सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !
११ मे १९१२ रोजी लुधियानातील एका बॅरिस्टरच्या कुटुंबात मंटोंचा जन्म झाला. त्यांचं बालपण सामान्य मुलांप्रमाणे व्यतित झालं. जालियांवाला बाग हत्याकांड घडलं तेंव्हा ते सात वर्षाचे होते. या घटनेनं मंटो बदलून गले. (त्यांच्यातल्या विद्रोहाची मशाल याच काळात प्रदीप्त झाली. पुढे जाऊन मंटोच्या 'तमाशा' नावाच्या कथेत या नरसंहाराचा उल्लेख आणि संदर्भ आलेत) अमृतसर मधील हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. 'कॉलेज ऑफ रशीद जहां'मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झालं. इथं कॉम्रेड आगा हर्श कश्मिरी आणि बारी अलीग यांच्याशी त्यांची भेट झाली. ऑस्कर वाईल्डच्या ‘वेरा’चं त्यांनी ऊर्दूत भाषांतर केलं. बंडखोर विचार आणि कमालीच्या अतिसंवेदनाशील मनामुळे त्यांचं परिवर्तन एका अत्यंत अभिनव लेखकरुपी मंटोमध्ये कधी झालं हे त्यांनाही उमगलं नाही. आपल्या बंडखोर विचारापायी त्यांनी भूमी मार्गाने रशियाला जाण्याचा निश्चय केला पण त्यात अयशस्वी झाल्यावर अमृतसरलाच रशिया मानून आपलं कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला. वर्गवादा आधारे पिचलेल्या घटकासाठी काम करायचं त्यांच्या मनात ठसलं ते याच काळात. याच उर्मीतून त्यांनी लेखणी हाती धरली आणि त्यातून कागदावर जे उतरलं त्याने कैकांच्या मेंदूत परंपरांचा विस्फोट घडवणारी आग लावली तर अनेकांच्या काळजातील जखमांना मलम लावलं. अनेक वाद झाले. टीकेचा भडीमार झाला. जणू काही जगबुडी झाली आणि मानवी सभ्यता धोक्यात आली असा कांगावा केला गेला. जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापासून ते न्यायालयीन खटल्यापर्यंत लोकांनी त्यांना छळलं, पण मंटो ढळले नाहीत की मागेही सरले नाहीत. ते आपल्याविचारांवर, साहित्य रचनेवर ठाम राहिले आणि त्याची त्यांनी पाठराखण केली.
लोकांनी इतका थयथयाट करावा असं काय होतं त्यात ? असा काय गुन्हा एका लेखकाने केला होता की त्यांच्या लेखनाविरुद्ध वणवा पेटला होता ? याचं उत्तर धुंडाळण्यासाठी समग्र मंटो वाचले पाहिजेत असं काही नाही. त्यांच्या काही कथा जरी वाचल्या तरीत्यांचा रोख कुणावर होता आणि त्यांना काय मांडायचं होतं हे समोर येतं. मंटोने स्वतःला घडवावं, म्हणून त्यांच्या अब्बाहुजूरनी त्यांना अलिगढला पाठवलं. पंरतु तिथे घडण्याऐवजी, अली सरदार जाफरी, जाझबी, मजाझ, सिब्ते हसन, जाँ निसार अख्तर आणि अख्तर हुसैन रायपूरी यांच्या संगतीतून वेगळ्या अर्थाने मंटो ‘बिघडत’ गेले. त्यामुळे जेमतेम वर्ष पुरं होण्याआधीच अमृतसरला परतावे लागले. तिथेही त्यांना स्वस्थ बसवले नाही, ते लाहौरला गेले. तिथं गेल्यावर त्यांनी 'पारस' नावाच्या दैनिकात काम केलं. 'मुसव्विर' नावाच्या साप्ताहिकाच्या संपादकाचं कामही काही दिवस केलं. १९४१ ला ते दिल्लीत परतले आणि त्यांनी ऑल इंडिया रेडियो जॉईन केला. दिल्लीत ते अवघे १७ महिने राहिले. मात्र तेव्हढ्यातही त्यांनी कमाल केली. 'आओ', 'मंटो के ड्रामे', 'जनाज़े' आणि 'तीन औरतें' ही रेडीओ नाटके या काळात प्रकाशित झाली. पुन्हा काही दिवसांसाठी ते लाहौरला गेले. इथं असलेली 'हिरामंडी' हे त्यांचं आकर्षण होतं. हिरा मंडी ही तत्कालीन भारताची सर्वात मोठी वेश्यावस्ती होती, मंटोचं या प्रती असणारं आकर्षण शारीरिक नव्हतं तर मानवी भावभावनांच्या गुंतागुंतीच्या ओढीचं होतं. तिथं फारच अस्वस्थ वाटू लागल्यावर ते १९४२ मध्ये मुंबईस आले. १९४८ पर्यंत काही नियतकलिकांसाठी व 'इम्पिरिअल फिल्म कंपनी’च्या चित्रपटांच्या संवाद - पटकथांसाठी त्यांनी काम केलं. फाळणी झाल्यावर ते लाहौरला गेले. १८ जानेवारी १९५५ रोजी लाहौरमध्येच त्यांचं निधन झालं. 'टोबा टेक सिंह', 'खोल दो', 'घाटे का सौदा', 'हलाल और झटका', 'खबरदार', 'करामात', 'बेखबरी का फायदा', 'पेशकश', 'कम्युनिज्म', 'तमाशा', 'बू', 'ठंडा गोश्त', 'घाटे का सौदा', 'काली सलवार' या त्यांच्या विशेष गाजलेल्या कथा होत. आपल्या कथांतून त्यांनी स्त्री-पुरुष प्रेम संबंधांवर वेगळ्या भूमिकेतून प्रकाश टाकला. ज्याने दोन्ही देशात जणू धर्म संकटात सापडला. इस्मत चुगताई आणि सआदत मंटो या द्वयीने हे काम इतक्या निर्भीडपणे आणि परखडपणे केलं की त्या काळाला ते पचलंच नाही. १९३६ मध्ये 'आतिशपारे' हा तरुण मंटोच्या कथांचा पहिला अनमोल कथासंग्रह प्रकाशित झालेला.
पराकोटीचा द्वेष, उपेक्षा सोसत त्यांनी तब्बल १९ वर्षे साहित्यसेवा केली. २३० कथा, ६७ रेडीओ नाटके, २२ शब्द चित्रे आणि ७० लेख ही त्यांची लेखनसंपदा. मंटो दिल्लीत होते तेंव्हा त्यांच्या रेडीओ नाटकांनी त्यांना वादग्रस्त प्रसिद्धी मिळवून दिली, त्यांच्या नाटकांनी आजही रंगमंच गौरविला जातो मात्र मंटोना खरी लोकप्रियता आणि फेम मिळवून दिली ती कथांनी ! त्यांच्या कथांत कमालीची नाटकीय मुल्ये ठासून भरलेली होती. तो केवळ विद्रोह नसून तो तर साहित्यिक सीमांच्या चौकटबंद झापडांना उध्वस्तकरून टाकणारा अक्षरप्रलय होता. मंटोच्या आयुष्यात डोकावताना सुरुवातीस उत्सुकता असते, नंतर जिज्ञासा वाटू लागते, रोमांचक असतं हे सगळं. पण नंतर समोर येतो तो डोक्याला झिणझिण्या आणणारा काळ्याकभिन्न अंधाराकडे नेणारा अंतहीन प्रवास ! मंटोनी समाजातील सर्वात खालच्या स्तराला असणाऱ्या शोषित वेश्यांवर कथा लिहून एका नव्या दृष्टीकोनाचा आरंभ केला पण समाजाने त्यांना काय दिलं ? त्यांच्या साहित्याला अश्लाघ्य निषिद्ध मानत त्यांचा अप्रत्यक्ष छळवाद मांडला, अघोषित बहिष्कार टाकला. परिणामी एक उमदा साहित्यिक अकाली गेला. जे आपण आनंदाने अनुभवतो, समाज ज्या शोषणाचा मिटक्या मारत आनंद घेतो त्यावर एक विलक्षण माणूस सर्वशक्तीनिशी आसूड ओढतो हे कुणाला बरे रुचेल ? द्वेष आणि असूयेने भारलेल्या समाजाने मंटोला अव्हेरलं. तत्कालीन सुधारणावादी साहित्यिकांनीही यावर ठोस भूमिका न घेता मंटोनाच मागं सरण्याचा सल्ला दिला. पण आपल्या कथांवर मंटोंचा इतका जीव होता की जणू त्यांचं ते प्रथम प्रेम होतं !
'मेरा नाम राधा हैं' या कथेत राधा या नवअभिनेत्रीचं राजकिशोर या मुरब्बी अभिनेत्यावरचं पहिलं प्रेम आणि त्याचं 'लंगोट का पक्का असणं' नी मग तिने त्याला जोखून बघणं या गोष्टी मंटोच्या खुमासदार शैलीत समोर येतात. 'ठंडा गोश्त'मध्ये एक चोर आणि एक वेश्या यांच्यातल्या शरीर संबंधासोबतच दोन भिन्न विश्वात जगणाऱ्या जीवांची तगमग समोर येते. 'बाबू गोपीनाथ' या कथेत व 'पीर का मजार' आणि 'रंडी का कोठा' या दोन्हीविषयी आत्मीयता असणाऱ्या जगावेगळ्या माणसाची शरीर लालसा दिसते. 'काली सलवार' या कथेत एका गरीब स्त्रीला नवी सलवार हवी असते तर एकीला पैंजण हवे असतात, स्त्रीमनातल्या शृंगारविश्वाचा अत्यंत हळुवार आलेख यात मांडला आहे. 'पीरन' या कथेत मंटोंनी बृजमोहन आणि त्याची प्रेयसी पीरन यांच्यातील नखरेल आडमुठ्या संबंधांचं 'रसभरीत' वर्णन केलंय. मंटोच्या कथांचं सार लिहायचं म्हटलं तर शब्दसीमा आड येते. तरीही एक गुणविशेष सांगावासा वाटतो तो म्हणजे त्यांची एकही कथा त्यांच्याच दुसऱ्या कथेची नक्कल वाटत नाही, शब्दनिवड आशय विषय तेच असूनही ही किमया मंटोनी लीलया साधली आहे.
मंटोची पत्नी, त्याच्या तीन मुली यांची मंटोच्या स्वैर जगण्यामुळे ससेहोलपट झाली. एका घटनेत मद्यपानाच्या सवयीमुळे एका रात्री अंथरुणाला खिळून असलेल्या मुलीस औषधाऐवजी दारुची बाटली घेऊन मंटो घरी येतात आणि घरी आल्यानंतर त्यांच्याकृत्याची उपरती होते. तेंव्हा मंटो आपल्या मुलींबद्दल लिहितात- ‘काही वर्षे इतकी भकास होती की, माझ्या मुलींना त्यांच्या जन्मदिनी एखादी भेट देण्यासाठी माझ्या खिशात फुटकी कवडीही नव्हती.’ अशा घटना त्यांच्या आयुष्यात नित्याने घडत राहिल्या. याला कारण म्हणजे त्यांची आर्थिक, सामाजिक नाकेबंदी. १९४८ मध्ये पाकिस्तान सरकारने ‘नाकुश’ या मासिकावर मंटोची ‘खोल दो’ ही कथा प्रकाशित केल्याबद्दल बंदी आणली. ‘अदब-ए-लतीफ’,‘सवेरा’,‘नाकुश’ या मासिकांवरची बंदी हा पाकिस्तान सरकारचीसेन्सॉरशिप आडूनची मुस्कटदाबी होती. 'ठंडा गोश्त' कथेद्वारे अश्लीलता व भावना दुखावण्याच्या आरोपाखाली शिक्षेची मागणी करत मुस्लिम वाचकांनी मंटोला कोर्टात खेचले. ‘बू’ या कथेमध्ये त्यांनी स्त्रीच्या छातीला छाती संबोधल्याने लाहोरमध्येत्यांच्यावर खटला भरला गेला. बर्फ कारखान्यात कामावर असतानाची बाब असो वा अखेरीस मनोरुग्ण झालेल्या मंटोंना घ्यावी लागलेली शॉक ट्रीटमेंट असो त्यांना पैशाची कायमच चणचण राहिली ती याच कारणामुळे ! त्यांच्या कथा नाकारल्या गेल्यावर एकदा ते म्हणाले होते की, ‘इफ यू कॅन नॉट बेअर माय स्टोरीज, देन धिस इज अनबेअरेबल टाइम’ ! ते शेवटपर्यंत लिहीत राहिले आणि त्यांच्या नवविचारांना मानणारा एक छोटासा गट त्यांची पाठराखण करत राहिला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. खरं तर पाकिस्तानमध्ये आज जे काही त्रोटक विचारस्वातंत्र्य आणि वैचारिक आधुनिकता दिसून येते त्याचं कारण म्हणजे भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मंटो, फ़ैज़ अहमद फ़ैज़, डॉ अरसद आणि सज्जाद ज़हीर यां दिग्गज विचारवंतांचं वास्तव्य होय.
'मंटो खूप आवडले', 'त्यांच्या लेखनाने झपाटून गेलो', 'त्यांच्यावरचा सिनेमा खूप प्रभावशाली वाटला', 'माइंड ब्लोईंग लाईफ होती त्यांची' अशा अर्थाची विविध सृजनांनी केलेली मीमांसा वाचण्यात आली. वाचून छान वाटलं. पण सखेद आश्चर्यही वाटलं. मंटोनी ज्याच्यासाठी संघर्ष केला त्या विषयावर बोलण्याचं अत्यंत त्रोटक अपवाद वगळता अनेकांनी सफाईदारपणे टाळत मंटोंचं गुणगान केलेलं दिसून आलं. त्यांच्या लेखनावर वा त्यांच्या जीवनावर स्तुतीसुमने उधळणं खूप सोपं आहे पण मंटोंचे विचार सार्वजनिक जीवनात पचवणं अवघड आहे याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला. रांडेच्या जीवनावरच्या कथांची पुस्तके वाचणे किंवा त्या पुस्तकाच्या साहित्यिक मुल्यांची मीमांसा करणे सोपं आहे. 'असलं' लेखन करणाऱ्या लेखकाची भलावण केली की आपण सुधारणावादी झाल्याचा आव आणणंही सोपं जातं. पण जर कधी याच रांडांच्या बदनाम गल्लीतून जायचा प्रसंग आला की हेच लोक साईडटर्न करतात किंवा नाकाला रुमाल लावतात. मग मंटों आवडणं हे एक ढोंग होऊन गेलेलं असतं. मंटो हा केवळ लेखक नाही किंवा कुणी प्रेषितही नाही, मंटो एक विचारधारा आहे जी हलाहलाहून ही जहरी आहे पण तरीही जीवनदायी आहे ; आपल्याच प्रकाशमान दुनियेच्या एका अंधारल्या कोनाड्यात तिष्टत पडलेल्या लूत भरल्या दुनियेचं ती प्रतिनिधित्व करते. या दुनियेतलं वास्तवअंगावर आरेखताना त्याचे ओरखडे वाचणाऱ्याच्या काळजावर कायमस्वरूपी उठावेत हे मंटोंच्या साहित्याचं प्रयोजन ! नुसते मंटो तर कुणालाही आवडतील पण त्यांच्या प्रयोजनाचं काय ? एखाद्या वेश्येजवळ जाऊन तिच्या लुगडयातला अंधार धुंडाळतानाआपलं सत्व टिकवून ठेवून समाजाला आरसा दाखवण्याचं धारिष्ट्य जोवर येत नाही तोवर मंटो आवडून काहीच साध्य होणार नाही. फारतर आपण नवमुक्ततावादी विचारांचे पाईक आहोत याचा जगापुढे दिखावा करता येईल. मंटो सदैव जिवंत असतील ते या वेगळेपणामुळेच !
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा