Saturday, February 3, 2018

राजाच्या दरबारी - दुखवटा !


मिशावर ताव देत भालदार आरोळी देतो, "सावधानमेहरबानकदरदानराजाधिराज सिंहासनाधिश गप्पेश्वर संस्थांननरेश राजा अर्धचंद्रजी यांचे आगमन होत आहे !! " 
चोपदार ( भालदाराला ढूसणी देत बारीक आवाजात )  - "ते बारदाण म्हणायचं विसरलास की !"
भालदार - (ओठात जीभ चावत)  - "खरंच की राहिलं गड्या." 
जबडा हलवत पोटावरून हात फिरवट महाराज आपल्या आसनावर आरूढ होतात.
चुटकी वाजवून इशारा देतात आणि दरबारातील कामकाजास सुरुवात होते. 

प्रधानजी - "महाराजहे काय आज कामकाजास सुरुवात करायची ?"
महाराज (भुवया उंचावत ) - "त्यात काय गैर आम्ही समजलो नाही ?"
प्रधानजी - "ते आपलं दुखवटयाचं काय ?.... म्हणजे आज तिसरा दिवस ना ?"
महाराज (बगलेत खाजवत) - "मग माती सावडून या की ! दरबाराचा काय संबंध ? "
प्रधानजी (बुचकळ्यात पडलेल्या चेहऱ्याने) - "माझं कोण मेलं नाही ओ ! ते काल तुम्हीच म्हटला होतात ना, (महाराज मुकुट काढून डोकं खाजवतात आणि पुन्हा मुकुट घालतात)
महाराज - "कुणाचं काय म्हटलो मी आजकाल काहीच कसे आठवेना बुवा ? (हळूच उजवा पाय उचलतात आणि हलके होतात. भालदार चोपदार गुपचूप टाळी देतात)
प्रधानजी - (झर्रकन वळवून) "राजवैद्यहे काय चाललं आहे तुम्ही महाराजांना शंखपुष्पी देताय की आणखी काही भलतं सलतं देताय ?" (महाराज सलवारीचा सोगा आवळून धरतात आणि तोंडाचा चंबू करून पाहू लागतात)
राजवैद्य - (फिदीफिदी हसत ) "त्याचं काय झालं की... आं आं (प्रधानजी त्यांच्याकडे दात ओठ खाऊन बघू लागतात) सांगतो राजे ..सांगतो ...झालं असं की माझ्याकडे नवीन सेवक आलाय त्याने चुकून शंखपुष्पीऐवजी पेटसफा दिलेय. त्याने मला आज सकाळीच ही गडबड कबूल केलीय !"
महाराज - (पुन्हा उजवा पाय उचलतपोटावरून हात फिरवत) "इकडे माझ्या पोटात गडबड सुरु आहेकामकाज लवकर आटपा आणि त्या सेवकाला मी सांगतो तो दंड द्या ! "
प्रधानजी - "माफी असावी महाराज. तुम्हीच म्हणाला होतात दुखवटयाचे म्हणून मी विषय काढला होता. त्या आपल्या लाडक्या अभिनेत्री वारल्या नाहीत का ... आं .. आं ..त्यांचे बद्दल तुम्ही म्हटला होतात ना ?"
महाराज काही तरी आठवल्यासारखं करत आपला हसरा चेहरा लगेच दुःखद करतात. 
महाराज (शेला डोळ्यांना लावत) - "होय प्रधानजी ... आम्ही खूप दुःखात आहोत..आपली सगळी प्रजा दुःखात आहेअखंड राज्य दुःखात आहे !"
प्रधानजी पुढे होतात आणि राजांच्या डोळ्यांना समोरील तबकातील रेशमी रुमाल लावतात. 
महाराज - "अहो हे काय करताय आज स्नान उरकत असताना पाणी कमी पडले आणि डोळ्याची चिपडे काढायची राहूनच गेली ती साफ करत होतो मी !"
प्रधानजी झटकन हात मागे घेत - "असं होय मला वाटलं की आपल्याला अश्रू अनावर झाले !" 
महाराज - होय मला दुःख तर फार झाले... (पोटावरून हात फिरवत ढेकर देत) अगदी जेवण देखील गेले नाही हो ... (समोरील तबकात ठेवलेल्या सुक्या मेव्याकडे बघत) पोट अगदी खायला उठलेय हो पण मी जिभेवर ताबा ठेवून आहे...पण माझी अवस्था फार वाईट आहे. (पुन्हा पाय उचलू लागतात तेंव्हा प्रधानजी चेहरा मागे वळवतात)
प्रधानजी - "होय महाराज आपली प्रजा देखील मागील छत्तीस तासात खूप दुःखात आहे कुणीही जेवलेलं नाही सगळे आपआपल्या वॉलवर शोकमग्न आहेत.."
या संभाषणाने हुरूप चढलेले दिवाणजी पुढे होत बोलतात - "मागे ते अभिनेते वारले होते ना ते आपले विनोद तावडे ! ते नाही का कुर्बानी सिनेमात समुद्र किनाऱ्यावरती कपडे -" इतक्यात प्रधानजी त्यांच्या तोंडावर हात ठेवतात आणि खडसावून बोलतात - 
"अरेच्चा ते तावडे नाहीत वोते खन्ना होते ! आणि तुम्ही तर एकदम समुद्र किनाऱ्यावरच्या सीनमध्येच घुसून राहिले ना या वयात हे सीन ही आवड ! ही स्मरणशक्ती ! (दिवाणजींच्या  तोंडाचा आ वासलेला तसाच राहतो) तेंव्हा देखील आपली प्रजा खाऊन पिऊन फार दुःखात होती बघा महाराज !"
महाराज - "मग हे तावडे कोण ?"
प्रधानजी - "ते आपल्या डोक्याबाहेरचं प्रकरण आहे महाराज त्यावर आपण नंतर बोलू... आधी दुखवटयाचा विषय क्लिअर करू.... विषयपत्रिका नील केली की विरोधी पक्ष गार होतो असं लोकसत्तेत कालच वाचलंय !"
महाराज - (पुन्हा एकदा ढेकर देत ) - "त्या बाई गेल्या आणि माझी चान्नी गेली असं वाटू लागलं हो ! (ओठावरून जीभ फिरवत) आता मी आभाळात काय बघू माझी चान्नी गेली ना ?"
प्रधानजी - (कंबरेची तलवारीचे म्यान विनाकारण घट्ट करत) - "पण राणीसाहेब तर अजून हयात आहेत ना !"
महाराज - (सुस्कारा टाकत) - "तेच तर दुखणे आहे ना !" 
महाराजांचे उत्तर ऐकून सगळा दरबार जागेवर उडतोप्रधानजी जागेवर आडवे होतात. 
महाराज अंगरखा नीटनेटका करत - "तसं नाही हो ! त्यांचे दुखणे सुरु आहे असं म्हणायचं होतं मला. बिलोरी शयनकक्षातल्या रुपेरी चंद्राला अनंताचे ग्रहण लागल्यावर राजाची साधीभोळी नजर निळ्याकाळ्या अस्मानातील सहस्त्रावधी चांदण्यावर पडली तर त्यात गैर ते काय असं वाक्य मी कालच फेसबुकवर वाचलं आहे !"
राजवैद्य - "महाराज इतकी लंबीचौडी वाक्ये बोलू नयेतआपणास दम लागेल "
दिवाणजी - "राजवैद्यजी तुम्हाला फेकू नका असे म्हणायचे होते का की  तुम्ही मुद्दाम तो शब्द लपवून बोलू नका हा शब्द वापरलात ? (हातावर मूठ आपटत) बोला राजवैद्य कधी तरी खरे बोला ! अन्यथा मी तुमची कडी निंदा करतो !"
गृहमंत्री (टकलावरून हात फिरवत)  - "णीशेध ! घोर णीशेध ! कडी निंदा करण्याचा अधिकार फक्त माझाच आहेअन्य कुणी ते शब्द वापरू शकत नाही !"
अर्थमंत्री (आपले तुरळक केस खाजवत सदरा ठीक करत) - "गृहमंत्री महोदय त्या शब्दांचे पेटंट कालच्या बजेटमध्ये सार्वजनिक केलेलं आहेआणि दयाळू महाराजांनी त्या शब्दावरील जीएसटी रद्द करून आपल्या मोठ्या मनाची पुन्हा एकदा ग्वाही दिली आहे !"
प्रधानजी - "दरबारी मानकऱ्यांनो किती बोलाल तेही राजांच्या समोर किती हा उपमर्द ?(उपमर्द शब्द उच्चारताना त्यांना ठसका लागतो)
महाराजांचे पोटावरून हात फिरवणे आणि उजवा पाय उचलणे याकडेच सगळे लक्ष केंद्रित आहे. हळूच ते खिशातून मोबाईल बाहेर काढतात आणि राणीसाहेबांना फोन लावून बारीक आवाजात सांगतात - "हे बघा राणी साहेबामुदपाक खान्यात फोन करून खात्री करून घ्याआज दुखवटयाची स्पेशल पायनॅपल बासुंदी करा म्हणावं.. दुखवटा थाटात व्हायला पाहिजॆफेसबुक व्हॉटसऍप ट्विटरवर पोस्ट करायच्या म्हणजे एनर्जी हवी ना !" 
प्रधानजी चोरपावलाने महाराजांच्या जवळ जाऊन उभं राहून ऐकण्याचा प्रयत्न करतात. 
महाराजांचा संवाद ऐकून त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. 
प्रधानजी - "महाराज खूप दुःखात आहेत. प्रजाही दुःखात आहेदरबार दुःखात आहे, (दरबारातील सगळे मानकरी आपआपल्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेलेमहाराजही आपला मोबाईल हळूच अंगरख्याच्या चोरकप्प्यात ठेवताहेत) आणि मीही हाडामांसाचा माणूस आहे तेंव्हा महाराजांचा आदर्श घेऊन मलाही दुखवटा साजरा आं आं (जीभ चावत) माफ करा पाळण्यासाठी वेळ हवायतेंव्हा आजचे कामकाज स्थगित करून दरबार बरखास्त केला जावा अशी मी सूचना मांडतो.
दिवाणजी खुनशीपणे राजवैद्याकडे बघत उठतात - "हरकत नाही या सूचनेस माझे अनुमोदन आहे. पण एक काम राहिलेच की !"
सगळेजण दिवाणजींकडे प्रश्नांकित मुद्रेने पाहू लागतात. 
दिवाणजी - "ते आपल्या राजवैद्याच्या सेवकाला सजा फर्मावयचे राहिले की महाराज. आपल्याला आठवण करून देणे हे माझे परमकर्तव्य आहे ."
महाराज - (ताठ बसत मुठी आवळत मिशीला पीळ देत) - " खरे आहे दिवाणजी तुमचे ! तर आम्ही सजा फर्मावत आहोत. राजवैद्यांच्या सेवकाने पीएनबी बँकेच्या गीतांजली शाखेत त्याच्या पत्नीचा हिऱ्याचा हार गहाण टाकावा आणि येणाऱ्या रक्कमेचे लेटर ऑफ अंडरस्टँडिंग राज्याच्या खजिन्यात जमा करावे ! आजचे कामकाज इथेच संपुष्टात आणण्यात येत आहे. उद्या दरबार पुन्हा भरेल. " 
प्रधानजी - "वाह वा !! काय न्याय दिलाय ! न्याय द्यावा तर आमच्या राजेसाहेबांनीच ! "
सगळे घोषणा देऊ लागतात, "राजे अर्धचंद्रराव महाराजांचा विजय असो !"
महाराज सिंहासनावरून उठून शयनकक्षाकडे मार्गस्थ होतात. 
वाटेत त्यांच्या मोबाईलवर राणीसाहेबांचा कॉल येतो. महाराज फोन घेतात आणि बोलू लागतात, "तुम्ही पाटताट तयार ठेवा. दुखवटयाचे स्पेशल भोजन होताच आज दुपारीच आपण खरेदी करायला जाऊ !"

समीर गायकवाड.

(हे विडंबनात्मक प्रहसन आहे. यात कोणाच्या भावना दुखवणे वा खिल्ली उडवणे हा उद्देश नाही)