शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

तपस्वी कर्मयोगी - भाऊराव पाटील


आपल्या मुलास दरमहा दहा रूपये कोल्हापूर दरबाराची स्कॉलरशिप मिळत असे हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फ्क्त दोन रूपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित आठ रूपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षणसंस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेंव्हा त्यांनी मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात,"तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे." यातून त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडते.

'छत्रपती शिवाजी कॉलेज' हे संस्थेचे पहिले मोफत व निवासी कॉलेज त्यांनी १९४७ मध्ये सातारा येथे सुरू केले. तेंव्हा शिवरायांच्या नावावरून काही मंडळींनी शंका उपस्थित केली होती त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्याविषयी सर्व काही सांगून जातात. ते म्हणाले होते, " प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही.

त्यांनी उभ्या केलेल्या संस्थेवर आजीव सदस्य म्हणून संस्थेस वाहून घेण्याची शपथ घेण्याचा सोहळा महर्षी विठ्ठल रावजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी महर्षी म्हणाले होते की, "देवांनी पुष्पवृष्टी करावी असा हा सोहळा आहे. 'याची देही याची डोळा' हे जे यांना लाभले ते मला लाभले नाही. समाजसेवा अक्रोडाच्या झाडासारखी असते. झाड लावणा-यास फळ खावयास मिळत नाही. यांनी लावलेल्या रोपट्याचा महान वृक्ष झाला. व त्याची फळेही त्यांना चाखता आली."
त्यांनी कराडला काढलेल्या 'सदगुरू गाडगे महाराज कॉलेज'ची अनामत रक्कम भरण्यासाठी पुण्याच्या मंडईतील लोकांनी रू. २५००० /- जमा करून दिले होते इतका लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. 'स्‍वावलंबन शिक्षण हेच आमचे ब्रिद' असे ब्रीदवाक्य त्यांच्या संस्थेचे होते त्या कर्मवीर भाऊराव पाटलांची जीवनगाथा अत्यंत रोमांचकारक तर आहेच पण त्यात नाट्यमय घटना देखील आहेत. काल कर्मवीरांची जयंती होती त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा आपल्या आयुष्याला प्रकाशमय करून जाईल ....

मुळचे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री या आडवळणाच्या गावचे रहिवासी असणारया एका जैनधर्मीय कुटुंबातल्या पायगोंडा आणि गंगुबाई या दांपत्याच्यापोटी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी २२ सप्टेबर १८८७ रोजी एका मुलाचा जन्म झाला, त्यावेळेस त्यांना वाटले सुद्धा नसेल की आपला हा मुलगा ऐतिहासिक असं समाजकार्य करून आपलं नाव अजरामर करेल. त्या मुलाचे नाव भाऊराव ! आपल्या अलौकिक व ऐतिहासिक अशा समाजकार्यामुळे हा मुलगा पुढे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून जनमाणसाच्या हृदयात विराजमान झाला…

कर्मवीरांचे पूर्णनाव भाऊराव पायगौंडा पाटील. कर्मवीरांचे पूर्वज नशीब आजमवण्यासाठी दक्षिण कन्नड मधून महाराष्ट्रात आले. व ऐतवडे बुद्रुक जि.सांगली येथे स्थिरावले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे मुळचे देसाई हे आडनाव जाऊन पाटील हे आडनाव रूढ झाले.


कर्मवीर अण्णांचे लग्न त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्या बरोबर झाले. त्यावेळी त्यांचे वय १२ वर्षांचे होते. त्यांचे माहेरचे नाव आदाक्का असे होते. त्यांचे माहेर कुंभोजचे. तर माहेरचे आडनाव पाटील होते, जे एक प्रतिष्ठित व श्रीमंत घराणे होते. लग्नात त्यांनी आपण होऊन सौ. लक्ष्मीबाई यांना १२० तोळे सोन्याचे दागिने केले होते. हे दागिने पुढे लोकशिक्षण आणि वसतिगृहे यावर खर्ची पडले हे वेगळे सांगायला नको. आपले शिक्षण सोडल्यानंतर कर्मवीर अण्णा कोरेगावला आले कारण त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ.लक्ष्मीबाई या कोरेगावात होत्या. याच काळात कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी मिळणारी घटना घडली. कार्यक्रमानिमित्त घरी पाहुणेमंडळी आली होती. जेवणाचा बेत होता.पाहुणे मंडळी जेवायला बसली. कर्मवीरांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई वाढत होत्या. गप्पा सुरू होत्या. एका पाहुण्याने विचारले, 'आपले चिरंजीव भाऊराव काय काम करतात? भाऊरावांचे वडिल म्हणाले. “ काही काम करत नाही तो एकच काम करतो. दोनवेळ जेवणाचं व गावभर फिरण्यांचं !" बायकोच्या देखत झालेला अपमान भाऊरांवाच्या जिव्हारी लागला. त्यांच्या पत्नीच्रेही डोळे भरून आले. त्या भाऊरावांना वाढत होत्या. त्यांच्या डोळ्यातले थेंब भाऊरावांच्या ताटात पडले. कर्मवीर जेवत्या ताटावरून उठले. मनाचा निश्चय केला . काहीतरी करून दाखवलेच पाहिजे असा मनाचा निर्धार करून तडक कोरेगाव ते सातारा अंतर पायी चालत आले. खिशात पैसा नाही. पूर्वी मुंबईच्या माणिकचंद पानाचंद या जवाहि-याकडे मिळालेले काम आपण सोडून आलो हा मूर्खपणा केला असे त्यांना वाटु लागले.त्यावेळी त्यांना एक कल्पना सुचली. शिकवण्या घेण्याची. त्यांनी संकल्प सोडला. भाऊरावांच्या अंगी एक गुण होता.एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या गोष्टीचा पिच्छा पुरवायचा. मग कितीही कष्ट पडोत. शिकवणी वर्ग सुरू केले. हळूहळू मुले वाढू लागली, बोलता बोलता मासिक उत्पन्न ९०-९५ रूपयांपर्यंत गेले. पुढे उभयता दोघेही सातारयाला आले.

अगदी संस्कृतच्या देखील शिकवण्या त्यांनी घेतल्या आणि त्यात त्यांच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू लागले, अण्णांकडे जिद्द व चिकाटी असल्यामुळे हे शक्य झाले. त्याकाळी मुलांना शिक्षणासाठी दूरगावी जावे लागे. मुलांची रहण्याची सोय व्हावी म्हणून कर्मवीर अण्णा, मदृवाण्णा मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर इ. मंडळीनी १९१० साली ‘ दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे वसतीगृह पेठ नेर्ले या गावी सुरू करण्यात आले. दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हेच रयत शिक्षण संस्थेचे मूळ रोपटे होय.

१४ फेब्रुवारी, १९१४ च्या रात्री कोल्हापुरात सातवा एडवर्ड व व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासले गेले. वसतीगृहातील मुलांना फूस लावून, कर्मवीरांची वसतीगृहातून हकालपट्टी करणारे, वसतीगृह प्रमुख लठ्ठे यांनी हे कृत्य केले असा बनाव करण्यात आला. कर्मवीरांनी विरूध्द साक्ष द्यावी म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. कर्मवीरांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले. ‘ एक वेळ मरण पत्करेन, पण खोटी साक्ष देणार नाही. ’ असे कर्मवीरांनी सांगितले. शेवटी त्यांची निर्दोष सुटका झाली व ते विट्याला गेले.त्यानंतर कर्मवीरांनी ओगले ग्लास वर्क्समध्ये काम सुरू केले. पुढे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी नांगराचा कारखाना काढला. त्या कारखान्यात ते प्रचारक म्हणून काम करू लागले. यामुळे फिरती सुरू झाली. कर्मवीरांनी महाराष्ट्र पायाखाली घातला. लोकांचे दारिद्र्य डोळ्यांनी पाहिले. अज्ञान हे दारिद्र्याचे मूळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकांना सज्ञान केले पाहिजे याची जाणीव झाली. दरम्यानच्या काळात कर्मवीरांनी कूपर कारखान्यात नोकरी सुरू केली. कामावर रूजू होताना कूपरने निव्वळ नफ्याच्या १० टक्के भाग कर्मवीरांच्या बोर्डिंग विकासासाठी देण्याचे वचन दिले होते. ते कूपरने न पाळल्यामुळे कूपरशी भांडण करून त्यांनी ती नोकरी सोडली व पूर्णवेळ शैक्षणिक कार्याला वाहून घेतले.

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला आदर्श मानून आपले जीवन व्यतीत करणारया भाऊरावांवर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारांचाही खूप प्रभाव होता. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे कामही कर्मवीरांनी पुढे चालू ठेवले होते. ४ ऑक्टोंबर, १९१९ रोजी (विजयादशमी) काले, जि. सातारा येथे सत्यशोधक समाजाची मोठी परिषद भरली होती. या परिषदेत कर्मवीरांनी ‘ रयत शिक्षण संस्था ’ स्थापण्याची घोषणा केली. त्यासाठी वसतिगृह सुरू केले. १९०८ साली कर्मवीर अण्णा ‘मिस क्लार्क होस्टेलच्या ’ नामकरणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. अस्पृश्यांसाठी हे वसतिगृह राजर्षी शाहू महाराजानी सुरू केले होते. तेथे सर्व जातीधर्मातील लोक उपस्थित होते.कार्यक्रम संपल्यानंतर कर्मवीर वसतिगृहात आले. वसतिगृह प्रमुखांनी त्यांना आंघोळ करून वसतिगृहात येण्याची ताकीद दिली..अर्थात ते कर्मवीरांनी ते जुमानले नाही. “ मी सकाळी आंघोळ केली आहे. व पुन्हा आंघोळ करणार नाही दलितही माणसे आहेत, घरात कुत्री, मांजरे आलेली चालतात. आणि माणसांचा विटाळ कसा होतो ? आंघोळ केल्यावर विटाळ कसा काय जातो ? ” अशा बे शिस्त वर्तनाबद्दल कर्मवीरांना बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले. आपली मते ते ठामपणे मांडत आणि त्यावर ते निश्चयपुर्वक अंमल करत असत. याचे मुळ त्यांच्या बालपणात आहे. अगदी किशोरवयातच त्यांचा स्वभाव बंडखोर असा होता. कर्मवीरांच्या बालपणी कुंभोज भागात ‘ सत्याप्पाचे बंड ’ हे प्रकरण खूप गाजले. कुंपणाच्या काट्या तोडणा-या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले. सत्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला, रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले व तो फरारी झाला. तो कर्मवीर अण्णांच्या आजोबांच्या ऊसाच्या फडात लपून बसे. छोट्या भाऊरावांना तो अंगाखांद्यावर खेळवी. पराक्रमाच्या गोष्टी सांगत असे. बंडखोरी, सत्यनिष्ठा, अन्यायाविरूध्द चीड हे सदगुण सत्याप्पाकडून भाऊरावांना मिळाले.त्यामुळेच अन्याय झाल्यास त्यांना संताप येत असे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले. त्यानंतर विद्यालयीन शिक्षण राजाराम हायस्कूल- कोल्हापूर येथे झाले. ते जैन बोर्डिंगमध्ये राहात होते. त्याकाळात ते शाहू महाराजांच्या कार्याने आणि विचारांनी भारावून गेले होते.

रयत शिक्षण संस्था स्थापण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे, मागासवर्गीयांना विनाशुल्क शिक्षणाच्या संधी निर्माण करणे, सर्व जाती-धर्मांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून सामाजिक सुधारणांसाठी जुन्या कालबाह्य प्रथा, रूढी- परंपरा, चालीरीती बंद करणे. एकत्र काम करण्यावर भर देऊन विद्यार्थ्यांना चांगले वळण लावताना संस्कार देणे. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्व पटवताना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे करत असताना शैक्षणिक शाखांचे विशाल विस्तारीकरण करून अनेकांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे मोठे कार्य कर्मवीरांनी एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे पार पाडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक पटलावर त्यांचा जो अद्भुत ठसा उमटला तो आजही अबाधित आहे.

या सर्व कार्यात त्यांना पत्नी लक्ष्मीबाई यांची अगदी मोलाची साथ लाभली. त्या अगदी खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी राहिल्या, त्यांची सुखदुःखे त्यांनी आपली मानली. त्यांचा स्वभावदेखील कर्मवीरांसारखाच होता याची प्रचीती देणारी एक घटना सांगावीशी वाटते. एकदा निवासी वसतीगृहातील एक मुलगा आजारी पडला होता. कर्मवीर बाहेरगावी होते. सौ. वहिनी त्या मुलाची देखभाल करीत होत्या. अशा वेळी सौ.वहिनीच्या घरून तार आली, “ आई फार आजारी आहे ; लवकर निघून यावे,” सौ. वहिनींनी उलट तार केली. “ वसतीगृहातील माझा मुलगा फार आजारी आहे. भाऊराव बाहेरगावी गेले आहेत. ते आले की मी येईन.” कर्मवीर आल्यानंतर सौ. वहिनी आईस भेटावयास गेल्या. आपल्या कार्यालाच आपलं कुटुंब मानण्याचा त्यांचा हा दुर्मिळ वत्सलभाव त्यांच्या कर्तुत्वास बहर आणण्यास खूप उपयुक्त ठरला. वसतीगृहातल्या मुलांवर भाउरावांची मायेची पाखर असे. भाऊराव वसतीगृहात राहत असत. मुलांचे जेवण व्यवस्थित होते की नाही, मुले अभ्यास करतात की नाहीत, पहाटे उठतात की नाहीत हे जातीने पाहत असत. कर्मवीर मध्य रात्री उठत. हातामध्ये कंदील घेऊन झोपलेल्या मुलांमधून हिंडत. त्यांच्या अंगावरील पांघरून बाजूला पडलेले आहे त्यांच्या अंगावर पांघरून घालीत. काही मुले अंथरूणाखाली जात. त्यांना अंथरूणावर घेत. दिवा तसाच ठेवून अभ्यास करता करता झोपी गेलेल्या मुलांच्या उशाचा दिवा विझवून बाजूला ठेवीत. एके दिवशी एक मुलगा असाच उघडा पडला होता. त्याची उलघाल झालेली कर्मवीरांनी पाहिली. त्याच्या अंगात ताप भरलेला होता. कर्मवीरांनी त्याला आपल्या अंथरूणात घेतले. त्याला पांघरून घातले. वसतीगृहातील काही मुलांना आई नव्हती. काहींना वडील नव्हते. सौ. वहिनी व अण्णांनी त्यांना आईवडीलांची उणीव कधीच भासू दिली नाही.

भाऊरावांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थी घडवताना इतर शिक्षणावर भर दिला. सर्वांगीण विद्यार्थी घडवून त्यांच्या श्रमाचे चीज व्हावे यासाठी ते जन्मभर झगडले. शिक्षण संस्था आणि वसतिगृहे चालवताना अनंत अडचणी आल्या; परंतु त्यातून मार्ग काढत ते पुढे गेले. दिनांक २५ फेब्रुवारी १९२७ रोजी सातारा येथील वसतिगृहाचे "छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे नामकरण महात्मा गांधींच्या च्या हस्ते झाले. कर्मवीरांच्या अद्वितीय कामावर प्रसन्न होऊन गांधीजींनी दरवर्षी ५०० रु.ची देणगी हरिजन सेवक फंडातून देण्यास सुरवात केली. १६ जून १९३५ मध्ये रयत शिक्षण संस्थेची अधिकृतपणे त्यांनी नोंदणी केली. त्याच वर्षी त्यांनी सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सातारा येथे सुरू केले. त्यानंतर महाराजा सयाजीराव हायस्कूलची सातारा येथे सुरवात केली. हे हायस्कूल विनाशुल्क पद्धतीचे आणि कमवा व शिका या योजनेवर आधारित होते. त्यानंतर १९४७ मध्ये त्यांनी अशा प्रकारची अनेक हायस्कूल सुरू केली आणि शिक्षणाची कवाडे ग्रामीण महाराष्ट्रात उघडली गेली. सन १९५४ मध्ये त्यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केले. त्यानंतर लगेचच कऱ्हाड येथे संत गाडगेबाबा कॉलेज सुरू केले. सन १९५५ मध्ये चांगले शिक्षक घडवण्याच्या उद्देशाने, मौलाना आझाद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. त्यांचा प्रमुख उद्देश शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा होता.

सामाजिक कार्य करताना त्यांच्या मनावर महात्मा फुलेंचा जबरदस्त प्रभाव होता. भाऊराव पाटील यांनी सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी ३८ वसतिगृहे असलेल्या शाळा आणि हायस्कूल सुरू केली, तसेच ५७८ शाळा, सहा ट्रेनिंग कॉलेज, १०८ हायस्कूल आणि तीन महाविद्यालये सुरू केली. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना "कर्मवीर' ही पदवी दिली. कृतिशील राजा असाच त्याचा अर्थ आहे. रयत शिक्षण संस्था ही तिच्या बोधचिन्हांसारखीच आपली पाळेमुळे खोलवर असणारया एखाद्या विस्तीर्ण वटवृक्षासम सकळ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर आपली विशाल छत्रछाया देऊन आजही नम्रतेने उभी आहे सन १९५९ मध्ये कर्मवीर भाऊरावांना पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले. त्याचवर्षी भारत सरकारने पद्‌मभूषण देऊन त्यांना सन्मानित केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले. कर्मवीर भाऊराव पाटील ९ मे १९५९ रोजी स्वर्गवासी झाले. ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दीपस्तंभासारखे जीवन जनतेच्या सदैव स्मरणात राहील. नवीन पिढीला त्यांच्या संघर्षमय जीवनाची आणि कर्तुत्वाची माहिती असणे दिशादर्शक ठरू शकते. जयंतीदिनाच्या औचित्याने कर्मवीर भाऊरावांना शतशः नमन....

- समीर गायकवाड

sameerbapu@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा