Saturday, July 7, 2018

सोशल मीडिया कोणी भरकटवला ?व्हॉटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे काही दिवसापूर्वीच्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या बेभान जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. या नंतर सरकारने जागे झाल्याचे सोंग केले. यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरु केले. ४ जुलैला व्हॉट्सऍपने देखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा वापर करताना खोटे व्हिडीओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे याचे राजकारण्यांना काहीच वाटले नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रुपांतरीत झाला आणि सामान्य माणूस देखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. त्यामुळेच धुळ्याच्या घटनेला अनेक पैलू आहेत. याला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे.


सोशल मीडियाचे मुख्य अंग असलेले व्हॉटसऍप हे ऍप भारतात २०१० मधे आले. तर सप्टेबर २००६ ला फेसबुक तर ऑक्टोबर २०१० मध्ये इन्स्टाग्राम भारतात आले. २०१२ मध्ये ट्विटरचे केवळ पन्नासेक लाख भारतीय युजर होते ते २०१४ मध्ये दिड कोटी झाले. या सर्वांची सुरुवातीची दोनेक वर्षे स्थिरावण्यात गेली. ही ऍप्स मनमोहनसिंग सरकारच्या कारकिर्दीत रीतसर परवानगीने दाखल झाली. वास्तवात या ऍपचा काय आणि कसा उपयोग केला जाऊ शकतो हे तत्कालीन सरकारच्या ध्यानी आले नसावे वा त्यांनी याच्या खोलात जाऊन तसे प्रयत्नही केले नाहीत. परंतु विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मात्र याची उपयुक्तता आणि उपद्रव क्षमता दोन्ही जोखून आपल्या पक्षाचे सोशल मीडिया सेल उभे करत याचा हवा तसा वापर करून घेतला. असे आयटी सेल नंतर सर्वच पक्षांनी स्थापन केले.

२०१२ पासून आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वार वाहत होते. काँग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचार, दहशतवाद, अनागोंदीच्या अतोनात आरोपांमुळे २०१४ ची निवडणूक जड जाणार हे नक्की होते. भाजपकडून वातावरणनिर्मिती होईपर्यंत लालकृष्ण आडवाणी यांचे नाव पुढे होते. परंतु २०१३ च्या मध्यास जसजसे नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे येऊ लागले तसतसे प्रचार आणि आरोपांचे चित्र बदलू लागले. हा तोच काळ होता जेंव्हा सोशल मीडियाच्या सर्व माध्यमातून सोनिया गांधी, मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्या मॉर्फ केलेल्या प्रतिमा वापरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची चिखलफेक करण्यात येत होती. सामान्य माणूस यात गंमत आणि विनोद म्हणून सामील होत गेला. महात्मा गांधींच्या नृत्य करतानाच्या छबीच्या गैरवापराच्या पोस्टपासून ते गांधी घराणे हे आधी पक्के मुसलमान होते, पंडीत नेहरू किती अय्याश होते अशा कंड्या एकीकडे पिकवल्या जात होत्या आणि गुजरात हेच विकासाचे कसे सुपर मॉडेल आहे ; तिथे सर्वात जास्त लांबीचे कालवे, विमानतळासारखी बसस्थानके, जगात कुठेही नसणाऱ्या (?) पाईपलाईन्स, डिजिटल सरकारी कार्यालये कशी अस्तित्वात आहेत यांचे अतिरंजित वर्णन करणारया पोस्ट पेरल्या जाऊ लागल्या. (विशेष बाब म्हणजे मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातचा गोडवा गाणाऱ्या पोस्ट जाणवेल अशा वेगाने बंद झाल्या) मागील सरकारने किती वाट्टोळे केले हे सांगताना खोट्यानाट्या आकडेवाऱ्या दिल्या जाऊ लागल्या. हे काँग्रेसच्या लक्षात आल्यावर तेंव्हाचे माहिती प्रसारण मंत्री कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियावर देखरेख ठेवून त्यावर निर्बंध लावले जातील असे सांगताच भाजपने केलेला देशव्यापी आक्रोश कुणी विसरले नसेल. मात्र सत्तेवर येताच आपल्या विरोधात सोशल मीडियावर आवाज उठायला सुरुवात झाल्यावर मोदी यांनीही तेच धोरण अवलंबण्याचा प्रयत्न केला होता हे नोंद घेण्याजोगे आहे. एकेकाळी काँग्रेस नेत्यांचे हवे तसे चारित्र्यहनन केल्या जाणाऱ्या सोशल मीडियावरून भाजपविरुद्ध हलकासा आवाज उठू लागला तर तो ही त्यांना सहन होईनासा झाला. नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरणे हा गुन्हा ठरवला गेला. हेच नियम २०१० पासून लावले गेले असते तर निम्मा आयटी सेल तुरुंगात असला असता. दरम्यान आपसातला राजकीय विखार इतका वाढला की त्यातून सामाजिक एकतेची वीण कधी उसवू लागली हे लोकांच्या लक्षातही आले नाही. आपल्या जाहीर सभातून वा वार्तालापातून अनेक भाजप नेत्यांनी, मंत्र्यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये बऱ्याचदा केली आहेत, चुकीची माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांनी त्यातला फोलपणा समोर आणल्यावरही वक्तव्याची दुरुस्ती त्यांनी केली नाही. काँग्रेसचे काही नेतेही आपल्या भाषणातून चुकीचे संदर्भ, आकडेवारी देताना पॉइंटआऊट झाले आहेत. पण त्यांनी नंतर त्या चुका सुधारून तरी घेतल्या आहेत तसे भाजपकडून क्वचित होताना दिसले आहे. मुख्य नेत्यांच्या बेताल वर्तणुकीचा आदर्श त्यांच्या समर्थकांनी घेतला. खोटी माहिती देण्याचा हाच कित्ता सामान्य माणसांनी गिरवला.

कुठलेही व्हिडीओ, वेबलिंक्स, मॉर्फ इमेजेस, फेक फिगर्स वापरून हवा तो परिणाम साधणे हा व्हॉटसऍपचा केंद्रबिंदू झाला. 'मारा', 'कापा', 'चौरंगा करा', 'चिरडून टाका' हे परवलीचे शब्द बनले आणि नेत्यांची प्रक्षोभक भाषणे, बेताल वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. मनामनात हिंसा असलेल्या गर्दीचे यामुळे उग्र जमावात रुपांतर होत गेले तर कधी एकट्याने हिंसक कारवायां होऊ लागल्या. गर्दीच्या मानसिकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे या गर्दीचा स्वतःचा एक मेंदू. गर्दीच्या डोक्यात जे किडे वळवळत असतात त्यानुसार ती गर्दी वागत असते. कधी गोमांस बाळगल्याच्या तर कधी गोहत्या केल्याच्या संशयावरून गर्दीने एकट्या दुकट्या माणसाला ठार मारायला सुरुवात केली. कधी चोरीचा आळ, छेडखानी, धार्मिक विडंबना, भावना दुखावणे, अपहरण वा अपहरणाची भीती अशी कोणतीही कारणे एखाद्या निरपराध निशस्त्र माणसाला ठेचून मारण्यासाठी गर्दीला पुरेशी ठरू लागली. हे ज्याला जमले नाही तो आपल्या मनातले विकृत स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी वाट्टेल त्या अफवा पेरू लागला. एका आकडेवारीनुसार वर्षभरात देशभरात जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या १३ घटना घडल्या असून, त्यात २७ जणांची हत्या झाली आहे. यात सोशल मीडियातून पसरवल्या गेलेल्या फेक व्हिडीओ, फोटो आणि माहितीचा मोठा हात होता. असं असलं तरी सत्तेतील एक मुख्य घटक सोशल मीडिया अधिकाधिक लोकप्रतिनिधींनी वापरला पाहिजे असे सांगतानाच त्यातल्या अनेक अनिष्ट प्रथांना बळ देत होता.

सोशल मीडियाचा हा अतिरेकी आग्रह कुणाच्या फायद्यासाठी केला जातोय हे कुणीही ओळखू शकते. काही दिवसापूर्वी ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येनंतर अत्यंत विकृत भाषेत त्यांच्याबद्दल गरळ ओकले गेले होते. हे लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या काही लोकांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात हे माध्यमांनी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी यावर मौन धारण केलं. कोणतीही गोष्ट बूमरँगसारखी उलटू शकते. या बाबतीतही असेच झाले. एका मुस्लीमाशी विवाह केलेल्या लखनौमधील हिंदू महिलेच्या पासपोर्टवरून नुकताच गदारोळ झाला. या दांपत्याचे म्हणणे होते की, पासपोर्ट कार्यालयात धार्मिक कारणामुळे शेरेबाजी झाली. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे त्यांनी न्याय मागितला. स्वराज यांनी तक्रारीची दखल घेताच या दांपत्याला लगेच पासपोर्ट देण्यात आला. स्वराज यांनी त्या स्त्रीस मदत करताच ज्यांच्या डोक्यात 'लव्ह जिहाद'चा किडा वळवळत होता त्यांनी स्वराज यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत विखार ओकला. इंद्रा वाजपेयी या ट्विटर हॅंडलवरून एका व्यक्तीनं केलेली टीका उदाहरण म्हणून देता येईल, "लाज बाळगा मॅडम. हा तुमच्या मुस्लीम किडनीचा परिणाम आहे का?" काही दिवसांपूर्वी स्वराज यांच्यावर किडनीरोपणाची शस्त्रक्रिया झाली त्याचा नीच संदर्भ या व्यक्तीने वापरला. या ट्रोलपैकी बहुतांश ट्रोलर्स भाजपचे समर्थक आहेत, स्वराज यांना ते फॉलोही करतात. स्वराज या १७ ते २३ जून परदेश यात्रेवर होत्या. परतल्यावर त्यांनी ट्विट करत युजर्सना प्रश्न उपस्थित विचारला की, 'अशाप्रकारे ट्रोल करणे योग्य आहे का ?' तर वाईट गोष्ट अशी होती की सोशल मीडियावर तब्बल ४३ टक्के लोकांनी ट्रोलिंगला बरोबर ठरवले होते. गौरी लंकेश यांच्या हत्येसमयीच्या ट्रोलिंगवर तमाशा बघत बसलेल्या भाजप नेत्यांना या घटनेत नेमकी काय भूमिका घ्यावी हे देखील उमजले नाही. दोन दिवसापूर्वी अखेर एकटे नितीन गडकरी स्वराज यांच्या बाजूने उभे राहिले, मग राजनाथ सिंग यांनी देखील ट्रोल्सवर आपण कारवाई करणार असल्याचे सूतोवाच केले. पण बारीक सारीक घटनेवर बोलणारे पंतप्रधान या घटनेवर मौन राहिले हे खूप बोलके होते.

सोशल मीडियातून जे पेरले तेच आता उगवत आहे. आधी बेगुमान वापरलेलं हे हत्यार आता कुणाच्याच नियंत्रणात नाही. पराकोटीचा द्वेष, हिंसा यांनी आता सामान्य लोकांनाही ग्रासले आहे, वाईट बाब अशी की जे सुशिक्षित आहेत, माध्यमप्रवण आहेत तेच लोक असे खोटे व्हिडीओ, फोटो वापरून लोकांना हिंसक बनवत आहेत. ज्यांना सोशल मीडिया कसा वापरायचा हेच माहिती नसतं, त्यातल्या तांत्रिक बाबींचे ज्ञान नसतं ते अशिक्षित अडाणी लोक हे काम करू शकणार नाहीत. म्हणूनच हे काम सुनियोजितही असू शकते. धुळयातील घटनेस कारणीभूत ठरलेला व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला मूळ व्हिडीओ पाकिस्तानातील एका एनजीओने लोकजागृतीसाठी बनवला होता, त्यातला अर्धाच भाग कापून त्यावर एडिटिंग करून आपल्या भागाचे उल्लेख त्यात जोडत लोकांत संभ्रम निर्माण केला गेला. लोक त्याला बळी पडत गेले. मागे पाकिस्तानात मारहाण झालेल्या चोरांचा व्हिडीओ वापरून उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथे सप्टेबर २०१३ मध्ये हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणली होती. यानंतर संपूर्ण राज्यात धार्मिक ध्रुवीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की पुढील निवडणुकात त्याचे प्रतिबिंब उमटले. नंतर तिथेही तपासाचे नाटक पार पडले पण जे नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले. लोकांची मने दुभंगली गेली. आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. धुळ्यातील हत्याकांडाचाही तपास पूर्ण केला जाईल पण चांगल्या हेतूंसाठी निर्मिलेल्या सोशल मीडियाला आपल्या स्वार्थासाठी विकृत पद्धतीने भरकटवणाऱ्या लोकांपर्यंत आपल्या तपास यंत्रणा कधी पोहोचू शकतील का खरा यक्षप्रश्न आहे !

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment