ज्येष्ठ प्रौढा, नाव - ज्युलिएट फिट्ज पॅट्रिक. वयाच्या चोपन्नाव्या वर्षी जानेवारी २०१६ मध्ये त्यांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाले. शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर असल्याने स्तन काढून टाकण्याचा मास्टेक्टॉमी करण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला. ते ऐकताच स्तन काढून टाकल्यानंतर आपण कसे दिसू आणि त्यावर काय उपाय केला पाहिजे याच बाबी त्यांच्या डोळ्यापुढे तरळल्या. आपले स्तन आपण रिकंस्ट्रक्ट करायचे का हा प्रश्नही त्यांच्या मनात उभा ठाकला. त्यांना तसा सल्लाही दिला गेला. कदाचित नेहमी ऍडमिट होणाऱ्या रूग्णांची तशी डिमांडही तिथल्या स्टाफने अनुभवली असावी. त्यामुळेच ज्युलिएटना देखील तोच सल्ला दिला गेला. शस्त्रक्रियेनंतर आपले स्तन पूर्वीसारखे दिसावेत आणि आपला स्त्रीत्वाचा लुकही तसाच असावा ही भावना त्यामागे असू शकते असं ज्युलिएटना वाटले. कारण स्तन ही स्त्रीत्वाची एक मुख्य खूणही आहे, तसेच तिच्या सौंदर्य लक्षणाचे ते एक अंग आहे अशी धारणा सर्वत्र रुजलेली आहे. या सल्ल्यावर विचार करताना दिवस कसे निघून गेले ते ज्युलीएटना कळले नाही.
ज्युलिएटना फायनली सांगितले गेले की, तीव्रतेच्या प्रमाणामुळे डाव्या बाजूचा स्तन सत्वर काढून टाकावा लागेल. त्यावेळी त्यांना काही फोटोग्राफ्स दाखवले गेले. स्तन काढल्याआधीचे आणि स्तन काढल्यानंतरचे असे ते फोटोज होते. ते पाहून बधीर आणि स्तनाग्र विरहीत सपाट छातीत (नॉन निपल्ड फ्लॅट चेस्टेड) आपण कसे दिसू याचा त्यांना विचार करवेना.
ज्युलिएटवर उपचार करणाऱ्या नर्सेसपैकी त्यांची गट्टी जमलेल्या कनवाळू नर्सला देखील ज्युलिएटच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आला आला नाही. त्यांनाही वाटले की स्तन काढल्यानंतर अन्य स्त्रियांप्रमाणेच या देखील ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट करून घेतील. त्यामुळे स्तन सपाट ठेवण्याबद्दल त्यांच्या जवळ कुणी फारसा जोर दिला नाही. डीआयईपी फ्लॅप प्रोसिजर द्वारा त्यांचे स्तन पुन्हा उभारले जाऊ शकतात याची त्यांना बारकाईने माहिती दिली गेली. त्यांच्या पोटावरील अतिरिक्त चरबी जी त्यांचा पोटाचा घेर वाढवत होती आणि शेपही बिघडवत होती, ती काढून घ्यायची ती स्तनाच्या त्वचेत भरून हिप्सजवळील त्वचेचे ग्राफ्टिंग करायचे असे त्याचे एकंदर स्वरूप होते. यामुळे त्यांच्या कंबरेचा घेर बराचसा कमी होईल असा विनोदही केला गेला. त्याचबरोबर त्यांच्या नितंबावर काही स्कार्स असतील. अशा तऱ्हेने त्यांच्याच अतिरिक्त चरबीने त्यांचे स्तन रिकन्स्ट्रक्ट केले जाणार होते.
ज्युलिएटबाबत एक अडचणही होती. त्यांच्या एका स्तनाच्या रिमुव्हलनंतर जवळपास दिड वर्षभर त्यांना किमो थेरपीच्या सायकल्स घेणे अनिवार्य होते. त्यामुळे एक स्तन काढल्यानंतर एका स्तनासह दिड वर्ष काढायचे हे त्यांना थोडंसं अवघडणारं वाटलं. ज्युलिएटना तर ते बरंचसं असुलभही वाटलं कारण त्यांना आपल्या स्तनांचा फिल कसा असेल याचा प्रश्न होता. पण हा दिड वर्षाचा विलंबच त्यांच्या आयुष्यात एक कठोर निश्चय घेऊन आला.
मधल्या काळात त्यांच्या मनातल्या अनेक शंका कुशंकांनी त्यांना घेरले. स्तन काढून टाकल्यानंतर आपण कसे रहायचे हे आपणच ठरवायला पाहिजे असं त्यांना राहून राहून वाटू लागलं आणि त्या जिज्ञासेतून अन जिद्दीतून त्यांनी दुसरा पर्याय अभ्यासायला सुरुवात केली. ज्या स्त्रियांनी स्तनांचे रिकन्स्ट्रक्शन केले नाही त्यांनी काय केले याची माहिती घ्यायला त्यांनी सुरुवात केली. 'फ्लॅट फ्रेंड्स' नावाच्या एका वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्यांना त्यांच्या सारख्या कर्करोगग्रस्त महिलांचे एक नवे वर्तुळ मिळाले. त्यात काही महिला एका स्तनासह जगणाऱ्या होत्या तर काही महिला दोन्ही स्तन काढून फ्लॅट चेस्टेड लाईफ न अवघडता जगत होत्या.
हा मार्ग त्यांना काहीसा आपला वाटला. गुगलवर माहिती घेतल्यानंतर त्यांना अशाच आणखी काही महिलांची छायाचित्रे आणि माहिती मिळाली. त्यांच्या क्लिनिकमध्ये दाखवल्या गेलेल्या फोटोजपेक्षा हे फोटो त्यांना अधिक भावले. आपल्यासारखीच शस्त्रक्रिया करून घेतलेल्या आणि स्तनाशिवाय आरामात आणि ताठ कण्याने जगणाऱ्या त्या महिलांशी त्यांनी अनुभव शेअर केल्यावर त्यांना अधिकच बरे वाटले. विशेष म्हणजे त्यांना यात काही विचित्र वाटत नव्हतं आणि नेमकी हीच गोष्ट ज्युलिएटना सुखावून गेली.
१७ मार्च २०१६ रोजी त्यांचा डाव्या बाजूचा स्तन काढला गेला. खरे तर ज्युलिएटना वाटत होते की दुसरा स्तन देखील लगोलग वा लवकरच काढला जावा पण त्यांचे डॉक्टर याला राजी नव्हते. त्यांचा एका बाजूचा स्तन काढल्यानंतर त्यांना आलेले फिलिंग कसेसेच होते, एका बाजूला स्तन आहे आणि एका बाजूला ढिली पडलेली त्वचा हे त्यांना अवघडून टाकत होते, शिवाय त्यावर काही स्कार्स देखील होते. त्यांचे टाके भरून आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एका बाजूस सिलिकॉन स्तन वापरण्याची परवानगी दिली. आपल्या ब्रामध्ये अशी काही वस्तु घालून फिरणे त्यांना बिल्कुल आवडले नाही. उलट त्यामुळे त्यांना अनइझी फिल होऊ लागले.
यानंतरही त्यांच्या मनात द्वंद्व सुरुच होते. आपल्या दुसऱ्या बाजूच्या उजव्या स्तनासही काढून टाकावे असे त्यांना वाटायचे, इन्फेक्शन फैलावू नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले जावे असे ज्युलिएट आपल्या डॉक्टरांना दर तपासणीच्या वेळेस सांगत. ते मात्र याच्या विरोधात होते, बाधा झालेली नसताना अकारण एक चांगला भाग का कापायचा असे त्यांना वाटे. पण ज्युलिएटनी त्यांना आपली दुसरी भूमिकाही समजावून सांगितली. थेट दफनायच्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या तेंव्हा त्यांच्या डॉक्टरांना पटले की, यावर आपण आता काही तरी निर्णय घेतलाच पाहिजे. आयुष्यभर एका स्तनाने जगण्यात आणि एका बाजूला अचेतन वस्तु बाळगून जगण्यात ज्युलिएटना मुळीच स्वारस्य नव्हते. अखेर डॉक्टर याला तयार झाले, पण तत्पूर्वी त्यांनी ज्युलिएटला मानसोपचार तज्ञास दाखवून घ्यायला सांगितले. ज्युलिएट वेडी तर झाली नाही ना असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला असावा. पण ज्युलिएट नमल्या नाहीत, त्यांनी ही तपासणी देखील केली. ज्या स्त्रिया असा निर्णय घेतात त्यांच्या बद्दल इतका आकुंचित दृष्टीकोन का बाळगला जात असावा याचे त्यांना आश्चर्य वाटले आणि अत्यंत निष्ठेने त्यांनी आपला निर्णय अंमलात आणला.
अखेर ९ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांचा उजव्या बाजूचा स्तनही काढण्यात आला. खरेतर हॉस्पीटलायझेशन आणि शस्त्रक्रिया या दोन्हींची त्यांना अपार भीती होती तरीदेखील एक शस्त्रक्रिया नाईलाजाने केल्यानंतरही त्यांनी बळजोरीने दुसरी शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्या वेळी भीतीच्या गोष्टी नावालाच उरल्या आणि त्यांचे मनोबळ मात्र वाघिणीसारखे वाढले. कॅन्सरला हरवताना त्यांनी एक स्तन काढला होता आणि मनातल्या भीतीला व स्त्रीत्वाच्या बेगडी व्याख्येला हरवताना त्यांनी दुसरा स्तन आपण होऊन काढून टाकायला लावला. ज्युलिएट म्हणतात, "माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी शौर्यदर्शक गोष्ट होती, या दिवशी मी खूप काही जिंकल्याचा फील आला आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगताना जगाला काही तरी नवीन धडा दिल्याचा आनंदही मिळाला, या घटनेने माझे आयुष्य आणि माझी विचारसरणी दोन्हीही निग्रही व दिशादर्शक झाली.
आपल्या नव्या लुकबद्दल ज्युलिएट इतक्या आश्वासक झाल्या की त्यांनी आपले फोटो आणि आपले विचार लोकापर्यंत नेण्याचे ठरवले. त्यांनी सोशल मिडियावर आपले टॉपलेस फोटो विनासंकोच पोस्ट केले. लोकांना बोलतं केलं आणि स्त्रियांच्या मनात स्तनविषयक दृष्टीकोनाची नवी उभारणी केली. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन दिला - "माझ्या नव्या शेपबद्दल मी खूप आनंदी आहे, मला नेहमीच वाटते की जसे शरीर आपल्याला हवे असते तसेच ते मिळते. यात काही उणेही असू शकते आणि आहे ही. माझ्या दोन्ही हातांच्या आतील बाजूने छातीच्या खालच्या भागात बधीरपणा आहे, जास्ती झालेल्या चामडीच्या घड्या माझ्या हातांच्या खालच्या बाजूस आहेत. अज्ञात तऱ्हेचा त्वचेचा दाह आणि कधी कधी वेदनाही आहेत. पण यापुढे कधीही ब्रा घालायची की नाही हे मी ठरवू शकते या आनंदापुढे ही दुःखे अगदीच किरकोळ आहेत. कॅन्सरनंतरचे माझे आयुष्य उत्फुल्लित असावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. एका अत्यंत वाईट कसोटीतून मी पार गेले आहे आणि आता स्थिती माझ्या नियंत्रणात आहे. मास्टेक्टॉमीनंतर काय करायचे, अगदी सपाट छाती ठेवायची की नाही हे ठरवण्याचा सर्वाधिकार बाधित स्त्रियांनाच दिला जावा याचा मी प्रचार करणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त स्त्रियांनी फ्लॅट चेस्टचा पर्याय निवडावा यासाठी मी राबणार आहे. मला हे उमजले आहे की, स्त्रीत्वाची अनुभूती सचेत राहण्यासाठी स्तन नसले तरी तिला काही फरक पडत नाही. या टॉपलेस फोटोमध्ये मी खूपच लाघवी दिसत्येय. सामान्यांहुन कदाचित वेगळी दिसत असेन पण तरीही भारीच दिसते आहे." या घटनेनंतर त्यांची जगभरात चर्चा होऊ लागली आणि जगभरातील महिलांनी त्यांचे कौतुकही केले आणि आपले समर्थनही दिले. एका नव्या विचारांची क्रांतिकारी सुरुवात ज्युलिएट फिट्ज पॅट्रिक यांनी केली. पाश्चात्त्य देशात हे चित्र असताना या विषयावरील आपल्याकडचे दृष्टिकोन अपवाद वगळता आदिम काळाला शोभावे असेच आहेत.
आपल्याकडे अजूनही बायको नवऱ्याजवळही हा विषय काढत नाही. स्त्रीरोगतज्ज्ञाकडे याची तपासणी आपखुशीने करण्यास अनेक स्त्रिया राजी नसतात. त्यांना त्यांच्या घरातूनच सपोर्ट मिळत नाही. लज्जा आणि भीती याचे जीवघेणे मिश्रण काळजात घेऊन आपल्याकडील स्त्रिया स्तनांच्या कर्करोगाच्या सावलीत वावरतात. यामुळे आपल्याकडे स्त्रियांच्या कर्करोगाचे आणि त्याच्या गंभीरतेचे प्रमाण खूप आहे. यावर कुणी खुलेपणाने बोललं तरी लोक पाठीमागे त्याची मापे काढतात. इतके मागासले आहोत आपण. प्रत्येकाने बालवयात आईच्या स्तनांना आपले मुख लावलेले असते तरीही आपल्याकडील पुरुष अधिक स्तनाग्रही आहेत. तर स्त्रिया स्तनाच्या बेगडी विळख्यात अडकून पडल्या आहेत. सुडौल बांधा आणि पुष्ट स्तन हेच स्त्रीत्वाचे मुख्य लक्षण होऊन बसले आहे. त्याला अनेक बाजूंनी खतपाणी घातले जातेय. अशा काळात ज्युलिएट फिट्ज पॅट्रिकनी जे धाडस दाखवले आहे आणि या विषयाला एक नवा दृष्टीकोन देत कोंडी फोडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो शब्दातीत आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या आजारास लपवून ठेवण्याऐवजी वेळीच तपासणी करून घेऊन आपल्याला हवा तसा पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे. समाजाने एका कोनाड्यात बंदिस्त केलेल्या बहिष्कृत विषयाला जेंव्हा एक थेट टॉपलेस होऊन आव्हान देते तेंव्हा संवेदनशील स्त्री पुरुषांनी तिच्या धाडसाची आणि जिद्दीची दाद ही दिलीच पाहिजे.
ज्युलिएट फिट्ज पॅट्रिक तुम्हाला आणि तुमच्या विचारांना सलाम !
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा