३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्व प्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. या थोर आद्य क्रांतीकारकाचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते...
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून ते आद्यक्रांतिवीर ठरतात. छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमीकाव्याने लढत ब्रिटिशांशी झुंज दिली...
~~~~~~~~
ब्रिटिशांनी १८१७ मध्ये भारतात मद्रास लिटररी सोसायटीची स्थापना केली. याच संस्थेकडून मद्रास जर्नल ऑफ लिटरेचर अँड सायन्स नावाचे
नियतकालिक चालवले जात होते. त्याचे पाच शृंखलात ३८ अंक काढले गेले. १८३३ ते १८९४ या काळात ते प्रकाशित केले गेले. १७५० पासून ते १८९४ पर्यंतच्या विविध ठिकाणी विविध हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बहुपेडी माहितीचं हे संकलन स्वरूप होतं. यात पानाफुलांपासून ते किटकापर्यंत आणि तापमान - पर्जन्यमानापासून ते क्रांतीकारकापर्यंत व जात - वंश भेद इथपर्यंतचे मुद्दे, घटना, व्यक्ती विशेष चर्चिले गेलेत. हे सगळं तटस्थ वृत्तीने केल्याचे जाणवतं. याच उपक्रमा अंतर्गत 'ऍन अकाऊंट ऑफ द ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन ऑफ द ट्राईब ऑफ रामोसीज इनक्लुडिंग लाईफ ऑफ द चीफ उमैया(उमाजी) नाईक' या कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश लिखित पुस्तकात उमाजी नाईक आणि रामोशी समाज यांचा सविस्तर इतिहास मांडला आहे. अलेक्झांडर मॅकिंटॉश हे मद्रास आर्मीच्या २७ व्या रेजिमेंटमधील लष्करी सेवेत होते यामुळे या ऐतिहासिक दाव्यांना, तथ्यांना महत्व आहे. यात एके ठिकाणी उमाजी नाईक याने बंड केले असा उल्लेख आहे, विशेष म्हणजे बंड हा मराठी शब्द BUND असा लिहिलाय. उमाजी नाईक यांचे प्रेरणास्थान मराठा राज्याचे नायक शिवाजी होते असा महत्वाचा उल्लेख यात आढळतो.
संदर्भ - An Account of the origin and present condition of the Tribe of Ramoossies, including the life of the Chief Oomiah Naik - by Captain. Alexander Mackintosh.
A Sketch of the history of Ramossies residing in the Sattarah Territory and in the Poonah and Ahmednuggur districts - by, Captain. Alexander Mackintosh of the 27th Regiment Madras Native Infantry, commanding Ahmednuggur Local Corps. यातील पृष्ठ क्रमांक २२६ वर स्पष्ट लिहिलंय की उमाजी नाईक यांनी देशद्रोह केल्याचे सिद्ध झाले आहे. तर पृष्ठ क्रमांक २३७ वर मॅकिंटॉशने उमाजी नाईकांचा दरारा वर्णिला आहे आणि पूर्ण सातारा, पुणे, भोर व पुरंदर परिसरात लोकांनी कसा उठाव केला होता ते लिहिले आह. पृष्ठ क्रमांक २०७ पासून रामोशी समाजाची बारकाईने माहिती यात आहे. उमाजी नाईक आणि त्यांचे वडील कसे हिंमतबहाद्दर होते, उच्चजातीय स्त्रियांशी सलगी केल्यामुळे पंत सचिवांच्या आदेशानुसार पुरुषच नव्हे तर लहान मुलांचे गळे छाटून कसे मारले जात होते, कडेलोट केला जात होता याचेही वर्णन आहे (पृष्ठ - २११ ), प्रत्येक इंग्रज अधिकारी त्याच्या घराच्या सुरक्षेसाठी रामोशी बाळगून होता व त्याबदल्यात तो त्यांना दरमहा ७ रुपये देत होता अशी नोंद पान २३७वर आहे, रामोशांच्याकडून हिसकावून घेलेलेल्या त्यांच्या पिढीजात जमिनी परत मिळाव्यात म्हणून त्यांनी पेशव्यांकडे अनकेदा अर्ज केले पण पेशव्यांनी त्याची दखल घेतली नाही याचेही वर्णन यात आहे. कुणबी व कोळी समाजातील लोकांची मदत व त्यांचे समाजरूप, खंडोबा दैवतापासून ते उमाजी नाईक हा शिवप्रेमी कसा होता याचे बारकाईने वर्णन या पुस्तकात आहे, रामोशी स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा धीट, चलाख व देखण्या आकर्षक असल्याची नोंद देखील यात आहे (पृष्ठ २१५) माळशिरस मधील रामोशी व पुरंदरमधील रामोशी यांची स्वतंत्र नोंद यात आहे, पारनेर- अकोला- नाशिक- खानदेश इथपर्यंतचे लोक उमाजी नाईकाच्या आंदोलनात सामील झाल्याची नोंद पान २२३ वर आहे. उमाजी नाईक यांना अनेक ब्राम्हण कुटुंबियांनी आपल्या घरात आसरा दिला होता आणि आपल्या बैठकीत समान जागा दिली होती. काहींनी त्यांना जातीवरून त्रासही दिला होता. एका ब्राह्मण स्त्रीने त्यांना भाऊ मानल्यानंतर त्यांनी तिच्या पतीस प्राणदान दिले होते. जे इंग्रजांना सामील असत त्यांच्यावर उमाजी नाईकांच्या टोळीने बिनदिक्कत दरोडे घातले होते. किंबहुना यामुळे बदनामी आणि दरारा दोन्हीही त्यांच्या वाट्यास आलेले.
उमाजी नाईकांचा उच्चार यात Oomiah Naik या नावाने आढळतो. पृष्ठ २३१ वर यशवंतराव होळकर पुण्यातील इंग्राजांच्या कोर्टात येऊन आपले बंधू विठोजी होळकर ज्यांना हत्तीच्या पायी देण्यात आले होते त्यांच्यासाठी फिर्याद मागून गेल्याची नोंद आहे. या पूर्ण नोंदींमध्ये तत्कालीन पेशवे कसे कुचकामी होते अन जनता जातीयतेत कशी विखुरली गेली होती याची तपशीलवार नोंद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उमाजी नाईकांचे शौर्य आणि संघर्षलढा तेजाने तळपून दिसतो. असे असून देखील त्यांना जो यथोचित मानसन्मान वा दर्जा इतिहासाने वा सरकारने द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही ही बाब अत्यंत क्लेशकारक आहे. उमाजी नाईकांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला होता का ? वासुदेव बळवंत फडके यांना प्रसिद्धी देण्यास कुणाचीही हरकत नसावी पण आपल्या धूर्त इतिहासकारांनी त्याच्या कणभर देखील प्रसिद्धी उमाजी नाईकांच्या वाट्यास दिली नाही हे दुर्दैव म्हणायचे की कुणाचे षड्यंत्र ? कारण वरील कागदपत्रात एके ठिकाणी असं लिहिलंय की एके दिवशी या उमाजीची ख्याती कोलकता पर्यंत जाईल आणि ब्रिटीश सत्तेपर्यंत त्याचे नाव पोहोचेल. जे ब्रिटिशांना उमजले ते आपल्या इतिहासकारांना का उमजले नसावे हा प्रश्न उरतोच.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याची रखवाली करीत असलेल्या रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी गावामध्ये झाला. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचपुरा, करारी असे होते त्यामुळे त्यांनी पारंपारिक रामोशी हेरगिरीची कला लवकरच आत्मसात केली. आज रामोशी ही महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात म्हणून ओळखली जाते. त्यांची वस्ती मुख्यतः पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आढळते. कर्नाटक राज्यातही त्यांची तुरळक वस्ती आहे. तेथे त्यांना ‘बेरड’ या नावाने ओळखतात. ब्रिटिश राजवटीत ही जमात गुन्हेगार जमात म्हणून ओळखली जात असे. रामवंशी या मूळ नावाचा अपभ्रंश होऊन रामोशी हे ज्ञातिमान बनले असावे. त्याविषयीच्या काही दंतकथा प्रचलित आहेत.
जसजसे उमाजी मोठे होत गेले तसे त्यांनी दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कु-हाडी, तीरकामठा, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. याकाळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली. हळूहळू मराठी मुलुखहि जिंकत पुणे ताब्यात घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुसरे बाजीराव पेशवे गादीवरआले पण ६ डिसे १८०३ला वसईच्या तहाद्वारे ते इंग्रजांचे अंकित झाले. या पेशव्यांनी कारभार हाती घेतल्यावर इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. मराठा अंमलात गावगाड्याच्या ग्रामव्यवस्थेत रामोशी लोकांना बलुतेदार म्हणून मान्यता दिलेली होती. बारा बलुतेदारांप्रमाणे त्यांना पारंपरिक खास व्यवसाय नसला, तरी त्या काळी गावच्या रक्षणाची जबाबदारी रामोशांवर असे, हाच पुढे त्यांचा व्यवसाय मानला गेला. त्याचा मोबदला गावचे शेतकरी, पाटील व ग्रामस्थ त्यांना देत असत. त्याला बलुते असे म्हटले जाई. काही गावांमध्ये त्यांना इनाम म्हणूनही जमिनी दिल्या गेल्या.
या दरम्यान जनतेवर इंग्रजी अत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजीनाईक, कृष्णनाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर यांना बरोबर घेऊन उमाजींनी कुलदैवत जेजुरीच्या श्रीखंडेरायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांच्या विरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार, अन्याय झालाच तर ते भावासारखे धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रासदिल्यामुळे उमाजीना १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्या काळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या कारवाया आणखी वाढवल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने प्रदेशातील जनताही त्याना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले.
उमाजींना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉशने क-हेपठारच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजींनी पाच इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे, त्यांच्या एका टोळीत जवळ जवळ पाच हजार सैनिक होते.
१८२४ ला उमाजींनी भांबुर्डा येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभाली साठी जनतेला वाटला होता. इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत पुकारले जातील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. उमाजीनी आपला पाठलाग करणा-या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते. आणि काहीचे प्राण घेतले होते.
नंतर इंग्रजी सत्तेविरुद्ध १६ फेब्रुवारी १८३१ रोजी एक जाहीरनामाच त्यांनी प्रसिद्ध केला, त्यात नमूद केले होते, लोकांनी इंग्रजी नोक-या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एक प्रकारे त्यांनी स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हा पासून उमाजी जनतेचा राजा बनला.
या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. मोठे सावकार ,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली. उमाजींच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. अशा लोकांत एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केले गेलेला काळोजी नाईक हाही होता. जो पुढे जाऊन इंग्रजांना मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणा-यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. काळोजी नाईकांसोबत नाना चव्हाणही फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजींना इंग्रजांनी पकडले. त्यांच्या वर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्याखोलीत ठेवण्यात आले. या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली आहे. नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.
नरवीर उमाजी नाईक ज्या रामोशी समाजाचे होते त्या समाजात आजच्या घडीला चार प्रमुख पोटजाती आहेत : व्हलगे रामोशी, कोळी रामोशी, भिल्ल रामोशी आणि मांग रामोशी. रामोशी हिंदू असून मराठी भाषिक आहेत. त्यांच्या बोलीभाषेत काही तेलुगू व कन्नड शब्द आढळतात. त्यांची एक सांकेतिक ध्वनीभाषा आजदेखील अस्तित्वात आहे.
एकाच आडनावाच्या कुळात व समान कुलदैवते असणाऱ्या कुटुंबात विवाह होत नाही. विधवा-विवाह आणि घटस्फोटास मान्यता आहे. खंडोबा हे रामोश्यांचे कुलदैवत आहे. याशिवाय राम, कृष्ण, शंकर, वेताळ, बहिरोबा, म्हसोबा, जनाई, तुकाई, काळोबाई या देवदेवतांना ते भजतात. शुभकार्याला ‘जयमल्हार’ या उद्घोषाने प्रारंभ करतात. खंडोबाच्या जत्रेत देवाची पालखी उचलण्याचा पहिला मान रामोश्यांना दिला जातो. खंडोबाला मुले-मुली सोडण्याची किंवा खंडोबाशी मुलींची लग्न लावण्याची प्रथा पूर्वी मोठ्या प्रमाणात या समाजात होती व अजूनही कुठेकुठे असे लग्न लावले जाते. देवाला सोडलेल्या मुलीस ‘मुरळी’ व मुलास ‘वाघ्या’ म्हणतात. वाघ्यांचे घर वाघ्या आणि संन्यासी वाघ्या हे दोन प्रकार आहेत. प्रपंच करून खंडोबाची सेवा करणारा घर वाघ्या आणि अविवाहित राहून सेवा करणारा संन्यासी वाघ्या होय. वाघे-मुरुळी एकत्र येऊन नाचगाण्याचे कार्यक्रम करतात, त्याला जाग्रण-गोंधळ असे म्हणतात. जाग्रण-गोंधळ ही पारंपरिक लोककला मानली जाते. रामोशी समाजात काही लोक मृताला पुरतात तर काही लोक दहनविधी करतात.
अशा या दुर्लक्षित समाजातील एक योद्धा माणूस इंग्रजांविरुद्ध बंड पुकारतो अन जनतेच्या मनात असंतोषाची ठिणगी पेरतो तरीदेखील आपली इतिहासाची पुस्तके त्यांची दखल केवळ एका शब्दात घेतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत तर त्यांना आद्य क्रांतिकारकाचे श्रेय देखील दिले जात नव्हते. उमाजी नाईकांच्या मृत्यूनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून तरुण बरोबर घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देउन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंडाची घोषणा केली होती. वासुदेव फडके यांचे कर्तृत्व कुणीच नाकारू शकत नाही परंतु उमाजी नाईक यांना आद्य क्रांतीकारकाचे श्रेय द्यायला हवे होते ते कोत्या मनाच्या संशोधकांनी आणि इतिहासकारांनी दिले नाही हे खुल्या मनाने सर्वांनी मान्य करायला हवे.
इतिहासकारांनी जाणीवपूर्वक उपेक्षिलेल्या आदय क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा स्मृतीदिन नुकताच झाला. त्यांना अभिवादन....
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा