शिवकालानंतर मराठ्यांच्या इतिहासातली रणांगणावरची सर्वोच्च पराक्रमाची शर्थ म्हणून पानिपताकडे पाहिले जाते. या सर्व धामधुमीच्या कालखंडात ज्या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याची शिकस्त केली त्यात शिंदे घराणे अग्रस्थानी होते आणि पानिपतात गेलेली पत परत आणण्याचे महत्कार्य करणारे शिंदे होळकर यांचा इतिहास हा भव्य आणि उत्तुंग आहे. यातही शिंदे घराण्यातल्या महादजी शिंद्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व पराक्रम अलौकिक असा आहे. महादजी शिंद्यांनी उत्तर हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. मध्यंतरी ज्या गोवध हत्या बंदीवरून आपल्या देशात गदारोळ माजला होता ती बंदी महादजींनी १७८५ मध्ये शहाआलम या मुघल बादशहाला आपली कठपुतळी बनवून अंमलात आणली होती. मुघल बादशहा सत्तेत असूनही हा फतवा त्यांनी अमलात आणला होता यावरून महादजींचे दिल्लीवरील वर्चस्व लक्षात यावे. उत्तर भारताचा प्राण असणारा मध्य - पूर्वेचा भाग आपल्या टापाखाली ठेवणारे धोरणी राणोजी, सर्वांग जखमांनी भरलेले असतानाही बचेंगे तो और लढेंगे असं म्हणण्याची जिगर ठेवणारे दत्ताजी, वयाच्या १६ व्या वर्षी नजिबाच्या गुरुचे कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात तोडणारे अन पुढे पानिपतावर हौतात्म्य पत्करणारे जनकोजी, काळाची पावले ओळखून आपला विकास साधून घेणारे जयाजी व माधवराव, स्वातंत्रोत्तर काळात राजकारणात आपली पत राखणाऱ्या विजयाराजे अन त्यांचे पुत्र माधवराव, अन आताच्या काँग्रेसमधील एक आशास्थान असलेले ज्योतिरादित्य शिंदे असा यांचा छोटेखानी परिचय देता येईल. ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून ओळखले जात असलेल्या शिंदे घराण्याचा इतिहास सुरु होतो राणोजी शिंदयांपासून.....
शिंदे घराणे - राणोजी शिंदे :
राणोजी शिंद्यांनी १८ व्या शतकाच्या सुरुवातीस ग्वाल्हेरला शिंदेशाहीचे अधिष्ठान असणारे शिंद्यांचे संस्थान स्थापन केले. हे शिंदे म्हणजे मुळचे सातारा जिल्ह्यातल्या कण्हेरखेडच्या मराठी मातीतले, ही रयतेवर प्रेम करणारी अन मुघली सत्तेविरुद्ध अहोरात्र लढण्यास सज्ज असलेली ही रणमर्द माणसे ! राणोजी शिंदे हे बाळाजी बाजीराव पेशव्याचे निष्ठावंत सेवक होते. महापराक्रमी महादजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे सर्वात कनिष्ठ चिरंजीव होते. राणोजींनी उज्जैन हे आपले मुख्य ठाणे बनवले होते. तर आपले लष्कर ग्वाल्हेर इथे ठेवले होते. पश्चिम मध्य भारतातील विंध्याचलाच्या रांगेतला समृद्ध पठारी अन पर्वतीय प्रदेश असणारा माळवा राणोजींनी आधी कब्जे केला. त्यानंतर त्यांनी चौथाई वसुलीसाठी सुलभ ठिकाण म्हणून उज्जैन निवडले. मैनाबाई व चिमाबाई ही राणोजींच्या पत्नींची नावे. पहिल्या पत्नीपासून जयाप्पा, दत्ताजी अन ज्योतिबा ही मुले झाली तर दुसऱ्या पत्नीपासून तुकोजी अन महादजी ही मुले झाली.
१७३७ ते १८८० मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र राज्य होते. त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती. महाराज राणोजी शिंदे यांनी महांकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे यांचे मंत्री रामचंद्र शेणवी यांनी उज्जैन मध्ये असलेले महाकाल मंदिर बांधले. १८१० मध्ये शिंदे घरण्याची राजधानी ग्वाल्हेर मध्ये आली. शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेडचे पाटील होते, या घराण्यातील राणोजी शिंदे हा बाळाजी बाजीरावच्या वेळी नावलौकिकास आला. त्याने १७२६ मध्ये माळव्यात चौथाई आणि सरदेशमुखीच्या वसुलीला प्रथम सुरुवात केली १७२७-२८ पासून राणोजी शिंदेचा कार्यकाळ सुरु होतो. माळवा प्रांतातून, चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे यांची नेमणूक होती. माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा जो निर्णायक पराभव मराठ्यांनी केला त्यात उदाजी पवार, मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे देखील आपल्या पथकासोबत उपस्थित होते. १७३५ पासून राणोजी शिंदे यांनी आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले. जुलै १७३६ च्या दरम्यान महादेव भट्ट हिंगणे यास पाठविलेल्या एका पत्राद्वारे राणोजी शिंदे यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व विशेष खुलून दिसते. असे हे राणोजी शिंदे १७३५ ते १७४५ मराठ्यांचे बस्तान बसविण्याच्या कामगिरीत सतत आघाडीवरचं होते. जयपूरचा शासक सवाई जयसिंह याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवरुन चाललेल्या वारसाहक्कात राणोजी शिंदे यांना ईश्वरसिंहाने विशेष पत्र लिहून मदतीस बोलाविले यावरून त्यांचे त्याकाळचा दरारा देखील लक्षात येतो. या केलेल्या मदतीखातर ६६ लाख रुपये राणोजी शिंदेंना मिळाले. १९ जुलै १७४५ला राणोजी शिंद्यांचे निधन झाले.
जयाप्पा शिंदे :
राणोजी शिंद्यांच्या मृत्यूनंतर जयप्पानी ग्वाल्हेरची गादी सांभाळली. २५ जुलै १७५५ ला जोधपुरच्या महाराजा विजयसिंह राठौर यांच्या वारसदारांशी (बिजसिंह राठौर ) लढताना वयाच्या ३५ व्या वर्षी जयाप्पांना नागौर (राजस्थान) येथे घातपात करून मारण्यात आले. जयाप्पा शिंद्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जनकोजी शिंदे यांनी शिंदेशाहीची सूत्रे आपल्या हाती घेतली. जयाप्पा शिंदेंनी १७४५ ते १७५५ अशी दहा वर्षे आपली कारकीर्द केली. दत्ताजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे द्वितीय पुत्र. जयाप्पाच्या मृत्यूनंतर शिंदेशाहीची सूत्रे जनकोजीस मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. ...या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतहि मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर अप्तामीनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करुन त्याची डोलाची अंबारी खालीं पाडिली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होते. जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या मोहिमेंत खून झाला, तींतहि दत्ताजी होते ; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेऊन बिजेसिंगाचा मोड केला. पुढें १७५६ मध्ये दत्ताजीनी सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली. नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले. पुढील सालीं पेशव्यांनी अबदालीवर स्वारी करून गेले असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानी दत्ताजीसच धाडण्याबद्दल लेखी दरख्वास्त केली. या दरम्यान १७५८ मध्ये दत्ताजीचा विवाह भागीरथीबाईशी झाला. लग्न उरकून हळद ओल्या अंगाने दत्ताजी उज्जैनला आले. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबानें सांगितलेल्य नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावांनी "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोतरे बडविण्यास लावितील" असे उद्गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें १० जानेवारी १७६० च्या दिवशी दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला. बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणत मृत्यूस कवटाळणाऱ्या दत्ताजीचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर आहे. जनकोजी शिंद्यांचे वय या वेळी १५ वर्षांचे होते, त्यांनी दत्ताजी शिंद्यांना परत फिरण्याचा मुत्सद्दी सल्ला दिला होता पण भावनेच्या आहारी जाऊन प्रतापराव गुजरांनी जी चूक शिवछत्रपतीच्या काळात केली होती तशीच चूक इथे केली.
जनकोजी शिंदे :
पानिपतच्या मोहिमेत पेशव्यांबरोबर असलेले जनकोजी शिंदे दत्ताजीच्या वीरमरणानंतर माघारी फिरले नाहीत, उलट क्रूरकर्म्या नजीबाविरुद्ध त्यांच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धगधगत होता. अब्दालीबरोबर कुंजपुरा इथे (ऑगस्ट १७६०) झालेल्या चकमकीत नजिबाचा गुरु कुतुबशहा याचे मुंडके जमदाडाने कापून काढून आपला सुडाग्नी काहीअंशी शांत केला होता. याच कुतुबशहाने प्राण कंठाशी आलेल्या दत्ताजीवर अखेरचा वार केला होता.
पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, . परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी राजगादीवर बसलेल्या जनकोजी शिंद्यांना पानिपतमध्ये (१४ जानेवारी १७६१ ) वयाच्या १६ व्या वर्षी पकडण्यात आले. पानिपतावर जेंव्हा विश्वासराव पडल्याची वार्ता पसरली, सर्व सैन्य घाबरून सैरावैरा पळू लागले तेंव्हा जनकोजी अन त्याचे काका तुकाजी ( महादजी शिद्यांचे सख्खे मोठे तर जयाप्पा - दत्ताजीचे सावत्र लहान भाऊ ) यांनी सदाशिवराव भाऊंच्या गोटाकडे त्यांना बळ देण्यासाठी कूच केले, यावेळी बर्खुरदार खानाने तोफगोळा लागून जायबंदी झालेल्या जनकोजी शिंद्यांना पकडले. काशीराजाने नन्तर त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करून पाहिले, काही आर्थिक आमिषे दाखवली. पण याचा सुगावा नजीबास लागला. नजिबाने आपल्याला मारण्याआधी आपण जनकोजीस मारणे योग्य असा विचार करून बर्खुरदार खानाने जनकोजीस हाल हाल करून ठार मारले. याच दरम्यान ज्योतिबाराव शिंद्यांचे (दत्ताजींचे अखेरचे सख्खे बंधू ) कुंभेर येथे निधन झाले.
जनकोजीच्या नंतर अनेकांनी वारसा हक्काचा दावा केल्याने पेशव्यांनी ३ वर्षे शिंदेशाहीस नव्या राजाची राजमान्यता दिली नाही. २५ नोव्हेबर १७६३ ला कदराजी शिंद्यांना ( तुकाजी शिंद्यांचे पुत्र ) पेशव्यांनी शिंदेशाहीची सूत्रे दिली, पण त्यांनी ती नाकारली अन सरदार म्हणून राहणे पसंत केले. १० जुलै १७६४ ला मानाजीराव शिंद्यांची अखेर तख्तपोशी झाली अन शिंदेशाहीला नवा राजा मिळाला,ते जानेवारी १७६८ पर्यंत सिंहासनावर आरूढ होते.
महादजी शिंदे :
राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होतीआणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले..नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. रियासतकार सरदेसाईंनी मराठ्यांच्या इतिहासात महादजींची तुलना नेपोलियनशी केली आहे यावरून महादजींच्या शौर्याची कल्पना यावी.
महादजी शिंदे हेही पानिपत मोहिमेच्या वेळी भाऊसाहेबांबरोबर दक्षिणेंतून निघाले होते. पानपतांत युद्धाच्या शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां हेही परत फिरले. परतीच्या वाटेंवर त्यांच्यावर पठाणांच्या एका शस्त्रसज्ज टोळीने हल्ला चढवला, त्यातीलच एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून त्यांचा पाय कायमचा अधू केला होता. राणाखान नांवाच्या एका मराठ्यांच्याच लष्करांतील माणसानें त्याला पुढे निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें. राघोबादादांच्या घालमेलीच्या कारकीर्दीत महादजी हे पटवर्धन, प्रतिनिधीप्रमाणें निजामाकडे जाऊन मिळण्याच्या बेतांत होता. बारभाईच्या कारस्थानांत कोणास जाऊन मिळावें याबद्दल प्रथम महादजीचा निश्र्चय झाला नव्हता; परंतु नाना व बापू यांनीं शेवटीं त्याना मुलूख वगैरे देऊन आपल्या बाजूस घेऊन त्यांच्याकडूनच राघोबाचा बंदोबस्त केला. मात्र या वेळेपासून महादजींच्या मनांत नाना फडणविसाबद्दल असूया उत्पन्न झाली. या सुमारासच भाऊसाहेबांच्या तोतयाच्या प्रकरणांत महादजींनी कारभाऱ्यांस मदत केली व कोल्हापुरकरांचा पराभव केला.
पहिल्या इंग्रज-मराठे युध्दांतील महादजींची कामगिरी मुत्सद्देगिरीची होती. सालबाईच्या तहानंतर महादजीनें ज्या रजपूत राजांनीं त्याचा मुलूख बळकविला होता त्यांचा पराभव करून आपला प्रांत परत घेतला. आतांपर्यंत इंग्रजांशीं झालेल्या लढायांत त्यांच्याकडील कवायती पलटणींचा उपयोग पाहून, महादजींनी फ्रेंचांनां चाकरीस ठेऊन तोफा ओतण्याचे व हत्त्यारें तयार करण्याचे कारखाने काढून कवायती पलटणें तयार केलीं व त्यांच्या बळावर गेल्या १० वर्षांत दिल्लीच्या बादशाहीवरील जें मराठयांचें वर्चस्व नाहीसें झालें होतें तें पुन्हां प्रस्थापित केलें आणि यापुढें १०।१२ वर्षे सर्व उत्तरहिंदुस्थानचीं सूत्रें आपल्या हातीं खेळविलीं. यावेळी दिल्लीच्या बादशाहीला हाताखालीं घालण्याचा उपक्रम शीख, इंग्रज व मराठे हे तिघे करीत होते; परंतु त्यांत अनेक कारणांनीं मराठेच पुढें आले. याच वेळीं महादजींनी पातशहाकडून पेशव्यांस वकील-इ-मुतलकचें पद व स्वतःस त्या पदाची नायबगिरी मिळवून, साऱ्या बादशाहींत गोवधाची मनाई करविली. बादशहास दरमहा ६५ हजारांची नेमणूक करून देऊन महादजींनी सारी पादशाही आपल्या हातांत घेतली (१७८५). यानंतर कांही काळ मोंगली पादशाही लुप्त होऊन साऱ्या हिंदुस्थानभर हिंदुपदपादशाही सुरू झाली.
उत्तरहिंदुस्थानांत महादजींनी कडक अम्मल गाजविला, त्यामुळें बादशाहींतील मुसलमान सरदार व रजपूत राजे यांनीं त्यांच्याविरुद्ध बंडाळी माजविली (१७८६-८७). लालसोटच्या लढाईंत तर बादशहाची सर्व फौजच रजपूत राजांनां मिळाली, त्यामुळें महादजींना हार खावी लागली (१७८७); गुलाम कादरनें दिल्ली, अलीगड वगैरे शहरें ताब्यांत घेतल्यानें महादजींना चंबळेअलीकडे यावें लागलें. याप्रमाणें त्यांच्या उत्तरेकडील वर्चस्वास धक्का बसला, परंतु महादजींनी धीर न सोडतां पुन्हां गेलेले प्रांत परत मिळविण्याचा प्रयत्न चालविला; यावेळीं मात्र महादजींनी आपला ताठा व मत्सर सोडून नाना फडणविसाकडे मनांतील किल्मिष काढून टाकून मदतीची मागणी केली. दिल्ली हातची जाते हें पाहून नानानींहि अल्लीबाहद्दरास त्याच्या मदतीस धाडलें (१७८८). अल्लीबहाद्दर व महादजी यांनीं शीख आणि जाट यांनां मदतीस घेऊन गुलाम कादर वगैरे मुसलमान मंडळी आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर येथील राजे वगैरे रजपूतमंडळ यांचा पराभव करून पुन्हां रजपुताना आणि दिल्ली हस्तगत केली (१७८९-१७९०). उदेपूरचा राणा तर महादजींना सामोरा आला होता. हा मान त्या घराण्यानें खुद्द दिल्लीच्या बादशहासहि कधींच दिला नव्हता. याच सुमारास गुलाम कादरानें शहाअलमचे डोळे काढून व त्याच्या जनान्याची अब्रू घेऊन दिल्लींत प्रळय मांडला होंता; त्यावर महादजींनी गुलामास पकडून त्याला देहांतशासन केलें व पुन्हां शहाअलमास तक्तावर बसवून सर्व पातशाही कारभार आपल्या हातीं घेतला (१७८९).
महादजींनी पानपताचा कलंक धुऊन काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात कित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीन्सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही… त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली…कारण या महाकाय युद्धातील पराभवानंतर पेशवाईतील मुत्सद्दीच खचून गेले होते. याचे एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते- १७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलात पुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल ह्यांच्या नावे सनदा काढल्या: - ”गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उन्ते व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले आहेत.. त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे !"
महादजी शिंदे पुण्याजवळील वानवडी येथे १२ फेब्रुवारी १७९४ला वयाच्या ६७व्या वर्षी निधन पावले. महादजींना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपले सख्खे भाऊ तुकोजी शिंदे यांचे नातू दौलतराव शिंदे यांना दत्तक घेतले आणि आपला वारसदार नियुक्त केले. याच काळात यशवंतराव होळकरांनी आपल्या तलवारीचे पाणी भारतभर तेजाने परजले होते.
दौलतराव शिंदे :
दौलतराव हे राणोजी शिंद्यांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र तुकोजी यांचे नातू असल्याने सुरुवातीस पेशव्यांनी त्यांना मान्यता दिली नाही. अखेर ३ मार्च १७९४ रोजी त्यांना नवा राजा म्हणून मान्यता मिळाली. १८२७ पर्यंत दौलतराव शिंदे सत्तेत होते. दौलतरावांनी लॉर्ड कोर्नवॉलिसशी १८१७ मध्ये तह करून पायावर धोंडा पाडून घेतला. तब्बल ३१ वर्षे दुबळा कारभार केलेल्या दौलतरावांचे १८२७ मध्ये निधन झाले, त्यांना मुलबाळ झालेले नव्हते अन त्यांनी कुणाला वारस म्हणून दत्तक घेतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पश्चात १८२७ ते १८३३ असा कार्यभार सांभाळला. बायजाबाईने दत्तक घेतलेल्या शिंदे वंशावळीतील मुकुटराव या मुलाने नंतर जनकोजी द्वितीय म्हणून कारभार पहिला.
बायजाबाई आणि जयाजीराव शिंदे :
बायजाबाईने जमेल तितकी टक्कर दिली पण तिने दत्तक घेतलेल्या जनकोजीने (दुसरा) पार गुडघे टेकले. १८३३ ते १८४३ अशी दहा वर्षे त्याने कारभार केला, १८४३ मध्ये त्याचा मृत्यू झाला अन दुर्दैवाने त्यालाही मुलबाळ नव्हते त्यामुळे त्यांची पत्नी ताराबाई शिंदे हिने हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा भगीरथराव याला दत्तक घेतले. पुढे हाच जयाजीराव शिंदे या नावाने ओळखला गेला. बायजाबाई या काळातही सक्रीय होत्या अन त्यांचे भाऊ त्यात त्यांना मदत करत होते. जयाजी शिंदे जेंव्हा कारभार पाहू लागले तेंव्हा त्यांना त्यांचे कारभारी असलेले दादा खासगीवाले यांनी बायजाबाईंच्या भावाने जशी अप्रत्यक्ष रित्या सत्ता स्वतःच्या हाती ठेवली होती तसेच काम केले. दिनकर राव शिंदे यांनी काही काळ सूत्रे आपल्या हाती घेतली तेंव्हाच्या कळातच १८५७चे बंड देशात घडले होते. हे जयाजीराव शिंदे गायकीच्या ग्वाल्हेर घराण्यातले एक उत्तम गायकदेखील होते. चंदेर प्रदेश ( आताचा एमपी मधील अशोकनगर जिल्हा ) नंतर ग्वाल्हेरमध्ये सामील करण्यात आला. १७ जून १८५८ रोजी ह्यूज रॉज याने ग्वाल्हेर खरे तर खालसा केले असते पण आणखी बंडाळ्या होऊ नये म्हणून त्यांनी जयाजीरावाला पुन्हा सिंहासनावर बसवले पण सर्वाधिकार कमी करून!
माधवराव शिंदे १ :
यांनतरच्या काळात जयाजीराव शिंद्यांनी आपल्या राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले अन इंग्रजासोबत नरमाईची भूमिका ठेवली. १८८६ मध्ये जयाजीराव शिंदे निवर्तले. त्यांच्यानंतर माधवराव शिंदे वयाच्या १० व्या वर्षी गादीवर बसले, त्यांचे वय कमी असल्याचे कारण दाखवत इंग्रजांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अंतर्गत मंत्रीपरिषद नियुक्त केली. पण आपल्या प्रजेचा विकास करण्यासाठी माधवराव शिंद्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना उर्वरित अधिकार देण्यात आले होते. १९२५ पर्यंत ते गादीवर होते. इंग्रजांनी त्यांचा उल्लेख प्रगतीशील राजा असे केले होते.
माधवराव,जिवाजीराव आणि विजयाराजे शिंदे
जॉर्ज जिवाजीराव शिंदे : १९२५ मध्ये माधवरावांचे एकुलते एक पुत्र जॉर्ज जिवाजीराव (जियाजीराव असाही उल्लेख आहे ) शिंदे ग्वाल्हेरचे राजे झाले ते भारत स्वतंत्र होईपर्यंत ग्वाल्हेरचे अखेरचे राजे म्हणून कार्यरत राहिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर १५ जून १९४८ मध्ये 'मध्य भारत' हे राज्य अस्तित्वात आले. या राज्यासाठी राजप्रमुख हे पद निर्माण केले गेले होते. या मध्य भारत राज्यात ग्वाल्हेर संस्थान विलीन करण्यात आले होते. २८ मे १९४८ रोजी जॉर्ज जिवाजीराव शिंदे राजप्रमुख या पदी नियुक्त झाले ते ३१ ऑक्टोबर १९५६ पर्यंत मध्य प्रदेशची निर्मिती होईपर्यंत त्या पदावर राहिले. विजयाराजे शिंदे ह्या जॉर्ज जिवाजीरावांच्या पत्नी होत्या.
विजयाराजे शिंदे ते ज्योतिरादित्य शिंदे :
या नंतर ग्वाल्हेरचे शिंदे राजघराणे नाममात्र राजेशाहीचे राहिले पण स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या राजकरणात सक्रिय राहिले. विजयाराजे शिंदे भाजपकडून सक्रिय राहिल्या तर त्यांचे पुत्र माधवराव शिंदे हे काँग्रेसकडून सक्रिय राहिले. माधवरावांच्या अकाली मृत्युनंतर त्यांचे पुत्र आताचे काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हाती शिंदे घराण्याची सूत्रे आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे ह्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या आणि माधवरावांच्या कनिष्ट भगिनी अन ज्योतिरादित्य यांच्या आत्या होत. आजच्या घडीलाही शिंदे घराणे भाजपा आणि काँग्रेस यांच्यात दुभंगलेले पहायला मिळते. काल २५ जानेवारी २००१ला राजमाता विजयाराजे शिंदे यांचे वार्धक्याने देहावसान झाले होते, स्वातंत्र्यपूर्व काळातला शिंदे घराण्याचा अखेरचा दुवा निखळला होता.
आपल्या मराठी मातीचा अंश घेऊन उत्तर भारतात पुढे गेलेले, मराठ्यांचे नाव इतिहासात अजरामर करणारे हे घराणे राजकारणाच्या दलदलीमुळे आज दुभंगलेल्या अवस्थेत आहे ही क्लेशदायक गोष्ट आहे. कारण शिवछत्रपतींचा वारसा पुढे चालविणारे महाराष्ट्रातील भोसले घराणे (सातारा - कोल्हापूर) देखील राजकारणामुळे एकसंध दिसून येत नाही. उर्वरित कुठलेही मातब्बर सरदार घराणे आज वैभवशाली अवस्थेत दिसून येत नाही. तत्कालीन अनेक मराठा सरदार घराणी आजही अस्तित्वात आहेत पण त्यांची अवस्था बडा घर अन पोकळ वासा अशी झाली आहे, तर काहींची नाके गेली पण भोके शिल्लक राहिली अशी गत झाली आहे...त्यातल्या त्यात ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी आजही आपले वैभव टिकवून ठेवले आहे हीच काय ती समाधानाची बाब !
- समीर गायकवाड.
संदर्भ : शिंदे घराण्याचा इतिहास - सरंजामे,
मराठी साम्राज्याची छोटी बखर - मोडक जनार्दन बाळाजी,
नाना फडणवीस - मॅकडोनल्ड,
फॉल ऑफ द मुघल एम्पायर - एच जे किन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा