सोमवार, ३० एप्रिल, २०१८

हरवलेले राजकीय दिवस ...



आजच्या काळात सर्वोच्च पदावरील राजकीय व्यक्तीपासून ते गल्लीतल्या किरकोळ कार्यकर्त्यापर्यंत भाषेतील असभ्यपणा सातत्याने डोकावताना दिसतो. पूर्वीचे दिवस मात्र काहीसे वेगळे होते. खरं तर तेंव्हाही याच राजकीय विचारधारा होत्या, हेच पक्ष होते. मग फरक कुठे पडलाय ? याचा धांडोळा घेताना एका ऐतिहासिक क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र हाती लागले आणि चार शब्द लिहावेसे वाटले. अनेक आठवणींचे मोहोळ जागवणारे हे छायाचित्र भारतीय राजनीतीचे अनेक पैलू आपल्या समोर अलगद मांडते. दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज भरतानाचा हा सोनेरी क्षण आहे. हिमालयाएव्हढ्या उत्तुंग कर्तुत्वाचा शास्त्रज्ञ देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो हे देखील एक विशेषच म्हणावे लागेल. भारतीय लोकशाहीचा हा लोकोत्तर विजयाचा अनोखा अन लोकांप्रती असणाऱ्या सजीवतेचा विलोभनीय दार्शनिक क्षण होता….

आजच्या काळात एकमेकाला खाऊ का गिळू करणारे मुलायम सिंह अन मायावती या फोटोत चक्क शांततेत शेजारी शेजारी बसलेले आहेत. मुलायमसिंहाच्या तोंडावर प्रसन्न भाव आहेत तर मायावती त्यांच्या नेहमीच्या भावमुद्रेत गालावर हात ठेवून शांततेने पाहत आहेत. या दोघांना शेजारी बसलेले पाहून बरे वाटते. आज त्यांच्यातून विस्तवही जाऊ शकत नाही. हा दुरावा कशामुळे आला आहे हे सांगायला कुणा कुडमुडया ज्योतिषाची गरज नसावी.

भाजपाच्या दुसऱ्या फळीचे आशास्थान म्हणून ज्यांच्याकडे कुतुहलयुक्त आदराने पाहिले जायचे ते दिवंगत नेते प्रमोद महाजन त्यांच्या नेहमीच्या आरामदायी 'मुड' मध्ये दिसताहेत. बारकाईने पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा मिश्कील आनंद स्पष्ट दिसतो, 'एकदाचे मोठं काम पार पाडले बुवा' असं काहीसं त्यांचा चेहरा सांगतो.

भाजपाचे राजकारण ज्यांनी पाच दशके आपल्या खांद्यावर पेलले, भाजपचा मवाळवादी चेहरा म्हणून ज्यांना ओळखले गेले व राजकारणात शालीनतेची आणि साधनशुचितेची नवी परिमाणे ज्यांनी निर्मिली ते अटलबिहारी वाजपेयीजी खूप आश्वासक मुद्रेत आसनस्थ दिसतात. त्या क्षणी वाजपेयीजी पंतप्रधान होते. तर पीएम इन वेटींग अशा अवघडलेल्या अवस्थेत भाजपाचा दुसरा जहाल चेहरा म्हणून जनमानसाला परिचित असणारे आणि आताचे केवळ 'नामधारी' मार्गदर्शक नेते बनून राहिलेले लालकृष्ण आडवाणीजी पहिल्या रांगेतच होते पण कोपऱ्यात होते !

शिवाय त्यांच्या आणि वाजपेयीजींच्या मधोमध चंद्राबाबू नायडू बसले आहेत. त्या काळात नायडू किंगमेकर होते. त्यांच्या शब्दाला खूप मोल होते. आताच्या राजकीय सारीपटावर नायडू हतबल झालेले दिसून येतात पण ते अजूनही सक्रीय आणि आशावादी आहेत. शिवाय त्यांचे राजकारणही अजून एका विशिष्ट पातळीखाली गेलेले नाही. नायडूंचे या दोघांमध्ये बसणे हा योगायोग होता की हेतूपूर्वक होते हे ज्ञात नाही. पण त्यांचे मध्ये बसणे हा या दोन नेत्यातील शीत सत्तासंघर्षाचा एक बिंदू असावा. शिवाय नायडूंचे महत्वदेखील त्यातून अधोरेखित होते.

फोटोत एका कोपरयात उभे असलेले अमरसिंह आज राजकारणाच्या सारीपटावर खरोखर अडगळीत गेलेले आहेत. 'अमरसिंहांचे असे का झाले' याचे उत्तर शोधायला भूतकाळाची पाने चाळायची काहीच गरज नाही. फुटकळ कर्तृत्व असूनही केवळ लागेबांधे कसे वापरावेत याचे अफाट टायमिंग असणारा हा माणूस जसजसा एक्स्पोज होत गेला तसतसे त्याचे उपद्रवमुल्य कमी होत गेले आणि त्या प्रमाणात त्यांचे राजकीय महत्वही घटत गेले. राजकारणात केवळ उपयुक्ततेला किंमत नसते तर उपद्रवमूल्यही खूप महत्वाचे ठरते. अतिछद्मीपणा अंगलट आल्यामुळे आज अमरसिंह कोनाडयात गेले आहेत.

आजच्या घडीला वाजपेयीजी जसे अंथरुणाला खिळून आहेत तसेच त्यांचे आणखी एक सहकारी व जिवलग स्नेही जॉर्ज फर्नांडीस हे देखील विस्मृतीच्या वनात शय्येला खिळून आहेत. एनडीएच्या काळात त्यांच्याकडे सुकाणूचे काम होते, संघटनात्मक कामात पुढे राहूनही प्रकाशझोतात न येता पडद्यामागे राहून काम करण्यात त्यांचा हातखंडा होता. जॉर्ज फर्नांडीसांच्या या स्वभावानुरूप ते या फोटोत थेट अगदी मागे पार भिंतीला खेटून उभे आहेत ! बिनीच्या घडीला समोर येणारा,साध्या बिनइस्त्रीच्या कपडयात वावरणारा हा माणूस भारतीय राजनीतीचे एक कोडे ठरावा असा होता. वाजपेयी आणि आडवाणी यांची सातत्याने कोंडी करणं तत्कालीन विरोधी पक्षाला (कॉंग्रेस) शक्य नसे त्यामुळे जॉर्ज कायम तोफेच्या तोंडी असत. पण तेंव्हा आताच्या सारखी कपडेफाड चिखलफेक होत नसे.

जॉर्ज फर्नांडीसांच्या शेजारी उभे असलेले वी. गोपालस्वामी वायको तत्कालीन एनडीएची एक 'ओळख' बनून गेले होते. खांद्यावर कायम मफलर असणारा हा लुंगीवाला इसम एमडीएमकेचे चार खासदार बाळगून होता. एका छोट्याशा राज्यातील, छोट्याशा पक्षाचा आणि जहाल द्रविड विचारसरणीचा पुरस्कर्ता माणूस ही त्यांची ओळख होती. पण त्या काळात संख्येला असणारे महत्व पाहता वायकोंनी मोठी बाजीच मारली होती असे म्हणावे लागेल. वायको आणि डीएमके खासदारांची धुमश्चक्री संसदेत अनेकदा पाहायला मिळाली होती पण त्याचाही एक स्तर ठरलेला होता. तो कधी खालावला नाही. वायको आणि आता भाजपात आलेले तत्कालीन जनता पक्षाचे बोलभांड नेते सुब्रमनियन स्वामी यांच्यात विळ्याभोपळ्याचे सख्य होते. या फोटोत वायको सुद्धा अगदी हसतमुख चेहरयाने या क्षणाचे साक्षीदार झालेले आहेत..

फोटोच्या समोरील रांगेत डाव्या बाजूला प्रथमस्थानी बसलेल्या किंचित सावध मुद्रेतील सोनिया गांधींची भावमुद्राही बरेच काही सांगून जाते. सोनियाजीं, वाजपेयीजी आणि अडवाणी तिघांचे चेहरे वेगवेगळ्या भावमुद्रेत आहेत हे विशेष. कलाम यांना पुढे करून एनडीएने जो तीर मारला आहे त्यावरचे डावपेच काय असावेत याचा तर विचार सोनियाजी करत नसतील ना ? त्यांच्या मनात निश्चित खळबळ असणार पण ती शिताफीने लपवून त्या शांत चित्ताने तिथे बसून आपला पाठिंबा दर्शवत होत्या.

सोनियाजींच्या मागे दुसऱ्या स्थानावर बसलेले कॉंग्रेस नेते नटवरसिंह काहीसे त्रासिक मुद्रेत दिसून येत आहेत. त्यांनी दोनेक वर्षापूर्वी लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र अन त्यावरून युपीए वर उठलेली राळ या पार्श्वभूमीवर या दोहोंच्या मुद्रा फारच बोलक्या वाटतात. नटवरसिंह भारतीय विदेश सेवात (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) निवडले गेलेले अधिकारी होते. त्यांच्याकडे कॉंग्रेसच्या काळात महत्वाची मंत्रालये आली होती. विरोधी पक्षात गेल्यावर राहुल गांधीचा शिरकाव आणि संसदीय कार्यकारिणीतून कमी केले गेलेलं वजन या दोन बाबींवर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

नटवरसिंहांच्या शेजारी बसलेले एस. जयपाल रेड्डी आहेत,जे काँग्रेसची प्रवक्तेपदाची खिंड अगदी नेटाने लढायचे. काँग्रेसचं कुठलेही धोरण असो जयपाल रेड्डी त्यांच्या ढंगदार शैलीत त्याचे समर्थन करायचे. रेड्डी दिव्यांग होते, त्यांची वाणी दक्षिणीय लेह्जाची होती पण त्यांचा टायमिंग सेन्स खूप जबरदस्त होता. त्यामुळे ते कॉंग्रेसवर्तुळात फार वजनदार मानले गेले.

याच रांगेत सोनियाजींच्या मागे बसलेल्या अर्जुनसिंगाचे फक्त टक्कल दिसते आहे. सोनियाजींच्या राजकीय भूमिका ठरवण्यात अर्जुनसिंगांचा मोठा रोल असायचा. ते त्यांच्या निर्णयाचा मुख्य भाग असत. पण कालांतराने ते निष्प्रभ होत गेले आणि कॉंग्रेस नेतृत्वाने त्यांच्यासाठी लक्ष्मणरेखा आखून दिली. अर्जुनसिंग या रेषेला ध्वस्त करण्यासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहिले, एक पाताळयंत्री माणूस सतत बरोबर घेऊन फिरणे हा अनुभव सोनियाजींना खूप काही शिकवून गेला असणार.

फोटोत पांढरा सफारी परिधान केलेले डीएमकेचा सोज्वळ आणि अभ्यासू चेहरा अशी प्रतिमा असणारे टी.आर.राजू यांची उपस्थिती वाजपेयी कशा चतुर खेळ्या करत असत याचा उत्कृष्ट नमुना ठरावा.

भारतीय राजकारणाच्या एका महत्वाच्या पर्वात उपस्थित असलेल्या या दिग्गज अन मुरब्बी राजकारण्यांच्या मधोमध बसलेले आहेत ते एपीजे कलाम जे स्वतःच एखाद्या दंतकथेच्याही पुढचे आयुष्य जगलेले आहेत. आज या छायाचित्रातले काही चेहरे आपल्याबरोबर नाहीत, तर काही अंथरुणाला खिळले आहेत तर काही राजकारणातून फेकले गेले आहेत तर काहींना उतरती कळा लागलीय तर काही अजून खिंड लढवत आहेत …. काळाचा महिमा अगाध असतो त्यापुढे कोणाचे काही चालत नाही…

आज देखील हे सर्वजन चैतन्यदायी वाटतात, त्यातही एपीजे कलाम त्यांच्या वेगळेपणाने अधिक नजरेत भरतात. ते गेलेत यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांचे अजरामर विचार हेच 'तरुण' भारताचे खरे आयओपनर आहेत. वाजपेयीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये जुलै २००२ मध्ये हा फोटो घेतलेला आहे पण आजही तो लोभसवाणा वाटतो याचे कारण ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे.

आजच्या काळात जाहीर सभा असोत की कोपरा सभा असोत वा वाहिन्यांवरची वायफळ चर्चा असो किंवा संसदीय राज्य वा केंद्रस्तरावरील सभागृहे असोत राजकारणातील शालीनता आणि सभ्यतेच्या मर्यादा पायदळी तुडवून अश्लाघ्य रणकंदन माजवले जाते याचा पावलोपावली प्रत्यय येतो आहे. जिथे नेतेच असं वागतात तिथे सोशल मिडीयावरच्या चवचाल, वावदूक, बोलघेवडया अन केवळ शाब्दिक वाफ दवडणाऱ्या नागडया उघडयांच्या पक्षीय, व्यक्तीनिष्टासापेक्ष निलाजऱ्या टोळ्यांना ऊत येणं साहजिकच असते. 'यथा राजा तथा प्रजा' यात तथ्य आहेच... पण 'एक काळ कसा होता' याचे कुणाला पुनर्विलोकन करावेसे वाटले तर त्याने खुशाल जुने फोटो काढून बसावे, आठवणींचा फेर सगळं काही उलगडून दाखवेल...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा