
गावाकडे आता पाऊस सुरु झालाय...माहेरवाशिनी सारखे त्याचे डोळ्यात पाणी आणून स्वागत झालेय...
मी इकडे सोलापूरात. इथला पाऊस अगदीच अरसिक.
त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही, तो देखील शहरी झालाय. तोंड देखलं पडून जातो, त्याच्यात कोसळण्याची विशेष उर्मी अशी नसतेच. तो येतो आणि पडून जातो. खेरीज इकडे शहरी भागात त्याचे रुक्ष वर्णन मॉन्सूनने होते...
गावात पाऊस आला की पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो, घरी काही तरी गोड धोड होते. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडे बघून काहीबाही पुटपुटतो, त्याचे ते पुटपुटणे एखाद्या अभंगाच्या ओवीसारखे असते. पावसाच्या स्वागतासाठी पेज होते. त्यासाठी माजघरातल्या चुलीवर पातेले चढले की बाहरेच्या पावसाचा आवाज, चुलीवरल्या पातेल्यातला रटरटणारा आवाज आणि चुलीतल्या जळणाच्या वासात मिसळलेला मृद्गंधाचा वास सारं कसं मस्तकात भिनत जातं....
पाऊस सलग असला की गोठ्यातल्या बैलजोडीला थोडा विसावा मिळतो अन सालगड्याना थोडी विश्रांती. सगळं रमत गमत चालतं. गोठयातल्या शेळ्या अंग चोरून त्याचे मुटकुळे करून बसतात. बाहेर ठेवलेल्या सरपणाच्या राशीत पाकोळ्या लपून बसतात. जिथे जिथे गळती लागेलेली असते तिथे जुन्या पटकुरावर खताच्या रिकाम्या पिशव्याची चवाळे नाहीतर प्लास्टिक अंथरले जाते. मोठाल्या झाडातल्या ढोलीत पाखरे चिडीचूप होतात तर वरती फांद्यामध्ये ज्यांची घरटी असतात ते मात्र भिजल्या पंखाना अधून मधून फडकवत शांत बसून असतात. आडोसे शोधून कुत्री वेटोळे करुन राहतात. झाडे मुक्त देहाने भिजत राहतात, पानं मात्र अंग चोरतात. उतरणीच्या रानात दंड वाहू लागतात. डोबीचे पाणी वर येते आणि बेडकाला कंठ फुटतो !! (repost)
पाऊस सुरु झाला की पोरासोरांना शाळेत जायचे अक्षरशः जीवावर येतं. शाळेत अजिबात लक्ष नसे, सगळे ध्यान पावसात मग्न. दिस मावळतीला आला की गोठ्यातली वासरे गायीच्या घंटानादाकडे ध्यान देत कानात जीव आणून उभी असत, गायी गोठ्याजवळ येताच वासरे नेमक्या आपापल्या आईच्या कासेला तोंड लावत. बऱ्याचदा पाऊस देखील अल्पशी विश्रांती घेऊन ह्र्द्यंगम सोहळा बघून तृप्त होतसे. मस्त तांबूस उजेडात गायीच्या कासेला तोंड लावून ढूसण्या देत पिणारी ती वासरे, गायींच्या गळ्यातल्या वाजणाऱ्या घंटांचा आवाज. भेडबकऱ्यांच्या एकसुरी आवाजाने त्यांना दिलेली साद अन गोठ्यातल्या आधणावर चहासाठी चढवलेले मातीत सारवलेले पातेले. सगळ्या रानातून सुंसुं आवाज करत वाहणारा थंड वारा अन त्यावर फिरत राहणारा पिकल्या पानांचा नक्षीदार दोलायमान गलका ! वर आभाळात अंग मोकळे करून घेण्यासाठी निघालेले त्रिकोणी रांगेतून गिरक्या घेत चाललेले बगळे !!
दरसाली ही अशी पावसाळी हवा आली आली की आठवणींचे भले मोठे मळभ गोळा होते अन गावातला पाऊस डोळ्याच्या कडांतून हळुवार वाहू लागतो, या आनंदाश्रूंची बातच न्यारी असते ...
- समीर गायकवाड
👌👌
उत्तर द्याहटवा