शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

महादेवी वर्मा यांची कविता - ठाकुरजी !

वय जसजसे वाढत जाते तसतशी मानसिकता बदलत जाते. विचारधारा प्रगल्भ होत जाते. जीवनाकडे आणि सकल चराचराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. काही 'दिव्य' लोक याला अपवाद असू शकतात. पण ज्यांच्यात संवेंदनशीलता आणि आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती असते त्यांचे विचार सातत्याने बदलत जाऊन विरक्तीच्या डोहाशी एकरूप होत चाललेल्या एका धीरगंभीर औदुंबरासारखी त्यांची अखेरची अवस्था होते. ज्ञानपीठसह असंख्य पुरस्कार -गौरव विजेत्या महादेवी वर्मा यांना गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे. २६ मार्च १९०७ चा त्यांचा जन्म. त्यांच्या जन्मानंतर वडील बांके बिहारी यांना हर्षवायू होणं बाकी होतं, कारण त्यांच्या कुटुंबात तब्बल २०० वर्षांनी मुलगी जन्मास आली होती. ते ज्या देवीचे साधक होते तिचेच नाव त्यांनी तिला दिले, 'महादेवी' !

हिंदी साहित्यात ज्यांच्या पडछाया व्यापून आहेत ते चार दिग्गज म्हणजे जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी निराला, सुमित्रानंदन पंत आणि महादेवी वर्मा.

महादेवींनी वयाच्या सहाव्या वर्षापासून कविता केल्या. त्यांचा बालविवाह झाला होता. पण आपल्या पती(स्वरूप नारायण वर्मा)सोबत त्यांचे भौतिक व्याख्येनुरूपचे वैवाहिक संबंध नव्हते, पण त्यांच्याशी त्यांचा विसंवादही नव्हता. दोघेही मित्रासारखे जगले. पतीच्या पश्चातल्या महादेवी साध्वीहून कठोर आयुष्य जगल्या. त्यांनी कायम शुभ्र वस्त्रे परिधान केली, त्या कायम सतरंजीवर निजल्या, त्यांनी कधीही आरशात स्वतःला न्याहाळलं नाही. महादेवींच्या बहुतांश रचनात कारुण्य ठासून भरलेलं होतं. स्वातंत्र्यपूर्व भारतातील दुःख दैन्य आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील अपेक्षाभंग हे दोन्हीही त्यांनी अनुभवलं होतं. अश्रू आणि कारुण्य याला आपलं शब्दशस्त्र बनवत त्यांनी या अंधःकारावर प्रकाश टाकला. त्याना हिंदी भाषिक पट्ट्यातले लोक आधुनिक मीरा म्हणतात, मला मात्र ते पटत नाही. त्या काही कुणासाठी झुरल्या नव्हत्या की कुणाच्या प्रेमासक्तीत त्यांनी आयुष्य व्यतीत केलं नव्हतं. त्यांची राहणी साध्वीसारखी जरूर होती, त्यांच्या साहित्याला कारुण्याची झालर नक्की होती पण त्यांचा आवेश हा जेत्या स्त्रीचा होता, त्यांच्यातला विश्वास हा परिवर्तनाचा होता.

पोस्टच्या पहिल्या परिच्छेदाला अनुसरून महादेवींच्या दोन कविता इथें देतोय.
'ठाकुरजी' ही कविता त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षीची आहे. ही 'तुकबंदी' (बडबडगीत) स्वरुपाची आहे. त्यातले भोळेपण आणि आस्था लगेच लक्षात येतात. दैवी संकल्पनेच्या साचेबंद कल्पनाही जाणवतात.
ठाकुर जी -

ठंडे पानी से नहलातीं,
ठंडा चंदन इन्हें लगातीं,
इनका भोग हमें दे जातीं,
फिर भी कभी नहीं बोले हैं।
माँ के ठाकुर जी भोले हैं।

'खुदी न गई' ही कविता त्यांच्या अखरेच्या रचनांपैकीची आहे. या त्याच महादेवी आहेत, ईश्वरही तोच आहे पण इथे महादेवींचा दृष्टीकोन खूप प्रगल्भ आणि अत्यंत वेगळा जाणवतो. ही प्रगल्भता जीवनातील विविध अनुभवांनी आणि जाणीवांनी येते. वाट्याला येणाऱ्या प्रत्येक क्षणापासून जो काही न काही शिकतो त्याला जीवनाचे सच्चे अर्थ नक्कीच उमगतात..

खुदी न गई -
बिन बोये हुए बिन सींचे हुए; न उगा अंकुर नहिं फूल खिला,
नहिं बाती संजई न तेल भरा, न उजाला हुआ नहिं दीप जला,
तुमने न वियोग की पीर सही नहिं, खोजने आकुल प्राण चला !
तुम आपको भूल सके न कभी, जो खुदी न गई तो खुदा न मिला !

आयुष्यात चढउतार येत राहतात, कमीजास्त होत राहते. हे थोडंसं त्रासदायक जरुर असतं पण यानेच जगणं समृद्ध होत जातं.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा