काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव घोषित केले आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुमार केतकर हे मराठीतील प्रतिथयश पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होत. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'लोकमत' या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली ऑब्झर्व्हर'चे निवासी संपादक तसेच 'इकॉनॉमिक टाइम्स'चे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दैनिक दिव्य मराठी' वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. राज्यसभेच्या उमेदवारीचा हा निर्णय अनपेक्षित नव्हता तसेच ही वाटचालही इतक्या सहजासहजीची नव्हती. काँग्रेसमधील अन्य इच्छुकांनी यावर दबक्या आवाजात चर्चा आरंभण्याचा प्रयत्न केला तर काहींनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने याची काडीमात्र दखल घेतली नाही. कुमार केतकर यांच्या नावाला राहुल गांधींनीच पुढे आणल्याने यावर व्यक्त होणे काहींनी शिताफीने टाळले. काही ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसजनांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत केतकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा, भाषाप्रभुत्वाचा, पत्रकारितेतील वर्तुळातील अनुभवाचा आणि चौफेर व्यासंगाचा चांगला उपयोग होईल अशी प्रतिक्रिया दिलीय. अन्य राजकीय पक्षांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या तर पत्रकार जगतातून अनेकांनी या निर्णयासाठी काँग्रेस आणि केतकर यांचे अभिनंदन केले. इथेही काहींनी नाराजीचा सूर आळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे यश लाभले नाही. या निर्णयाची सोशल मिडीयाच्या सर्व अंगांवर रंगतदार चर्चा पाहावयास मिळाली. काहींनी टवाळकी केली, काहींनी पाठराखण केली तर काही नेहमीप्रमाणे तटस्थ राहिले. तरीदेखील एक मोठा वर्ग असा आढळून आला की जो या घटनेच्या आडून पत्रकार आणि त्यांचे राजकारण व पत्रकारांच्या राजकीय भूमिका यावर टिप्पण्या करत होता. ही संधी साधत अनेकांनी सकल पत्रकारांना दुषणे दिली. काहींनी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया याची गल्लत करत पत्रकारांवर हात धुवून घेतले. पत्रकारांनी राजकारणात जाऊ नये असा धोशा या लोकांनी लावून धरलेला होता. वास्तविक पाहता ही काही पहिली घटना नव्हती की लोकांनी इतकी आदळआपट करावी. अशा घटना या आधी राज्यात,देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.
देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री असणारे आणि मध्य प्रदेशातून भाजपचे खासदार झालेले एम. जे. अकबर हे पत्रकारितेतील मोठे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रीपद बहाल करण्याआधी ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. असदुद्दीन ओवेसींचा युक्तिवाद खोडताना मुख्तार अब्बास नक्वी आणि शहानवाज हुसेन यांची दमछाक व्हायची. मात्र मोदींनी चाणाक्षपणे एम. जे.अकबर यांची सुलभ एन्ट्री करवून ही लढाई तीक्ष्ण केली. भाजपचा हात धरण्याआधी ते एके काळी राजीव गांधींच्या निकटच्या वर्तुळातील व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती. राजीव गांधींच्या पश्चात त्यांनी सक्रीय राजकारणातून माघार घेतली व पुन्हा ते पत्रकारितेत रुजू झाले. आणि आता पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रीय झाले आहेत. पत्रकार, नेता, पत्रकार आणि पुन्हा नेता असा वळणावळणांचा प्रवास अकबर यांनी केलाय. त्यांना भारतीय पत्रकारितेतील तमाम लागेबांधे आणि खाचा खोचा चांगल्या माहिती आहेत. ऑक्टोबर २०१२ मध्ये राजीनामा देईपर्यंत लिविंग मिडिया समूहाचे भारतातील प्रमुख इंग्रजी नियतकालिक 'इंडीया टुडे'चे ते संपादक होते. 'टिंडरबॉक्स: द पास्ट एंड फ्यूचर ऑफ पाकिस्तान' या पुस्तकातून एम. जे. अकबर यांच्या भूमिकेतील बदल जाणवला होता. तो मोदींनी टिपून घेत सत्तेत येता क्षणीच त्यांना मंत्रीपदाच्या बोहल्यावर चढवले असावे. आज एम. जे. अकबर भाजपच्या थिंक टॅंकमध्ये गणले जातात.
पेशाने वकील असणारे कानपूरचे राजीव शुक्ला प्रसिद्ध हिंदी दैनिक 'जनसत्ता'च्या संपादकीय मंडळात होते. पण राजकारणाची रुची ध्यानात येताच त्यांनी आपली नोकरी सोडत काँग्रेसच्या नौकेत पाऊल ठेवले. काँग्रेसचा कॉर्पोरेट चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या वाक्चातुर्याने त्यांनी प्रवक्तेपदासोबतच संसदही गाजवली. बीसीसीआयमधेही त्यांचे वजन आहे. 'आयपीएल'ची राळ अंगावर आल्यावर मात्र त्यांची काहीशी नाचक्की झाली. हसतमुख चेहऱ्याचे, हजरजबाबी राजीव शुक्ला पत्रकारितेतून आलेत यावर आता अनेकांचा विश्वास बसणार नाही. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार मुक्ती आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा असलेल्या शाहजिया इल्मी ह्या तत्कालीन स्टारन्यूज वाहिनीच्या वृत्तनिवेदिका होत्या. पुढे जाऊन त्या 'आम आदमी पार्टी'च्या प्रवक्त्या झाल्या आणि आता तर त्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. 'आयबीएन -7' ह्या वृत्तवाहिनीचे संपादकीय प्रतिनिधी आणि निवेदक असणारे आशुतोष हे 'आम आदमी पार्टी'चे आता नेते झाले आहेत. 'आप'चेच प्रवक्ते आशिष खेतान हे ही इलेक्ट्रॉनिक मीडियातून पुढे आले आहेत. ते पूर्वी 'तहलका' मध्ये कार्यरत होते. याच पक्षाचे सध्याचे मोठे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचीही पूर्वपीठिका पत्रकारितेतीलच आहे.
'पंजाब'मधील पत्रकारितेतील मोठं नाव असणारे कंवर संधू हे पूर्वी 'द ट्रिब्युन'मध्ये होते नंतर ते 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये रुजू झाले. पत्रकाराच्या भूमिकेतून आपण जितके परिवर्तन घडवू शकतो ते पुरेसे ठरणार नाही त्या ऐवजी आपण प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रात शिरलं पाहिजे हे त्यांना जाणवलं. मग त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. एके काळी 'इंडियन एक्स्प्रेस' आणि 'टाईम्स ऑफ इंडिया' सारख्या बलाढ्य वर्तमानपत्राच्या संपादकीय मंडळात समावेश असणारे अरुण शौरी हे भाजपच्या पक्षप्रवाहात सामील झाले होते. 'एनडीए १' मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील भूषवले होते. जागतिक बँकेसाठीही त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. राजकीय मतभेद जाणवू लागल्यावर त्यांनी राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. मात्र त्यांच्यातला स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा आणि बाणेदारपणा त्यांनी अजूनही जतन केला आहे. मोदी सरकारवर काही काळापूर्वी त्यांनी डागलेल्या तोफा याची साक्ष ठराव्यात.
१९४५ पासून 'केसरी'च्या संपादनाचे काम करत असताना स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून देणारे जयंतराव टिळक हे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार झाले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष होते. खास ठाकरी शैलीत विरोधकांची पिसं काढणारे शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक असणारे संजय राऊत हे केवळ रोखठोक पत्रकारच नव्हेत तर एक यशस्वी संसदपटू म्हणूनही विख्यात आहेत. 'सामना'च्याच हिंदी आवृत्तीचे प्रेम शर्मा हे दोन वर्षापूर्वी सामना आणि सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचे अधिकृत प्रवक्ते झाले आहेत.
जगाच्या पाठीवरही अशी अनेक उदाहरणे सापडतात. कधी काळी 'द मॉर्निंग पोस्ट'साठी काम करणारे विन्स्टन चर्चिल जगाच्या पटलावरील प्रभावशाली नेते होतील असे तेंव्हा कुणालाही वाटले नसेल. स्कॉटलंड बीबीसीसाठी काम करणारे, किंग्डम एफएम व रिअल रेडीओचे प्रतोद, ग्लेन्रोथ्स मासिकाचे संपादक रुथ डेव्हीडसन हे स्कॉटीश पार्लमेंटचे मुख्य नेते झाले. 'संडे टेलिग्राफ', 'फायनान्शियल टाइम्स' 'स्पेक्टेटर'चे संपादक राहिलेल्या नीगेल लॉसन ह्या एक्सचेकर या ब्रिटिश सिव्हिल सर्व्हिसेसच्या चॅन्सलर झाल्या. राजकीय - कॉर्पोरेट जगाचा नेक्सस असणारा जागतिक चेहरा म्हणून ओळख असणारा फॅसिझमचा उद्गाता मुसोलिनी हा देखील इटलीच्या सोशालिस्ट पार्टीच्या वर्तमानपत्रात (द फ्युचर ऑफ वर्कर) साठी संपादकाचे काम करायचा. ब्रिटनच्या येस मिनिस्टर, मिनिस्टर अँड येस, लेटर प्राईम मिनिस्टरमध्ये काम केलेल्या जिम हॅकर यांनी प्रशासकीय कामकाजाचे मंत्रीपद भूषवण्याआधी 'न्यूजपेपर रिफॉर्म'चे संपादक पद भूषवले होते. एड बॉल्स, मायकेल फूट ही नावेही अशीच होत. 'द डेली टेलिग्राफ'चे राष्ट्रीय संपादक बिल डीडस हे पूर्वी मंत्रीपदी आरूढ झाले होते. अलास्काच्या पहिल्या महिला गव्हर्नर झालेल्या आणि अमेरिकन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पहिल्या महिला उमेदवार ठरलेल्या सारा पालीन ह्या पूर्वी क्रीडा पत्रकार व समालोचक होत्या. जगभरात पत्रकार आणि राजकारण यांच्यात असणारी अदृश्य सीमारेखा अशा प्रकारे अनेकांनी लांघलेली आहे आणि आपली राजकीय भूमिका अधिक स्पष्ट केली आहे.
पत्रकार आणि राजकारण हे कधीच एकमेकापासून अलिप्त राहु शकत नाहीत पण त्यांच्यात अंतर असणेही गरजेचे आहे. पत्रकारांच्या या राजकीय परीप्रेक्षाशिवाय प्रत्येक राज्यात, प्रांतात अगदी जिल्ह्यातसुद्धा एक तरी स्थानिक वृत्तपत्र असे असतेच की ते एका राजकीय पक्षाची भूमिका बजावत असते. पश्चिम महाराष्ट्रातील एका नामवंत मराठी दैनिकाची ख्याती एका राजकीय पक्षाहून अधिक आहे. पत्रकार आणि वर्तमानपत्र या दोहोंना राजकीय भूमिका असतात. मात्र आपल्या भूमिका मांडत असताना त्यांनी समाजहित आणि देशहितास प्राधान्य देऊनच त्याचा अंगीकार केला पाहिजे हे अपेक्षित आहे. एक पत्रकार जेंव्हा राजकीय नेता होतो तेंव्हा त्याच्यातला पत्रकार त्याने सदैव जिवंत ठेवला पाहिजे आणि केवळ राजकारणी म्हणून न वावरता वा कुणाचाही बाहुला न होता स्वतःच्या विद्रोही मतांचा जागर त्याने सातत्याने केला पाहिजे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राजकारणात प्रवेश घेतल्यावर जनता त्याला फारसे आढेवेढे घेत नाही किंवा त्याच्या पूर्वेतिहासाची फारशी चर्चाही होत नाही मात्र एखाद्या पत्रकाराने राजकारणात सक्रिय प्रवेश केला की त्यावर सुंदोपसुंदी सुरु होते, याचे कारण म्हणजे पत्रकरांकडून समाजाला राजकीय निर्भीडत्याच्या आणि निस्पृहतेच्या अपेक्षा असतात. कालपर्यन्त प्रखर टीका करणारा पत्रकार जेंव्हा एखाद्या विरोधी विचारधारेत सामील होतो तेंव्हा तिथे संशयाला जागा असू शकते. पण कुमार केतकर यांनी जी विचारधारा त्यांच्या पत्रकारितेतुन आजवर मांडली आहे किंवा ज्या कॉम्रेड डांगे प्रणित डाव्या विचारसरणीचे ते आग्रही आहेत वा उजव्या विचारसरणीचे ते परखड विरोधक राहिले आहेत त्याला अनुसरूनच त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे त्यात कुणी फारशी खळखळ करायची आवश्यकता नाही. एक पत्रकार हा चांगला राजकारणी होऊ शकतो याची अनेक उदाहरणे आजवर घडलीत. सरसकट सर्वच पत्रकारांनी यातून प्रेरणा घेऊन राजकारणात शिरण्याचे दिवास्वप्नही पाहू नये, कारण वर्तमानपत्र हा आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनमानसात आपले स्थान टिकवून आहे.
- समीर गायकवाड.
(आजच्या दैनिक 'दिव्य मराठी'त संपादकीय पृष्ठावर प्रकाशित लेख)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा