Thursday, June 9, 2016

अजुनी रुसून आहेचे अक्षय भावगीत ... कवी अनिल .


साल होते १९१९. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन शिक्षणाच्या निमित्ताने अठरा वर्षे वयाचा एक हळव्या मनाचा उमदा तरुण पुण्यात आला. शालेय शिक्षण गावाकडे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यात येऊन थेट फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. किंचित अबोल स्वभावाच्या या तरुणाला तिथे जमवून घेणे थोडे कठीण जात होते.असेच दिवस पुढे जात राहिले आणि त्यांच दरम्यान पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकला असणारया तरुणीशी ओळख झाली. दोघात काही विलक्षण साम्य होते. दोघेही हळवे आणि कविमनाचे होते. दोघेही विदर्भातले. तो अकोला जिल्ह्यातला तर ती अमरावतीची. तो  मॅट्रिकपर्यंत मुर्तीजापुंरात तर तिचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालेले. पुढे तो पुण्यात आलेला तर ती मॅट्रिक व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुण्यातच होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.अगदी सच्चे आणि गहिरे प्रेम दोघामध्ये होते. पुढे ती नागपुरास गेलीतो पुण्यातच राहिला. अधून मधून भेटीगाठी होत राहिल्यापण मनातले बोल जास्त करून पत्रांतून व्यक्त व्हायचे. पत्रे इकडून तिकडून जात राहिलीइतकी की त्यावर नंतर सुंदर पुस्तक बनले. दोघेही कलाशाखेतून पदवीधर झाले. तिला नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळालेआणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची  विशेष शिष्यवृत्ती मिळवून ती इंग्लंडला गेली. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून ती १९२९ला भारतात परतली. तोवर हा तरुण कला शाखेची पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे गेलेला. भौगोलिक अंतर वाढलेले पण दोघांमधले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. दोघेही एकमेकाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस १९२९ ला त्यांचा विवाह झाला. त्याने पुढे विधीशाखेची पदवी घेतली अनेक मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली. दोघांचा स्वभाव हळवा आणि कवीमनाचा असल्याने दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत करत लेखन करत राहिले. तो कवितेवर जीव लावून होतातर कथा हा तिचा आवडता पिंड होता. सुखाचा संसार होत गेला. लग्नाला आता चांगली ३२ वर्षे झाली होती आणि प्रेमाची चाळीशी पार झाली होती. तिने तर भीमपराक्रम केला१९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती पहिली महिला अध्यक्ष झाली अन त्याला हाच मान १९५८ मध्ये मिळाला होता. प्रेमाने ओथंबलेल्या या दोघांनी आपल्या आयुष्यातली हे सर्वोच्च शिखर सर केले होते. आयुष्य आनंदाने व्यथित होत होते....

१७ नोव्हेंबर १९६१. एक हळुवार वारयाची झुळूक आली आणि तिची प्राणज्योत मालवून गेली. आयुष्याभराची सांगाती अशी अचानक निघून गेलीत्याना  हा धक्का कसा सहन झाला असेल त्याच्या मनात काय विचार आले असतील त्यावर त्याने एक अप्रतिम कविता लिहिली....
अजुनी रुसून आहे,... 
खुलता कळी खुले ना...
मिटले तसेच ओठ
की पाकळी हले ना !”       
हळव्या मनाचा तो कवी म्हणजे कवी अनिल होत.आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल. आणि ती म्हणजे कुसुमावती देशपांडे. पूर्वाश्रमीची कुसुम रामकृष्ण जयवंत.

डिसेंबर १९६१. अनिलांचा सांगाती हा काव्यसंग्रह मौज प्रकाशनने प्रकाशित केला. त्यामध्ये ही कविता समाविष्ट केली गेली. अशी पार्श्वभूमी असली तरी 'या कवितेचा कालखंड ऑगस्ट १९६१चा असून त्यांच्या पत्नीला उद्देशूनच मात्र तिच्या हयातीत ती  लिहिली असल्याचे'ही काही जाणकार सांगतात. पण यावर एकदा दस्तुरखुद्द कुमार गंधर्वांनीच पडदा टाकल्याचे वाचल्याचे स्मरते. 

आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केले. जिचा चाळीसएक वर्षे सहवास लाभला. ती निघून गेलीय. तिचा निष्प्राण देह शेजारी आहे. तिच्या त्या म्लान चेहऱ्याकडे बघून अनेक आठवणींचे काहूर मनात माजते. तो विचार करतो ही अशी का रुसून गेली आहे हा असला कसला रुसवा तिचा चेहरा असा का म्लान झाला आहे तिच्या चेहऱ्यावर नेहमीची ती दिलखुलास कळी खुलत नाहीये. ओठांच्या हळुवार पाकळ्या मिटून गेल्या आहेत अन त्या खुलता खुलेनात ! काय झालेय तिला ?

पुढच्या पंक्तीत तर ते आणखी भावविभोर होऊन जातात. मी समजूत करावी म्हणून तु रुसायचीस. मी हास म्हणताच रडता रडताही तु हसायचीस हा आपल्या रुसव्याफुगव्याचा प्रेमाचा शिरस्ता होता. पण आज तसं काही होत नाहीये. माझं समजावणं तुला आज पटत नाहीये. आज तु असा काही अबोला धरलायस की तुझ्याच्याने काहीच कसे बोलवेना !!

नंतरच्या पंक्ती त्या दोघांमधील अत्यंत उत्कट,निरागस,गहिऱ्या अन हळव्या प्रेमाच्या अल्वार श्रावणझडीचा प्रत्यय आपल्या डोळ्यात नकळत अश्रू उभ्या करून देतात. अश्रुंचा बांध डोळ्यात फुटला आहेपण हे अश्रू देखील आता अनंताच्या सागरात कुठे तरी विरणार आहेत म्हणूनच का  पापण्याचा आडोसा घेऊन तु दूर आहेस जीवाची अक्षरशः तगमग होतेयमनाची तडफड होतेय. काही चुकले असेल का अन त्याची काही अढी तर राहिली नसेल ना याचे अटीतटीने पोटतिडकीने द्वंद्व मनात चालू आहे. यावर आता उत्तर काहीही येवो पण आपल्या दोहोंमध्ये हे जे काही अंतर नियतीने पाडले आहे ते अंतर मिटविल अशी मिठी काही मला मारता येईना ! हे नियती मी किती दुर्दैवी आणि हतबल आहे कीमी इतकेही करू शकत नाही....
   
शेवटी ते परमेश्वरालाच विचारतात की हा तुझा तर काही गूढ डाव नाही ना ज्यामध्ये तु हे रुसव्याचे दृश्यभास माझ्यापुढे उभे करत आहेस. माझ्या काळजाचा ठाव घेण्यासाठीमाझ्या अंतरंगात डोकावून माझ्या प्रेमाची एखादी कसोटी तर तु घेत नाहीयेस ना अंतिम पंक्तीत ते पुन्हा तिला विचारतातहा असा कसा रुसवा धरला आहेसहा कसला अबोला आहे की ज्यात तुला आपले कोण कळेना ( तु त्या विश्वनिहंत्याच्या नादाला लागू नकोसतु रुसवा सोड परत येतुझा आपलं माणूस मी आहे. तो नाही. तुला आपलं माणूस कळायला पाहिजे) तेंव्हा तु हा रुसवा सोड. उसने अवसान आणून मी हे म्हणतोय खरे पण तु अजुनी रुसून आहेस अन तुझी कळी काही केल्या काही खुलत नाहीये.....

प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेऊन जातोअथांग प्रेमाची शांत शीतल अनुभूती देऊन जातो. कसलाही आक्रस्ताळेपणा नाही. ना कुठले अवडंबर ना शब्दांचे आकांडतांडव. जीवनातल्या अंतिम सत्याचे इतके मुग्ध शब्दांकन करून अंतर्यामातून भिजवून टाकणारे हे काव्य म्हणजे प्रेमकवितेतल्या भावभावनांचे सकळ आणि निर्मळ प्रकटीकरण आहे. नकळत डोळे कधी पाणावतात काही कळत नाही व आपणही कुठे तरी स्वतःला हरवून जातो.... 
   
कवी अनिल यांच्या सांगातीला रसिक वाचकांनी डोक्यावर घेतले. त्यातही रुसवा या कवितेला लोकांनी अगदी आपल्या हृदयाच्या कप्प्यात हळुवारपणे आजही जतन करून ठेवलेले आढळते. या नितांतसुंदर कवितेला भावगीतात प्रस्तुत करण्याविषयीच्या चर्चा सुरु झाल्यावर आनिलांनी अक्षरशः हट्ट धरला की पंडित कुमार गंधर्वच हे गातील अन्यथा विषय बाजूला राहू दया. पंडितजींनी होकार दिलागाणे गायलेसुद्धा आणि स्वतःच त्याला संगीत दिले. अशा रीतीने मराठी भावगीतांच्या माळेत गुलबकावलीचे हे भावगंधित सुमन गुंफले गेले.....

रुसवा ......
अजुनी रुसून आहे,... खुलता कळी खुले ना...
मिटले तसेच ओठकी पाकळी हले ना..
             .
समजूत मी करावीम्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताचरडताहि तू हसावे,
ते आज का नसावेसमजावणी पटे ना
धरीला असा अबोलाकी बोल बोलवेना ।

का भावली मिठाचीअश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीनेसुटता अढी सुटेना,
मिटवील अंतरालाऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाववरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठावबघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हाज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहेखुलता कळी खुले ना ।

कवी अनिल यांनी लिहिलेल्या अनेक कविता ह्या जणू शब्दगाभारयातल्या शीतल ज्योती आहेत ज्यात त्यांच्या हळव्या मनाचे अन भावोत्कटतेचे शीतल दर्शन होत राहते.

'बैस जवळि येबघ ही पश्चिमकोमल रंगी फुलली अनुपम',  'केळीचे सुकले बागअसुनिया पाणी कोमेजलि कवळी पानेअसुनि निगराणी',  ' कुणि जाल कासांगाल कासुचवाल का ह्या कोकिळा रात्री तरी गाऊ नकोखुलवू नको अपुला गळा...सांगाल का त्या कोकिळाकी झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली'…‘, 'पावसा पावसा थांब ना थोडा पिळून काढुन न्हालेले केस बांधु दे एकदा सैल अंबाडा'…’ ‘मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची ही अलिकडची,नदीच्या थडीची…’ या व अशा अनेक कविता लिहून मराठी कवितेत आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारया अनिलांची एक ओळख मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून असली  तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदीहा काव्यप्रकार देखील तितकाच मनोरम्य ठरला. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असतेतशाच धर्तीवरचे दहा काव्यपंक्तीत गुंफले गेलेले काव्य म्हणजे दशपदी !
  
एका संस्कारक्षम वयात काही वाचन होणे अनिवार्य असतेत्याशिवाय जीवनातील विविध अर्थ आणि सामाजिक जाणिवांच्या लक्षवेधी संवेदना याची खरी अनुभूती येत नाही. अशा वाचनाचा अविभाज्य अंग म्हणजे कविता. मला अशा कविता वाचायला मिळाल्या आणि त्यातून मी घडत गेलो हे माझे भाग्य समजतो....

आज कवी अनिल यांचा जन्मदिवस आहे. या अद्वितीय प्रतिभावंत कवीस त्रिकाल नमन. त्यांनी लिहिलं आणि पिढ्या मागून पिढ्या त्यावर वाढत गेल्या घडत गेल्या...

समीर गायकवाड.    

(वाढीव मजकूर - ६.६.२०१७ - मराठी साहित्यात "कुसुमानिलहा कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्यातल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या लग्नाच्या आधीची पत्रे यात समाविष्ट आहेत आणि १९७२ ला तो प्रकाशित झाला होता. कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांची पहिली दृष्टभेट २ जुलै १९२१ रोजी झाली आणि अनिल यांनी आपल्या प्रियेला लिहिलेल्या पहिल्या पत्राची तारीख होती- २ जुलै १९२२. आजच्या मोबाईल आणि चॅटिंगच्या जमान्यात प्रेमपत्रे किंवा चिठ्ठी याचे महत्व आजच्या पिढीला कळणार नाही. पण प्रेम भावना किती हळुवारपणे आणि नितळ शैलीत व्यक्त करता येतात याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. कवी अनिल सुरुवातीस या पत्रसंग्रहाच्या प्रकाशनाच्या विरोधात होते. आपल्या प्रेमभावना सार्वजनिक व्हाव्यात हे त्यांना पटले नव्हते. प्रकाशक ह.वि. मोटे यांनी त्यांचे मन वळवले आणि मग ते राजी झाले. योगायोग असा आहे की येत्या २ जुलैस 'कुसुमानिल'ची दुसरी आवृत्ती संगीतकार कौशल इनामदार यांची मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था याची दुसरी आवृत्ती नव्या रुपात प्रकाशित करत आहे.)

No comments:

Post a Comment