सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कैफ...



ती एकदोन दिवसात निघून जाणार होती.
कसाबसा तिचा निरोप मिळाला, 'भेटायला ये.'
नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचण्याचा निश्चय करूनही बऱ्याच उशिरा पोहोचलो.
ठरवलेल्या जागी जाईपर्यंत काळजात धाकधूक होत होती.
काय झालं असेल, का बोलवलं असेल, पुढं काय होणार एक ना अनेक प्रश्न.
सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावालगत असलेल्या वनराईत तिने बोलावलेलं.
मला जायला बहुधा खूपच विलंब झालेला.
वाट बघून ती निघून गेली होती...
खूप वेळ थांबलो, पाण्याचा सपसप आवाज कानात साठवत राहिलो,
ती जिथं बसायची तिथं बसून राहिलो,
तिच्या देहाचा चिरपरिचित गंध वाऱ्याने पुरता लुटून नेण्याआधी रोम रोमात साठवत राहिलो.
नारळाच्या झावळ्यातुन येणारे उन्हाचे कवडसे, पाना आडून बघणारे पक्षी निराश होऊन माझ्याकडे पाहत होते.
खूप वेळ तिथं हताश अवस्थेत बसलेलं पाहून एक विमनस्क भिकारीही येऊन गेला,
माझ्या डबडबलेल्या डोळ्याकडे बघताना त्यालाही भरून आलेलं.
बघता बघता आजूबाजूची पानंफुलंही कावरी बावरी झालेली...
बऱ्याच काळाने कळलं की ती वेळ आता निघून गेलीय,
एव्हाना सोनेरी उन्हे तिरपी झाली होती.
तलावातील हिरवं निळं पाणी संथ झालं होतं.
त्यातलं श्याममेघांचं तरल प्रतिबिंब हलकंच पुढं पुढं सरकत होतं.
घरट्याकडं परतणाऱ्या पाखरांची किलबिल वाढत चालली होती.
जड पावलाने मी तिथून माघारी फिरलो...

दुसऱ्या दिवशीही तिथं जाऊन बसलो,
काळजाला तडस लागेपर्यंत तिची प्रतीक्षा केली.
पण काही केल्या ती परत आलीच नाही आणि पुन्हा कधी भेटलीही नाही.
तिचं पुढं काय झालं काही कळालं नाही, साधी खबरबातही लागली नाही.
काळ मात्र आपल्या गतीनं पुढं जात राहिला.

त्या जागी अनेकदा बसून आलो, ते क्षण पुन्हा पुन्हा अनुभवून आलो.
ते श्वास जगण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्यातही कमी पडलो.
नंतर नंतर त्या स्मृतींचा काटा काळजाला दंश करू लागला तसतसं तिथं जाणं टाळू लागलो.
अलीकडच्या काळात तिथं जाणं जवळपास खंडित झालेलं.
काही महिन्यापूर्वी तलावाच्या देखभालीचं काम काढल्याचं वाचनात आलं आणि जीवाचा कापूर झाला.

तिथं नुकतंच जाऊन आलो.
बरंच काही बदललं गेलं होतं, निसर्गाच्या समतोलासाठी ते आवश्यकच होतं.
धकधकत्या काळजाने त्या जागेपाशी पोहोचलो.
सभोवतालच्या परिसराचा नक्षा बदलला होता,
ती जिथं बसून रहायची तिथला कभिन्न कातळ तसाच होता
त्या कातळाच्या मध्यात चक्क कोवळ्या हिरव्या पिवळया तरतरीत अंकुरावर एक आरस्पानी फुल उमललं होतं.
निमिषार्धासाठी मनात विचार आला की, फुल नाही तर निदान एक पान तरी खुडून घ्यावं आणि जुन्या वहीच्या पानात मोरपीसाजवळ ठेवून द्यावं.
पुढच्याच क्षणी विचार बदलला.
त्या फुलाचं हळुवार चुंबन घेण्यासाठी वाकलो आणि थक्क झालो.
तिचाच तो परिमळ होता, जीवाला पिसं लावणारा तोच सुगंधी कैफ !
तिला आता नव्याने पुन्हा पुन्हा अनुभवणं शक्य झालं होतं....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा