शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

'फिल्लमबाजी'तले कललेले दिवस...



आमच्या सोलापुरात ओएसिस मॉलमध्ये नुकतेच इ-स्क्वेअरची मल्टीप्लेक्स सुरु झालीत, एकदम चकाचक. गारवा देणारी हवा, बाहेर फ्लॅशलाईटस आणि आत थोडासा अंधुक उजेड असणारया या थियेटरची तिकिटे बहुतांशी पब्लिक ऑनलाईन काढूनच थियेटरला येतं....

भागवत व त्याला लागून असणारया मीना, आशा आणि मागच्या कल्पनामध्ये सादळलेल्या बिस्किटाचे भाव तोंडावर घेऊन तासंतास रांगेत उभं राहून प्रसंगी काठ्या खाऊन तिकीटबारीतसमोर जाऊन ८५ पैशाचे पिटातलं तिकीट काढण्यातील सुख आणि घरात बसून मखमली स्मार्टफोनवर अलगद तर्जनी फिरवून २५० रुपयाचे बुकिंग करणे ही दोन्ही सुखे भिन्न आहेत. हलवाई गल्लीतल्या हलवायाच्या दुकानात काळपट झालेल्या कढईत उकळत्या तेलात जुन्या बनियनच्या कापडातून आचाऱ्याने जिलेबी सोडावी तसं पूर्वीचे तिकीट काढण्याचे दिव्य असे ! आताचे तिकीट काढणे हा आताच्या सिनेमासारखाच नीरस प्रकार ! आजकालच्या प्रमाणे ऍडव्हान्स बुकिंगची सोय पूर्वीही होती मात्र तिची कथा वेगळी आहे.

तेंव्हा नवा सिनेमा लागला की शुक्रवारी भल्या सकाळपासून थियेटरच्या बंद लोखंडी गेटजवळ पब्लिक एकमेकाशी झोंबाझोंबी करत उभं असे. बाभळीच्या झाडाला शेळ्या लगटून राहत तशा या दारापाशी पोरं आशाळभूत तोंडानं उभी असत. आतल्या कर्मचारयाने साखळीला बांधलेले कुलूप काढले की लोकांचा लोंढा तिकीट खिडकीच्या दिशेने धावत सुटे. ह्यात काही वीर धराशायी होत किंवा त्यांच्या पायात पाय घालून पाडले जाई, हेतू हा की त्याला अडखळून आणखी दहापाच जण धारातीर्थी पडावेत, तेव्हढीच रांगेतली खेचाखेची कमी होण्यास मदत !

आत घुसलेला हा लोंढा बुकिंग खिडकीपाशी 'तू आधी की, मी आधी' करत एकमेकाशी हुज्जत घालत त्या खिडकीच्या तोंडापाशी हातघाईला येई. दुपारी पडदयावर बघावयास मिळावयाची गुद्दागुद्दी अशा प्रकारे सकाळच्या बुकिंगमध्ये मोफत दिसत असे. यातदेखील आडमाप, राकट, दांडगी दुंडगी पोरं इतर पोरांना भारी पडत. येतानाच घोळक्याने आलेली ही पोरे साहजिकच बुकिंग विंडोच्या सर्वात जवळ असत. थोडीशी फ्री स्टाईल झाल्यावर मग एखादा डोअर कीपरचे काम करणारा तिशीतला 'अट्टल शिन्मावाला' तिथं येऊन उभा राही. त्याच्या हाताताला दंडुका तो अगदी हेरून चालवायचा.

काळ्याबिंद्र्या तोंडाचा, चेहऱ्यावर नानाविध व्रण असलेला, हातात भलं मोठं कडं मिरवत मिशीला ताव देणारा, चालताना शर्टाच्या बाह्या मागे सारणारा, गालात धरलेली तंबाखूची गोळी ओठांचा चंबू करून अलगद थुंकणारा, कानात करंगुळी घालून जोरात हात हलवत दुसऱ्या हाताने पाठीत धबुका घालणारा, रात्रीची अजून उतरली नाही हे सिद्ध करणारे लालभडक डोळे बाहेर येतील की काय अशा रानटी पद्धतीने गटागटा चोळणारा, बेरकी नजरेने रांगेत उभे असणारया माणसांची थोबाडे न्याहाळणारा अशी अनेक रूपे या माणसाची असंत. याला पाहून दशावतारी विष्णू कसा असू शकेल याचा चमत्कारिक अंदाज मी मनाशी बांधत राही. चांगले दोनेक तास मोडल्यावर बुकिंग ऑफिसमधला तिकीट वाटणारा 'देवदूत' प्रकट होई अन त्याला आत जाता यावे म्हणून आपखुशीने रांग मोडून लोक खुल्या दिलाने त्याच्यासाठी रस्ता करून देत.

हा इसम त्या बंद खोलीत जाऊन तिथल्या लाकडी खुर्चीत स्थानापन्न झाला की तिकिटांवर शिक्के मारण्याचे काम सुरु करे. हा आवाज खिडकीला लागून उभं असणारया व्यक्तीच्या गालावरून मोरपीस फिरे. आधी तारखेचे आणि मग आसन व्यवस्थेचे शिक्के मारून झाले की लाल, पिवळ्या, निळ्या किंवा क्वचित पांढरया रंगाच्या तावाच्या कागदाची तिकीटबुके पुढ्यात मांडून हा माणूस ती खिडकी आतल्या बाजूने उघडताच कुणी तरी जोरात शिट्ट्या फुकायला सुरुवात करे अन मग सुरु होई ढकलाढकली ! गतजन्मी यमदरबारात कामाला असलेला तिथला तो डोअर कीपर नावाचा इसम मग पुरता चेकाळलेला असे, आपली दहशत टिकून रहावी म्हणून हातातले दांडके तो कधी जमिनीवर तर क्वचित कुणाच्या पायावर हाणत रांगेला शिस्त लावण्याचा पोलिसी प्रयत्न सुरु करे.

चित्रपटगृहाच्या आवारातल्या या भल्या मोठ्या रांगेत उभं असताना सारखी धाकधुक असायची की आपला नंबर आला अन नेमकी तेंव्हाच तिकीट खिडकी बंद झाली तर ? अन असं बरयाच वेळा घडायचे देखील. लग्नाच्या पंगतीत जेवायला बसावे आणि स्वयंपाक संपल्याचे कानी यावे तसं काहीसं होऊन जाई. तिकीटबारी बंद करताना आतल्या देवदुताने आता आपला रोल बदलून नरकातील शोषकाचा रोल अवलंबलेला असे, त्याने तिथून बाहेर पडताना सर्व रंगाच्या तिकिटांचे गठ्ठेच्या गठ्ठे वेगळे काढून आपल्या खिशात कोंबलेले असत. ही सर्व तिकिटे त्या डोअरकीपरकडे हसतमुखाने तो हस्तांतरित करून चालता व्हायचा तेंव्हा तिळपापड होणे म्हणजे काय याचा अनुभव येई. दुपारी तीनच्या शो ला किंवा सांयकाळी सहाच्या शोच्या सुमारास 'ती तिकिटे' काळ्या बाजारात विकली जात असत. ब्लॅकने तिकीटविक्री सुरु झाली की चडफडाट व्यक्त करण्यापलीकडे जास्त काही करता येत नसे.

'राकट देशा दगडांच्या देशा' या पंक्ती ज्यांच्याकडे बघून कवींना सुचल्या ती तमाम माणसे एव्हाना थियेटरच्या आवारात हातात तिकिटांचा गठ्ठा नाचवत फिरू लागत. शर्टाच्या कॉलरच्या आतून गळ्यालगत कळकट रुमाल घातलेला, शर्टाची दोनचार बटणे उघडी सोडून आपली छाती उघडी टाकून, तोंडात पानाची पिचकारी इकडून तिकडे रिझवत रंगी बेरंगी विचित्र कपडे घातलेले हे ब्लॅकवाले पाहिले की त्यांना तुडवून काढावे असे वाटे पण आपल्याला माती तुडवतानाही टाचा दुखतात याचा चांगला अनुभव असल्याने हा विचार तत्काळ रद्दबातल होई.

'दो का चार' किंवा 'एक का दो' फार तर 'पांच का दस' असं ब्लॅकचे गणित असे. अशा वेळी आशाळभूतासारखे कोणी ओळखीचे तिकीटवाले गाठ पडतात का याची शोधाशोध व्हायची. तासभर तिथे रेंगाळून देखीलही हाती काहीच लागत नसे. मग नाईलाजाने तिथून काढता पाय घ्यावा लागे. पाय जड होणे म्हणजे काय याची ती तेज प्रचीती असे. मग इतर थियेटरमध्ये एक फेरफटका होई. भागवतमधील चार चित्रपटगृहांना लागून मीना,आशा. शारदा आणि काही अंतरावर प्रभात व कल्पना अशी चित्रपटगृहे होती. तिथे रमत गमत गेले तरी अर्ध्यातासाचा कालापव्यय निश्चिंती असे. मग कुठेतरी एखादा समदुःखी मित्र गाठ पडे किंवा सिनेमाला उशिरा आलेला एखादा मित्र आपल्याला टुकटुक माकड करत आत निघून जाई. सिनेमा सुरु होतानाचा घंटी वाजल्याचा आवाज मला देवघरातील घंटीइतकाच प्रिय वाटायचा. पण सिनेमा संपताना हाच आवाज बेसुरा वाटायचा ! थियेटरच्या आवारातील सायकल पार्किंगवाले फुकटात सिनेमा पाहत असतील अन वर दिवसभर चित्रपटातील डायलॉगबाजीचा श्रवणानंद घेत असतील या कल्पनेने त्यांचा हेवा वाटायचा. तिथले कॅंटीनवाले जमेल तेंव्हा आता जाऊन पाहिजे त्या सीनचा पुन्हा पुन्हा आनंद घेताना त्यांना किती आनंद वाटत असेल या कल्पनेने मलाच आनंद व्हायचा.

चित्रपटगृहातले वातावरण सिनेमा सुरु होण्याआधी अन नंतर वेगवेगळे असे. आपण जागेवर येऊन बसल्यावर उशिराने सावकाश पावलांनी आत येणाऱ्या लोकांचा फार संताप येई, कारण त्यामुळे दारातला काळा पडदा सारखा हले अन त्याचा उजेड हमखास तोंडावर येई. 'ही माणसं इतक्या उशिरा येईपर्यंत उकिरडा उकरायला जातात का' असा प्रश्न मनात येई. मुख्य सिनेमा सुरु होण्याआधीच्या जाहिराती डोक्याला काव आणीत, त्यातही विको पेस्ट आणि विको टर्मरीकच्या जाहिराती भंडावून सोडत. अमृतांजन, झंडू आणि बुढे हो या जवान वाली केसरची जाहिरात तर पार पिसाळून टाके. या दरम्यान पिटात बसलेले पब्लिक शिव्या आणि शिट्ट्या यांचे एकत्र मंत्रोच्चार सुरु करे. तर त्यांच्या मागे असलेल्या 'ड्रेस सर्कल' या सुरेख नावाने ओळखल्या जाणारया 'पब्लिक क्लास'मध्ये कुणीतरी एखादा तिकीटनंबरचा घोटाळा झाला म्हणून सात पिढ्यांचा उद्धार करे.

इथले डोअरकीपर कोल्हयासारखे तरबेज शिकारी ! ते रिकाम्या खुर्च्यांवर बॅटरीचा प्रकाशझोत टाकण्याऐवजी माणसांच्या तोंडावर किंवा डोळ्यावरच त्याचा मारा करत. अंधाराने भेंडाळलेला तो माणूस या उजेडाच्या मारयाने कोसळून जायच्या बेतात येई आणि त्याच्या तिकीट क्रमांकाची खुर्ची शोधताना तो दहाबारा जणांचे पाय कचाकचा तुडवून पुढे गेलेला असे. या पाय तुडवून घेतलेल्या लोकांच्या यादीत एखादा नामचीन मवाली असला की मग तिथेच 'फ्री स्टाईल' सुरु होऊन जाई ! बघता बघता सिनेमा सुरु होई. मात्र काहींना याचा आनंद घ्यायचा नसे. काहीजण घरी झोपण्याऐवजी इथे झोपायचे या न्यायाने आलेले असत. तर काही सिनेमा सुरु झाल्यापासून 'रम्याने मला कसे गंडवले' ते सुऱ्याला रंगवून रंगवून सांगत असत. त्यांच्या लेखी पब्लिक आणि सिनेमा शून्य असे.

बसल्या बसल्या समोरच्या खुर्चीला पाय लावणे. समोरची खुर्ची पायाने रेटून नेणे किंवा आपल्या सीटचे रुपांतर औरंगजेबाच्या आसनात करता येते का याचे विविध पोजिशनमध्ये अंदाज घेणारे लोक जर शेजारी आले की सिनेमा पाहणे कमी आणि त्याची चुळबुळ बघून त्याला खाली ढकलून देण्याचे खुनी मनसुबे डोक्यात आकार घेत. दोन खुर्च्यांच्या मधले हँडरेस्टसाठीचे सामायिक दांडके हा प्रॉपर्टीवाटपाइतकाच गहन प्रश्न असे. हे दांडके नेमके आपले की आपल्या शेजाऱ्याचे असा मानभावी प्रश्न मला आपल्या देशाच्या मॅकमोहन लाईनच्या सीमेवर आणून सोडत असे. आपण बसलेल्या समोरच्या सीटच्या समोर उंच करकोचा छाप मानेचा माणूस आला की त्याला दर दहा मिनिटाला सांगावे लागे की, 'आलमगीर आपण आपली मान जरा लघुकोनाच्या अंशाच्या कलती ठेवा !" तो माणूस कधी डोळ्यानेच बोका गुर्गुरावा तसा गुरगुरे आणि आणखी मान ताठ करून बसे !

आपल्या मागच्या सीटवरती एखादा पिंटू किंवा चिंटी आली की त्याच्या आईचा लडिवाळ आग्रह सुरु होई, 'अहो प्लीज जरा सरकून बसता का ? आमच्या चिंटूला दिसत नाही !" त्या रसाळ आवाजातला मध काम करून गेलेला असे अन तीन तास मानपाठ वाकडी करून बसल्याने पुढचे चारपाच दिवस पाठ अवघडून गेलेली असे. इतकं सारं कमी असायचे की काय म्हणून काही लोक जन्माला आल्यापासून थुंकत असल्यागत दर दहा मिनिटाला पचापचा थुकत राहत. यांचे काय करावे बरे असा विचार मनात असतानाच शेजारचा इसम मोठमोठ्याने घसा खाकरू लागे तेंव्हा इकडे आड तिकडे विहीरचा अनुभव येई.

बघता बघता मध्यंतर होई. लोक मजेने सिनेमा बघताहेत असं डोअरकीपरला वाटलं की किमान पाचेक मिनिटे आधीच तो लाईट्स सुरु करे अन दाराजवळचा पडदा बाजूला करून पिंपळाला लटकलेल्या समंधासारखा त्या पडद्याला झोंबत उभा राही. असाच वाह्यातपणा तो सिनेमा संपताना देखील करे. त्याने पडदा उघडला की त्याच्या नरडीचा घोट की काय म्हणतात ते घ्यावा असा वाटत राही पण त्याचे ड्रॅक्युलाछाप दात बघून त्या कडू विचारांचा घोट उलटा प्यावा लागे. सिनेमाच्या मध्यंतरात कोल्डड्रिंक्स विकणारी पोरे हातातल्या ट्रे मधील बाटल्यांवर ओपनरने कचाकचा वाजवत आवाज करत फिरत अन त्यांच्या केकाटण्याच्या स्वरात थम्सापलिम्कागोल्डेस्पॉट असा मोठा शब्दोच्चार एका दमात बाहेर पडे ! एखादं खौट पोरगं पॉपकोर्न खाऊन झाल्यावर त्याची रिकामी प्लॅस्टिकची पिशवी फट्टाक आवाज करून फोडत राही.

तिखटमीठ लावलेलं दाणेदार कणीस, खमंग चवीचे पापड, तिखट लावलेले शेंगादाणे, कागदी कोनात गच्च भरून मिळणारे डाळेफुटाणे, लालबुंद तिखट भुकटी फिरवलेले काकडीचे खाप असे अनेक तऱ्हेचे खादयजगत तेंव्हा स्वस्तात उपलब्ध असे. आताच्या या कडक इस्त्रीची तोंडे घेऊन सिनेमे बघण्याच्या युगात ही गरिबी अन गरिबांना जगवणारी खाद्यजंत्री लोप पावली आहे. तिथे बेचव, नीरस महागडया ब्रँडेड खाद्य पदार्थांनी त्यांची जागा घेतली आहे. फक्त पैशावर डोळा असणारे हे खाद्यपदार्थ विकणारे लोक मला कधीच आपलेसे वाटले नाहीत. मात्र पापड, कणीस, फुटाणे विकणारे ते लोक आणि त्यांनी काही सुट्या पैशाच्या मोबदल्यात दिलेले ते जिभेला चव देणारे पदार्थ आपलेसे वाटत असत. त्याची चव सिनेमा संपला तरी ओठावर रेंगाळत राही.

थियेटरमध्ये असणारे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, तिथल्या गळक्या तोटयांना साखळीने बांधून ठेवलेला स्टीलचा ग्लास आणि थियेटरमधल्या मुताऱ्या हा आपल्या स्वच्छतेचा मानक मानला तर आपण अश्मयुगीन स्वच्छतेत जगतो आहोत असे वाटावे इतकी स्वच्छता तिथे असे ! एकामागे एक रांगेत उभी असलेली माणसे बघून आपण तिथे न गेलेले बरे असा कोल्ह्याला द्राक्षे आंबट ह्या टिपिकल मराठी मानसिकतेचा विचार करत मी सीटवर बसून राहणे पसंद करे. मध्यंतर संपून सिनेमा पुन्हा चालू झाला तरी काही बुद्धी भ्रष्ट झालेले असंतुष्ट आत्मे सतत येजा चालू ठेवत असत. ही लोकं पिक्चरला का येतात असा प्रश्न मला राहून राहून पडत असे.

आपल्या हिरोचा फेव्हरीट डायलॉग झाल्यावर किंवा एखादं गिर्रेबाज गाणं झाल्यावर शिट्ट्यांचा गदारोळ उडून जाई. कधीकधी लोक चिल्लर पैसे उधळत असत. 'ही नाणी कोणती आणि कशी असतात' या उत्सुकतेपायी एकदा ही नाणी पुढे पळत जाऊन गोळा केली अन हिरमुसून गेलो. कारण ती नाणी नव्हती तर कोल्डड्रिंक्सच्या बाटल्यांची झाकणे होती ! लोक आपल्या आवडत्या हिरो हिरोईनला देखील फसवतात याचे तेंव्हा जाम वाईट वाटले होते. ही टोपणे फेकणाऱ्या लोकांना बाकीचे पब्लिक मनातल्या मनात किती शिव्या देत असेल याचा मला आनंद वाटला पण पुढच्याच क्षणाला वाईट वाटले होते कारण माझ्या खुर्चीवर एका दांडग्या इसमाने अतिक्रमण केले होते. रांगेबाहेर भिंतीच्या कडेला लावलेल्या त्याच्या पत्र्याच्या फोल्डिंग खुर्चीवर राहिलेला सिनेमा पहावा लागला होता. काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखा सगळ्यांपासून दूर असल्यागतचा फिलिंग तेंव्हा आला होता. काळ्या बाजारात जास्तीची तिकिटे विकून झाली की त्या पब्लिकसाठी ही लोखंडी खुर्च्यांची सोय असे. बऱ्याचवेळा या खुर्चीवरही 'साईज'नुसार दोनेक जणांना कोंबून बसवलेले असे.

या सारया जाम्यानिम्यात जर का चुकून लाईटने 'हे राम' म्हटले की काहीच धडगत नसे. थियेटरमध्ये बऱ्याचवेळा जनरेटर नसे अन जरी असलेच तरी ते नादुरुस्त असे. पंखे बंद पडत, शिव्यांचा सुकाळ सुरु होई आणि लोकं खुर्च्या बडवायला सुरु करत. पुन्हा यमदरबारीचा सकाळचा तो डोअरकीपर आत येई अन गोंगाट करणारया, बडवाबडवी करणाऱ्याला बरोबर हेरून त्याच्या बखोटास धरून ओढून काढे. काही वेळाने वीजपुरवठा सुरळीत होई. प्रोजेक्टर रूममधून प्रकाशझोत थेट पडद्यावर पडे तेंव्हा काही लोकांना आपला हाथ जगन्नाथ असल्याची आठवण होई अन ते त्या झोतात आपला हात खुपसत. समोर पडद्यावर त्याची सावली पडे अन ह्या नाठाळ लोकांची तृप्ती होऊन जाई. बऱ्याच वेळा सिनेमाची रिळे लोड करताना प्रोजेक्टर चालविणाऱ्या नररत्नाने जर कात्री चालविली की त्याला घरी जाऊन कान धुवून घ्यावे लागतील इतक्या अभद्र, अश्लील शिव्या खाव्या लागत.

सिनेमा संपायच्या काही मिनिटे आधीच काही लोकं दाराजवळ जाऊन उभी राहत, तर काही बागेत चालायला आल्यासारखे सावकाश उठून उभे राहत आणि जमतील तितक्या लोकांचे पाय कचकून तुडवत पुढे जात राहत. यांच्या मागेपुढे होणाऱ्या आकृत्यातून क्लायमॅक्सचा तुटक तुटक आनंद घ्यावा लागे. स्थानक कोसो दूर असताना हातातल्या बॅगा सांभाळत ट्रेनच्या दारापाशी जाऊन उभे राहणारे लोक हेच असावेत असा मला राहून राहून संशय येई. सिनेमा संपल्यावर देखील काही लोकांची घाई सुरुच असे. आजूबाजूच्या लोकांना जमेल तितके मागे रेटून आपला अक्राळविक्राळ देह पुढे नेण्याचे हे कसब वाखाणण्याजोगे असते. आपली दोन पायाची सायकल घेऊन थियेटरच्या बाहेर पडताना तिथली पोस्टर्स पुन्हा खुणावू लागत.

त्या काळी आमच्या इथे 'यल्ला-दासी' नावाची चित्रकार कम पेंटर जोडी होती. ही जोडी ऑईलपेंटमधली अप्रतिम पोस्टर्स बनवायची. बरयाचदा हे पोस्टर बनवायचे काम थियेटरच्या मागील बाजूस चाले. ही पोस्टर्स रंगवली जात असताना तिथं उभं राहणे हा देखील एक आनंद सोहळा असे. आता मल्टीप्लेक्सच्या बाहेर डिजिटल फ्लेक्सचे पोस्टर्स असतात. मी अगदी छातीठोकपणे पैजेवर सांगतो, ही डिजिटल पोस्टर्स त्या ओरीजिनली कलर्ड पोस्टर्सपुढे अगदी निर्जीव वाटली असती. आज ते लोक हयात नाहीत आणि त्यांची रसरशीत पोस्टर्स देखील दिसत नाहीत. ती सिनेमागृहे म्हणजे अस्सल फळांचा रस देणारी ती रसवंती होती आता पॅकेज्ड फ्रुट ड्रिंक्सचा जमाना आहे. डोअरकीपर हा तेंव्हा खूप मोठा माणूस वाटायचा, त्याच्याशी ओळख असणे अभिमानाची बाब होती. मॉर्निंग, मॅटिनी आणि रनिंग या तिन्ही शोची वेगवेगळी नशा या थिएटर्सना असे अन इथल्या चाहत्यांचा कल्लोळ जीवघेणा असला तरी ती नशा आणि तो कल्लोळ हवाहवासा वाटे.

सतराशे साठ वाहिन्या, इंटरनेट आणि बेचव मल्टीप्लेक्सच्या जमान्यात ही जुनी चित्रपटगृहे वय वाढलेल्या अन आयुष्याच्या संधीकाळात थकून गेलेल्या जराजर वृद्धांसारखी झाली आहेत. कुठे कुठे ह्या जीर्ण इमारती पाडून तिथे अलिशान इमारती उभ्या राहत आहेत. आता पब्लिकही तसेच झाले आहे, सकाळी प्रपोज, दुपारी सेटिंग आणि संध्याकाळी ब्रेकअपच्या या फास्ट जमान्यात सुखसोई आणि सुविधा यांना महत्व जास्त असणे साहजिक आहे. रंगी बेरंगी लाईट्स, सायलेंट म्युझिकच्या लयीत उभी असणारी मल्टीप्लेक्स मला कागदी फुलांसारखी वाटतात. त्यात अस्सल सुगंध आणि सच्चेपणा नाही. आहे तो फक्त बाजारू दिखाऊपणा !

ती अशी का बनली आहेत याचे कारण आजच्या जगाकडे पाहिले की आपसूक मिळते कारण आजचे जगच मुळी दिखाऊपणावर अधिक भर देणारे आहे. त्याला कशाच्याही खोलात जायचे नाही, सगळे कसे कृत्रिम आणि बेगडी ! मग ह्या जुन्या थियेटर्सचे इथे काय काम ? मी मात्र ह्या जुन्या थियेटरमधे रमतो, त्या कललेल्या दिवसांना कवेत घेतो. डळमळीत झालेल्या खुर्चीत बसून इथल्या पोपडे उडालेल्या भिंतीत आठवणींचा धांडोळा घेतो. आयुष्यातले हरवलेले क्षण ओलेत्या डोळ्याने आठवत त्या रुपेरी पडद्याकडे टक लावून स्वतःला शोधत राहतो....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा