बुधवार, ११ मे, २०१६

गोब्राम्हण - जुन्या वादाला नवी फोडणी !



"आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते", अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आणि राज्यात एकच धुरळा उडाला.
महात्मा ज्योतीराव फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, 'शिवरायांनी अफझल खानाच्या रूपात मुसलमानाचा नव्हे, तर शत्रूचा कोथळा बाहेर काढला. अत्याचार, अन्याय, आक्रमणाच्या विरोधात त्यांचा लढा होता. त्यामध्ये त्यांनी जातीधर्माचा विचार केला नाही. मात्र, त्यांचा संघर्ष जाणीवपूर्वक मुस्लिमांपुरता मर्यादित ठेवला गेला. महापुरुषांनी संघर्षाला धार्मिक स्वरूप येऊ दिले नाही. तरीही शाळेत छत्रपतींचा इतिहास वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो. समाजासमोर इतिहासाची वास्तव मांडणी झाली पाहिजे. जातीवाचक विचार न करता राज्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे', अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या निमित्ताने महाराष्ट्रात 'गोब्राम्हण'चा वाद पुन्हा नव्याने ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. सोशल मीडीयापासून ते वृत्तवाहिन्यांवर या विषयाने जागा व्यापली आहे.

शिवाजीराजांच्या आगमनाआधी दिल्या जाणारया ललकारीत 'गोब्राम्ह्मणप्रतिपालक' हा शब्द होता की नव्हता यावरून आजघडीला रणकंदन माजले आहे आणि दोन्ही बाजूचे चतुर राजकारणी यातही आपला कार्यभाग साधत आहेत. लोक मात्र आपसात वाद घालत बसल्याचे दिसत आहे. श्रीमंत कोकाटेंनी पुस्तकात जे दावे केलेत तो मुद्दा पुढे येण्याआधी हा मुद्दा समोर आला आहे. काही हिंदुत्ववादी संघटना या उपाधीबाबत आग्रही आहेत तर पुरोगामी विचारसरणीचे लोक याच्या विरोधात आहेत असे उघड दुफळीचे हे चित्र आहे. दोन्ही बाजूंकडून यावर युक्तिवाद याआधीही मांडले गेले आहेत त्यात आता काही नवे दावे मांडले जाताहेत.

'बुधभूषणम' या संभाजी महाराजांनी लिहिलेल्या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठीतील अनुवाद प्रभाकर ताकवले यांनी केला आहे. जिजाई प्रकाशनने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. यात त्यांनी गोब्राह्मणचा अर्थ विशद केला आहे. या'गो' म्हणजे भूमी आणि तिच 'ब्रम्ह' होय. ब्राम्हण म्हणजे भूमीवरील सर्व चराचरसृष्टी. (येथे ब्राम्हण म्हणजे एक वर्ण वा जात संभाजी राजांना अपेक्षित नव्हता असे दिसते) याच ग्रंथात क्षत्रियास स्वर्गप्राप्ती कशी होते हे सांगताना त्यांनी याच व्याख्येवर आधारीत गोब्राम्हणप्रतिपालकची फोड केली आहे.(श्लोक क्र.५५४) शिवाय श्लोक क्र. ५१७ मध्ये त्यांनी गाय आणि ब्राम्हण यांचे महत्व सांगितले आहे. पण ही उपाधी शिवबांना लावली जाई असे स्पष्ट उल्लेख त्यात नाहीत. मग याचे उल्लेख त्यांनी का केले असावेत याचे उत्तर शोधावे लागते. शिवबांचे वर्णन करताना व त्यांचे गुणगान गाताना ही उपाधी काही ऐतिहासिक दस्तावेजात वापरल्याचे आढळते. कदाचित यामुळेही संभाजीराजांनी या विषयाचा उहापोह केला असावा.

'गोब्राम्हणप्रतिपालक' ही उपाधी राजांना लावली जात होती या गृहितकाचे समर्थक शिवकालीन 'आज्ञापत्रा'चा दाखला देतात. शिवराजभूषण आमात्य आपल्या 'आज्ञापत्रा'मध्ये म्हणतात की, 'सिंहासना रुढ होऊन छत्र धरुन (शिवराय) छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करुन देव-ब्राम्हण संस्थानी स्थापून यजन यजनादि षट्कर्मे वर्णविभागे चालिविली तस्करादि आन्याई यांचे नाव राज्यांत नाहीसे केले.' अर्थात - शिवरायांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन धर्मोद्धात केला देव ब्राम्हण मंदीरे यांची संस्थाने स्थापून त्याठीकाणी योग्य कारभार चालावा यासाठीचे नियोजन केले.

याचप्रमाणे सभासद बखरीच्या सुरवातीलाच सभासद म्हणतात "रत्रौ श्री शंभुमहादेव (शहाजी राजांच्या) स्वप्नात येऊन प्रसन्न होऊन बोलीला जे तुझ्या (शहाजी राजे) वंशात आपण अवतार घेवु, देव-ब्राम्हणांचे संरक्षण करुन म्लेंच्छांचा क्षय करतो" याच आर्थ असा की भगवान श्री शंकर शहाजी राजांच्या स्वप्नात येवुन दर्शन देतात व म्हणतात की आपण तुझ्या वंशात अवतार घेवुन देव-ब्राम्हणांचे संरक्षण व म्लेंच्छांचा क्षय करतो.

'शिवबावनी' व 'शिवराजभूषण' या काव्यामध्येही कवी भूषण देखील अशाच अर्थाचे उल्लेख करतात. 'देवानां ब्राम्हणांनां च गवां च महिमाधिकम । पवित्राणि विचित्राणि चरित्राणे च भुभूजाम ॥' (अ.१. श्लोक. ३९) अर्थ :- देव ब्राम्हण आणि गाई यांचा महिमा आणि राजांची पवित्र व अद्भुत चरित्रे ज्यात वर्णिलि आहेत. (असे ते शिवरायांचे चरित्र); मात्र या सर्वांत हे उपाधीपर शब्द राजांच्या गौरवासाठी या लेखकांनी वा कवींनी वापरले आहेत असेच ध्वनीत होते. शिवबांनी ही उपाधी स्वतःला लावून घेतल्याचे कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रात नमूद नाही.

ज्या आज्ञापत्रांचा आधार मुख्यत्वे समर्थनासाठी वापरला जातो ती शिवचरित्र साधने खंड ५, क्र. पत्र क्र. ५३४ व ५३७ यात आहेत. या सर्व पत्रांची आणि आधारांची छाननी करून इतिहासकार त्र्यं.शं. शेजवलकरांनी पूर्वीच निर्वाळा दिला आहे की, ५३४ क्रमांकाच्या लेखात शिवाजी महाराज स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत नाहीत, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण महाराजांस तशी पदवी देतो. ५३७ क्रमांकाच्या लेखात तर गोब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही !

महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तिला ऊर्दूमध्ये 'अल्काब' तर प्राकृतमध्ये यातील प्रत्येक उपाधीला 'बिरुद' आणि बिरुदांच्या पूर्ण स्वरूपाला 'बिरुदावली' म्हणले गेले. शिवबांसाठीच्या ललकारीवर मत व्यक्त करताना दस्तुरखुद्द बाबासाहेब तथा ब.मो. पुरंदरे यांनीही असाच निर्वाळा दिला आहे की 'गोब्राह्मणप्रतिपालक' हा शब्द त्या अल्काबमध्ये नव्हता. महाराज प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती अशी ती ललकारी असल्याचा ते निर्वाळा देतात. शिवबांचा गौरव करताना दुर्गपती, गज-अश्वपती, भूपती प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टावधानजागृत, अष्टप्रधानवेष्टीत, न्यायालंकारमंडीत, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, राजनितीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंधर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज अशा अनेक उपाध्या लावल्या गेल्या त्याप्रमाणेच ही देखील एक उपाधी लावली गेली.

शिवाजी राजे हे कुणा एका जाती धर्माचे पालक नसून सकल रयतेचे पालक होते. ते खरया अर्थाने लोकराजे होते. शिवबांना लावलेल्या उपाधीचा विचार करताना महात्मा फुलेंनी वापरलेल्या विशेषणांचा विचार करणे अनिवार्य वाटते कारण महात्मा जोतिराव फुले आधुनिक काळातील पहिले शिवशाहीर होते. या शाहिरीतून त्यांनी ‘कुळवाडी-भूषण’ म्हणून छत्रपती शिवरायांचा गौरव केला. यात एक पंक्ती 'पोषिंदा कुणब्यांचा। काळ तो असे यवनांचा।।’ अशीही आहे, मग त्या आधारे फुल्यांनी शिवबांना मुस्लीमद्वेष्टे असं संबोधले असा अर्थ कुणी काढला तर तो अयोग्य ठरेल. कारण पुढील पंक्तीत त्यांनी विस्तृत भूमिका मांडली आहे. पूर्वी संपूर्ण शेतकरी वर्ग एकाच जातीत मोडत होता. त्याला त्यालाच कुळवाडी म्हणत. मूळ शब्द कुळ आहे. हे दोन्ही शब्द ‘कृषिवल’ या शब्दाच्या अपभ्रंशातून आले आहेत. कृषिवल-कृषिवळ-कुवळ-कुळ अशी त्याची उपपत्ती आहे. कुळ म्हणजे शेती कसणारा. हा फार प्रचलित शब्द आहे. शेती कसणारया कुळांना शेतीचे मालक बनविणारा कुळकायदा सर्वपरिचित आहे. ‘वाडी’ हा प्राकृत भाषेतील प्रत्यय आहे. मारवाडी, काठेवाडी, भिलवाडी, असे शब्द भारतीय भाषांत दिसतात. तसाच कुळवाडी हा शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचा देखील ब्रिटिशांच्या कागदोपत्री वेरुळ गावचे पाटील असा उल्लेख आहे. तत्कालीन पाटील म्हणजे शेतकरी मग या न्यायाने महात्मा फुल्यांनी दिलेली कुळवाडी भूषण ही पदवी देखील सार्थ वाटते.

खरे तर इतिहासाची विभागणी करताना ‘प्राचीन' च्या ऐवजी हिंदू, 'मध्ययुगीन' च्या ऐवजी मुस्लीम आणि 'आधुनिक' च्या ऐवजी ब्रिटीश’ अशी विभागणी करून काही धूर्त लोकांनी कावा साधायचा प्रयत्न केला आहे. शिवाजी राजे मुघलांच्या विरुद्ध लढले असे सांगण्याऐवजी त्यांनी मुसलमानांशी लढा दिला यावर जोर दिला गेला. संपूर्ण इतिहासात अमुक एखादी व्यक्ती मुसलमान आहे म्हणून तिची हत्या करा असं शिवबांनी म्हटल्याचे एकाही दस्तऐवजातून आजतागायत सिद्ध झालेले नाही परंतु शिवबांच्या नावाचा वापर मुस्लीमद्वेष पसरवण्यासाठी केला गेला हे महाराष्ट्राचे, इतिहासाचे आणि शिवबांच्या पराक्रमाचे दुर्दैव आहे. अलीकडील काळात जेंव्हा हा समज पुसण्यासाठी नव्याने इतिहासाची साधने धुंडाळली जाऊ लागली तेंव्हा नव्याने युक्तिवाद - प्रतिवाद होणे साहजिक आहे. पण त्यात अभ्यासू वृत्ती कमी आणि उथळपणा जास्त दिसून येतोय. 'गोब्राम्हण'चे विरोधक जेंव्हा व्हायरल झालेल्या पुरंदरेच्या व्हिडीओचा आधार घेतात तेंव्हा त्यांनी याआधी पुरंदरेंच्या अनेक विधानांना नाकारल्याचा विसर पडल्याचे तर हिंदुत्ववादी आणि गोब्राम्हणवादी समर्थक जे नेहमी पुरंदरेना प्रमाण मानतात ते या मुद्द्यावर त्यांना जमेस धरताना दिसत नाहीत. असे विरोधाभासी चित्रही या निमित्ताने समोर आले. अशा वादातून सामाजिक स्थैर्य जरी काही काळासाठी अंशतः लोप पावत असले तरी निकोप समाजमनाच्या वाढीसाठी असे वाद पुढे जाऊन हितकारकच ठरतात. त्याचवेळी हे वाद केवळ फोडणी न ठरता त्यातून सत्य बाहेर यावे हीच सामान्य जनांची अपेक्षा असणार हे मात्र नक्की आहे.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा