जगभरात मागील काही दिवसांत कोलाहलाच्या, विद्वेषाच्या आणि आपत्तींच्या अप्रिय घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येताहेत त्यामुळे वातावरणास एक नैराश्याची झालर प्राप्त झालीय. या गदारोळात भिन्न परिप्रेक्ष्यातल्या दोन वेगवेगळ्या वृत्तांनी हे मळभ काहीसे दूर होईल. यातली एक घटना वाचनचळवळीच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे जी स्थलसापेक्ष नाही, ती एकाच वेळी जगाच्या पूर्वेस आणि पश्चिमेसही घडलीय. तर दुसरी घटना आशियाई देशातल्या विरंगुळयाच्या बदलत्या व्याख्यांशी संदर्भित आहे. या दोन्ही घटना म्हणजे गेल्या काही वर्षातील आधुनिक मानवी जीवनशैलीच्या अतिरेकी डिजिटलवर्तनाचा परिपाक असणाऱ्या कालानुगतिक प्रक्रिया आहेत, ज्याचा दृश्य परिणाम आता दिसून येतोय. त्याचा हा आढावा.
१२ सप्टेंबर २०१८ च्या 'इकॉनॉमिस्ट'मध्ये 'ऍलिस इन इन्स्टाग्राम' हा लेख प्रकाशित झालाय. जपानसह काही आशियाई देशांत आणि अमेरिकेत स्मार्टफोनच्या माध्यमातून होऊ घातलेल्या पुस्तकवाचन चळवळीच्या बदलत्या डिजिटल स्वरूपावर त्यात प्रकाश टाकलाय. विख्यात इंग्लिश साहित्यिक चार्ल्सडॉसन यांनी लिहिलेली 'ऍलिस'स ऍडव्हेंचर इन वंडरलँड' ही जगप्रसिद्ध कादंबरी १९६५ साली प्रकाशित झाली होती. तब्बल दीडशतक तिचे गारुड टिकून राहिले. त्यावर सरस चित्रपट निर्मिले गेले. मालिका निघाल्या, कार्टून सिरीज काढल्या गेल्या. लोकांनी यास अफाट प्रतिसाद दिला. मात्र मूळ पुस्तक फारसेकुणी वाचेनासे झाले ही वस्तूस्थिती होती. पण केवळ खंत व्यक्त करण्यापलीकडे कुणी काहीच करू शकत नव्हतं. लोकांसमोर उपलब्ध असलेल्या माहिती आणि संपर्क माध्यमातल्या अद्भुत क्रांतिकारक बदलापुढे सगळे हतबल झाले होते. त्यातही सर्वात परिणामकारक घटक ठरला सोशल मीडियाचा अतिवापर.
सोशल मिडियाच्या प्रसारपूर्व काळात विसाव्या शतकात मुद्रित स्वरूपातील माध्यमांचा पगडा होता. तत्पूर्वीच्या काळात केवळ मुद्रित साहित्याचा जगभरातील सकल चळवळीवर प्रखर प्रभाव होता. साहित्य, वर्तमानपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि इंटरनेट अशा क्रमाने माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलतगेले. स्मार्टफोनच्या क्रांतीनंतर यात अमुलाग्र परिवर्तन झाले. आजकाल सोशल मिडियाचा सगळीकडे बोलबाला झालाय. याचा सर्वात जास्त परिणाम वाचन चळवळीवर झाला, परिणामी मुद्रित साहित्य वाचनाची टक्केवारी वेगाने घसरू लागली. लोक तासंतास सोशल मिडीयावर रेंगाळू लागले. वर्तमानपत्रांनी,नियतकालिकांनी छापील आवृत्तीला फटका बसू लागल्याबरोबर सावध होत पुढच्या हाकांचा कानोसा घेतल वेब साईट्स सुरु केल्या. त्यामुळे त्यांना बसलेल्या फटक्याची झळ कमी झाली. पण कथा, कादंबऱ्यासह लेखनाच्या अन्य प्रकारांच्या छापील प्रारुपास पिछेहाट सोसावी लागली. लोकसंख्येच्या वाढत्याप्रमाणात ही घटती टक्केवारी लक्षणीय होती. जगभरातील विचारवंत आणि साहित्यिक याबद्दल जाहीर स्वरूपात आपली तळमळ व्यक्त करू लागले. लेखक आणि प्रकाशक मंडळी दोहोंसाठी हा गहन चिंतेचा काळ होता.
मात्र आता एकाच वेळी पूर्वेकडून आणि पश्चिमेकडूनही एक आनंदवार्ता आलीय, ती वाचन लेखन चळवळीच्या सर्व घटकांना उत्फुल्लित करणारी आहे. 'इकॉनॉमिस्ट'मधल्या लेखानुसार जपानच्या छापील प्रकाशन माध्यमांच्या आकडेवारीनुसार १९९६ मध्ये मुद्रित साहित्याची विक्री शिगेला पोहोचली होती. १९९७पासून अनेक आशियाई देशांत आर्थिक पडझडीचे सत्र सुरु झाले आणि या क्षेत्राला त्याचा जबर फटका बसला. सन २००० पासून अर्थकारण रुळावर येऊ लागले. जवळपास सर्व व्यवसाय मूळच्या उलाढालीपेक्षा पुढे गेले पण मुद्रित साहित्याकडे लोकांनी पाठ फिरवलेली काही केल्या मूळ वळणावर येत नव्हती. यास्थितीला 'मोजी बॅनॅरे' (अक्षर विश्वाचे उड्डाण) ही जपानी संज्ञा बहाल केली गेली. सन २००० पासून घडत गेलेल्या भौतिक बदलातून आता असे आढळलेय की वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणावर पुन्हा सक्रीय होतेय, त्यातही तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. स्मार्टफोन्सच्या माध्यमातून विरंगुळयाच्या स्वरूपातवाचन करणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागलीय. 'केटाई शाऊसेत्सू'ला (डिजिटल स्वरुपात वाचल्या जाणाऱ्या कादंबऱ्या, ‘मोबाईल नॉव्हल्स’करिताचा जपानी शब्द) यातून मोठं बळ मिळालं.
अगदी डिजिटल टेक्नोसॅव्ही व्यक्तीसच ही पुस्तके वाचता येतील असं यांचं स्वरूप नव्हतं. यात शंभरेक शब्दांची छोटी छोटी प्रकरणे ठराविक काळात मोबाईलवर पाठवली जाऊ लागली. शृंखला स्वरूपात त्यांचं प्रकटन होऊ लागलं. एकाच वेळी शेकडो पानांचा मजकूर देण्याचं इथं टाळलं गेलं. त्यामुळे काहीमिनिटाच्या फ्री टाईममध्ये या मजकुराचं वाचन करून लोक पुन्हा आपल्या दिनचर्येत गुंतू लागले. रेल्वे स्थानकावरील प्रतिक्षेची घटिका असो की कार्यालयीन अवकाशाची वेळ असो, लोक फावल्या वेळात पुन्हा पुन्हा डिजिटल वाचनाकडे वळू लागले. जगभरातल्या अस्थिरतेतील सातत्याने मानवी जीवनातीलआनंदाचा स्थायीभाव असणारा विरंगुळा जणू लोप पावत चालला होता त्याला पुन्हा संजीवनी देण्याचं काम त्याच डिजिटल साधनांनी दिले आहे ज्यांनी त्याची हानी केली होती. एके काळी ज्यांनी छापील साहित्याकडे पाठ फिरवत केवळ स्मार्टफोनवरील माहितीप्रवण लेखन वाचण्याकडे कल ठेवला होता त्यांनीआता आपला कल बदलत त्याच मुद्रित साहित्याच्या डिजिटल रुपास प्रथम पसंती दिलीय. यामुळे आजघडीला जपानच्या प्रत्येक पाच पैकी चार बेस्ट सेलर कादंबऱ्यांची लोकप्रियता मोबाईल फोन्सवरूनच आकारास येतेय.
अशीच प्रक्रिया अमेरिकेतही होते आहे. मागच्याच महिन्यात न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीने (NYPL) त्यांच्या संग्रहातील क्लासिक कादंबऱ्यांचे नवे डिजिटल स्वरूप जनतेपुढे आणण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासाठी त्यांनी इंस्टाग्राम या फोटोशेअरिंग मोबाईल ऍपकरिता काम करणाऱ्या 'मदर' या क्रिएटिव्हजाहिरात एजन्सीशी त्यांनी करार केला आहे. याला त्यांनी 'इन्स्टानॉव्हल' असं संबोधलंय. यात सादर होणाऱ्या कादंबऱ्या दैनिक स्लाईडशोच्या स्वरुपात समोर येतील, ज्यात इमेजेस आणि व्हिडीओज सामील असतील. याची सुरुवात 'ऍलिस इन वंडरलँड'ने झाली आहे, लोकांनी याला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्वअसल्याचे NYPLने म्हटलेय. पुढच्या क्रमात शार्लोट गिलमन यांची 'द येलो वॉलपेपर' आणि फ्रॅंझ काफ्काचे 'द मेटामॉर्फोसिस' सामील आहे. कालांतराने प्रत्येक अमेरिकन इंस्टाग्राम युजर ही पुस्तके वाचेल असा NYPLला विश्वास आहे.
२०१५ मध्ये केलेल्या एका पाहणी अहवालानुसार केवळ ४३ % प्रौढ अमेरिकन्स वर्षातून मुद्रित स्वरूपातील किमान एक साहित्यकृती वाचत होते, १९८२ पासूनचे वाचन निर्देशांक पाहू जाता हे सर्वात निम्नप्रमाण होते. त्याचदरम्यान सोशल मीडियातील फेसबुकची सर्वाधिक लोकप्रियतेची सद्दी संपुष्टात आणतानाइंस्टाग्रामचे वापरकर्ते वाढत होते. यात १८ ते २४ वयोगटाच्या नव्या पिढीचा वाटा मोठा आहे. आजघडीला दरमहा एक दशलक्ष वापरकर्त्यांची त्यात भर पडतेय. याचा नेमका फायदा उचलत इंस्टाग्रामच्या फोटो व्हिडीओ फिचरचा वापर करत त्याद्वारे कादंबऱ्या सादर करण्याची ही कल्पना अफाट यशस्वी ठरतेय.याच मार्गाने जात अर्ड (URD) ह्या फिक्शनऍप बरोबरच 'स्टोरी टूरिस्ट'या ऍपनेदेखील अशा स्वरुपात साहित्यकृती समोर आणण्याचा आपला इरादा जाहीर केलाय. शेरलॉक होम्सच्या कथांपासून त्यांनी सुरुवात केलीयसुद्धा ! सेल्फीसह अन्य फोटोविश्वाच्या प्रेमात पडलेल्या इंस्टाग्राम युजर्सनी हा विरंगुळाडोक्यावर घेतला आहे. कथेच्या मजकूर स्वरूपासोबत चित्रे आणि चित्रफिती यांनी त्यांना भुरळ पाडलीय.
दुसऱ्या घटनेच्या रूपाने कोरियन स्ट्रेसकॅफेचा बोलबाला जगासमोर आलाय. या महिन्याच्या 'द अटलांटीक'ने याची दखल घेतलीय. अशा दहा लाख कॅफेचे उद्दिष्ट वर्षात साध्य होईल असं त्यात म्हटलंय. आपल्या आवडीची जुनी गाणी, जुन्या साहित्यकृती, जुने रेडीओ प्रोग्राम्स, चित्रे सर्व काही आपल्या पुढ्यातयेतं आणि आपण एका आराम खुर्चीत रेलून याचा आनंद घ्यायचा ; आणखी आराम हवा असल्यास स्पाची सोय असते. जुन्या आठवणींना उजाळा हवा असल्यास टॉकींग जॉकीशी जोडता येतं. हवी तशी प्रकाश रचना करता येते, हव्या त्या वातावरणाचा फील घेता येतो. घराबाहेर असूनही घरासारखं अनुभवतायेतं आणि पर्यटन न करताही त्याचा आनंद घेता येतो. मनावरील ताण हलका होण्यासाठी हे उपयुक्त आहे. या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे हे स्ट्रेसकॅफे वेगाने लोकप्रिय होताहेत.
आपल्या बौद्धिक प्रगतीचा हवाला देताना सिलिकॉन व्हॅलीस्थित भारतीय संगणकतज्ज्ञांचा हवाला नेहमीच दिला जातो. त्यांना या गोष्टी ठाऊक नसतील असं म्हणणं धाडसाचं ठरेल. कदाचित या प्रांतात काही करावं अशी त्यांची इच्छाशक्ती असेल नसेलही. असं काही आपल्याकडे घडल्यास काळाच्या पडद्याआडगेलेल्या साहित्यकृती आणि चांगलं लेखन असूनही लोकांचा प्रतिसाद मिळत नसलेल्या नवसाहित्यकांच्या रचनांना एक नवं आकाश उपलब्ध होईल हे नक्की !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा