भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.
१९५५ मंटो निवर्तले त्या नंतर तब्बल १० वर्षांनी भाऊंची सर्वाधिक चर्चा झालेली 'वासूनाका' ही कादंबरी प्रकाशित झाली आणि एकच गजहब उडाला. धर्म बुडाला, संस्कृतीला लांच्छन लावले, जातीला बट्टा लावला, मराठी साहित्याला काळिमा फासला, सभ्यतेचे धिंडवडे निघाले अशी जहरी टीका त्यांच्यावर होऊ लागली. आचार्य अत्रे ज्याचे संपादक होते त्या 'नवा मराठा'ने २४ एप्रिल १९६६ रोजी अग्रलेखातून भाऊंना ज्या डागण्या दिल्या त्यावरून त्यांना काय काय सहन करावे लागले असेल याची पुसटशी कल्पना येते. लोकांनी कोणत्या स्तराला जाऊन टीका केली. भाऊंच्या लेखनास अश्लील ठरवताना आचार्य अत्रे यांनी देखील टीकेची पातळी सोडल्याचे स्पष्ट जाणवते. असा काय अपराध भाऊंनी केला होता की तत्कालीन समाज आणि सभ्यतेचे स्वयंघोषित रक्षक चडफडून गेले होते ! आजकाल जसे 'अमुक एक लिहिले तर याद राखा, महागात पडेल' ही साथीच्या रोगाची प्रवृत्ती जशी सर्वत्र सहज आढळते ती त्या काळीही होती याचा हा मार्मिक दाखला ठरावा. आज सोशल मिडीयात स्वतःला सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित म्हणवून घेणारे याहून वाईट, अश्लाघ्य आणि असभ्य भाषेत आपली गरळ ओकत असतात. मग भाऊंनी काय घोडे मारले होते ? याचे उत्तर भाऊंच्या साहित्यात आहे. जी लाईन ऑफ थिंकिंग मंटोच्या साहित्यात आढळते तीच भाऊंच्या साहित्यातही डोकावते. फोरासखान्यातल्या, कामाठीपुऱ्यातल्या बायकांना त्यांनी आपल्या कथांच्या नायिकांची जागा दिली आणि तत्कालीन सनातन्यांचे पित्त खवळले ! भाऊंनी वापरलेले शब्दप्रयोग ज्यांनी हीन ठरवले होते त्यांनी त्याच शब्दात भाऊंवर जहरी टिप्पण्या केल्या. वाईट गोष्ट अशी की विजय तेंडुलकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या मोजक्या दिग्गज लेखकांनी भाऊंची पाठराखण केली आणि त्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले. आपल्याला न पटणाऱ्या किंवा आपल्या पचनी न पडणाऱ्या सर्वच साहित्यिकांना कसे धोपटून काढले जाते, त्यांच्यावर पूर्वग्रहदुषित वृत्तीने कशी टीका केली जाते याची झलक दैनिक 'मराठा'च्या या अग्रलेखात टोकदारपणे दिसते.
******
(दै. मराठा, अग्रलेख, दि. २४ एप्रिल १९६६)
हा बाजूला ज्याच्या चित्राचा ठसा आम्ही छापलेला आहे ना, त्याचे नाव प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये. त्याच्या चेहेऱ्यावरून तो चांगलाच मवाली दिसतोय. ‘वासूनाका’ नावाचा एक कथासंग्रह लिहून ह्या इसमाने मराठी वाङ्मयात जी बीभत्स आणि गलिच्छ डाकूगिरी केलेली आहे, तिला तोड नाही. अशा तऱ्हेच्या हिडीस मवालगिरीला मराठी साहित्यात ‘रथचक्र’चे कर्ते श्री. ना. पेंडसे, ‘चक्र’ बनविणारे जयवंत दळवी, ‘माणूस’चे लेखक मनोहर तल्हार, ‘बाईविना बुवा’ बनलेले उद्धव शेळके आणि ‘कोसला’चे निर्माते भालचंद्र नेमाडे ह्यांनी यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. तथापि ह्या हिडिस बीभत्सपणावर जर सर्वांत कोणी किळसवाणा कळस चढविला असेल, तर तो भाऊ पाध्ये ह्याच्या ‘वासूनाका’ने. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताशी पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा निर्माण केल्यानंतर गेल्या सात शतकांत ह्या मराठी भाषेत चांगले वाईट लिखाण करणारे पुष्कळ लेखक अन् कवी होऊन गेले. पण भाऊ पाध्ये ह्याच्यासारखा घाणेरडा कागदखराब्या ह्या महाराष्ट्रभूमीत आजपर्यंत कधई जन्माला आला नसेल. ह्याचा जन्म आपल्या मातेच्या कुशीत झालेला नसून, कोठल्या तरी बावनखणीच्या वा फोरास रोडच्या गटारात झाला असला पाहिजे, ह्याबद्दल आता आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. संडासात आपली लेखणी बुडवून भाऊ पाध्याने जेव्हा हे भयानक ‘वासूनाका’ लिहिले, तेव्हा त्याची बोटे महारोगाने का झडली नाहीत किंवा त्याच्या मेंदूला कॅन्सर का झाला नाही, असे ते चोपडे वाचताना वाचकांना वाटू लागते. ‘वासूनाका’ लिहिणाऱ्या लेखकाला आई नसावी. बहीण नसावी. बायको नसावी किंवा मुलगी नसावी असे वाटते. कारण, असे जवळच्या जिव्हाळ्याचे कोणी नातेवाईक त्याला जर असते, तर धंदेवाईक वेश्यांच्या दुकानांतसुद्धा जी भाषा त्यांच्या गिऱ्हाईकांना उच्चारण्याचे कधी धाडस होणार नाही, असा गटारबोलीत ‘वासूनाका’ लिहिण्याचे धैर्य ह्या भाऊ पाध्याला कदापि झाले नसते. आम्हाला गंमत वाटते ती ही, की हा भाऊ पाध्ये पूर्वी साधारण बऱ्यापैकी लेखक होता. त्याने आमच्याकडेही पूर्वी थोडेसे लेखन केलेले आहे. आम्ही त्याला कधी पाहिले नसले किंवा त्याची व्यक्तिगत अशी काहीही माहिती आम्हाला जरी नसली, तरी आम्हाला परिचित असलेल्या त्याच्या पत्नीला तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी आम्ही स्वतः दीडशे रुपयांची मदत केलेली आहे. तोच भाऊ पाध्ये कालांतराने ज्ञानेश्वराच्या अमृतमधुर मराठी भाषेत मांजराचे मूत्र आणि कुत्र्याची विष्ठा कालवील असा त्यावेळी आम्हाला सुतराम् देखील संशय आला नाही. ‘वासूनाका’ ह्या चोपड्याच्या अस्तित्वाची आम्हाला कालपरवापर्यंत जाणीवदेखील नव्हती. पण ‘राजश्री’ मासिकाने त्या चोपड्यातील गलिच्छपणा आपल्या एका अंकात उघडकीस आणल्यानंतर, त्याकडे आमचे लक्ष वेधले. तेव्हा ताबडतोब आम्ही ‘वासूनाका’मागवून तासाभरात घाईघाईने ते वाचून टाकले. ते वाचून आमच्या सर्वांगाचा भडका उडाला. आमच्या निकटच्या मित्रमंडळींना त्यातले काही उतारे जेव्हा आम्ही वाचून दाखविले, तेव्हा ते तर हतबुद्ध झाले. ते उद्गारले, ‘अशा तऱ्हेचे गलिच्छ पुस्तक मराठी भाषेत प्रसिद्ध कसे होऊ शकते?’ आम्ही त्यांना सांगितले की, ‘अहो, भाऊ पाध्यासारख्या फोरास रोडवरच्या एखाद्या भडव्याने मराठी भाषेत काय वाटेल तो मात्रागमनीपणा केला असेल. पण ते बेवारशी पाप मुंबईच्या ‘पॉप्युलर प्रकाशन’सारख्या नामवंत आणि प्रतिष्ठित प्रकाशनकाने आपल्या अंगाखांद्यावर खेळवून लोकांच्या हाती ठेवण्याचा बेजबाबदार पागलपणा काय म्हणून करावा? भरबाजारात देहविक्रिय करणाऱ्या धंदेवाईक वेश्येला कुटुंबवत्सल गृहस्थाने आपल्या घरात हळदीकुंकवाला वा सत्यनारायणाला काय म्हणून बोलवावे? आमचे वाचक आम्हांला विचारतील की तुम्ही ‘वासूनाका’ हे चोपडे हिडीस आहे, गलिच्छ आहे, बीभत्स आहे, असे घसा खरडून आतापर्यंत या अग्रलेखात जे सांगितलेत, त्याचा एखादा काही तरी पुरावा द्या की! तर त्याबाबत आम्हाला एवढेच सांगावयाचे आहे की ह्या ‘वासूनाक्या’तला काही बीभत्स भाग इतका हिडीस आणि गलिच्छ आहे की त्याचा सामान्य नामनिर्देश देशील करणे आम्हाला शक्य नाही. स्त्री जातीच्या शरीराच्या सर्व अंगोपांगाची आणि तिच्याशी होणाऱ्या पुरुषसंबंधांची साद्यंत वर्णने कधी एखाद्या शब्दात, एखाद्या वाक्यात वा टप्प्यात पुनःपुन्हा मिटक्या मारीत ह्या भाऊ पाध्याने केलेली आहेत. आई आणि बहीण ह्यांच्या संदर्भातल्या हिडीस शिव्यांची तर समग्र पुस्तकात खैरात केलेली आहे.‘भ्यांचोद’, ‘मादरचोद’, आणि ‘च्यायला’ ह्या शिव्या वाक्या वाक्यागणिक लेखकाने उधळलेल्या आहेत.‘भ्यांचोद’ ही शिवी तर आम्ही ह्या पुस्तकात दीडशे वेळा मोजली. अन् ‘च्यायला’ सव्वाशे वेळा. ‘ती मुलगी बारा ** ची आहे’, ‘तिचा ** फारच भरलेला किंवा टरारला होता’, (फुल्या आमच्या). असली या चोपड्यातली महाबीभत्स शिमगा वाक्ये वाचताना वाचकांच्या माना शरमेने खाली मोडून पडतील आणि त्यांच्या मनात असाही विचार येऊन जाईल की ती वाक्ये भाऊ पाध्येच्या कुटुंबातील स्त्रियांच्या संदर्भाने कोणी तरी वापरावीत. हे चोपडे वाचून आमच्या सर्वांगाचा असा काही भटका उडाला की, ‘केशवसुतांच्या जन्मोत्सव सभे’त बोलताना ह्या भाऊ पाध्याला जोड्याने मारावयाला पाहिजे, असे आम्ही संतापाने म्हणालो. तेव्हा भाऊ पाध्येचे काही पाठीराखे त्याच्या मदतीला मोठ्या हिरीरीने धावून आले हे पाहून आम्हांला खरोखरच त्यांची कीव आली. भाऊ पाध्यांचे हे समर्थक काही सामान्य साहित्यिक नाहीत. मराठी साहित्यात ज्यांनी नावलौकिक आणि प्रतिष्ठा मिळवलेली आहे असे ते वजनदार आणि जबाबदार लोक आहेत. त्यांची नावेच सांगितली तरी पुरे. दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर आणि वसंत शिरवाडकर, ह्यांनी अनुक्रमे ‘अभिरुची’, ‘महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘वीणा’ ह्या नियतकालिकांत हा हिडीस‘वासूनाका’ अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचविलेला आहे. दुर्गा भागवत ह्या तर मराठी भाषेतल्या नामांकित लेखिका आहेत. अभिजात आणि शैलीदार लेखन करण्यात त्यांचा हात धरणारे मराठीत फारच थोडे लेखक किंवा लेखिका सापडतील. असे असून त्यांनी ‘वासूनाका’ची विष्ठा चिवडून चिवडून त्यातून एक ‘गंधर्वसृष्टी’ शोधून काढली आहे. ‘वासूनाक्या’तल्या सर्व कथा पोरवयातच बिघडलेल्या माणसांच्या अतृप्त लैंगिक वासनेच्या आहेत. वासनेच्या भुकेचे बळी आहेत सारे. ते लोक उंडगे म्हणजे मनाचे दुबळे आहेत. ते दारूडे, व्यसनी व बीभत्स चलनी भाषा बोलणारे आणि लोकांची टिर्रेबाजी करणारे आहेत, असे कबूल करूनही दुर्गाबाईंनी, ह्या गुंडांच्या मनात स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल फार मोठा आदर असून ‘तरुण, सौंदर्य, चारित्र्य व प्रेमळपणा या चार गुणांचा साज ह्या मवाल्यांनी आपल्याला मनातून पूज्य वाटणाऱ्या स्त्रीच्याभोवती चढविलेला आहे’, असा अजब शोध लावलेला आहे. वस्तुतः कोणीही सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री हे ‘वासूनाका’ चोपडे हातातसुद्धा धरणार नाही. पण ज्याअर्थी गटाराच्या घाणीत कोपरापर्यंत हात बुडवून दुर्गाबाई तो आपल्या नाकाजवळ नेऊन हुंगीत आहेत आणि हाताला गुलाबाचा वास येत असल्याचे त्या सोंग करीत आहेत, त्या अर्थी स्वरूपाच्या अभावामुळे दीर्घकालीन अविवाहित स्थितीत राहाणे आजपर्यंत त्यांना भागच पडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या मनात भलभलते अविचार सध्या येत असावेत आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा, भावनेचा आणि अभिरुचीचा तोल ढळला असावा, असा तर्क करणे क्रमप्राप्त आहे. दुर्गाबाईंपेक्षा अधिक पोटतिडकीने तेंडुलकर ह्यांनी ‘वासूनाक्या’चे समर्थन केले आहे. त्यांनी वासूनाक्यातील काही नमुनेच आपल्या समालोचनात दिले आहेत. त्यातले काही नमुने येथे देण्यासारखे आहेत. १) ‘उन्हे उतरली म्हणजे आमची ‘कंपनी’ वुलन पँटस् चढवून वासूनाक्यावर‘भंकसगिरी’ करायला जमत होती. आम्हाला च्यायला मधुबालेसारखी ‘पणती’ पकडणे शक्य आहे का?’२) ‘परवा संक्रांतीची गोष्ट. सकाळी तिचा भाऊ तिळगूळ घेऊन आला. त्याने मला चिठ्ठी दिली. भ्यांचोद काय काय लिहिलं होतं त्यांत! काय म्हणे ‘मला फक्त तुम्ही हवेत. दुसरे कोणी नको! भ्यांचोद काय ती बडबडते!’ ३) ‘साला हिच्याबरोबर दोन घंटे टाईमपास होतो आहे ना! ही सगळी हिरव्या नोटेची पावर!’
हे तीन उतारे वाचले म्हणजे ‘वासूनाक्या’मधील गुंडांना ‘स्त्रीच्या इज्जतीबद्दल’ विलक्षण आदर वाटतो आणि त्यामुळे ह्या सर्व वर्णनात ‘हृदयस्पर्शी उद्विग्नता वाटते’ असा शोध लावणाऱ्या विजय तेंडुलकरांचे डोके ठाणे येरवड्याच्या तज्ज्ञ डॉक्टरकरडून तपासून घ्यावे असेच वाटल्यावाचून राहणार नाही. वसंत शिरवाडकरांनी त्याच्यापुढे जाऊन ‘वासूनाक्या’तील गलिच्छ भाषेचे आणि अश्लीलतेचे बेशरमपणे समर्थन केले आहे. ते म्हणतात, ‘‘बकाल जीवनाचे प्रत्यंतर घडविण्यासाठी लेखकाने जर पांढरपेशी सुसंस्कृत भाषेचे माध्यम वापरले असते, तर त्याच्या आशयाचा अस्सलपणाच तो हरवून बसला असता. या बकाल बोलीत अर्वाच्यता भरपूर असली तरी तिचेही एक सामर्थ्य आहे.‘वासूनाक्या’वरील बकाल जीवन (जे लेखकाने चितारले आहे) ते खरे आहे. आणि ते खरे असल्याचे तुम्हाला शंभर टक्के जाणवावे म्हणून लेखकाने ते तेथील चालू बोलीतून तुम्हाला सांगितलेले आहे. त्याची ही सत्यता हेच त्याचे समर्थन आणि तेच त्याचे आव्हान. वासूनाक्यात आचरट किंवा अश्लिल काही नाही. त्यात जे बीभत्स दिसते, ते काही लेखकाच्या डोक्यातले नाही. ते त्याच्या वर्ण्य विषय असलेल्या जीवना आहे. ‘त्या जीवनात तसे असेल, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, आम्हाला ते पहावयाचेही नाही’ असा विश्वामित्री आविर्भाव ज्यांचा असेल त्यांच्याशी या मुद्द्याबाबत वाद घालणे व्यर्थच आहे!’’ वाङ्मय म्हणजे काय, वाङ्मयात भाषेचे स्थान काय किंवा वाङ्मयातील वास्तववादाचे स्वरूप आणि व्याप्ती काय असावी, ह्याची सुतराम माहिती नसलेल्या वसंत शिरवाडकरासारख्या एका मूर्ख, अडाणी आणि वेडगळ माणसाशी काय वाद घालावा?
‘फायनॅन्शल एक्सप्रेस’मधे ‘जे-वॉकर’ ह्या नावाने (कोणी आम्हांला सांगितले की ‘अडाणेश्वर’ नावाचे मराठी लेखकच आहेत.) एका लेखकाने व्यक्तिशः आमच्याविरुद्ध हंबरडा फोडला आहे, की ‘भाऊ पाध्येसारख्या ‘युगप्रवर्तक’ (Epochmaking) कादंबरीकाराविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध करून आणि सरकारी कायद्याला चिथावून अत्रे हे त्यांचा निष्कारण बळी घेण्याच्या प्रयत्नात आहेत!’ म्हणून त्यांचे लोकांना असे आवाहन आहे की, त्यांनी ‘वासूनाक्या’कडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने पाहावे आणि सरकारला त्यांचे असे सांगणे आहे, की ‘त्याने ‘वासूनाक्या’वर जर काही कारवाई केली तर ती अन्याय्य आणि अविचाराची होईल.’ वासूनाक्याकडे ‘कलात्मक आणि वाङ्मयीन’ दृष्टीने कसे पाहावयाचे ते फक्त ह्या ‘अडाणेश्वरां’नाच माहीत! मग शौचकूपाकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने का पाहू नये बरे? ह्या गचिच्छ चोपड्यावर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र सरकार काय करील ते काही आम्हाला माहीत नाही. कारण, सरकारच्या वाङ्मयीन सल्लागार मंडळींत दुर्गा भागवत किंवा ‘अडाणेश्वर’ ह्यांचेच भाऊबंद घुसलेले आहेत. म्हणूनच गलिच्छ चोपड्यांना महाराष्ट्र सरकार सालोसाल पारितोषिके देते. झोपडपट्टींतल्या किंवा खालच्या थरांतल्या लोकांच्या जीवनाचे वास्तववादी वर्णन करण्याचा आव आणून लैंगिक महारोगाने सडलेले बरेचसे मराठी लेखक आजकाल अत्यंत बीभत्स आणि हिडीस लिखाण करून मराठी भाषेत नि साहित्यांत अक्षरशः मूत्र आणि विष्ठा कालवीत आहेत. अशा त्या लिखाणाचा बहुसंख्य सभ्य आणि सुसंस्कृत मराठी जनतेने शक्य त्या उपायांनी नायनाट करावा हाच इशारा तिला आम्ही देतो.
***
वासूगिरी हा शब्द आजही रूढ आहे तेंव्हाही होता, पुढे असेल की नाही हे सांगता येणार नाही. पण येणाऱ्या काळात देखील स्त्रियांचे शोषण सुरूच असेल असं आताच्या काळाच्या वाटचालीवरून ठळक जाणवतं. मग स्त्रियांच्या शोषणावर आणि त्यांना हीन समजण्यावर कुणी लिहिलं तर त्यावर दोन्ही बाजूंनी पडसाद हे उमटणारच. भाऊंच्या लेखनसंपदेत 'अग्रेसर', 'ऑपरेशन छक्का', 'एक सुन्हेर ख्वाब', 'करंटा', 'गुरुदत्त', 'डोंबार्याचा खेळ', 'दावेदार', 'पिचकारी', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरक', 'भाऊ पाध्ये यांची कथा', 'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा' - संपादित संकलन लोकवाङ्मय गृह, 'मुरगी', 'राडा, 'वॉर्ड नंबर ७-सर्जिकल', 'वासूनाका', 'वैतागवाडी', 'होमसिक ब्रिगेड' या साहित्यकृतींचा समावेश होतो. मंटोंच्या वाट्याला उपेक्षा आणि प्रसिद्धीही आली पण भाऊ त्याबाबतीतही मागेच राहिले. आजही काही समीक्षक नाकाने कांदे सोलताना त्यांचा उल्लेख विशिष्ट शिक्के मारूनच करताना आढळतात.
'आम्ही म्हणू तिच संस्कृती', 'आम्ही ठरवू तिच सभ्यता' हे आपण घटकाभर खरेही मानू पण मग या संस्कृतीत आणि या सभ्यतेत जे राजरोसपणे स्त्रियांचे दमण चालू असते ते काय आहे ? ती कुठली संस्कृती ? वेश्यांच्या नावाआडून ते एका अबला आणि असहाय्य नारीचेच शोषण होय. मग समाजाला सगळं काही कापूर आरतीनं ओवाळून सोवळ्यातलं साजूक गोडच आवडत असेल तर या शोषित घटकावर समाज का मौन बाळगून आहे याचे उत्तर तेंव्हाच्या टीकाकारांनीही दिले नाही आणि आताच्या टीकाकारांबद्दल तर न बोललेलं बरं. बुडाखाली कितीही अंधार असला तरी चालेल पण वरकरणी माणूस सोज्वळ हवा या ढोंगाचे पाखंड उघड केलेच पाहिजे त्यात काही गैर नाही. भाऊ पाध्ये तर हिंदू होते जे मुस्लिमांहून दोन पावले अधिक सुधारणावादी आणि नवमतवादी समजले जातात. पण मंटो तर कर्मठ समजल्या जाणाऱ्या इस्लाम धर्मात जन्मलेले होते. ते ही भाऊंच्या लेखनकाळाच्या दशक भर आधी सक्रीय होते. मग त्यांना किती तीव्र व दाहक विरोध तत्कालीन धर्ममार्तंड आणि समाजधुरीणांकडून झाला असेल याची कल्पना यावी.
आजही काळ फारसा बदललेला नाही. आजच्या धर्ममार्तन्डांना आणि समाजधुरीणांना न पटणाऱ्या विचारांची पाठराखण करणारं लेखन प्रकटन कुणी जरी केलं तर आजही त्याला अमानुष त्रास सोसावा लागतो. काळ बदलायचा असेल तर आधी स्वतःला बदलावे लागेल आणि मग कालबाह्य झालेले मापदंड मोडीत काढावे लागतील. या साठी समाजमनाचा कठोर निग्रह हवा ज्याला वैचारिक प्रगल्भतेचे बळकट अधिष्ठान अनिवार्य आहे....
- समीर गायकवाड
(टीप - आचार्य अत्रे यांच्याबद्दल आधीही आदर होता आणि आजही आहे. त्यांनी लिहिलेलं प्रत्येक वाक्य म्हणजे प्रमाणवाक्यच मानले पाहिजे असं काही नाही. त्यांनी मांडलेल्या भूमिकात फोलपणा दिसून येत असेल तर त्याची मीमांसा ही व्हायलाच पाहिजे या हेतूने दैनिक मराठामधील अग्रलेखाचा संदर्भ लेखात वापरला आहे. लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याला मांडावयाचा असलेला आशय यांना चौकटबंद स्वरूपात रंगवण्याचा अट्टाहास कुणी करत असेल तर दोन्ही बाजूंनी साधक बाधक विचार होऊन मतप्रदर्शन तरी झालेच पाहिजे)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा