शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

अलिकडील काळात हेच त्यांचं आयुष्य झालेलं आहे. आता त्यांनी आयुष्यालाच प्रेमाचं रूप दिलंय. प्रेम करण्यासाठी देहरुपाचीच निकड असते असं काही नाही, आपलं प्रेम पराकोटीचं दृढ असेल तर ईश्वराचा देखील विसर पडतो आणि आयुष्यच प्रेम होऊन जातं, मग कुठलंच संकट उरत नाही... 'हर इक मोड पर हम ग़मों को सज़ा दें' चा अर्थ इतका भावपूर्ण आहे ! कितीही संकटं आली तरी जगणं सुंदर करता येतं, फक्त तशी इच्छाशक्ती असावी लागते.
आपल्याला एखाद्या माणसाची प्रसिद्धी दिसते, कीर्ती दिसते, नावलौकिक आणि संपत्ती दिसते मात्र त्या आडचे अपार दुःख दिसत नाही. अशाच धगधगत्या दुःखात होरपळलेले दांपत्य म्हणजे जगजीत आणि चित्रासिंग. त्यांच्या वाट्याला आलेली दुःखे कुणाच्याही वाट्याला न येवोत....

जगमोहन सिंग धिमन उर्फ जगजीतसिंग यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ सालचा. तत्कालीन बिकानेर राज्यातील (आताचे राजस्थान) श्रीगंगानगरचा त्यांचा जन्म. भारतीय गझल गायकीत आपल्या अद्भुत आवाजाची छाप पाडली होती. प्रेमाने लोक त्यांना गझलसम्राट म्हणत. त्यांच्या दर्दभऱ्या गायकीचा दिवाना नाही असा संगीत रसिक विरळाच म्हणावा लागेल. बालपणी शीख धर्मगुरूंची वचने गाणाऱ्या लहानग्या जगमोहनच्या आवाजातला गोडवा त्याच्या वडीलांनी अचूक ताडला आणि त्याला शास्त्रीय गायनाचं शिक्षण देण्याचं ठरवलं. त्याच्या गोड आवाजाने भारावलेल्या एका जत्थेदाराने 'त्याचं नाव जगजीत ठेवा' असं त्याच्या वडीलांना सांगितलं. तेंव्हापासून ते जगजीत सिंग याच नावाने ओळखले जातात आणि नावाप्रमाणेच आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर त्यांनी जग जिंकून दाखवलं. पाच दशकांची संगीत सेवा संपन्न झाल्यावर वयाच्या सत्तराव्या वर्षी १० ऑक्टोबर २०११ रोजी जगजीत सिंग निवर्तले. जगभरात त्यांचे चाहते पसरले आहेत ज्यांनी आजही त्यांना आपल्या हृदयात अढळस्थान दिलेलं आहे. जगजीतसिंग यांची गझल गायकी आणि त्यांची अद्भुत शैली, श्रोत्यांवर गारुड करणारा तरल अल्वार आवाज यावर अनेकांनी लिहिलं आहे. त्यांच्यातल्या अद्भुत प्रतिभेस अनेकांनी कुर्निसात केला आहे. त्यांच्या गझला आजही मोठ्या तन्मयतेने ऐकल्या जातात. आयुष्यभरात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनमोल गायकीने त्यांना अफाट प्रसिद्धी दिली, नावलौकीक दिला, समृद्धी दिली, यश दिलं आणि संपत्तीही दिली मात्र त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदाची पखरण करताना नियतीने हात आखडता घेतला.

आताच्या बांगलादेशात जन्मलेल्या चित्रासिंग या आधीच्या चित्रा दत्ता होत. देबो प्रसाद दत्ता हे त्यांचे पहिले पती. १९५७ च्या आसपास त्यांचा विवाह झाला. १९५९ मध्ये या दांपत्यास एक कन्यारत्न झाले. मोठ्या हौसेने त्यांनी तिचे नामकरण केले. मोनिका तिचे नाव. या नंतरच्या वर्षात त्यांची ट्युनिंग बिघडू लागली, दांपत्य जीवनाची वीण उसवू लागली. १९६८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आर्थिक तंगीसोबतच वैयक्तिक आवडी निवडी यांच्यामुळे हे मतभेद वाढत गेले होते त्याची परिणती विभक्त होण्यात झाली. 'बियॉन्ड टाईम - द एजलेस म्युझिक ऑफ जगजित सिंग' या फोटोबायोग्राफीत एका प्रसंगात चित्रा सिंग यांनी एक अत्यंत भावुक क्षण नोंदवलाय. त्या लिहितात, "मोनिका वीस दिवसाची तान्ही पोर होती. तिला पाळण्यात घालून अंगाई गीत गाण्याऐवजी मी माईक हाती धरून तयार होते, त्या दिवशी गायलं नसतं तर तिच्या माझ्या पोटापाण्याचा प्रश्न होता. पैशासाठी मला हे करावं लागलं माफ कर पोरी !" किती कळवळून गेला असेल ना त्यांचा जीव ! विभक्त झाल्यानंतर आपल्या हिंमतीवर त्यांनी मुलीस सांभाळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांची ओळख जगजीतजींशी झाली.दोघांना एकमेकाचा स्वभाव आवडला, आवडी निवडी तर सारख्याच होत्या पण विचारही आवडले. जगजीत सिंग भले माणूस होते. त्यांनी देबो प्रसाद दत्ता यांची भेट घेऊन आपली मनीषा त्यांच्या कानावर घालण्याचे ठरवले. आणि ते त्यांना भेटले देखील. 'मी तुमच्या एक्स वाईफसोबत लग्न करू इच्छितो' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याही आधी त्यांनी चित्रा सिंग यांचा होकार मिळवला होता. १९६९ मध्ये त्यांनी विवाह केला. या वेळी चित्रांच्या मुलीचे म्हणजे मोनिकाचे वय दहा वर्षांचे होते म्हणजे तिला बऱ्यापैकी समज आलेली होती. जगजीतजींनी तिला मुलीचे प्रेम दिले आणि आपलंसं केलं.

जगजीत सिंग मुंबईत शिफ्ट झाले ते साल असावे १९६५चे. गाण्याचे कार्यक्रमही वाढत होते आणि सातत्याने रेकॉर्डिंगला मुंबईला यावे लागत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे त्यांच्या आयुष्याला आणखी एक कलाटणी मिळाली, त्यांना लाईफ पार्टनर मिळाला. एका जाहिरातीच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने जगजीत आणि चित्रा जेंव्हा पहिल्यांदा भेटले होते तेंव्हा चित्रांनी जगजीत सिंगांच्यासोबत गाण्यास नकर देत कमेंट केली होती की जगजीतजींचा आवाज खूपच हेवी आहे आणि उभयतांचे आवाज मॅच ही होत नाहीत व कॉम्बिनेशन नीट होत नाही. पण चित्रांचा अंदाज चुकीचा होता हे नियतीने दाखवून दिले. या दोघांनी जेंव्हा एकत्रित गायला सुरुवात केली तेंव्हा रसिकांनी या ड्युओला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. यांचे अनेक अल्बम हिट झाले. त्यातल्या अनेक रचना आजही मोठ्या प्रमाणात ऐकल्या जातात. या दांपत्याचं वैवाहिक जीवन आणि सांगीतिक जीवन अगदी सुखैनैव चालू होते. सगळं सुरळीत होतं. १९७१ मध्ये त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. विवेक सिंग ! त्याच्या बाललीला पाहत आणि त्याच्यावर कोणतंही दडपण न आणता त्यांनी आपली सुरेल सफर जारी ठेवली होती. मात्र नियतीला हे सुख पाहवले नसावे.

१९९१ मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सडक अपघातात विवेकचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. जगजीत आणि चित्रा साठी हा मोठा धक्का होता. या दांपत्यास हे एकच अपत्य होते, नियतीने ते ही हिरावून नेल्याने ते इतके खचले की एक वर्षभर त्यांनी गायन बंद केले. हळूहळू काळाने त्यांच्या जखमेवर फुंकर घातली आणि काही कालावधीनंतर जगजीत सिंग पुन्हा मैफलींची शान वाढवताना दिसू लागले. जगजीत सिंगांना हे शक्य झाले कारण संगीत हा त्यांचा आत्मा होता. मात्र चित्रा सिंग यांना मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का पचवता आला नाही. त्यांनी आपला तरुण मुलगा गेल्यापासून कधीच गायन केलं नाही. जणू काही त्यांचा आवाजच हरपला ! जगजीत विवेकला लाडाने बब्बू म्हणत. विवेकचा जन्म झाल्यावर त्यांचे विचार काहीसे असे होते - “That was the height of happiness. We were not well-off then, but I felt as if I was the richest man in the world.” लाडका बब्बू गेल्यावर मात्र ते स्वतःबद्दल लिहितात - “I was a broken man.. ”

या काळात जगजीत आणि चित्रा यांच्यातलं नातं अत्यंत हळवं राहिलं. ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत चित्रांनी याचा अल्वार उल्लेख केला आहे. त्या म्हणतात विवेक झाला तेंव्हा मी त्याला सांगायचे की, 'जाओ पापा का बुलाओ... ' मग चिमुरडा विवेक दुडूदुडू धावत जाऊन आपल्या वडिलांना आईचा निरोप द्यायचा, मग ते बाप लेक चित्रांच्या समोर हजर होत. पण विवेक गेल्यानंतर जगजीत हेच चित्रांचे अपत्य झाले, त्यांच्यातले नाते इथे मायलेका सारखे झाले होते. ते चित्रांना अनेकदा मम्मी पुकारायचे. परस्परांना समजून घेण्याचं सत्व या दोघांत किती खोलवर रुजलं होतं याचं हे अप्रतिम उदाहरण ठरावं. चित्रा स्थिर झाल्या पण सावरू शकल्या नाहीत कारण नियती त्यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत होती.

हा धक्का मोनिकाचा होता. मोनिका एक साजिरी गोजिरी तरुणी होती. जगजीतनी तिच्यात आणि विवेकमध्ये कधीही अंतर राखले नाही. दोघांना सारखंच प्रेम दिलं. मोनिकाला आपल्या जन्मदात्या पित्याचं कधीच अप्रूप वाटलं नाही की कधी त्याच्याबद्दल मायाही दाटून आली नाही, पण जगजीत सिंगांबद्दल बोलताना मात्र तिचं प्रेम उतू जाई. वर उल्लेख केलेल्या बायोग्राफीत एक प्रकरण तिचेही आहे यात तिने खुलून कौतुक केलं आहे. आपल्या आईवर तिचा अपार जीव होता. वरकरणी आनंदी, अवखळ असणारी मोनिका खूपच संवेदनशील आणि विचारी होती. याच कारणामुळे आयुष्याचा जोडीदार शोधायला तिला थोडा वेळ लागला. १९८८ साली वयाच्या २९ व्या वर्षी तिने व्यवसायाने सिनेमॅटोग्राफर असणाऱ्या जहांगीर चौधरीशी निकाह केला. १९९१ मध्ये त्याच्यापासून तिला मुलगा झाला, अरमान त्याचं नाव !. याच वर्षी बब्बूच्या निधनाने कोसळून गेलेल्या जगजीत - चित्रा दांपत्यास आजोबा आजी झाल्याचं सुख काही नीट अनुभवता आले नाही. चार वर्षांनी मोनिकाला उमर हा दुसरा मुलगा झाला, दरम्यान तिच्या पतीचं कामकाज थंडं पडत गेलं, त्यांच्यात मतभेद वाढत गेले.

पुत्रवियोगाने शोकाकुल झालेल्या आपल्या आई वडिलांना आपल्यामुळे आणखी दुःख द्यायला नको या हेतूने तिने तरीही हे नातं बळेच ओढत नेलं. पण एक वेळ अशी आली की त्याच्यासोबत आणखी निभावून नेणं अशक्य झालं. अखेर तिने त्याच्यापासून तलाक घेतला. २००५ मध्ये हे दोघे विभक्त झाले. दोन मुलं घेऊन तिने नव्याने डाव मांडण्याची तयारी सुरु केली, पण इथे ती आणखीनच फसली. २००५ मध्येच तिने विक्रोळी स्थित ब्रिटिश उद्योजक मार्क ह्युटन रॉजर अटकिन्स यांच्याशी विवाह केला. पण तिच्या नशिबाचे फासे उलटे पडले होते. या माणसाने तिला पराकोटीचा त्रास दिला. २००७ मध्ये तिला पोलीस चौकी गाठावी लागली. आपल्या पतीने केलेल्या छळवादाची रीतसर तक्रार तिने पोलिसात दिली. पोलिसी कारवाईचा वेळकाढूपणा तिच्या नवरयाच्या पथ्यावर पडला. २००८ च्या प्रारंभास तो देश सोडून परागंदा झाला.

मोनिका अंधाराच्या खाईत लोटली गेली. जहांगीरसोबतच्या लग्नाआधी मॉडेलिंग करणाऱ्या मोनिकाचे विचार स्वावलंबी होते पण आता आपलं ओझं आपल्या आईवडिलांवर पडणार या विचाराने तिला ग्रासलं. ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यातच तिने अविवेकी निर्णय घेतला. २९ मे २००९ च्या शुक्रवारी तिने बांद्र्याच्या पेरी क्रॉस रोड स्थित राहत्या घरात बाथरूममध्ये स्वतःला संपवलं. ३० मे च्या सकाळी चित्रा सिंग जेंव्हा आपल्या मुलीच्या घरी गेल्या तेंव्हा हा प्रकार उघड झाला. हे पाहताना त्यांना काय यातना झाल्या असतील याला शब्द कमी पडावेत ! या घटनेने चित्रा सिंग पुरत्या जमीनदोस्त झाल्या पण पती जगजीत सिंग यांचं असीम प्रेम त्यांचं जगणं थोडं फार का होईना सुकर करत होतं. पण नियतीला कदाचित हे ही पाहवलं नाही. तिने चित्रांची अखेरची परीक्षा घेण्याचं ठरवलं.

घटस्फोटातून पहिल्या पती पासून मुक्ती मिळवत नवा सुखाचा डाव मांडण्यासाठी चित्रांना नियतीची जी साथ लाभली होती ती साथ त्यांच्या मुलीला मोनिकाला लाभली नाही. उलट तिचं नवजीवनाचं गणित चुकलं आणि ती पुरती उन्मळून पडली. या धक्क्याने गलितगात्र झालेल्या चित्रांना सावरताना कुठे तरी जगजीत सिंग यांनाही नियतीच्या या सुडान्वेशी नीतीचा तिटकारा आला असावा आणि त्यांनी तिला टक्कर देतानाच आपल्या पत्नीला पुरतं सावरण्यासाठी कंबर कसली. स्टेज शोंचे प्रमाण जाणवण्या इतपत घटवले आणि घराकडे अधिक लक्ष दिले. आता त्यांच्या संसारवेलीवर कोणतेच फुल नव्हते, कधी काळी हिरवी कोवळी असलेली तजेलदार पानं आता सुकण्याच्या बेतात आली होती. काळ हळूहळू पंजा कसत असतो माणूस मात्र आपल्याच विश्वात जगत असतो.

जगजीत वरवर सुखी असल्याचा अविर्भाव करत होते पण त्यांना आता चित्रांची काळजी लागून राहिली होती. त्याचा ताण त्यांच्यावर पडत गेला. २०११ मध्ये त्यांनी इंग्लंडचा संगीत दौरा केला. तिथून परतल्यावर काही दिवसांनी मुंबईत गुलाम अलींच्या गझला ते परफॉर्म करणार होते. मात्र हे होणे नव्हते. २३ सप्टेबरला अतिरक्तदाबामुळे जगजीतसिंग यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्यातच ते कोमात गेले. तब्बल दोन आठवडे ते कोमात होते. हे चौदा दिवस ते मृत्यूच्या दारात उभे होते.

त्यांना तिथून परतायचे होते तर त्या विश्वनिहंत्याला त्यांच्या स्वरांची मैफल सजवायची होती. तो त्यांना ऐकायला उत्सुक होता, त्यांना माघारी फिरण्याची अनुमती तो देत नव्हता. जीवन मृत्यूची ही कश्मकश कुरूक्षेत्रावरील लढाईपेक्षा कमी नव्हती, यात अखेर जगजीत हरले आणि तो विश्वाचा निर्मिक जिंकला. या चौदा दिवसात चित्रा सिंग यांची मानसिक अवस्था काय झाली असेल याचा विचार करवत नाही. एका मागोमाग जीवाची माणसं सोडून जाताहेत आणि आता काळजाचा तुकडा मृत्युच्या अंथरुणाला खिळून आहे, तो जागा होईल की नाही याची कसलीच शाश्वती नाही ! खरंच हे क्षण खूप वाईट असणार ! प्रत्येक क्षण एकेका वर्षासारखा गेला असणार. पण चित्रा म्हणतात, 'या चौदा दिवसांनी मला आणखी जगण्याची उर्मी दिली. कदाचित माझ्यात जगण्याच्या ऊर्मीची प्रेरणा यावी म्हणूनच जगजीतजींनी हा जीवनसंघर्ष केला असावा... '

जगजीतजी गेले तेंव्हा चित्रांनीही नुकतीच सत्तरी पार केली होती. गात्रे थकली होती, एकेक करून आयुष्याचे महत्वाचे पडाव मागे गेले होते. आता त्या उरल्या होत्या आणि त्यांचा संधीकाळ ! जगजीतजींना जाऊन आता आठ वर्षे झालीत चित्रा आता ऐंशीच्या घरात आल्यात, त्यांची नातवंडे मोठी झालीत. त्यांच्या सावलीत त्यांचा दिवस जातो पण संध्याकाळ होताच त्यांचा आवाज कातर होत जातो. दिवाणखाण्यातील सतार नकळत झंकारु लागते आणि त्यांच्या कानात जगजीतजींचे स्वर गुंजारव करू लागतात. सांज ओसरून रात्र होताच अंधार दाटत जातो, सर्वत्र उदासवाणी शांतता पसरते, चित्रांच्या शयनकक्षात मात्र स्वरांची मैफल सजलेली असते. हजारो श्रोते बसलेले असतात आणि एका सुरेख सजवलेल्या मंचावर चित्रा आणि जगजीत गात असतात - 'अगर हम कहें और वो मुस्कुरा दें, हम उनके लिए ज़िंदगानी लुटा दें... हर इक मोड़ पर हम ग़मों को सज़ा दें, चलो ज़िन्दगी को मोहब्बत बना दें........

विवेकच्या मृत्यूनंतर जगजीत सिंग यांनी जेंव्हा कमबॅक केलं होतं, त्यावर एक स्वतंत्र प्रकरण 'बियॉन्ड टाईम - द एजलेस म्युझिक'मध्ये आहे. त्यात त्यांनी निदा फाजलींच्या गझलांचा संदर्भ देत म्हटलंय की, "जीवनाचं उद्दिष्ट हरवल्यानंतर माणूस दिशाहीन होऊन जातो आणि त्यातून त्यालाच मार्ग काढायचा असतो, त्याला पथदर्शक कुणी नसतो न कुणी काळजाचा दिवा घेऊन अंतःकरणातला प्रकाश पसरवतो, हे तर त्यालाच करावं लागतं, त्यालाच काजवा व्हावं लागतं, त्यालाच चंद्र व्हावं लागतं आणि त्यालाच सूर्य व्हावं लागतं. काळाचं ग्रहण मिटवण्यासाठी त्यालाच जळावं लागतं, हे जळणं एखाद्या ज्वालामुखीहून धगधगतं असतं, यात एखाद्या दीपस्तंभासारखं स्थिर राहत अविरतपणे कतरा कतरा जळत राहावं लागतं... " माझ्या मते हे प्रकरण एक इंटयुशन असावं जे जगजीतजींनी चित्रांच्या उर्वरित आयुष्याला प्रकाशवाटा दाखवण्यासाठी लिहिलं असावं...

नियती कुणाबरोबर कोणता डाव खेळेल हे कुणी सांगू शकत नाही. आता जो क्षण आपण जगतोय तेच जीवन होय. त्यात आनंद भरणे हे आपलं काम. सर्वच लोकांना हे सहजसाध्य होत नाही. काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो तर काहींच्या आयुष्यात सुख दुःखाचे इतके हिंदोळे येऊन जातात की त्यांचं जीवन दोलायमान होऊन जातं. आत्मिक प्रेमाने त्यावर मात करता येते. हे गृहितक या दांपत्याने सार्थ केलं.

तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातही या प्रकाशवाटा आहेत, आपण आपल्यातच सच्चेपणाने डोकवायचा अवकाश की आपण कितीही संकटात दुःखात असलो तरी आपलं ही जीवन प्रेमाच्या सच्च्या प्रकाशाने उजळून निघेल. जगजीत आणि चित्रा यांच्यात प्रेमाचं जे नातं होतं त्याला व्यवहारिक भौतिक जगाचे मापदंड भले लागू होत नसतील वा प्रेमाच्या तथाकथित ऋजूतेतही ते बसत नसेल पण त्यांचे प्रेम गहिरे होते, आत्मिक पातळीवरचे होते. त्या प्रेमाची वीण इतकी घट्ट होती की अजूनही ती तसूभरही उसवलेली नाही....

मला अजूनही वाटते की, 'कौन आयेगा यहां कोई आया न होगा, मेरा दरवाजा हवाओंने हिलाया होगा...' ही गझल या दांपत्याच्या अखेरच्या सफरीसाठीच लिहिली गेली असावी ..

- समीर गायकवाड

लेखन संदर्भ - 
'बियॉन्ड टाईम - द एजलेस म्युझिक ऑफ जगजित सिंग' - चित्रा अँड जगजीत सिंग. 
'द अनफरगॉटेबल जगजीत सिंग' - फरहान फारूक.
'जगजीत अँड चित्रा सिंग : हॉनेस्ट अँड अपिलिंग' - निसार पांगारकर. 
'कागज की कश्ती : इन मेमरी ऑफ जगजीत सिंग' - नरेंद्र कुसनूर.

1 टिप्पणी: