बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

करुणानिधी - द सुपर थलैवा...


दोन दिग्गज फलंदाज प्रदीर्घ वेळापासून क्रीझवर असतील व त्यांनी मोठी भागीदारी रचली असेल आणि त्यांच्यातला एकजण बाद झाला की दुसरा देखील फार काळ तग धरू शकत नाही. तो देखील काही वेळातच बाद होतो असं एक गृहीतक आहे. असंच काहीसं राजकारणातही होत असतं. एकमेकाशी प्रदीर्घ वैर असणारे दोन दिग्गज तमिळ राजकारणी एका पाठोपाठ एक गेले. दोघांनी एकमेकांना इतके पाण्यात पाहिले होते की सत्तेचा लंबक आपल्या बाजूला कलल्यावर त्यांनी परस्परास अत्यंत अपमानास्पद व धक्कादायक पद्धतीने अटक केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांनी जे सुडाचे राजकारण केले ते इतके टोकाचे होते की अनेक सामान्य लोकांनीही त्यात उडी घेत एकमेकांची डोकी फोडली होती. राजकारण ही एक विचारधारा न राहता सत्ताकेंद्रित द्वेषमूलक प्रवृत्ती म्हणून दक्षिणेत रुजवण्यात या दोहोंनी समान हातभार लावला होता.


कमालीची भाषिक, प्रांतीय अस्मिता जोपासणारे करुणानिधी प्रारंभीच्या राजकारणात भोळसटच होते. ते तसे नसते तर त्यांनी पक्षात एमजीआरच्या रूपाने उंट घेतलाच नसता. एमजी रामचंद्रन करुणानिधींचे बोट धरून राजकारणात आले, द्रमुकचे नेते झाले आणि त्यांचे करुणानिधींशी बिनसल्यावर त्यांच्या महत्वाकांक्षा इतक्या जागृत झाल्या की त्यांनी करुणानिधींच्या विरोधात पक्ष काढला. द्रमुक फोडला आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष काढला. असं म्हणतात की त्या दिवशी करुणानिधी त्यांच्या गुरूंच्या अण्णादुराई यांच्या तसबिरीला उराशी कवटाळून ढसाढसा रडले होते. एमजीआर आणि करुणानिधी यांच्यात इतकं वैर वाढत गेलं की दोघं आमने सामने निवडणुकीस उभे राहिले आणि त्यात करुणानिधींचा पराभव झाला. हा पराजय त्यांच्या जिव्हारी लागला आणि येथून पुढे त्यांनी एआयडीएमके हा आपला सर्वोच्च शत्रू मानला. एमजीआरच्या मागे जयललितांनी द्वेषाची गादी पुरेपूर चालवली.

करुणानिधी केवळ हिंदूद्वेष्टे वा हिंदीद्वेष्टे होते असं म्हणणं म्हणजे त्यांच्या व्यक्तीमत्वावर अन्याय करणारे ठरेल. त्यांचे हलाखीचे बालपण, त्यांच्या कुटुंबाची फरफट आणि एकंदर तत्कालीन भारतीय समाजव्यवस्थेतील विषमता पाहू जाता त्यांच्या विचारात काही गैर होते असं म्हणणे अयोग्य ठरेल. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यात असलेली टोकाची सामाजिक - सांस्कृतिक तफावत आणि परस्परांप्रति असणारा संशयभाव याने या विचारसरणीस अधिक खतपाणी घातले. वयाच्या चौदाव्या वर्षी करुणानिधींनी केलेलं लेखन पाहू जाता त्यात त्यांच्यातला विद्रोही तरुण साफ झळकतो. त्यांची आशय विषय मांडणी ही जातीय वर्चस्ववादाच्या विरोधात होती, किंबहुना हाच विचार त्यांनी आपल्या पक्षाचा पाया म्हणून रुजवला.

ऐंशीच्या दशकातले करुणानिधी आणि तत्पूर्वीचे करुणानिधी यात जमीन अस्मानचे अंतर आहे. उत्तरेतले काँग्रेसचे एकहाती अस्तित्व संपुष्टात यायला आणि करुणानिधींचे राजकीय सूर बदलायला एकच गाठ पडली. करुणानिधी प्रारंभी वाटायचे तितके साधे, सोपे, भोळे राजकारणी नंतर राहिले नव्हते, युपीए एक आणि दोन च्या काळात त्यांनी मनमोहनसिंग सरकारला कमालीचे छळले होते. वारंवार सत्तेतुन बाहेर पडायची धमकी देऊन ते ब्लॅकमेल करत. राज्यात सत्तेत येण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन राज्याचे अर्थकारण बिघडवणारी आश्वासने द्यायची आणि त्या गर्ते तून बाहेर पडण्यासाठी केंद्राला पिळत रहायचे हा फॉर्म्युला तमिळनाडूने ठसठशीतपणे राबवला. त्यांचे राजकीय कटाक्ष अत्यंत कुचकट आणि स्पष्ट असत. स्टेजवर पाया पडायला येणाऱ्यांनाही ते प्रसंगी उताणे पाडत. पण त्यांचा एक स्तर ठरलेला होता, करुणानिधींनी जयलालितांची टिंगल केली पण आपला तोल ढासळू दिला नाही. मुरासोली मारन, ए. राजा, कनीमोझी यांच्यातली गुंतागुंत सोडवताना त्यांनी स्वतःला व पक्षाला झळ बसु दिली नाही. त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या नंतरचा राजकीय वारसा कुणाकडे राहील यावरून देखील त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही ज्यामुळे डीएमकेची फुट टळली गेली.

करुणानिधींनी तमिळ जनतेवर मनापासून प्रेम केले याला कोणी आव्हान देऊ शकत नाही. त्यांचे तमिळप्रेम इतके अफाट होते की राजीव गांधीची हत्या झाल्यानंतर देखील ते एलटीटीईची आणि प्रभाकरनची बाजू उघडपणे घेत. श्रीलंकेत पाठवलेले भारतीय शांतीसेनेचं सैन्य मागे घ्यावे म्हणून त्यांच्या पक्षाने थेट रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. 'तमिळ इलम'ला तमिळनाडूच्या विधानसभेत ठराव करून मान्यता देण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. जहाल शीख अतिरेक्यांनी खलिस्तानची स्वप्ने पाहिली पण राजकीय दृष्ट्या त्यांना जे जमले नव्हते ते करुणानिधींनी उघडपणे करून दाखवले होते. तमिळ हित आणि तमिळ अहंकार यांचा ते कमालीच्या टोकाच्या भूमिकेतून पुरस्कार करत.

स्वातंत्र्योत्तर तमिळनाडू आणि सत्तरच्या दशकानंतरचा तमिळनाडू यात फारसे अंतर नव्हते. इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करताना तमिळ तरुणास समान संधी मिळावी यासाठी त्यांनीप्रयत्न केले. त्यांच्या राजकीय भूमिकांच्या शेडस इतक्या गडद झाल्या की जयललिता जेंव्हा सत्तेत आल्या तेंव्हा त्यांना करुणानिधींच्याच वाटेवरुन जावे लागले. साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करत, पर्यटन आणि शेती यावर त्यांनी विशेष भर दिला त्याची फळे आज तामिळनाडूत पाहता येतात. स्वतःचे धार्मिक विचार तिळमात्रही मवाळ न करता त्यांनी राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण होऊ दिले नाही हे त्यांच्या राजकारणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्यातला विद्रोही साहित्यिक त्यांनी मरू दिला नाही, त्यांची भाषणे जशी टाळ्या घेणारी आणि गर्दीवर जादू करून खिळवून ठेवणारी असत तशीच त्यांची लेखणी देखील धारदार होती.

पांढऱ्या शुभ्र रेशमी लुंगी सदऱ्याचा पेहराव करणारे, गळ्यात सदैव तलम पिवळे उपरणे बाळगणारे, डोळ्यावर त्याच जुनाट पद्धतीची काळसर गॉगल फ्रेम वापरणारे आणि अखेरच्या काळात व्हीलचेअरवर जखडले गेलेले करुणानिधी भारतीय राजनीतीतील प्रांतीय राजकारणाचा वरचष्मा वाढवणारे द्रष्टे नेते होते. आयुष्यभर एकाच टिपिकल ठाशीव पद्धतीचे राजकारण करणारे करुणानिधी सार्वजनिक जीवनात देखील एका साचेबध्द पद्धतीने जगत. करुणानिधी त्यांचे आयुष्य आपल्या अभिनव आणि बंडखोर शैलीत जगले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव स्टॅलिन ठेवले होते, सर्व जातीच्या लोकांना पुजारी होण्याचा अधिकार दिला होता, धर्माचे पाखंड त्यांनी अक्षरशः मोडीत काढले होते. पेरियार रामस्वामी यांच्यानंतर खरया अर्थाने वंचित, शोषितांच्यासाठी ते लढले. ते एक लढवय्ये कार्यकर्तेही होते आणि जनमाणसाच्या नसांवर पकड असणारे अभूतपूर्व नेतेही होते. त्यांची वेशभूषा, देहबोली आणि संवादफेक आजही तमिळनाडूच्या तरुणांचे आकर्षण आहे. किशोरापासून ते वृद्धापर्यंतचे त्यांचे समर्थक आज शोकाकुल झालेत, मुळात ही सगळी माणसे भडक ठेवणीची. त्यांचे सिनेमे, गाणी, कविता, ग्रंथ, साहित्य, शिल्पे, चित्रे या सर्वात त्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आपल्या आवडत्या नेत्याचे मरण हा देखील तिकडे सोहळा ठरतो. शक्य तितक्या भव्योदात्त पद्धतीने त्याला अलविदा करण्याकडे त्यांचा कल असणं साहजिक आहे. त्यातल्या त्यात एक बरे झाले की आपले गुरु अण्णादुराई यांच्या समाधीशेजारीच आपल्याला दफन केलं जावं ही करुणानिधींची अंतिम इच्छा पुरी झाल्याने सकल तमिळ जनतेचा शोक बऱ्यापैकी आवरला गेलाय आणि आता त्यांना प्रतिक्षा आहे ती अंतिम यात्रेच्या सुरुवातीची...
नावाप्रमाणेच करुणेचा निधी असणारा हा कलैग्नार (कलेचा भक्त) थलैवा (नेता) त्यांना पुन्हा कधीच दिसणार नाही...

मृत्यूपश्चात वैर संपते म्हणतात. करुणानिधींनी ते कृतीतून दाखवून दिले होते. त्यांनी अम्मांच्या परिवारात आग लावण्याचे काम केले नाही, त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी ते पडद्यामागून सक्रीय होते. आपल्याकडे कुणाचे निधन झाले की त्याचा अपार उदोउदो होतो वा केवळ पूर्वग्रहदुषित वृत्तीने टीका होते, पण त्यावर सटीक लिहिलं, बोललं जात नाही. आपण असं करत नसू तर भावी पिढ्यांपुढे गतकाळाचे सच्चे चित्र कधीच दिसणार नाही याची नोंद आपली प्रसारमाध्यमे आणि मिडिया कधी घेणार की नाही हा प्रश्नही जाता जाता विचारावा वाटतो. असो. एका झंझावाती जीवनाची अखेर झालीय हेच अधिक टोकदार सत्य आहे. आधी जयललिता गेल्या आणि आता करुणानिधी गेले, आता तमिळ अस्मितेचे काय होणार आणि तिची ध्वजा कुणी त्याच तडफेने पेलू शकेल की नाही हे येणारा काळच सांगेल...


अलविदा करुणानिधी...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा