आताच्या तरुण पिढीचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्वतःचे असे स्वतंत्र आणि स्वागतार्ह आहेत. यासाठी कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो. पण काही चाळीशी गाठलेली वा चाळीशी पार केलेली मंडळी याच मुद्द्यावर बोलताना थोडा कद्रूपणा करतात.
'ही पिढी फार नशीबवान बघा नाहीतर आमच्या पिढीला असली सुखं नव्हती' असा सूर जनरली ते आळवत असतात.
मित्रांनो हे तद्दन खोटं असतं, ही धूळफेक असते.मीही याच वयोगटाच्या पिढीचा आहे पण मला असे वाटत नाही. कारण मागे जाऊन विचार केला, तुलना केली तर लक्षात येतं की दशकानुगणिक दर पिढीच्या पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. त्यावर कटाक्ष टाकला की पिढी दर पिढी या कद्रूपणाचं कोडं उलगडत जातं....
आताची पिढी बोल्ड आहे, सगळं खुलेपणाने आणि खुल्या दिलाने करणारी आहे. मान्य आहे, शत प्रतिशत सहमत आहे.
'पण माझ्या पिढीचे काय' या सवालाबाबत एतद्देशिय जनतेचे काय मत होते वा किंबहुना काय अवस्था होती अशी पृच्छा करणे अधिक संयुक्तिक ठरेल.
'डोक्यावर काकूबाईसारखा (तत्कालीन समग्र पुरुषी वर्गाला हवाहवासा) पदर घेऊन, नजर खाली झुकवून अदबीने अन मोठ्या अवघडलेल्या स्थितीत पावले टाकत नक्षीदार डिशमध्ये पोहे घेऊन येणाऱ्या मुलीला पसंत करून तिच्याशी दोनपाच जुजबी प्रश्न विचारून लग्नं संपन्न झाली' या वर्गवारीतच अनेक जण मोडतात.
तिला 'पाहायला' जाताना सोबत बरेचसे पाहुणे अन एखादा मित्र नेला, चहापाणी उरकले, तद्दन फालतू प्रश्न विचारून झाले पण पोरगा पोरगी कुठे भिडले नाहीत, ओठावर न आलेलं हे एक दुखणे होते हे ही मान्य !
नंतरची चिठ्ठीद्वारेची निरोपा निरोपीही काही मोजक्याच लोकांच्या नशिबी आली, काहींना तर हे ही सुख मिळाले नाही. त्या काळी लग्नाआधी नियोजित बायकोसोबत फिरणे हे एक दिव्य साहसच होते जणू !
अरे तुझ्या पोराने काय थेरं चालवली आहेत वा तुझी कार्टी मोकाटच सुटली जणू अशी आगलावी कळ लावणारे अशा संधीचा नेमका वापर करत अन पराचा डोमकावळा कसा होतो हे लग्नाळू लोकांना असे काही कळे की विवाहापश्चातदेखील घराबाहेर पडताना ते विचार करत.
लग्न 'उरकल्या'वरही पाहुणे मंडळी अन घरातल्या विधी कार्यांनी अफाट छळले असे अनेक युगपुरुष, युगंधरा घरोघरी सापडतील. हे ही मान्य !!
पण .....
माझ्या पिढीने बायकोला अक्षता पडण्याआधी डोळ्यासमोर पाहिलं, तोंडदेखले का होईना पण आमची पसंती बापजाद्यांनी. चुलत्या-काक्यांनी विचारली. नाही म्हणायला हे अर्धसत्य होते कारण नकार देण्याची हिंमत होती कुणाच्यात ? गल्लीत मधोमध सर्वांसमक्ष सालटी सोललेला देह अन तकलादू इभ्रतीच्या फालुदयावर अकलेची तथाकथित दिवाळखोरी फ्री असा सगळा नजारा डोळ्यापुढे काजवे चमकावेत तसा नजरेपुढे यायचा. आताची पोरे अंगावर वळ येऊपर्यंत मारच खात नाहीत त्यामुळे त्यांना यातली मजा आणि दुःख दोन्ही कळणार नाही ही बाब अलाहिदा. शिवाय लग्न जमवताना कुंडलीचे चर्वित चर्वण होई.
म्हणजे नावासाठी का होईना पण वरवधूच्या मान्यतेने माझ्या पिढीचे लग्न लागले. नंतर मग लग्नाआधीचे मॅटिनी शो बंद झाले अन गाडी रनिंग शो वर आली 'तीन ते सहा विथ पॉपकॉर्न' असे परिवर्तन झाले. एखाद दुसरं अपत्य झालं अन मग रात्री नऊ ते बाराचा शो सुरु झाला. कालांतराने सिनेमासोबतच नाटकही कमी झालं अन उरल्या त्या दोन दिशेला तोंड करून झोपणाऱ्या पोक्त व्यक्ती ! असा हा सगळा मामला.
यामुळेच कुणी आपल्या मर्जीने लग्न केल्याचे कानी आले की इतरांच्या लेखी ती जोडी लैलामजनू, हिररांझाच्या पंगतीला जाऊन बसे.
याच्या आधीच्या काळात गेलं तर चित्र आणखी वेगळं दिसतं. माझ्या वडीलांच्या पिढीत मुलाची वा मुलीची पसंती विचारणे नामक प्रकार अस्तित्वात नव्हता. अशी पसंती विचारणे हा त्यांच्या बापजादयांसाठी कमीपणा होता.
'पोरगा धाकात आहे ! बापाच्या शब्दाबाहेर जाण्याची टाप नाही अजून ! माझा शब्द हाच परवलीचा शब्द ! त्यांना काय अक्कल, अजून मेल्याचे दात पडले नाहीत दुधाचे, काय पुसायचे त्यांना ? आमच्या घराण्यात अजून असली चाल पडली नाही ! ही थेरं इथं नसतात बरं का !' अशा फुलबाज्या तेंव्हा अभिमानाने झडायच्या. कुणा वरवधूच्या अंगात इतका दम नव्हता की ते असल्या जहांबाज आणि मुलुखाच्या परंपरावादी बापजादयांशी भिडावेत.
पर्यायाने 'पोरगं कसं सूतासारखं सरळ आहे अन पोरगी कशी खाली मान घालून असते' याची रेकॉर्ड सगळीकडे वाजत असायची. कुणाच्या पोराने आगळीक केली तर त्याने देश बुडवल्याचा कांगावा गावभर व्हायचा.
त्याच्या आईबापाची फजिती व्हायची, लोक छी थू करायचे. याच्या भीतीने इच्छा असूनही केवळ आपल्या कुटुंबियांना त्रास होईल या हेतूखातर अनेक प्रेमवीरांनी आपले घोडे दामटलेच नाही.
अनेकांनी लग्नातच बायकोला चोरून पाहिलेलं.
लग्न झाल्यावर मग अगदी भीत भीत माजघरात तिला स्पर्श करणं किंवा घरातली तमाम किरकिर मंडळी वामकुक्षी घेत असताना तिच्याशी बारीक आवाजात बोलणं हाच काय तो रोमान्स.
एरव्ही रात्र चिमणी कंदिलाच्या धुरकट उजेडातही बराच वेळ जोडी तरमळत रहायची, 'त्याचा' आवाज येईल का याचीच धास्ती जास्त राहायची.
सगळं गाव झोपी गेल्याशिवाय, म्हातारया कोतारयांनी घोरण्याची रागदारी सुरु केल्याशिवाय प्रेमाच्या 'गाठी' सोडता येत नसत. मग कधी कधी या प्रतिक्षेतच काम करून दमलेली बायको झोपी जाई तर चुकून कधी तिच्या आधी नवराही झोपी जाई. एखादया बऱ्यावाईट कार्याच्या निमित्ताने घडलेला प्रवास हाच काय तो एकांत असे.
या टप्प्यात असलेल्या दांपत्यांनी खऱ्या अर्थाने अखेरची एकत्र कुटुंब अनुभवली. काही अपवादात्मक घरात या पिढीतही तो गोडवा टिकून आहे. तर त्या पिढीला रोमान्स अन सहवास हा अत्यंत अभावानेच वाट्यास आला.
त्याच्याही आधीच्या पिढीत गेलो तर दिवस अजूनच खडतर होते असे चित्र समोर येते. आमच्या गावातल्या सगळ्या घरात गोषा पाळला जायचा.
वेशीतून बाईने जायचे नाही, वेस चुकवून डोक्यावर पदर घेऊन जायचे, बायकोने नवरयासमोर यायचे नाही मग परपुरुषाची तर गोष्टच नव्हती. लग्न जमवताना नवरा किंवा नवरी यापैकीचं कुणी त्या 'बैठकी'ला असायलाच पाहिजे असा कुठलाही दंडक तेंव्हा नव्हता.
अमक्याची मुलगी मी करेन किंवा तमक्याचा पोरगा माझा जावई असेल हे आधीच घोषित झालेलं असल्याने चॉईस नावाचा प्रकार बाकी नसे. त्यात अजून भरीस आणाभाका असत, वचनं असत, वायदे असत, देण्याघेण्यातून नाती जोपासण्यातून दिलेले शब्द असत. हे सर्व करताना त्या बिचाऱ्या जीवांची संमती कुणाच्या गावी नसे.
कुणी बहिणीला शब्द दिलेला असे तर कुणी मित्राला तर कुणी मेव्हण्याला तर कुणी आत्याला असा हा लांबलचक कारनामा असे. असं कुणाच्या बाबतीत घडलं नसेल तर मग मुलाच्या वा मुलीकडच्या ओळखीतला एक मध्यस्थ असे तो दोन्ही बाजूंना संदेश देऊन मिलन घडवून आणत असे. अशा व्यक्तींना त्या काळी प्रचंड मान सन्मान आणि अगत्य लाभे. (आता मध्यस्थ नावाची व्यक्ती लग्नसंस्थेतून मोडीत निघाली आहे हे विशेष नमूद करावेसे वाटते. )
स्थळ 'बघायला' गेलेली मंडळीच निकाल लावणारी वा निर्णय घेणारी असत. जोडप्याने नुसते बोहल्यावर उभं राहायचे, दटावलेल्या डोळ्यांना भ्यायचे अन चेहरे पाहण्याऐवजी पायाची बोटं निरखायची असा सगळा मामला होता.
नवरा बायकोचा दिवसभरात संवाद होत नसे. रात्रीच काय ते बोलणं, ते ही कुजबुजेच्या गतीतलं !
येती-जाती, चोरचोळी, डोहाळ जेवण, बारसं यांची तेंव्हा चलती असे.
त्या काळात नववधूला तिच्या माहेरी घेऊन जाणारा वा सासरी आणणारा मुराळी असे ! आता मुराळी इतिहासजमा झाला आहे.
दिवसा बायकोला काही सांगायचं असलं की काहीतरी निमित्त काढून तिच्याकडे जाण्याचा बहाणा कॉमन असे. पाण्याचा तांब्यापेला, घाम पुसायला गमजा, हातावर गुळ ठेवणे या निमित्ताने बोलाचाली करणे असला गुळ त्या काळी पाडला जाई !
मुलंबाळं मोठी होईपर्यंत आमची मंडळी, आमचं खटलं, आमचे सरकार, आमची ही असा उल्लेख होई. तिकडून यासाठी वेगळी शब्द असत. आमचे हे किंवा चिनूचे बाबावर सगळं निभावून नेलं जाई.
सर्वांच्या देखता थेट नावाने हाका मारण्याचा प्रसंग क्वचितच घडे. या अबोल नात्यात एक मिठास होती हे ही तितकंच खरं.
या पिढीच्या भूतकाळात डोकावलं तर वरवधूचे स्वातंत्र्य आणखीच आकसलेले दिसते.
त्या जमान्यात पाळण्यात लग्नं लागत. अनेकदा तर कुणी पोटुशी राहिली तरी संबंध पक्के केले जात,
"वसंता तुला मुलगी झाली तर माझ्या अनंताला द्यावी लागेल' असा सगळा मामला असे. नात्यात कटुता येऊ नये म्हणून अन मर्जी सांभाळता यावी, नाती खुश ठेवली जावीत म्हणून मुलं नेणती असतानाच सोयरिकी ठरवल्या जात.
ठरवलेल्या सोयरिकी लग्नाच्या बेडीत गुंतवल्या जात. पदराला गाठ मारण्याइतकी नवरा नवरी मोठी नसत. त्यांना यातलं काहीच कळत नसे. ते बिचारे नव्या कपड्यांनी अन आपण गर्दीच्या केंद्रस्थानी असल्यानेच हरखून जात असत.
नवरी मुलगी न्हाती धुती होईपर्यंत आधी ठरवल्या प्रमाणे सासरी किंवा माहेरी असे. मग मुराळी तिला ने आण करे. मग त्या दोन जीवांना किंचित खबरबात लागे. तोवर ते दोघे जीवाभावाचे मैत्र होत हा त्या नात्यातला फायदा होता.
पुढची वाटचाल मात्र खडतर होती. बायकांवरच्या अपार निर्बंधांनी या वाटचालीस आणखी काटेरी केलं होतं.
नवरा बायकोच्या खुणा ठरलेल्या असत.
दाराची कडी तीन वेळा वाजली तर बायकोने अजिबात बाहेर येऊ नये, हातातली काठी दोन वेळा आपटली तर न सांगता पाण्याच्या तांब्याचे निमित्त करून हळूच झुळूक यावी तसे येऊन जावे, टाळी वाजली तर भेटीचा अवकाश मोकळा आहे हे ओळखावे, खाकरले की ओळखावे की कुणी तरी खत्रूड व्यक्ती सोबत आहे त्यामुळे नीट आवरून सावरून सज्ज असावे, खोकल्याची खोटी उबळ आली की इशारा असे की आता बराच वेळ बाहेर येता येणार नाही ! या सर्व खुणगाठी व्यक्तीपरत्वे भिन्न असत.
या पिढीतल्या प्रेमवीरांचे अफाट हाल होत. त्यांच्या पाठीशी कुणीही उभारत नसे. सामाजिक बंधने इतकी क्लिष्ट आणि वाईट होती की दांपत्य जीवन नावाचा प्रकार अगदी नावालाच होता.
या पिढीची मर्जी कधीच कुणीच विचारली नाही अन ती जाणून घेण्याचा प्रयत्नही कुणी केला नाही.
या पिढीच्या आधीची पिढी मात्र रूढी परंपरा याच्या जोखडात इतकी रुतलेली होती की मोकळा श्वास अन मुक्त सहवास या गोष्टी दांपत्यांना स्वप्नवत वाटत.
ह्या सर्व बाबी बारकाईने पाहिल्या तर सहज लक्षात येते की पिढीगणिक लवचिकता वाढतच गेली आहे. नात्यातले निर्बंध सैल होत गेलेत, वर्तणुकीत ढिलाई वाढत राहिली, या बाबतीतले निर्णय घेण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होत गेलेत, प्रेमभावना आणि प्रेमी जीवांना समजून घेण्याच्या विचारांना वाढती चालना मिळत गेलीय.
आजवर कोणतीही पिढी आधीच्या पिढीच्या मागे गेली नाही. प्रत्येक पिढीने आधीच्या पिढीच्या तुलनेत अधिक स्वातंत्र्य लाभले आहे हे या संपूर्ण लग्नसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल अन त्याला कोणी नाकारू शकणार नाही. म्हणूनच आताची पिढी नशीबवान अन आम्ही कमनशिबी हे म्हणणं तितकंसं खरं नाही !!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा