रविवार, १९ जून, २०१६

शिवसेना - वाघाची पन्नाशी ! - एक आलेख ....



५ जून १९६६च्या मार्मिकच्या अंकात एक आवाहन छापून आले होते. "यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा !"१९ जून १९६६ ला 'मार्मिक'चा पुढचा अंक आला आणि त्यातील आवाहन वाचून मुंबईकर भारावून गेला त्याने तुफान प्रतिसाद दिला ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले ! प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना झाली. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या वचनाप्रमाणे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ६ वर्षांनंतर म्हणजेच १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. याचं पुढचं पाऊल म्हणून एक महिन्यानंतरच्या १९ जुलै १९६६च्या मार्मिकच्या अंकात प्रसिद्ध झालेलं मराठी मनाचं प्रतिबिंब असणारं दहा कलमी शपथपत्र सर्वसामान्य लोकांना प्रचंड भावलं आणि लोकांची खात्री पटली की शिवसनेचे लोक आपल्या मराठी माणसासाठीच लढणारे अन झटणारे शिवसैनिक आहेत.लोक आतुरतेने आता सहभागाच्या संधीची वाट बघत होते कारण शिवसेनेचं जनमानसापुढचं बारसंच तेव्हढं बाकी राहिलं होतं

लोकांना ज्याची प्रतिक्षा होती तो ऐतिहासिक दिवस उजाडला ! तो दिवस होता ३० ऑक्टोबर १९६६ चा, विजयादशमीचा ! मुंबईच्या शिवाजी पार्ककडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिलंगणाचं पहिलं सोनं लुटण्याचा दिवस. मुंबईतला सारा मराठी माणूस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटला ! गर्दीचे लोंढे सुरूच होते. तब्बल चार लाख लोक या सभेला उपस्थित होते ! तरीही लोकांचे जत्थेच्या जत्थे येतच होते अन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती ऐतिहासिक सभा सुरु झाली.
व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह श्रीकांत ठाकरे, रामराव आदिक, प्रा. स. अ. रानडे, अॅड. बळवंत मंत्री आणि प्रबोधनकार ठाकरे उपस्थित होते. शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजात महाराष्ट्र गीत सुरू झालं आणि मराठी जनसमुदायाच्या अंगावर रोमांच फुलले !

प्रबोधनकारांचं ते ऐतिहासिक ठरलेलं वाक्य याच सभेतील ! प्रबोधनकार म्हणाले, ‘माझा बाळ आज मी अवघ्या महाराष्ट्राला देत आहे!’ त्यानंतर भाषण झालं ते शिवसेनाप्रमुखांचं. घोषणांच्या आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात शिवसेनाप्रमुखांनी तोफा डागायला सुरुवात केली. अवघा मराठी माणूस एकेक शब्द मनात साठवू लागला आणि त्याचं रक्तही तापू लागलं…. बाळासाहेब म्हणाले… ‘मराठी माणूस जागा झाला आहे.. यापुढे तो अन्याय सहन करणार नाही ! राजकारण हे गजकर्णासारखं असतं. त्यामुळे शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करील! ही संघटना मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी झगडणार असली तरी जातीयवाद नाही ! मराठी माणसाशी संकटकाळातही जो मैत्री करतो तोच मराठी !'
बाळासाहेबांनी मराठी मने चेतवली. शिवाजी पार्कवर एकच कल्लोळ झाला ! मराठी माणूस जागा झाला आणि….. शिवसेनेचा जन्म झाला !

शिवसेना स्थापन झाली आणि मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात जणू एक मराठी झंझावात आला. मराठी मंडळं, संस्था, गणेशोत्सव मंडळं, दहिकाला उत्सव समिती, व्यायामशाळा यातील जिगरबाज मराठी तरुणांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळालं…. ‘मार्मिक’ तर ‘मराठी’ यज्ञ चेतवतच होता. त्यात धडाका सुरू झाला बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचा. बाळासाहेबांचे तिखटजाळ शब्द मराठी माणसांना भिडू लागले. प्रबोधनकारांचा व्यंगचित्रकार पुत्र एवढीच ओळख जणू ‘बाळ ठाकरे’ यांना अमान्य होती. सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार आणि जे पटत नाही त्याच्यावर जबरदस्त शरसंधान हे बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील भन्नाट मिश्रण मराठी माणूस डोक्यावर घेऊ लागला. त्याला नर्मविनोदाची जोड मिळाल्यानंतर तर बाळासाहेबांची गणना महाराष्ट्रातील उत्कृष्ट वक्त्यांत केली जाऊ लागली. वक्तृत्वाची अन लेखनाची तप्त भट्टी जमू लागली. मार्मिक, तडाखेबंद भाषणे आणि मराठी माणसांची होणारी कोंडी, हे रसायन खदखदलं आणि ठाणे पालिका निवडणुकीत या मराठी असंतोषाचा पहिला स्फोट झाला ! १९६७ साली लोकसभा निवडणुकीत राजकीय डावपेचांचे पहिले शड्डू ठोकून झाल्यानंतर ठाणे पालिका निवडणुकीत शिवसेना वाजत-गाजत उतरली. शिवसेनेचे निवडणुकीतील पहिले पाऊल ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पडले. १३ ऑगस्ट १९६७ रोजी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती. लोकांची नागरी कामे झटपट व्हावीत म्हणून शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक लढवण्याचे ठरवले. या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी मतदान केले. १४ ऑगस्ट रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. एकूण ४० जागांपैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेच २१ नगरसेवक निवडून आले आणि शिवसेना सत्तेवर आली. या विजयाने शिवसेनेने पुढच्या झंझावाताची चुणूक आनंदलेल्या मराठी मनाला आणि मराठीद्वेष्ट्यांना दिली.

मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायानंतर बाळासाहेबांनी याच वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान अमराठी नेते कृष्ण मेनन यांच्याविरोधात मराठी नेते स.गो. बर्वे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. शिवसेनेच्या पाठिंब्याने स.गो. बर्वे हे विजयी झाले. याच काळात शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पहिला मोर्चा २१ जुलै १९६७ रोजी महाराष्ट्र विधानसभेवर काढला होता. या विराट मोर्चाचे नेतृत्व बाळासाहेबांनी केले होते. याच वर्षी बाळासाहेबांनी इतर प्रश्नातही लक्ष घालण्यास सुरुवात केली होती..महाराष्ट्रराज्य निर्मिती सुमारास 'महाजन कमिशन'ने सीमा भागातील काही मराठी भाग कर्नाटकला देऊन टाकला होता. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, खानापूर हा सर्व प्रदेश सुमारे दहा लाख मराठी भाषिकांचा होता. हा प्रदेश महाराष्ट्रात यावा म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश येत नव्हते. अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्नासाठी शिवसेना रणकंदन करेल असे स्पष्ट शब्दात सांगितले आणि १९६७ मध्ये बेळगाव-कारवारचा प्रश्न शिवसेनेने प्रथम हातात घेतला. दोन पाऊले आणखी पुढे जात त्यांनी कामगार बांधवांना देखील आपल्या चळवळीत सामील करून घेतले. ९ ऑगस्ट १९६८ या क्रांती दिनी नरेपार्कवर भरलेल्या जाहीर सभेत हजारो श्रोत्यांच्या साक्षीने शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचा चक्रांकित ध्वज फडकावला. "शिवसेनेची भारतीय कामगार सेना ट्रेड युनियनिझम हा आपला धर्म मानील. कामगारांच्या हिताचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करेल. युनियनचे काम फक्त कामगारांसाठी झाले पाहिजे," असे या वेळी बाळासाहेबांनी ठणकावले होते.

बाळासाहेबांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सीमाप्रश्नावर १९६९ साली शिवसेनेचे तीव्र आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन करण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांनी केंद्र सरकारला हा प्रश्न सोडवण्याची संधी दिली. २० जानेवारी १९६९ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना शिवसेनाप्रमुखांनी पत्र पाठवून २६ जानेवारी १९६९ पर्यंत प्रश्न सोडवला गेला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला. पंतप्रधानांकडून हा प्रश्न सोडवला जाण्याची शिवसेनाप्रमुखांची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. त्यानंतर सीमाप्रश्नावर मुंबईतील आंदोलन तीव्र झाले. आजही सीमाप्रश्नावर सेनेने आपल्या भूमिकेत तसूभरही बदल केला नाही. उलट इतरांनी अनेक कोलांट्या मारल्या आहेत.

मुंबईमधील इतर पक्षांच्या राजकारण्यांनी एव्हाना शिवसेनेचा धसका घ्यायला सुरुवात झाली होती. तसं बघितलं तर बाळासाहेबांकडे कोणतीही बादशाहत नव्हती वा कुठला समृद्ध सत्तेचा राजकीय वारसा होता ! पण गर्दीवर त्यांची अफाट हुकुमत होती. सभा कशी गाजवावी अन वक्ता दशसहस्त्रेषु म्हणजे काय याचे ते धगधगते प्रतिक होते. भाषण करतानाची देहबोली कशी असावी याचा अप्रतिम वकूब त्यांच्याकडे होता. पांढरा कुर्ता, पांढरी विजार आणि खांद्यावर पांढरी शुभ्र शाल पांघरलेल्या रुबाबदार वेशात ते सभेला सामोरे जात. डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा आणि कपाळावर रुळणारे केस,गळ्यातली स्थिर रुद्राक्ष माला, तीक्ष्ण नजर, धारदार आणि विलक्षण जरब बसवणारा आवाज !
खांद्यावरील शालीशी चाळे करत ते सभा सुरु करत..
त्यांचे पहिले वाक्य ठरलेले असे, " जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो !"
सभा सुरु होई आणि तिथून पुढे ते समोर बसलेल्या लाखोंच्या समूहाला अक्षरशः झपाटून टाकत. टाळ्या,शिट्या आणि चित्कार यांनी सभेचे मैदान दणाणून जात असे...
बाळासाहेबांच्या सभा अशा होत गेल्या की त्यांची ख्यातीच अशी झाली की, 'माणसे झपाटून टाकणारा एक अफाट माणूस !' आजच्या घडीला काहींना त्यांचे विचार पटतील न पटतील पण त्यांचे अलौकिक व्यक्तीविशेषत्व कोणीही नाकारू शकत नाही हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे व विचारधारेचे ढळढळीत यश होय.
कालांतराने मराठी मुलखाबाहेर देखील बाळासाहेबांची ओळख 'मराठी मातीचा, मराठी मनाचा, मराठी बाण्याचा अन ताठ कण्याचा दिलदार माणूस' अशीच राहिली. कारण ते वैरयाला देखील आपल्याला भेटू देत हे जावेद मियांदाद प्रकरणातून अधोरेखित झाले ! त्यांना एकदा पाहिले वा भेटले की माणूस मंत्रमुग्ध व्हायचा. असं काय होतं बाळासाहेबांमध्ये ? बाळासाहेब म्हणजे डोक्यातून न जाणारा अन काळजाचा ठाव घेणारा माणूस !

आपल्या आयुष्याचे अग्नीकुंड करून मराठी मने पेटती ठेवणारा माणूस ! पिचलेल्या मनगटात जोर भरणारा अन खचलेल्या मनात जोश भरणारा माणूस ! काळजातली रग अन मेंदूतला राग यांचे अनोखे मिश्रण तेवते ठेवणारा जिंदादिल माणूस ! काही दशकानंतर बाळासाहेब ठाकरे हे येणारया पिढ्यांसाठी दंतकथा बनून गेले असतील यात शंका नाही. बाळासाहेब हे शिवसैनिकांचा प्राण होते तर शिवसैनिक हे त्यांचा श्वास होते असं अतूट नातं असणारा दुसरा कुठला पक्ष महाराष्ट्रात अजून झालेला नाही.

बाळासाहेबांच्या करिष्म्याने ठाण्यावर भगवा फडकवल्यानंतर मुंबईकरही इरेला पेटला अन मुंबईत नवा इतिहास घडला. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत १९६८ साली पहिल्याच फटक्यात धडाकेबाज यश मिळवलं. या पहिल्याच चढाईसाठी शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाबरोबर युती केली होती. प्रा. मधू दंडवते यांच्या पुढाकाराने प्रजा समाजवादी पक्षाने शिवसेनेपुढे मैत्रीचा हात पुढे केला आणि शिवसेना देईल तेवढ्याच जागा लढविण्याची अटही मान्य केली. शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्ष या युतीची पहिली जाहीर सभा झाली ती २८ जानेवारी १९६८ रोजी कामगार मैदानावर. या सभेत भाषण करताना प्रा. मधू दंडवते म्हणाले, “सध्या देशातील विविध राज्यांत प्रादेशिक भावना उफाळून आल्या असून, त्यांना समजून घेतलं पाहिजे, शिवसेना हा राष्ट्रहितावर संपूर्ण निष्ठा असलेला पक्ष आहे.”

शिवसेना-प्रसप युतीला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि एक प्रकारे काँग्रेसच्या राजवटीवरचा आपला असंतोषच वैफल्यग्रस्त मराठी युवकांनी व्यक्त केला. शिवसेनेने पदार्पणातच ४२ जागांची मुसंडी मारली ! युतीतील भागीदार प्रसपला ११ जागा मिळाल्या. राजकारणात युतीची शक्ती बाळासाहेबांनी प्रथमच वापरून ती यशस्वीही करून दाखविली ! या काळात अनेकांनी शिवसेनेला 'वसंतसेना' म्हणून हिणवायचा प्रयत्न केला हे आवर्जून सांगावे वाटते.

काही लोक शिवसेनेवर आणि तिच्या हिंदुत्वावार टीका करताना हा मुद्दा सेनेने राममंदिर आंदोलनातून उचलला असल्याची बालिश टीका करतात. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांचे हिंदुत्वाशी नाते शिवसेना-भाजपा युतीमुळे जडले, असाही एक समज आहे. मात्र त्यांना बहुधा इतिहास नीट माहिती नसावा. १९७० सालीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खरे तर हिंदुत्वाचा बिगुल वाजवला होता. परळमध्ये सर्वप्रथम विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेने प्रिं. वामनराव महाडिक यांना रिंगणात उतरवले. त्या वेळी जनसंघ, हिंदू महासभा अशा स्वतंत्र पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. ही पहिली-वहिली विधानसभा निवडणूक शिवसेनेने जिंकली आणि बाळासाहेब म्हणाले की, “आमचा विजय हा हिंदुत्वाचा म्हणजेच पर्यायाने खऱ्या राष्ट्रीयत्वाचा विजय आहे. हिंदू असल्याची आम्हाला जराही लाज वाटत नाही.” त्यापुढच्या काळात १९८७ मधील विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची तुतारी अधिक त्वेषाने फुंकून जिंकली आणि तेथूनच शिवसेनेचा हिंदुत्वाचा पुकारा सुरू झाला जो पुढे इतरांनी अंगीकारला. म्हणजेच शिवसेना-भाजपा युतीचे धागे हिंदुत्वाच्या पटावर घट्ट होण्याआधीच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची ध्वजा फडकावली होती. यथावकाश मग जनतेने त्यांच्या शिरी ‘हिंदुहृदयसम्राट’ हा मानाचा मुकुट चढवला !

मुंबईतल्या यशाने बाळासाहेबांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी सीमाप्रश्न आंदोलन अधिक तीव्र केले. २७ जानेवारी १९६९ रोजी केलेल्या सत्याग्रहाच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला जणू 'सैन्य चालले पुढे' अशी हाकच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. त्याप्रमाणे सीमावासीयांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. माहीम, शिवाजी पार्क, पोर्तुगीज चर्च, प्रभादेवी आणि वरळीच्या नाक्यांवर सत्याग्रहींच्या तुकड्या उभ्या राहिल्या. वरळीपर्यंत पाच ठिकाणी सत्याग्रहींनी ना. यशवंतराव चव्हाणांची गाडी अडवली. सीमाप्रश्नाचे हे आंदोलन सुरू असतानाच फेब्रुवारी १९६९ मध्ये भारताचे उपपंतप्रधान ना. मोरारजी देसाई मुंबई येणार असल्याचे जाहीर झाले आणि शिवसेनेने त्यांची गाडी अडवून त्यांना निवेदन देण्याचे ठरवले. मोरारजी देसाई रात्रीच्या वेळी मुंबईत आले. त्यांची मोटार अफाट पोलीस बंदोबस्तात कोठेही न थांबता अक्षरशः भरधाव वेगाने माहीम येथे शांततेत निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांना उडवून, जबर जखमी करून निघून गेली. मोरारजींच्या उर्मट अरेरावी वृत्तीमुळे आणि पोलिसांच्या विश्वासघातामुळे शिवसैनिक भडकले. लालबाग, दादर येथे भीषण रणकंदन माजले. मोरारजी देसाई यांची गाडी अडवली त्याच दिवशी रात्री उशिरा बाळासाहेबांच्यासह काही नेत्यांना अटक करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांसह अटकेतील नेत्यांना पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पहाटे नेण्यात आले. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि नेहमीचे मार्ग टाळून या नेत्यांना पहाटेच पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. या आंदोलन प्रसंगी नेत्यांसह शेकडो शिवसैनिकांनाही पकडून वेगवेगळ्या तुरुंगांत डांबण्यात आले होते.

बाळासाहेबांच्या अटकेनंतर ७६ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली. येरवड्यात त्यांना एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक देण्यात आली. त्यामुळे बाळासाहेबांच्या सुटकेनंतर मराठी माणसाचे मन उचंबळून आले. त्यानंतर शिवसेनेची अत्यंत विराट सभा शिवतीर्थावर झाली. त्या सभेत बोलताना सर्वच वक्ते भावनाप्रधान झाले होते. शिवसेनेच्या सीमाभागाच्या या तीव्र आंदोलनामुळे सीमाप्रश्नाला फार मोठी गती मिळाली. अटकेत असताना बाळासाहेबांनी लिहिलेलं 'गजाआडील दिवस' हे पुस्तक त्या काळच्या राजकीय, भाषिक व सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकते. या आंदोलनातील तरुणांचा वाढता सहभाग पाहून बाळासाहेबांनी १० ऑगस्ट १९६९ रोजी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना केली. या काळात त्यांची लोकप्रियता सहन न झालेल्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याच वर्षी नागपूर येथील सभेकडे जातानाच्या प्रसंगी काही गुंडांच्या टोळक्याने शिवसेनाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला केला. मात्र शिवसेनाप्रमुखांबरोबर असलेल्या अवघ्या तीनच शिवसैनिकांनी परिणामांची तमा न बाळगता त्या टोळक्याला खरपूस समाचार घेतला व या टोळक्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. दुसरी घटना माहीमची होती . माहीम चर्चजवळ बाळासाहेबांच्या जीवावर बेतले होते, त्या वेळी त्यांनी प्रसंगावधान राखून जमावावर रिव्हॉल्व्हर रोखले होते.

या सर्व काळात सेनेला सर्वात जास्त राजकीय विरोध कम्युनिस्ट पक्षाकडून होत होता. शिवसेना प्रखर राष्ट्रवादाच्या आधारे लालबावट्याशी कडवी झुंज देत होती. ५ जून १९७० रोजी एसएससीचा निकाल जाहीर होणार होता. याच दरम्यान आमदार कृष्णा देसाई यांचा मुंबईत निर्घृण खून झाला. कृष्णा देसाई हे शिवसेनेचे विरोधक होते, परंतु वैरी मात्र नव्हते. त्यामुळे व्यक्ती गेली, भांडण संपले अशी भूमिका शिवसेनेची होती. मात्र कृष्णा देसाईंच्या हत्येत सहआरोपी म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. परंतु काही काळाने शिवसेनेवरील संशयाचे ढग दूर झाले. असं असलं तरी कृष्णा देसाई हे देखील मराठी माणसापैकीच एक होते हा मुद्दा नजरेआड करता येत नाही शिवाय या घटनेच्या जेमेतेम दोन वर्षे आधी सेनेने कामगार संघटना उभी केली होती या योगायोगाचे स्पष्टीकरण सेना कधीच देऊ शकली नाही ! कृष्णा देसाई हत्येनंतर रिक्त झालेल्या परळ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रिं. वामनराव महाडिक यांचे नाव जाहीर केले आणि त्यांना मते देऊन शिवरायांचा भगवा विधानसभेत फडकवा, असे आवाहन शिवसेनाप्रमुखांनी मतदारांना केले. या निवडणुकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई आणि शिवसेनेचे वामनराव महाडिक यांच्यात लढत झाली. सरोजिनी देसाई यांना नऊ राजकीय पक्षांनी पाठिंबा असूनही या पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक विजयी झाले.

दरम्यानच्या काळातच सेनेच्या रक्तरंजित इतिहासाला सुरुवात झाली. नायगावचे शिवसैनिक सदाकांत ढवण यांचा २६ जून १९७० रोजी दुपारी दोघा इसमांनी नेहरूनगर येथे सुऱ्याने भोसकून खून केला. ढवण यांच्या मृत्यूच्या वार्तेने सारी मुंबापुरी ढवळून निघाली. क्षणार्धात वातावरण तंग आणि तप्त झाले. प्रक्षुब्ध शिवसैनिकांचे तांडेच्या तांडे रस्त्यावर आले. मुंबई बंदची हाक न देताही दुकाने भराभर बंद झाली. आजही अधूनमधून वर्षाकाठी शिवसैनिकांच्या हाणामाऱ्याच्या बातम्या कानी येतात. पंक्चर काढणारया पासून ते हमाली करणाऱ्यापर्यंत अन विद्यार्थ्यापासून ते वृद्धांपर्यंत एकच भावना बाळासाहेबांनी रुजवली ती म्हणजे - 'जीव का जाईना पण पक्ष शिवसेना !' १९८९ मध्ये मात्र या रक्तपाताची दुसरी बाजू श्रीधर खोपकर हत्याकांडाने बघायला मिळाली.

या काळात काही टीकाकार सेनेवर वेगळीच टीका करू लागले. त्यांचा रोख होता शिवसेनेच्या मुंबईच्या पट्ट्याबाहेरील सेनेच्या अस्तित्वाबद्दलचा ! पण बाळासाहेबांनी त्यांचेही दात लवकरच घशात घातले. बाळासाहेबांनी आपल्या कक्षा रुंदावून दाखवल्या ! त्याची सुरुवात त्यांनी मराठवाड्यापासून केली कारण मराठवाडा आणि शिवसेनेचा एक खास जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुंबई आणि ठाणे वगळता शिवसेनेला आपल्या राज्यव्यापी अस्तित्वाची आणि भविष्यातील वाटचालीची जाणीव जर कुठल्या प्रांताने करून दिली असेल तर ती मराठवाड्याने. १९८५-८६ साली औरंगाबाद शहरात शिवसेनेची फक्त एक शाखा होती. पण मराठी अस्मितेची मशाल पेटविण्यात शिवसेना नेते यशस्वी झाली आणि मराठवाड्यातील गावागावांत अस्वस्थ असलेला बेरोजगार मराठी तरुण उत्स्फूर्तपणे शिवसेनेच्या शाखा स्थापन करू लागला. मराठवाड्यात गावागावांत भगवा फडकावला जात होता आणि ‘मातोश्री’तील हिंदुहृदयसम्राटाला हत्तीचं बळ मिळत होतं. या धडाक्याची सुरुवात शिवसेनेने बरोबर दोन वर्षे आधी म्हणजे १९८४ साली मुंबईतील राज्यव्यापी अधिवेशनात केली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे १९८५ साली शिवसेनेचं राज्यव्यापी दुसरं अधिवेशन कोकणात महाडमध्ये वाजत-गाजत झालं. शिवसेनाप्रमुखांनी या अधिवेशनात दिलेला नारा होता, 'आता घोडदौड महाराष्ट्रात' !
१९८६ साली शिवसेनेने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात आयोजित केला. ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घर तिथे सैनिक’ हा शिवसेनेचा अघोषित एककलमी कार्यक्रम होता.
शिवसेनेने या काळात आयोजिलेल्या भगव्या सप्ताहानंतर राज्यात शिवसेनेच्या २० हजारांहून अधिक शाखा स्थापन झाल्या. या शाखांचाच पुढे विस्तार झाला. घराघरांत शिवसेनेचे कट्टर सैनिक निर्माण झाले !

या काळात अशीही टीका सुरु झाली की, 'या आंदोलनाने केवळ शिवसेनेचेच हित साधले गेले, सामान्य मराठी माणूस आहे तिथेच राहिला.' पण वस्तुस्थिती तशी नव्हती तर मराठी माणसाचा टक्का शिवसेनेमुळे निश्चितच वाढला ही गोष्ट आकडेवारी देखील कबुल करते. भारतीय कामगार सेनेच्या आधारे सेनेने हळूहळू मुंबईच्या कामगार क्षेत्रात आपले बस्तान बसवले. ‘टी. माणेकलाल’, ‘एल अॅन्ड टी’, ‘पार्ले बॉटलिंग’ अशा कंपन्यांत भारतीय कामगार सेनेने आपली ताकद दाखवून दिली. मात्र तरीही हे वर्चस्व पुरेसे नाही तर मुंबईतील हजारो कंपन्यांत मराठी कामगारांचा टक्काही वाढला पाहिजे, असे शिवसेनाप्रमुख वारंवार बोलून दाखवत.

या पार्श्वभूमीवर मग बँक, विमा कंपन्या आणि अन्य सार्वजनिक उपक्रमांमध्ये भूमिपुत्रांचा आवाज उठविण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. हे वर्ष होतं १९७२ ! लगेचच रिझर्व्ह बँकेपासून भारतीय आयर्विमा महामंडळ, बँक ऑफ बरोडा आदी ठिकाणी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समित्या स्थापन झाल्या. नोकऱ्या, बदल्या व बढत्यांमध्ये मराठी भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे का, त्यांना हेतुपुरस्सर डावलले जात आहे का, हे या समित्या डोळ्यांत तेल घालून पाहत. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. सुशिक्षित मराठी भगव्या झेंड्याखाली एकवटू लागला. पुढच्या दहा वर्षांत समितीचं काम दिसू लागलं. विविध उपक्रमांत २५ टक्क्यांवर असलेला माणूस मग ८० टक्क्यांवर वाढला. स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजे मराठी माणसाचा आवाज झाला. १९९० साली शिवसेनेने प्रथमच राज्यभरात आपले उमेदवार उभे केले तेव्हा मराठवाड्यापर्यंत पोहोचले ते स्थानीय लोकाधिकार समितीचेच कार्यकर्ते. प्रचार कसा करायचा याचं तंत्र या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या खेड्यापाड्यांतील शिवसैनिकांना शिकवलं.

"टीकाकारांना काय बोंबलायचे आहे ते बोंबलू द्यात तुम्ही आपलं काम निष्ठेने करत राहा, आपला भगवा मंत्रालयावर फडकल्याशिवाय राहणार नाही !"असं बाळासाहेब नेहमी म्हणायचे ते खरं होण्याचा काळ जवळ आला होता, साल होतं १९९५चं ! या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. त्यामुळे १९९५-१९९९ हा काळ शिवशाहीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. शिवशाहीचे सरकार महाराष्ट्रात आल्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले. शिवसेना-भाजपा युतीला १३४ जागी विजय मिळाला. काँग्रेसला केवळ ८४ जागी यश मिळाले. काही अपक्षांच्या मदतीने मंत्रालयावर भगवा फडकणार हे स्पष्ट झाले. शिवसेना-भाजपा युतीच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक शिवसेना भवनमध्ये घेण्यात आली. या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी मनोहर जोशी, तर उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांचे नाव शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले. या बैठकीला भाजपाचे ज्येष्ट नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. दुसऱ्याच दिवशी १४ मार्च १९९५ रोजी शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांनी जोशी-मुंडे यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मनोहर जोशी यांच्या रूपाने एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. याच काळात मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला आणि शिवसेनेचे १५ खासदार लोकसभेवर निवडून आले. हे सारे मराठी माणसांसाठी आनंददायी होते.

मात्र हा काळ व्यक्तीशः बाळासाहेबांसाठी दुःखद गेला. ६ सप्टेबर १९९५ ला त्यांच्या प्रिय पत्नी अन शिवसैनिकांच्या लाडक्या मांसाहेब मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले अन या नंतर अवघ्या सहा महिन्यात ज्येष्ठ पुत्र बिंदुमाधव यांचे कार अपघातात निधन झाले. हे दोन मोठे धक्के त्यांनी हिंमतीने पचवले. यावेळी बाळासाहेबांचे वय ७० वर्षाचे होते हा मुद्दा ध्यानात घेण्याजोगा आहे. चार दशके साथ देणारी पत्नी अन थोरला मुलगा सहा महिन्यात गमावून देखील या माणसाने खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा मैदान मारले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९७ मध्ये राज्यातील ९ महानगरपालिका आणि सर्व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती म्हणूनच लढविणार असल्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख आणि प्रमोद महाजन यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. ठाण्यात सभा घेत असताना "काँग्रेसच्या ४२ पिढ्या खाली उतरल्या तरी महाराष्ट्रापासून मुंबई अलग करू देणार नाही," असे त्यांनी जाहीर केले. १६९ जागांपैकी शिवसेना-भाजपा युतीला १०८ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला अवघ्या ३७ जागा मिळाला. ठाणे, उल्हासनगर येथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु शिवसेना-भाजपा इतरांपेक्षा पुढे राहिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही १० जिल्हा परिषदा शिवसेना-भाजपाला मिळाल्या. मुंबईच्या यशापेक्षाही जिल्हा परिषदांत मिळालेलं यश जाणकारांच्या भुवया उंचावणारं ठरलं. मात्र २००० सालच्या विधानसभा निवडणुकीत सत्तासोपान चढण्यासाठी बेरजेचे राजकारण सेनेला जमले नाही अन पवारांनी अचूक डाव साधून अपक्षांच्या मदतीने व शिवसेनेतून बाहेर पडून विजयी झालेले उमेदवार त्यांनी आपल्या गळाला लावले, सत्ता काबीज केली. राज्यात आघाडी सरकार आले.

या पराभवानंतरही सेनेची घौडदौड चालूच राहिली अन २००२ मध्ये झालेल्या मुंबई, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने भगवा फडकवला. मुंबई महापालिकेत शिवसेनेने ९८ तर भाजपाने ३५ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता मिळवली. ठाण्यामध्ये शिवसेनेला ४६ आणि भाजपाला १३ जागा मिळाल्या, तर नाशिकमध्ये १०८ जागांपैकी शिवसेनेला ३७ व भाजपाला २२ जागा मिळून पूर्ण बहुमत मिळाले.

या पुढचा काळ मात्र शिवसेनेची कसोटी घेणारा ठरला. २००३ साली शिवसेनेमध्ये प्रथमच घटनेत बदल करण्यात येऊन शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये एक नवीन पद निर्माण करण्यात आले, ते म्हणजे कार्यकारी प्रमुख. महाबळेश्वरच्या शिबिरात शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे यांची या पदासाठी एकमताने निवड करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. जयजयकार आणि टाळ्याच्या गजरात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरेंचे पक्षात वजन वाढू लागल्याने इतर काही महत्वाकांक्षी व कार्यक्षम लोकांच्या मनात सत्तेचे धुमारे फुटू लागले. त्यातूनच भुजबळांच्या रूपाने पक्षात पहिली बंडखोरी झाली ! छगन भुजबळांच्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे अन २००६ मध्ये राज ठाकरे अशी रांग लागली ! एक अख्खी फळी पक्ष सोडून गेली. बाळासाहेब व्यथित झाले, शिवसैनिक गोंधळून गेला. लोकांनी आवई उठवायला सुरुवात केली, "सेना संपली, सेना संपली !' मात्र बाळासाहेब हा अनेकांचे बारसे जेवलेला 'ठाकरी माणूस' होता, त्यांनी हार मानली नाही. उलट ते उद्धव ठाकरेंच्या मागे ठाम उभे राहिले, प्रचाराचा झंझावात उभा केला. २००७ ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. कोण हरणार, कोण जिंकणार, याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये रोज चर्चा होत होती. शिवसेनेतील फुटीनंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हादरा मिळेल, हा भ्रम खोटा ठरवीत मुंबईकरांनी शिवसेना-भाजपाच्या पदरात १११ जागा टाकून मुंबईवरचा भगवा कायम ठेवला. शिवसेनेला ८३ तर भाजपाला २८ जागा मिळाल्या. राज ठाकरेंच्या मनसेचा पहिला फटका मात्र इथं सेनेला बसला कारण २००२च्या निवडणुकापेक्षा युतीच्या २१ जागा कमी झाल्या होत्या, त्यात सेनेच्या १५ जागा तर भाजपाच्या ७ जागा कमी झाल्या होत्या.

आपलं शरीर थकत चाललं आहे याची जाणीव झालेल्या बाळासाहेबांनी २००८ नंतर सभा कमी केल्या मात्र त्यांचे मन चिरतरुणच होते, उद्धव ठाकरेंच्या पदभार सोहळ्यावरून झालेले मानापमान नाट्य पुन्हा रंगू नये यासाठी त्यांनी एक दुरदृष्टीचे पाऊल उचलले. २०१० साली झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर युवासेनेची स्थापना करून युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेना म्हणजेच महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ अशी युवासेनेची ओळख बनवण्याचा प्रयत्न केला. युवावर्गाचे प्रश्न, त्यांची मत-मतांतरे, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ असं त्याचं स्वरूप असावं यासाठी त्यांनी तशी इमेजबिल्डअप केली.

उद्धव ठाकरे यांचे पक्षावर नियंत्रण नाही, शिवसेनेला मरगळ आलीय, नवीन मुद्दे नाहीत, विधानसभा व लोकसभा यात सेनेच्या सीमा उघड झाल्यात, मुंबईत मराठी माणूस आहेच कुठे, मनसेची वेगळी फिल्डिंग आता सेनेचा तंबू उखडणार अशा चर्चांना पुन्हा ऊत आला. तरीही उद्धव ठाकरेंनी २०१२ मध्ये मुंबई महापालिकेवरचा भगवा खाली उतरू दिला नाही. मात्र जागांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. शिवसेनेला ७५ तर भाजपाला ३२ जागी विजय प्राप्त झाला. उद्धव ठाकरेंनी राबवलेली ‘करून दाखवले’ ही संकल्पना या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली होती. मात्र याच वर्षी शिवसैनिकांवर नव्हे तर उभ्या महाराष्ट्रावर एका शोकमग्न संकटाने घाला घातला .....

१७ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी घड्याळाचे काटे थबकले आणि काळीज हेलावून सोडणारी एक दु:खद बातमी आली. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या बातमीने त्या दिवशी मुंबईत सागराच्या लाटा नि:शब्द झाल्या. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी निरव शांतता मुंबईसह महाराष्ट्रात पसरली. येत होता आवाज तो फक्त हुंदक्यांचा आणि वाहत होता पूर तो फक्त अश्रूंचा. एक सम्राट अंतर्धान पावला होता. ज्यांनी आपल्या हयातीतील ४६ वर्षे या महाराष्ट्रात झंझावात उभा केला होता; मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसांसाठी ज्यांनी वाणी, लेखणी आणि कुंचल्याने भल्याभल्यांना दरदरून घाम फोडला होता ; मराठी माणसांच्या, हिंदूंच्या, राष्ट्रभक्त एतद्देशीय नागरिकांच्या हृदयावर हिंदुहृदयसम्राट म्हणून अधिराज्य केले होते ; कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारा एक अलौकिक माणूस म्हणून जो जगला होता त्या ते:जपुंज शिवसूर्याचा अस्त झाला होता. अथांग सागराला लाजवेल अशी अलोट गर्दी अंत्ययात्रेला झाली होती. ‘बाळासाहेब परत या’, ‘बाळासाहेब परत या’, ‘परत या’ असा हृदयद्रावक आलाप त्यांच्या अंत्ययात्रेत होत होता, हे अभूतपूर्व होते. मात्र यातच त्यांचे सारे मोठेपण, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व सामावलेले आहे. साहेबांवर निरतिशय प्रेम करणाऱ्या, विक्रमी गर्दीचा उच्चांक गाठणाऱ्या शोकमग्न जनतेच्या साक्षीने हा सम्राट १८ नोव्हेंबर, २०१२ रोजी अनंतात विलीन झाला. यानंतर दोनच महिन्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारी २०१३ रोजी शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली.

'बाळासाहेब गेले, आता सेना संपली' अशी आवई पुन्हा काही लोकांनी उठवण्यास सुरुवात केली, यावेळी उद्धव ठाकरयांनी त्यांना आरसा दाखवला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीने महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकून विक्रम केला. या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. शिवसेनेचे केवळ दोनच उमेदवार पराभूत झाले. तेही खूपच कमी मतांनी. अशा प्रकारे उद्धवजी ठाकरेंनी आपण लंबी रेस का घोडा आहोत हे दाखवून दिले. या निवडणुका नंतर झालेल्या २०१४च्याच विधानसभा निवडणुकात मात्र भाजपाच्या अतिमहत्वाकांक्षी योजनेपुढे न झुकता उद्धव ठाकरेंनी देखील आपणातही मागे हटण्याचा गुण नाही दाखवून देताना युतीवर तुळशीपत्र वाहिले. याच वेळी आघाडीही फुटली. राज्यात चौरंगी लढती झाल्या. भाजपाने केंद्रातल्या सत्तेचा पुरेपूर वापर केला, अनेक केंद्रीय मंत्री ठाण मांडून बसले, नवनव्या पद्धती वापरल्या गेल्या, तुंबळ वाकयुद्ध झाले. भाजपचे एकहाती सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. या काळात शिवसैनिकांची मोठी ओढाताण झाली. उद्धव ठाकरें धोरणीपणा दाखवून सत्तेत सामील झाले. मात्र या निवडणुकात आलेला कटूपणा त्यांनी कमी केलाही नाही अन कमी होऊही दिला नाही ! हे त्यांचे राजकारण भाजपाला गोंधळात टाकणारे ठरले. येणाऱ्या वर्षात २०१७ मध्ये मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांचा राजकीय आखाडा पुन्हा रंगणार आहे अन त्या पार्श्वभूमीवर या एके काळच्या मित्र पक्षात हाडवैर असल्यागत द्वेषभावना उत्पन्न झाली आहे.

२००६ साली स्थापन झालेली मनसे अजूनही चाचपडत आहे, तर १८८५ सालचा जन्म असणारी दीडशतकी वयाची काँग्रेस पार खिळखिळी झाली आहे, तर १९९९ मध्ये वेगळी चूल मांडणाऱ्या पवारांची एनसीपीला भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढले आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर अजूनही विश्वास ठेवून असलेला भाजप हाच नजीकच्या काळात सेनेचा सर्वात मोठा शत्रू असणार आहे हे स्पष्ट आहे. मात्र राजकारणाच्या या चक्रव्युहात जनतेची साथ कोणाला मिळणार हे आताच्या घडीला सांगणे महाकठीण काम आहे. कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरे सावकाश पावले टाकत आहेत.

शिवसेनेची पन्नाशी नुकतीच साजरी झालीय. तौलनिक दृष्ट्या पाहिले तर ३७ वर्षे बाळासाहेबांनी एकहाती पक्ष निर्मिला, वाढवला अन जपला देखील. तर उद्धव ठाकरेंनी २००३ पासून मागील १३ वर्षे पक्ष अगदी नेटाने एकसंध ठेवतानाच त्याची वाढ राज्याबाहेर करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना राज्याबाहेर लक्षणीय यश मिळाले नसले तरी दखल घ्यावी अशी मते मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. काळ बदलतोय तसे आपण बदलले पाहिजे हा आदित्य ठाकरेंचा विचार ते हळूहळू अमलात आणताहेत. व्हेलेंटाईन डेची मवाळ भूमिका व मुंबईच्या नाईट कल्चरची भलावण हे त्याचे फलित आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असणारी सोशल मिडीया कशी वापरायची हे आदित्य ठाकरेंना चांगले अवगत आहे. फक्त दोन गोष्टीवर आणखी विचार होणे आवश्यक आहे असं वाटतं ते म्हणजे - आदित्य ठाकरेंचा सर्वसामान्य शिवसैनिकांशी खुला व समान संवाद असला पाहिजे, तो होताना दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनचा आक्रमक चेहरा म्हणून जे जुने शिवसैनिक कार्यरत होते ते आता मुख्य प्रवाहात दिसत नाहीत. त्यातल्या हायसं वाटणारी बाब म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अगदी मुरब्बी राजकारण्यासारखे पाऊले टाकत आहेत. जसे भाजपने कायम दोन चेहरे ठेवले, ( वाजपेयीजी - जहाल तर अडवानी मवाळ अन पुढे जाऊन मोदी जहाल तर अडवाणी मवाळ ) तसे दोन चेहरे सेना हळूहळू निर्माण करत आहे. आदित्य ठाकरे तरुणांची मते जाणून त्या नुसार पक्षाची धोरणे फ्लेक्झिबल ठेवताहेत, तर सामना मधून संजय राऊत अत्यंत जहाल विचार मांडत असतात. या दोन्ही विचारांचा समन्वय साधणारं राजकारण उद्धव ठाकरे करताहेत. सध्या तर सेना भाजपामध्ये वाक्युद्धाचा कलगीतुरा तुफान रंगला आहे. भाजपाच्या अंगरख्यात असलेल्या खंजिराचा समाचार घेण्यासाठी सेनेने आपली वाघनखे तयार ठेवली आहेत हे नक्की ! ही वाघनखे पन्नाशीतल्या वाघाची असली तरी ती ढाण्या वाघाची आहेत हे भाजपादेखील मनोमन जाणून आहे. येणारं वर्ष इतर कुठल्या पक्षासाठी फारसं महत्वाचं नसलं तरी शिवसेनेसाठी मात्र अग्निपरीक्षेचं आहे हे खरे. यातून उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचे सीमोल्लंघन कसे करतात हे पाहणं मोठं औत्सुक्यपूर्ण असणार आहे !

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा