मऊसुत रेशमी अंगाचं पांढरं शिफट खोंडं होतो तेंव्हा धन्याने घोडेगावच्या बाजाराहून आणलं होतं तो दिवस अजून आठवतो. तेंव्हा गावात कैकांच्या शेतांनी मोट होत्या. पाऊसपाणी वेळेवर होत होतं. सगळ्यांच्या रानात औत ओढण्यापासून, नांगरट, कुळवण, मळणी आणि उसाची गाळणी अशी खंडीभर कामं असायची. त्या कामांसाठी बैल कमी पडायचे, मग एकमेकाचे बैल घेतले दिले जायचे. दावणीत तेंव्हा कधी टाचकं पडलेलं नसं. कडबा असायचा. पाऊसपाणी झालं की बाटूक असायचं, हिरवा गवत-घास असायचा. पाऊस आटला की भरडा- कडवळ. जेंव्हा औतं जोरात होते तेंव्हा धन्याने कधीकधी गुळपोळी सुद्धा खाऊ घातली होती.
कासऱ्याचं दोर अन नाकात वेसण होती पण तिच्यात रानटीपणा नव्हता. माया होती. मोट, गाडी ओढून ओढून कोवळे खांदे भरून आलं की धनी त्याच्या हाताने खांदे रातसारी मळायचा. पण वेसणीच्या ओढीनं नाक भरून यायचं. हनपटीने जोर लागायचा. कधी चिडलो की मातीत घट्ट खुरं रोवून उभे रहायचो तेंव्हा धनी जवळ जायचा, अंगावरनं अलगद हात फिरवायचा. तेंव्हा लई भारी वाटायचं. कामावर जुंपलं असतानाही थोडा वेळ विश्रांती द्यायचा. तेंव्हा बाजूने एखादा पोळ -वळू बैल मोकळा पळत जाताना दिसला की आभाळ जमिनीला टेकूस्तोवर त्याच्याकडे बघत राहावंसं वाटायचं. त्या दिवसांत सगळ्यांच्या शेतात ऊस, ज्वारी- बाजरी- मका- गहू सगळं पिकायचं पण हळू हळू दुष्काळ दर साली येत गेला. पाऊस कमी होत गेला, विहिरी कोरड्या ठाक झाल्या, तलाव आटत गेले. धन्याचं रान तर मुळातच पडीक बरड जमीनीचं होतं आणि पाण्याची बोंब बारमाही होती. आस्ते आस्ते आजुबाजुच्या शेतकरयाचीही अशीच स्थिती होत गेली. मग ज्याच्यापाशी सुबत्ता आहे त्याला बैलं रोजावर देणं सुरु झालं. त्यामुळे इतकी सोन्यासारखी बैलं लोकाच्या शिवारात न्हेऊन जुपावी लागतात याचं धन्याला दुःख होत होतं. त्याच्या बरड शेतात एके काळी जास्त करून ज्वारी-बाजरी आणि तुरीवरच जोर राहायचा त्यामुळे अगदी थोडंच काम असायचं, ते झालं की तो दुसरयांची शेतं गाठायचा, मिळेल ते काम करायचा. पण एकाबी जित्राबाच्या अंगाला चाबकाची वादी लागू देत नव्हता. आम्हा खोंडाची जेंव्हा धष्टपुष्ट बैलं झाली तेंव्हा अंग चांगलं भरून आले होते. ऐटदार मोठे वशिंड किंचित कलुन गेलं होतं. हातभर लांब टोकदार शिंगं शोभून दिसत होती. पाठीवर मस्त पन्हाळी तयार झाली होती. टणक रुंद पांढरया कपाळावरचे काळे राखाडी बारीक ठिपके उठून दिसत. डिरक्या मारताना बाजूचं जनावर दचकून जायचं, अंगात वारं भरल्यागत तरकटल्यावाणी करायचं पण धन्याने कधीही आमची चिडचीड केली नव्हती. गावातले लोक मात्र अशा बैलांच्या अंगातली रग जिरवण्यासाठी मुसळावर अस्ती ठेचून काढायचे अन वर हसायचे. पण आमच्या धन्यानं कधी रानटी वागणूक दिली नाही. ओझ्याचं काम नसलं तरी पुढ्यात वैरण द्यायचा अन स्वतः कुठं तरी कामाला जुपून घ्यायचा. असाच काळ पुढे जात राहीला. विहिरीच्या काठांवर धाडधाड आवाज करणारं पिस्टनवालं इंजिन आलं. विहिरीजवळच्या वाशावर शेडला बांधलेलं काळं लोटकं पकपक आवाज करू लागलं आणि बैलांचं एक काम कायमचं कमी झालं. काहींनी बैलं ऊस कारखान्याच्या कामाला लावले. उसाच्या गाडीवर लादला जाणारा टनाच्या मापातला ह्यो रग्गड ऊस बघून आम्हा बैलांच्या आधी आमच्या धन्याचीच छाती दडपून गेली. पर इलाज नव्हता ....
"बैलं किती दिस बसून ठीव्णार हायीस ?" असं कुणी विचारलं की तो उगाच मुंडकं हलवायचा पण त्यानं काय म्हणून आम्हाला उसाच्या गाडीला जुंपले नाही. मात्र त्यानं गाठीशी बांधलेला पैसा अडका संपला तशी त्याच्या घरात माणसांची अन इकडे चारयावाचून आमची आबाळ होऊ लागली. तब्येत ढासळू लागली. पोटं खाली गेली तेंव्हा त्यानं न राहवून ऊसतोडीला गाड्या जुंपल्या. त्या दिवशी तो मुक्याने रडत होता. आम्हाला सगळं कळत होतं. शेवटी तेही एक मरणच होतं, न चुकणारं ! मग सुरु झाला एका जीवघेण्या ओझ्याचा प्राणांतिक प्रवास ! रणरणत्या उन्हात चालायचं, तेही ओझ्याचा डोंगर अंगावर घेऊन. ना पाय दुखल्याची कैफियत न ओझ्याची तक्रार. वर तहान भूकेची रखरख, जोडीला चाबकाचा मार. तोंडातून फेस गळायचा, पायात जीव गोळा व्हायचा वर उन्हाच्या झळा लागायच्या, तरी चालावंच लागे. धडधाकट असेपर्यंत गाडी ओढावीच लागे. का आणि किती कष्ट उपसायचे याला अंत ना पार..धनी चारा खाऊ घालो न घालो कामाला तर जुंपुन घ्यावेच लागे. नांगर असो बैलगाडीचे जू वा असो घाणा की मोट ! स्वरूप काहीही असलं तरी काम तेच ! ओझं ओढणे, फक्त आणि फक्त ओझं ओढणे…त्यातून सुटका नव्हती !
विसाव्यासाठी गोठ्यात बसायला मिळायचे दिवस आठवले तरी बरे वाटे, बांधावरच्या झाडाखालची विश्रांती स्वप्नात येते. गावातली ती सवयीची कामे आठवतात. ऊस गाडीवरचं काम मात्र नको वाटतं. ऊसानं भरलेली गाडी ओढायला कसे तरी वाटतं. डांबरी सडकांवरनं पाय घसरायचे. खूरात नाल ठोकून घ्यावी लागली, फार वेदना व्हायच्या तरी चालावं लागलं. शहरात रस्त्यांच्या कडेनं झाडंही नसतात. भर उन्हातच थांबावं लागलं, तिथली रात्र संपू नये असे वाटायचं कारण रात्रीच काय ती थंड हवा मिळायची. ऊसाच्या ढिगारयावर गाडीवान अन त्याचा कबिला, जोडीला पाठीशी चाबकाची ढोसण असायची. रस्त्यानं सिग्नल कधी लाल असायचे तर कधी ट्राफीक जाम. तेंव्हा प्राण कंठात येत. कधी कोणी फटाके उडवायचा तेंव्हा जीवाची पाखरं कानात गोळा होत, काळीज फाटल्यासारखं व्हायचं. कधी कोणी पोर ऊस उपसायचा तेंव्हा फटक्याची बरसात आमच्या अंगावर होई. कातड्याला खूप रग यायची. डोळ्यातून पाण्याची धार वाहू लागे, तोंडातून फेसाची वेणा येई, वशिंड भरून येत. थांबत थांबत एकदाचे कारखान्यावर पोहोचत असू पण तिथे पोहोचल्यावर काही खावंसं वाटत नसं. पाचटाला जरा सुदीक तोंड लावावं वाटत नसं.....
खेप टाकून झाली की परतीच्या रस्त्याला मोकळ्या अंगानं लागत असू. तेव्हढाच काय तो कमी ओझ्याचा प्रवास. पुन्हा ऊसतोड अन पुन्हा कारखाना अशा अनेक फेऱ्या व्हायच्या. ऊसाचा हंगाम संपला की गावाकडे रवाना होत असू. शेतशिवारातल्या झाडांची सावली तेंव्हा आमच्या अंगावरून मायेचा हात फिरवायची, मोकळी हवा नाकातोंडातून थेट काळजापर्यंत भिनत असे. मग कुणाच्याही रानात नांगरणी वा पेरणीचे कोणतेही मशागतीचं काम असलं तरी जीव दमत नसे. धनी समोर असल्यावर तर अंगी दहा हत्तीचे बळ येई. पावसाळा आला की चिखल लई जीव खायचा. असेच किती तरी दिवस जात राहिले. काही केल्या दुष्काळ सरला नाही पर आमची उमर मात्र सरली. ऊन,पाऊस, थंडी जशी चालू राहिली तसे कष्टही चालू राहिले. नाही म्हणायला दरसाली पोळा यायचा अन धन्याचा, बळीराजाचा ऊर भरून यायचा. तो एक आगळंच सुख देऊन जाई.
काळ आणखी पुढे जात गेला. वय वाढत गेलं. कानावर बरेवाईट ऐकायला येऊ लागलं. एव्हाना ओझे वाहून खांद्याला जखम झालेली होती. पायातली ताकद संपलेली होती. पोट आत गेलेलं. कवळाभर असणारया गर्दनी बारीक झालेल्या. दांडग्या लट वशिंडी खंगून गेल्या. शेपट्या बारीक झालेल्या, फरयाचं मास गळून गेलेलं. बरगडयासकट सगळी हाडं वर आलेली. डोळे उघडावेसे वाटत नव्हते, सतत अश्रू वाहायचे. नाकातोंडा भोवती माशा घोंघावत राहत. शिंगं देखील नंतर जड झालेली. तरीही नसा ताणून काम करायचो. पाय उचलत नसले तरी नेटाने पावलं टाकायचो, गुडघे मोडून यायचे आणि अंगावरचं रेशमी कातडं लोंबू लागायचं, पाय तळावून जायचे. डोळं तांबारल्यागत लाल व्हायचे. नाकातोंडाला फेसाचे ओघळ लागत. असं करता करता अंगभर गोचीड गोमाशा झालेल्या. नख्या भरून आलेल्या, खांदा अवघडून जाऊन जाऊन गाठी झालेल्या. ऊर भरून भेंडाळल्यागत झालेलं, सापतीत अडकवलेली मान फासाला लटकल्यागत वाटू लागलेली.
आताशा थकून जीव गलितगात्र झाल्यावर मात्र काहीच काम लावलं जात नाही पण आता जीवही लागत नाही. भुकेकंगाल झालेला धनीही आता जवळ येत नाही. लांबूनच बघून डोळे पुसत राहतो. मायेचा हात पाठीवरून फिरत नाही. मनोमन दुःखी कष्टी राहतो. दावणीची ओढ आता संपत आलीय. गोठ्यातदेखील श्वास गुदमरु लागलाय. धन्याच्या घरात चाललेली भांडणं कानावर येतात, आम्हाला असंच जगवत राहायचं की विकून चार पैसे जमवून त्यात घरातलं किडूक मिडूक विकून एखादं नवं खोंड घ्यायचं यावरून वाद सुरु झालेला. धनी म्हणतो बैलं जगवायची. पर घर कसं चालवायचं याचं उत्तर त्याला देता येत नाही. घरातले आवाज चढत जातात त्यात धन्याचे मुके अश्रू स्पष्ट ऐकू येतात तेंव्हा आपला जीव नकोसा होतो. धन्याने आपल्याला गुपचूप नेऊन कसायाच्या हाती दिलं तर आपलीही सुटका होईल आणि त्याचं घरही चालेल असं वाटायचं. पण आम्हा अश्राप जीवांना माणसासारखी वाणी कुठं ?
एके दिवशी उफ़ानलेल्या संध्याकाळी धनी अवचित जवळ येउन ऊर फाटेपर्यंत रडून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वच्छ आवरून सावरून भाकडांची लपून छपूनची अखेरची वारी सुरु झाली. 'आपण होतो तोवर तरी धन्याला जीव द्यायची वेळ येऊ दिली नाही' मनातलं हे समाधान फार मोठं होतं. जनावरांच्या 'त्या' कसाईबाजारातली बोली आम्हाला नसते तर आमच्या वजनाला असते. त्या पैशात धन्यानं इकडून तिकडून गोळा केलेले पैसे घातलेत. त्यातून एक नवे खोंड पसंद केलेय. एव्हाना आमचा सौदा झालेला. धन्यापासून हलू वाटत नाही. त्याचे पायही उचलत नाहीत. शेवटी धोतराच्या सोग्याने डोळे पुसत तो तिथून निघतो. मग आमचा खरेदीदार आम्हाला अक्षरशः फरफटत ओढत नेत असताना धुरकटल्या डोळ्यांनी न राहवून मागं वळून पाहिलं तर नवीन खोंड घेऊन परतवाटेला लागलेला हिरमुसलेल्या चेहऱ्याचा धनी दिसला. धन्याला आणि त्याच्या सोबतच्या त्या कोवळ्या खोंडाला बघून काळजात कल्लोळ झाला. त्या खोंडाचं आयुष्यही असंच जाणार का ? हा विचार कासावीस करून गेला.
- समीर गायकवाड
( ऊसतोडीला जुंपलेल्या समग्र बैल गोतास हा ब्लॉग अर्पण करतो.... बैल हे आपले गण गोतच लागतात आपण त्यांचे ऋणको ! )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा