१२ जानेवारी हा जिजाऊ मांसाहेबांचा जन्मदिवस, ज्या जिजाऊनी शिवराय घडवले, स्वराज्याची आस जागवली अन एक भव्य दिव्य स्वप्न नुसते पाहिलेच नाही तर प्रत्यक्षात आणले त्यांचा जन्मदिवस म्हणजे तमाम मराठी माणसांचा आनंदोत्सव !! हा खरा सण, ज्यांनी आपल्या सर्वांचे स्वराज्य निर्मिले त्यांचा हा जन्मदिन !! त्यामुळे आजच्या या १२ जानेवारीचे महात्म्य कैक पटीने वाढले ! १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (आजच्या बुलढाणा जिल्ह्यातले) इथे लखुजी जाधवरावांच्या घरी त्यांचा जन्म झाला अन सह्याद्रीपासून ते भीमा-गोदाच्या प्रवाहावर आनंदाचा रोमांच आला. जिजाऊ मांसाहेबांच्या जन्मामुळे १२ जानेवारीचा संदर्भ आत्यंतिक आनंदाचा होऊन गेला आहे. पण ज्या जिजाऊनी मराठ्यांच्या शौर्याचे बीज रोवले, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले ज्यांनी स्वराज्यनिर्मितीसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या जन्मदिनाच्याच तारखेला ११० वर्षांनी मराठी स्वराज्यात दुही माजली, भाऊबंदकी झाली ! या दिवशी झालेल्या घटनेतून बोध घेऊन प्रत्येक मराठी माणसाने आपसातले वाद नक्कीच टाळले पाहिजेत नाहीतर १२ जानेवारीचा हा दुसरा संदर्भ आपल्याला आयुष्यभर अणकुचीदार दुहीचे भाले टोचवत राहतील....
काय झाले होते १२ जानेवारी १७०८ ला ? ह्याची माहिती घ्यायला आपल्याला इतिहासात जावे लागेल. पण नुसते मागे जाऊन चालणार नाही तर त्यातून आपण धडा घेतला पाहिजे तरच भाऊबंदकीचा लकडा आपला पिच्छा सोडेल ..
शहाजहानच्या मृत्यूनंतर औरंगजेब दिल्लीतच ठाण मांडून बसल्यामुळे औरंगजेबाच्या मागे माळव्याची सुभेदारी असलेल्या शहजादा आझमने स्वतःला बादशहा घोषीत केले त्याचवेळेस उत्तरेत शहा आलमने बंड पुकारले. जिंजींवर हल्ला करणारया झुल्फिकारखानाने शहजाद्याच्या मदतीने मराठ्यात फुट पाडण्याचा डाव इथे खेळला, त्याने २० वर्षांपासून मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीपुत्र शाहूंना कैदेतून आझाद केले ! आपण याला मुक्त केले तर हा आपल्याशी इमान राखेल हे झुल्फीकारखानाने अचूक हेरले होते अन मराठे हे केवळ मराठ्यांकडूनच मारले जातील हे त्याला ३० वर्षात चांगलेच अवगत झाले होते ! जिंजीहून मुक्त झालेले शाहु मराठी मुलुखात आले अन त्यांनी स्वतःला राज्याचा खरा वारस घोषीत केले.मराठी बेबनावाची अन भाऊबंदकीची अशा प्रकारे ठिणगी पडली. नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसला , रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुला येऊन मिळाले.
आपल्या मनगटाच्या जोरावर स्वराज्य राखलेल्या अन बुद्धीच्या जोरावर रयतेत - सरदारात सवतासुभा न होऊ देता स्वराज्य टिकवून औरंगजेबाला टक्कर देणारया ताराराणीना शाहूंचा दावा कबुल नव्हता, नेटाने चालवलेले स्वराज्यशकट त्या आपल्या सावत्र पुतण्याच्या (शाहूंच्या) हाती देण्यास राजी नव्हत्या. संभाजीमहाराजांच्या पश्चात आधी आपल्या पतीने आणि नंतर आपण स्वतः तलवार हाती घेऊन जसे स्वराज्य राखले आहे तसे स्वराज्य राखणे इतके वर्षे कैदेत काढलेल्या शाहूंना जमेल की नाही याचा देखील ताराराणींना नेमका अंदाज नव्हता. पण मुघलांचा डाव यशस्वी झाला, काही सरदार शाहुराजांकडून उभे ठाकले तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराराणीकडुन उभे राहिली.काही इतिहासकार इथे शाहूंची कड घेताना असे म्हणणे मांडतात की, शाहुना मुघलांनी कैद करण्याआधी संभाजीराजे पकडले गेले तेंव्हा शंभूराजेंचे (सम्राज्ञी येसूबाई यांचे) पुत्र युवराज शाहू अल्पवयीन असल्याने संभाजीराजांचे कनिष्ट (सावत्र) बंधू राजाराममहाराज यांना गादीवर बसवण्यात आले होते. शाहूच वारसा योग्य असल्याचे राजारामांचे देखील मत होते असाही दावा ते करतात. पण राजारामांच्या पश्चात स्वराज्याची राखण ज्या ताराराणीनी आपल्या असीम शौर्याच्या जोरावर केली त्यांच्या हक्काचे काय यावर भाष्य करताना इतिहासकार देखील द्विधा मनस्थितीत आढळतात. तत्काळी यात सामोपचार अपेक्षित असताना धनाजी जाधव जोवर ताराराणीकडे असतील तोवर आपण सबळ आणि उजवे ठरू शकत नाही हे मनोमन ओळखून चुकलेल्या शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना धनाजींकडे धाडले. ताराराणीच्या सैन्यावर हल्लादेखील चढवला, यात धनाजी जाधव शाहूंना जाऊन मिळाले पण शेवटी खेड-कडूस येथे दोन मराठी फौजा आपसात भिडल्याच ! यात शाहूंच्या फौजा विजयी झाल्या. इ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी ताराराणीचा पन्हाळा घेतला; परंतु पुढच्या चारच महिन्यांत सावंतवाडीच्या खेम सावंताच्या मदतीने ताराराणीनी पन्हाळा हस्तगत केला. पुढे ताराराणीचे नवे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी थोडी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, काही किल्ले देखील त्यांनी कब्जे केले. कान्होजी आंग्रेना जेरीस आणण्यासाठी अन तिथली घडी बसवण्यासाठी शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना मुतालिकपद देऊन पाठवले. ते कार्य त्यांनी चोख पार पाडले. या सर्व घडामोडीबाबत इतिहासकारांमध्ये अनेक टोकाचे मतभेद आहेत हे इथे नमूद करावेसे वाटते.
नंतर कान्होजी आंग्रे, सिधोजी घोरपडे, दमाजी थोरात हे देखील शाहुंकडे डेरेदाखल झाले. अशा रीतीने रियासतीमधील सर्व दिग्गज सरदार, मोक्याचे किल्लेशाहुंकडे गेल्यामुळे ताराराणीची बाजु कमकुवत झाली. त्यांनी अनेक वेळा शाहुंशी दावा मांडला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी १२ जानेवारी १७०८ ला शाहूनी स्वतःला राज्याभिषेक करविला, छत्रपती असल्याची द्वाही रयतेत फिरवली. या दिवशी मराठ्यांची गादी दुभंगली, स्वराज्याचे दोन दावेदार झाले, भाऊबंदकीचे नवे पर्व सुरु झाले, एक राजा एक स्वराज्य हे स्वप्न इथे बेकीत विखुरले ! याच दरम्यान उत्तरेत मोठ्या उलथापालथी झाल्या. औरंगेजेबाचे दोन शहजादे आझम व शहा आलम यांच्यात सामुगढजवळील जाजाऊ येथे युध्द होऊन त्यात शहा आलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी स्वतःला धारण करुन तो नवा बादशहा झाला. शहा आलम पातशहा झाल्याचे औरंगजेबाच्या सर्वात कनिष्ठ मुलाला कामबक्ष याला मान्य नव्हते. त्याने शहा आलम विरुद्ध दक्षिणेतून बंड पुकारले. जेंव्हा राजाराम छत्रपति जिंजीस होते तेंव्हा तेथें वेढा घालून बसलेल्या झुल्फीकारखानाच्या मदतीस हाच कामबक्ष आला होता. परंतु त्या दोघांत भांडणे सुरू झालीं व कामबक्ष मराठ्यांकडे राजकारणें करूं लागला. तेव्हा खानानें त्याला कैद करून औरंगझेबाकडे पाठवून दिलें होतें. कामबक्षाचे बंड मोडण्यासाठी बहादुरशाहने शाहूंची मदत मागितली. शाहुना कैदेतून सोडवताना आझम आणि झुल्फिकारखानाने जे करार मदार केले होते त्यावर नव्या बादशहाची मोहोर उठवून आपल्या छत्रपतीपदाच्या दाव्याला भक्कम करता येईल असा दुय्यम विचार करून शाहुनी नेमाजी शिंद्यांना बादशहाकडून लढायचे फर्मान जारी केले. जे नेमाजी शिंदे औरंगजेबाच्या हयातीत मराठी रियासतेसाठी उत्तरेवर स्वारी करून गेले होते तेच नेमाजी शिंदे शाहूंच्या आदेशाने नव्या मुघल बादशहाच्या बाजूने लढले ! किती हा दैवदुर्विलास !
१७०९ मध्ये बहादुरशहाने (पहिला) कामबक्षाला पकडुन ठार मारले. या दरम्यान प्रतिनिधी पद शाहूनी परशुरामपंत किन्हईकरांना वंशपरंरेनें वतनी करून दिलें (१७१०). मध्यंतरी काही काळ गदाधर प्रल्हाद यांना व पुढे नारायण प्रल्हाद नाशिककर यांस ५ वर्षे या जागेवर त्यांनी नेमलें होतें. यातील गदाधर प्रल्हाद अहमदनगरच्या मुक्कामात मरठ्यांच्या वतीने भेटायला गेला. त्याने बादशहास दक्षिणेची चौथाई मागीतली. धूर्त झुल्फीकारखानाने आपले वजन लगेच शाहुंच्या पारड्यात टाकले, शाहुच्या या कारभाराची कुणकुण लागलेल्या ताराराणीने देखील तिच्या वतीने प्रतिनिधी तिथे पाठवले. इथे आणखी राजकारण झाले, बादशाहच्या दरबारी वजीर असणारया मुनीमखानाचे झुल्फिकारखानाशी सख्य नव्हते, त्यामुळे त्याने झुल्फिकारखानाने आपले वजन शाहुच्या पारड्यात टाकल्याबरोबर त्याचे मत ताराराणीच्या बाजूने मांडले ! यावर बादशाहने आधी वारसा हक्क निकाली काढा मग सनदा देण्यात येतील असा निर्वाळा दिला. सनदाचे काम तसेच राहिले, पुढे शाहू आणि ताराराणी आपसात झगडत राहिले. १७०९ मध्ये बहादुरशाह बादशहा दिल्लीला परतला तरीदेखील हे आपसात भांडत राहिले.
अशा प्रकारे १२ जानेवारी १७०८ला सातारच्या गादीच्या निर्मितीमुळे मराठ्यांची आपसातली लढाई जी चालू राहिली ती अव्याहतपणे सुरु राहिली. मराठ्यांनी कोणताही बोध घेतला नाही. उलट यामुळे दुश्मन शिरजोर होत गेला अन मराठे आपसात झगडत राहिले !! आजही मराठी माणूस एकदिलाने एकीने राहताना दिसत नाही...
१२ जानेवारी हा जिजाऊ मां साहेबाचा जन्मदिवस म्हणून साजरा करताना प्रत्येकाने आपसातील भाऊबंदकी टाळण्याचा निश्चय जर केला तर पुन्हा पुन्हा दुही माजणार नाही हे मात्र खरे .....
प्रजाहितदक्ष, राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या जन्मसोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा