दिल्लीच्या जी.बी.रोडवरील रेड लाईट एरियातली आजची घटना. (अकरा ऑगस्ट २०१८)
पानिपतमध्ये राहणाऱ्या सद्दाम हुसेन याने पहिली पत्नी हयात असताना धोकाधडी करत गुपचूप दुसरा निकाह केला होता. तिच्याशी पटेनासे झाल्यावर तिला फिरायला नेतो असं सांगत त्याने थेट जी.बी.रोडवर आणलं. तिथल्या चलाख दलालांनी त्याला बरोबर हेरलं. त्याच्याबरोबरचं 'पाखरू' काय किंमतीचं आहे हे त्यांना नेमकं ठाऊक होतं पण सद्दामला बाई किती रुपयात विकायची हे माहिती नव्हतं. त्यानं बायकोची किंमत दिड लाख रुपये सांगितली. दलाल मनातल्या मनात खूप हसले असतील. काहींनी त्याच्याशी बार्गेन करून पाहिलं. पण सद्दाम आपल्या 'बोली'वर ठाम होता. शेवटी त्याच्यामुळे नसते वांदे होतील म्हणून काही दलालांनी त्याला हुसकावून लावले.
तो नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर परत आला. बायकोला तिथं थांबवून नव्याने तिच्यासाठी खरीदार पाहू लागला. तिची अपेक्षित किंमत येत नाही हे लक्षात येताच तिचा खून करण्याची योजनाही त्याने आखली. त्यासाठीची शस्त्रसज्जता केली. पण नवीन माणूस या धंद्यात थेट बाई घेऊन गेला की दलालांचे पित्त खवळते. अशाच एका अतृप्त आत्म्याने कमला मार्केट पोलीस स्टेशनवर खबर दिली. पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी त्यांच्याच एका माणसाला दलाल बनवून पाठवले. त्याने एक लाख वीस हजारात सौदा केला. दहा हजार एडव्हान्स दिला आणि सद्दामला रंगे हाथ पकडले.
सद्दामला आपल्या देशात बायकांची किंमत किती कमी आहे हे माहिती नसल्याने तो अडकला आणि त्याची बायको सलामत राहिली. त्याने जेमतेम काही हजार सांगितले असते तर 'डील' झाली असती. कधी कधी तर अवघ्या काही शे रुपयांतही कुणी घेत नाही, तर काही वेळा 'चीज' नाकाम असेल तर खूपच वाईट अवस्था होते..
या किश्श्यात दलाल देवासारखे वाटतात, पण ते असतात अमानुष क्रूर पाशवी सौदागर !
अशाच स्वरुपाची खरे तर याहून भयंकर घटना सहा जून २०१८ ला याच जी.बी.रोडच्या नरकात घडली होती. मुजफ्फरपूरच्या दोन तरुणांनी मेरठहून शामलीला जाणाऱ्या एका पंधरावर्षीय कोवळ्या तरुणीशी प्रवासात तोंडओळख करून तिच्याशी घसट वाढवली. हे दोन्ही तरुण व्यावसायिक दलाल वा ह्युमन ट्राफिकर्स नव्हते. त्या नंतर ते युपीमधील लोनी येथे घेऊन गेले. तिथे तिला शीतपेयातून नशीली द्रव्ये पाजली. त्या नंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. अमेरिकन एक्सप्रेसच्या एका कॅब ड्रायव्हरशी त्यांनी मुलीला दिल्लीत नेण्यासाठी संपर्क साधला. त्यानेही त्या मुलीवर बलात्कार केला. त्या नंतर बेशुद्धावस्थेतील मुलीला घेऊन ते दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत जी.बी.रोडला आल्यावर या दोन तरुणांनी दलाल समजून थेट एका कॉन्स्टेबलशीच बोलणी सुरु केली. त्यांनी मुलगी देखणी आणि तरुण असल्याचे सांगत बोली दोन लाख रुपये सांगितली. या चढ्या मागणीवरुन पोलिसाने ताडले की पोरं नवखी आहेत. त्याने एक लाख ऐंशी हजारात सौदा करत डील साठी सोबत चला म्हणत त्यांना एसओपुढे नेऊन चतुर्भुज केलं. नंतर कॅब ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली. मुलीला तिच्या घरी पोहोच करण्यात आलं.
या दोनही घटना देशाच्या राजधानीत घडल्यात. जागरुकतेमुळे उघडकीला आल्यामुळे त्या कळून आल्या. अशा शेकडो घटना एकट्या दिल्लीच्या जी.बी. रोड रेडलाईट एरियात घडत असतात. देशपातळीवर काय अवस्था असेल ? पोलिसांची सतर्कता इथे खूप महत्वाची ठरते. आपल्या महाराष्ट्रात मुंबई (कामाठीपुरा - नागपाडा पोलीस स्टेशन) पुणे(बुधवार पेठ - शुक्रवार पेठ पोलीस चौकी), सांगली(प्रेम नगर - विश्रामबाग पोलीस स्टेशन), मिरज (उत्तमनगर - मिरज सिटी पोलीस स्टेशन), नागपूर (गंगा जमुना - लकडगंज पोलीस स्टेशन) या काही फेमस रेड लाईट एरीयांच्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक होताना अत्यंत सतर्कतेने व सचोटीने निवड होणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यापासून ते शिपायापर्यंत एक लिंक काम करत असते, जी स्थानिक राजकारणी चालवत असतात, जिचे नेक्सस वरपर्यंत जुळलेले असतात. या साखळीत सर्वच नेते, अधिकारी एकाच मापात तोलता येत नाहीत. पण चांगल्यांची संख्या कमी आहे हे ही नाकारता येत नाही.
आपल्या आसपास घडणाऱ्या घटनात दडपणाखाली असलेल्या एकट्या दुकट्या स्त्रिया आणि त्यांच्या सोबतच्या पुरुषांत काही संशयास्पद हालचाल दिसल्यास नजीकच्या पोलिसांना वा महिला हेल्पलाईनला कळवणे कधीही इष्ट ! हे सर्व उद्योग काही रिकामटेकडे सतत करतातही ! पण अशा फसलेल्या, नाडलेल्या बायकांना घेऊन जाणारी व्यक्ती जेंव्हा एक बाईच असते तेंव्हा त्या प्रकरणाला वाचा फुटत नाही. म्हणूनच आपल्या देशात फिमेल एस्कॉर्टर्स मोठ्या संख्येने वाढत आहेत. अनेकांना या गावगप्पा वाटू शकतात पण या लोकांच्या तावडीत सापडलेली पुढची मुलगी, महिला नेमकी कुणाच्या नात्यातली असेल हे सांगता येत नाही !
- समीर गायकवाड
टीप - अशा संशयास्पद घटना भोवताली आढळल्यास राष्ट्रीय महिला हेल्पलाईनवर 1091/ 1291 / (011) 23317004 या नंबरवर कळवल्यास दखल घेतली जाते.
महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यानाही ट्विट करू शकता - Maneka Gandhi (@Manekagandhibjp) / https://twitter.com/Manekagandhibjp. त्यांच्याकडून त्वरित दखल घेतली जाते असा अनुभव आहे.
#रेड लाईट डायरीज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा