बायोफ्युएल वापराचा परामर्श सोप्या शब्दात मांडता येईल. माणसे आणि मालाची जलद ने-आण करणारी विमाने जेट इंजिनावर चालतात. या जेट विमानांची रचना विशिष्ट व क्लिष्ट प्रकारची असते. त्यामुळेच विशालकाय विमान आकाशातून झेपावू शकते. यासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले केरोसिन तेलच असते. काही जण त्यास ‘पांढरे पेट्रोल’ असे संबोधतात. त्यास ‘एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) असे तांत्रिक नाव आहे. काही विशिष्ट प्रकारच्या विमानात पेट्रोलसदृश इंधने वापरली जात असली तरी मोठमोठाली जेट विमाने या केरोसिन इंधनावरच उडतात. सुरुवातीच्या काळात, अतिशुद्ध केरोसिन तेलाचा वापर होत नव्हता, प्रवाशांची संख्या जसजशी वाढली तशी विमानाच्या इंजिनाची रचना बदलत गेली. नव्या इंजिनाला जास्तीत जास्त शक्ती देणाऱ्या नि सुरक्षित ठेवणाऱ्या इंधनाची गरज लागली. ए.टी.एफ. या इंधनातील सेंद्रिय रासायनिक संयुगे ही १५० ते ३०० अंश सेल्सिअस तापमानाला उकळतात. त्याची वाहकता प्रमाणबद्ध असते व ओतनबिंदू खूपच कमी तापमानाचा असतो. विमानाचे प्रस्थान आणि आगमन स्थाने बहुतांशी भिन्न हवामानातले असतात. ही दोन्ही ठिकाणे भूवाहतुकीच्या मानाने लांबवरची असतात. दोन्हीतले हवाईवाहतूक मार्गाचे वातावरण हे भिन्न स्वरूपाचे असू शकते. हवामान शीत वा उष्ण असले तरी विमानातले इंधन इंजिनाला सतत शक्ती पुरवीत राहते. ते उष्णतेमुळे बाष्पीत होत नाही की थंडीमुळे गोठत नाही. हे इंधन जळताना पांढरा धूर उत्सर्जित होतो आणि इंधनातील एरोमॅटिक्स संयुगाच्या प्रमाणावर निर्धारित मर्यादा राखली जाते. आकाशात उडताना विमानाचे हवेशी घर्षण होऊन मोठय़ा प्रमाणात उष्णता निर्माण होते, विद्युतभारही निर्माण होतात. एटीएफ इंधनावर त्याचा काहीच विपरीत परिणाम होत नाही. हे सर्व मुद्दे बायोफ्युएलच्या बाबतीत जसेच्या तसे लागू होत नाहीत. तरीही बायोफ्युएलच्या बाबतीत जगभरातील एव्हीएशन क्षेत्र आग्रही आहे. याची कारणे महत्वाची आहेत.
जेटच्या इंधनात जे एटीएफ वापरले जाते त्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोकार्बन्सची मिश्रणे असतात. गरज आणि आकार यानुसार भिन्न गोठणबिंदू आणि ज्वलनबिंदू यावर आधारित इंधनमिश्रणे वापरली जातात. जसजसे विमानोड्डाणांचे प्रमाण बेफाम वाढत चालले तसतसे या वाहतुकीमुळे हवेतील कार्बन फुटप्रिंट्सचे प्रमाण वाढत गेले. या वाढत्या प्रदूषणास आळा घालणे, वाढत्या इंधन किंमती, घटते तेलसाठे व तेलाचे राजकारण यावर उपाय काढलाच पाहिजे यासाठी एव्हीएशन उद्योग पारंपारिक इंधनाच्या स्वरुपात बदल करू इच्छित होता. त्यातूनच बायोफ्युएलची संकल्पना पुढे आली. २००७ साली ‘ग्रीनफ्लाईट इंटरनॅशनल’ या कंपनीने टाकाऊ वनस्पती तेलावर प्रक्रिया केलेलं बायोफ्युएल १०० टक्के प्रमाणात वापरून अमेरिकेच्या नेवाडा प्रांतातील रेनो ते व्हर्जिनिया प्रांतातील लेसबर्ग हा प्रवास विनासायास पार पाडला होता. ‘व्हर्जिन अटलांटीक’ने खोबरेल आणि बबासूच्या तेलावर तर २००८मध्ये एअर न्यूझीलँडने एरंडवर्गीय जट्रोफा अर्कावर विमान उड्डाण केले होते. या खेरीज कॅमेलिना ऑईल आणि शैवाल यापासून निर्मिलेल्या जैवइंधनाचा अनेक वेळा वापर झाला आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये ‘अलास्का एअरलाईन्स’ने स्वयंपाकाच्या टाकाऊ तेलाचा वापर (२०/८०) केला होता. एटीएफ इंधनाची बहुतांश मानके अंतर्भूत असणारे १००% बायोइंधनावरचे उड्डाण २०१२मध्ये कॅनडाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थानच्या वतीने निर्मिलेल्या इथिओपियन मोहरीच्या प्रक्रियाकृत तेलावर आधारले होते. जगभरात आजवर अनेकवेळा चाचणी स्वरूपाची उड्डाणे झालीत आणि वीसेक कंपन्यांची व्यावसायिक उड्डाणे नियमित झालीत. २०११ मध्ये 'केएलएम' या डच कंपनीने १७१ प्रवासी घेऊन ऍमस्टरडॅम ते पॅरिस असा व्यावसायिक हवाई प्रवास पार पाडला होता. जुलै २०११ ते जानेवारी २०१२ या काळात ‘लुफ्थान्सा एअरलाईन्स’ने तर सलग सहा महिने हॅम्बर्ग ते फ्रॅंकफर्ट अशी उड्डाणे भरली होती. नंतर ती बायोफ्युएलच्या सक्षम स्त्रोतासाठी थांबवली गेली.
बायोफ्युएलवरचे विमानोड्डान ही भारताच्या दृष्टीने निश्चितच गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. असा प्रयोग करणारा तो पहिला विकसनशील देश आहे हा दावा मात्र पोकळ आहे. १ ऑगस्ट २०११ रोजी मेक्सिकोची अधिकृत एअरलाईन एरोमेक्सिकोने जट्रोफा अर्काच्या बायोफ्युएलवर २५० प्रवाशांसह मेक्सिको सिटी ते माद्रिद असे अंतरखंडीय दीर्घ पल्ल्याचे विमानोड्डान केले होते. यानंतर सप्टेंबर २०११ पासून कंपनीने मधापासूनच्या बायोफ्युएलवर काम सुरु केले. त्यानंतर मेक्सिको सिटी ते सॅन जोस, कोस्टारिका या हवाईमार्गावरील 'ग्रीन फ्लाईट्स' सुरु केल्या. आणखी एक विकसनशील देश ब्राझीलदेखील या यादीत आहे. ‘फ्लाय लिन्हास’ या ब्राझीलियन एअरलाईन्सला घरघर लागल्यानंतर २००३ मध्ये तिला गाशा गुंडाळावा लागला. १९२७ मध्ये स्थापन झालेल्या 'वरिग' एअरलाईन्सने तिला टेकओव्हर केले आणि तिचे रुपांतर 'गोल' एअरलाईन्समध्ये केले. तिने ३० जुलै २०१४ रोजी 'फारनेसीन' या पुनर्वापर योग्य बायोफ्युएलचा वापर करत फ्लोरिडा ते साओपाव्लो असा विमानप्रवास केला. हे 'फारनेसीन' विविध फळांच्या पल्पपासून मिळवलेले होते. ‘एमिरीस’ या अमेरिकी - ब्राझीलियन कंपनीने हे इंधन विकसित केलेलं आहे. मेक्सिकोच्या विमानोड्डानासाठी बायोफ्युएलचा वापर करणाऱ्या देशांचा एक समूह निर्माण करण्यात आला आहे, त्याचे नाव आहे – ‘सस्टेनेबल फ्युएल युजर्स ग्रुप’(SFYG). २८ देश या समूहाचे सदस्य आहेत आणि पाच मुख्य विमाननिर्मिती कंपन्यांशी यांचे अफेलिएशन आहे. आपल्याकडे या समूहाचे सदस्यत्व नाही.
बायोफ्युएल वापरल्याने हरितगृह वायू उत्सर्जनावर नियंत्रण मिळवून हवेतील वाढते प्रदूषण नष्ट करणे शक्य असले तरी याचेही काही अपपरिणामही समोर आलेत. युएस एअरफोर्सने ११ सप्टेंबर २०१६ रोजी प्रकाशित केलेल्या एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरी मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग डायरेक्टरेटचे तज्ज्ञ हॉली जॉर्डन यांच्या 'व्हॉट्स बगिंग मिलिटरी एअरक्राफ्ट' या लेखात स्पष्ट म्हटलंय की, 'बायोफ्युएल वापरल्याने विमानात घातक जीवाणू आणि बुरशी यांचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर उपाय म्हणून विमानाचे पाश्चरायजेशन करून निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.' या संशोधनानंतर बायोफ्युएलचा वापर अधिक सजगतेने करणे क्रमप्राप्त झाले. इतकी सारी माहिती समोर असूनही आम्हीच पहिले अशा राणा भीमदेवी थाटात स्वतःची पाठ थोपटण्याचा आवेश 'बदकांमुळे पाण्यातील ऑक्सिजन वाढण्याच्या' विधानासारखा बालिश वाटतो. पेड न्यूजवर जगणारी प्रसारमाध्यमे आणि विविध प्रकारची भ्रामक विधाने करणारे राज्यकर्ते जनतेला खुळचट समजतात पण जनता चाणाक्ष आहे.
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा