रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८
श्रीदेवी - नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..
काल 'ती' गेल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्या लोकात अमोल पालेकरांचा समावेश होता याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्याला कारणही तसेच होते. लकवा मारलेल्या फुम्मन (अमोल पालेकर) या कुरूप अजागळ नवऱ्याच्या उफाड्याच्या बांध्याची षोडश वर्षीय पत्नी मेहनाची भूमिका तिने एका चित्रपटात केली होती ! १९७८ मध्ये आलेला हा चित्रपट होता 'सोलवा सांवन' ! याचे तमिळ व्हर्जन (पथीनारु वयतीनील - सोळावा श्रावण ) तिच्याच मुख्य भूमिकेने अफाट गाजले होते. त्यात रजनीकांत आणि कमल हासन होते. हिंदीत मात्र अमोल पालेकरांसोबत हीच केमिस्ट्री जुळली नाही. ती काही फारशी रूपगर्विता वगैरे नव्हती. तिचे नाक किंचित फेंदारलेले होते, ओठही काहीसे मोठे होते, वरती आलेले गोबरे गाल, कुरळे केस आणि बऱ्यापैकी सावळा रंग असा काहीसा तिचा इनिशियल लुक होता. तिचे सुरुवातीचे तेलुगु - तमिळ सिनेमे पाहिल्यावर हे लगोलग जाणवते. मात्र तिच्याकडे काही प्लस पॉइंट होते, कमालीचे बोलके डोळे, काहीसा सुस्कारे टाकल्यासारखा खर्जातला आवाज, सशक्त अभिनय आणि अत्यंत आखीव रेखीव आकर्षक देहयष्टी ! तिने स्वतःच्या रुपड्यात आमुलाग्र बदल करत 'रूप की राणीत' कधी कन्व्हर्ट केले कुणालाच कळले नाही. काल ती गेल्यावर याची जाणीव प्रकर्षाने झाली.
१९६९ मध्ये चेन्नैच्या प्रसिद्ध एव्हीएम स्टुडीओमध्ये सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन आणि सौंदर्यवती नायिका जयललिता यांच्या 'नाम नाडू' (आपला देश) या तमिळ सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते. एनटीआर आणि जया यांच्या 'कथानायकूडू' या सुपरहिट तेलुगु सिनेमाचा हा रिमेक होता. मूळ चित्रपटात नायिकेचे काम निभावलेले असल्याने रिमेकच्या सेटवर जया निवांत बसून असत आणि इतर कलाकारांच्या सीन कम्प्लीशननंतर एमजीआर सोबतच्या टाईम शेअरिंगसाठी थांबत. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की चित्रपटाच्या सेटवर एक बालकलाकार मुलगी आपलं शुटींग संपलं की अवखळ बाललीलांनी सर्वांना दंग करून टाकतेय. एका सीननंतर अम्मा जयललितांनी तिला मांडीवर घेतले आणि तिचे फुगीर गाल चिमटीत धरत तिला कवेत घेतले. 'एक दिवस ही मुलगी स्टारडमची सिम्बॉल असेल' असे तेंव्हा जयललितांनी भाष्य केले. याला फार कुणी गांभीर्याने घेतले नाही. कारण अशा घटना रोज शेकड्याने घडत असतात. सर्वांची भाष्ये खरी होतील याचा नेम नसतो. पण जयांनी वर्तवलेले ते भाष्य खरे झाले. ती चिमुकली होती श्रीअम्मा येण्जेर अयप्पन उर्फ श्रीदेवी !
काल श्रीदेवीचे अकस्मात निधन झाले. चित्रपटसृष्टीतले लोक निवर्तले की सोशल मिडीयावर एक लाट येत असते जी अवघ्या काही दिवसात लयास जाते. ताजा किस्सा आठवा ! विनोदखन्नाच्या निधनाच्या वेळेसही अशी लाट आली होती. हे लोक असले काय आणि नसले काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काडीचा फरक पडत नसतो. त्यांचे आणि सामान्य माणसाचे दुरान्वयानेही संबंध नसतात. तरीही सामान्य माणूस अशा दुःखद घटना घडल्या की सुस्कारे सोडतो. वाईट झाले असं म्हणत गेलेल्या व्यक्तीच्या फिल्मी स्मृतींचे रंजन करत बसतो. पुन्हा काही तासातच या घटनेला विसरून पुन्हा आपल्या दिनचर्येत बुडून जातो. असं असूनही तो दरवेळेस का शोकमग्न होतो याचे उत्तर सामान्य माणसाच्या फिल्मी दुनियेशी असलेल्या नात्यात आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मापासून ते अंतापर्यंत एक आठवणीचा शेला विणत असतो. आठवणीच्या या शेल्यात खाजगी आठवणींसह काही कालसापेक्ष आठवणी असतात ज्यात सिनेमा, साहित्य, कलात्मकतेशी निगडीत अन्य बाबी असतात. वाढत्या वयासोबत आपण रुपेरी पडद्यावर ज्याच्याशी एकरूप होऊ पाहतो अशी एक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात असतेच. आपली सुखदुःखे आणि आपली प्रतिमा आपण त्यात पाहू लागतो अन इथेच फिल्मी व्यक्तीरेखांशी आणि त्यांनी निभावलेल्या पात्रांशी एक अदृश्य पण घट्ट भावबंध तयार होतो. अशी एखादी आवडती फिल्मी हस्ती अचानक एक्झिट घेते तेंव्हा मग नकळत हुरहूर लागते आणि त्या नटाच्या आठवणीसोबत आपण आपल्याही आठवणींना नकळत उजाळा देत राहतो. श्रीदेवीबाबतचे फिलिंग्ज असेच आहेत.
दिग्दर्शक के. बालचंदर श्रीदेवीला भेटले नसते तर तिची सिल्क स्मिता झाली असती हे नक्की अशी एक वेळ होती. श्रीदेवी आणि सिल्क मध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. १३ ऑगस्ट १९६३ रोजी तमिळनाडूच्या फटाक्यांच्या गावात शिवकाशीत जन्मलेल्या श्रीदेवीचं बालपण आर्थिक मगजमारीचं नव्हतं पण तिला समाधानही नव्हतं. तिचे वडील तमिळ भाषिक होते आणि आई तेलुगु भाषिक होती. तिच्या वडीलांची दोन लग्ने झालेली. सावत्र नाती जगताना तिच्या आनंदाच्या उर्मीला अधिक बळ प्राप्त झाले. तिचा अल्लडपणा मात्र या काळात दबला गेला. पेशाने वकील असणारया तिच्या वडीलांनी तिच्यातले वेगळेपण जोखले आणि आपल्या ओळखीने चित्रपटसृष्टीची दारे तिला खुली करून दिली. कमल हासन, रजनीकांत, शिवाजी गणेशन ,एमजीआर, ए नागेश्वर राव, चिरंजीवी यांच्या सोबत तिने पडदा गाजवला. आपलं नाव कुणाशी जोडलं जाऊ नये यासाठी सुरुवातीच्या काळात ती खूप काळजी घेई. तिच्यात व्यावसायिकता भिनलेली होती. कदाचित बालपणीच्या कौटुंबिक नात्यांच्या एक्स्पोजरला मुकावं लागल्याने तिने स्वतःला ही बंधने घातली असावीत. पण याचा तिला प्रचंड फायदा झाला. ती वेळेची पक्की होती, तिची निवडही निश्चित होती. त्याच बरोबर प्रारंभीच्या काळात हात दिलेल्या दाक्षिणात्य निर्मात्यांना तिने कधी अव्हेरले नाही. तिला उपकारांची जाण होती. सहकलाकारांविषयी ती आदरभाव बाळगे. जितेंद्रसोबत दक्षिणेच्या निर्मात्यांशी काम करताना तिने अनेकांची तिजोरी खच्चून भरली. पद्मालया, एव्हीएम, कृष्णा, प्रसाद हे तिचे होमस्टुडीओ होते. इथले तिचे वर्तन आढ्यताखोर नसे, एका सामान्य माणसासारखा तिचा व्यवहार असे. ती स्वतःच्या किंमतीबाबत फ्लेक्झीबल नव्हती म्हणूनच तिला अनेकांनी विविध रोलसाठी आपल्या प्रोजेक्टमध्ये कास्ट केले.
इलायराजा, श्रीदेवी आणि एस.जानकी हे साऊथमधले हिट कॉम्बो हिंदीत चालले नाही. मात्र श्रीदेवी सुपरस्टार झाली. यश तिला रातोरात मिळालेलं नव्हते. तर त्या मागे तिची जिद्द आणि चिकाटी होती. १९७५ मध्ये हॉट 'ज्युली' आला होता. त्यातलं 'याद नही अब कुछ भूल गया सब कुछ' हे आजही अनेकांचे फेव्हरीट लव्ह सॉंग आहे. यात श्रीने अभिनेत्री लक्ष्मीच्या कुमार वयीन बहिणीचा रोल अदा केला होता. ती फारशी लक्षात देखील राहिली नाही. त्या नंतर पुन्हा चेन्नै - मुंबई अशा वाऱ्या करत राहिली पण तिने हार मानली नाही. अखेर तिने दक्षिणेच्या निर्मात्यांनाच बॉलीवूडवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडले. परिणाम चांगले आले. १९८३ मध्ये 'बिना फाटक की रेल्वे लाईन'सारख्या फालतू संवादाची रेलचेल असलेल्या 'हिंमतवाला'ने तिला हात दिला. भांड्याची रास रचलेले, साड्यांचे असंख्य फेर बांधलेले, नानाविध वस्तूंची चळत रचलेले आणि भल्या मोठ्या वाद्यांचे, नानाविध नगांचे सेट उभे केलेले अन त्यात मधोमध नाचणारे जितेंद्र आणि श्रीदेवी पब्लिकच्या आवडीचे, परीचयाचे झाले. त्यांच्या स्टेप्स आणि त्यांचे अजिबोगरीब पद्धतीचे चित्रीकरण डोक्यावर घेतले गेले. 'झोपडी में चार पाई' पासून ते 'आंखे तो खोलो स्वामी' सारखी तद्दन फालतू गाणी लोकप्रिय झाली. 'मवाली', 'मकसद', 'तोहफा', 'जस्टीस चौधरी', 'धर्माधिकारी', 'अकलमंद', 'सरफरोश (१९८५), 'घर संसार', 'आग और शोला', 'सोने पे सुहागा'सारखे अनेक आचरट सिनेमे या जोडीने दिले. या काळात तिची जोडी सहनायिका म्हणून जयाप्रदाशी जुळली. चित्रपटात या दोघींच्या नृत्याची जुगलबंदी सुरु झाली की पब्लिक फुल शिट्या वाजवी. श्रीदेवीचे हे सिनेमे म्हणजे डोक्याला ताप नाही या श्रेणीतले होते. निव्वळ पिटातले पब्लिक डोळ्यासमोर ठेवून ते तयार केलेले. राजेशखन्ना सोबतचे 'नया कदम', 'नजराणा' आणि 'मास्टरजी' हे सिनेमे म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अशा धाटणीचे होते तरीही तिने ते केले. दोघांनाही याचा फारसा फायदा झाला नाही की तोटाही झाला नाही. पण तिचे पडद्यावरचे अस्तित्व टिकून राहायला याची मदत झाली.
१९८३ त कमल हासनचा 'सदमा' आला होता. बॉक्स ऑफिसवर याने पाणीही मागितले नाही इतकी त्याची दुर्गती झाली. यात एक तरुणाच्या प्रेमाची शोकांतिका होती. कमलने आपल्या कारकीर्दीचा सर्वोत्कृष्ट अभिनय सकारत हा सिनेमा आपल्या नावावर अजरामर करून ठेवला. मात्र यात नायिकेचे काम करणाऱ्या श्रीदेवीला मात्र फारसा काही चमत्कार करता आला नाही. परिणामी तिच्या अभिनयाची फारशी चर्चा झालीच नाही. तिनेही याची कधी खंत व्यक्त केली नाही. पण याचे उट्टे नंतर भरून काढले. १९८७ चा 'मिस्टर इंडिया' हा खरा तर फॅन्टसीप्रधान नायकाचा सिनेमा होता. पण श्रीदेवीने अशी काही जादू दाखवली की अनिल कपूरचा जादुई नायक अगदीच फिका पडला. हा सिनेमा तिने असा काही खाल्ला की तिच्या 'हवा हवाई'ची भुरळ विद्याच्या ताज्या 'तुम्हारी सुलू'मध्ये जाणवली. तिने या भूमिकेत दाखवलेला अवखळपणा आणि अल्लडपणा तिच्या वाट्याला आलेल्या बालपणात कदाचित हरवून गेला असावा, ज्याचा आनंद तिने इथे घेतला. तिची ही भूमिका अत्यंत सशक्त होती.
१९८४ मध्ये तिने मिथुन सोबत राकेशरोशनच्या प्रॉडक्शन हाऊसचा 'जाग उठा इन्सान' केला आणि त्यांच्यात काही तरी शिजतेय असा प्रवाद झाला. सिनेमा खूप चालला. अभिनयासाठी मिथुनला कधी नव्हे ते समीक्षकांनी मार्क्स दिले. पुढे जाऊन श्रीदेवीने मिथुनसोबतच १९८८ मध्ये 'वक्त की आवाज' केला आणि त्यांच्या संबंधाचे गॉसिप चवीने चघळले जाऊ लागले. या काळात ती त्याच्या इतक्या जवळ गेली होती की त्याचा संसार मोडण्याच्या बेतात होता. आजही काही फिल्मी क्रिटीक्स या दोघांनी तेंव्हा विवाह केल्याचे लिहितात तेंव्हा याला पुष्टी मिळते. पण यावर श्रीदेवी कधीही जाहीर व्यक्त झाली नाही, तिने कमालीचा संयम दाखवला. कधीही मिथुनकडे बोट दाखवले नाही. यामुळे ही चर्चाही लवकरच थंड्या बस्त्यात गेली. मात्र श्रीदेवीच्या प्रेमाचे हरपलेलं हे तेज 'चांदनी'त (१९८९) असं काही दाहकतेनं चमकलं की रुपेरी पडदा तेजोमय झाला. ती चोप्रांची फेव्हरीट झाली. त्यांनी तिला 'लम्हे' मध्ये रिपीट केले. या काळात तिने नेसलेल्या साड्यांची इतकी क्रेझ होती की तिच्या सिनेमांच्या नावाने सर्व देशभरातल्या दुकानात प्रचंड खपाने साड्या विकल्या जात, तिच्या प्लेन कलर्ड 'चांदनी'साड्यांनी तर कहर केला होता. 'मेरे हाथो में नौ नौ चुडिया'ची तिची नखरेल अदा कुणीच विसरणार नाही.
'सीता और गीता'चा देखणा रिमेक असलेला पंकज पराशरचा 'चालबाज' (१९८९) मध्ये आला आणि तिच्या अभिनय सहजतेची आणि कौशल्याची सगळीकडे स्तुती होऊ लागली. यातले अत्यंत विरुद्ध टोकाच्या जुळ्या बहिणींच्या भूमिकेचे कॉन्ट्रास्ट तिने असे काही टिपले होते की रसिक एकाच वेळी घायाळही झाले आणि साश्रूनयनांनी भारलेही गेले. यातलं रजनीकांत आणि सनी देओल यांचं अस्तित्व तिच्या अभिनयानं नगण्य केलं. सफाईदार काम कसे करावं याचा आदर्श या चित्रपटात तिने घालून दिला. यातल्या 'न जाने कहां से आयी है ये लडकी'चा लडिवाळ, खोडकर अविष्कार कोण बरे विसरेल ! डझनभर सिनेमे काढून कर्जबाजारी होण्याच्या उंबरठयावर असलेल्या हरमेश मल्होत्रांना तिच्या रूपाने लॉटरी लागली. त्यांचे दुकान पुन्हा जोमाने उभं राहिले कारण 'नगीना' ! भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या सिनेमाचे नाव वेगवेगळ्या कारणाने नमूद आहे. याने अनेकांना अक्षरशः वेड लागले, यातील गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. स्नेकी लेन्सेस बसवलेल्या श्रीने कमाल केली. ऋषी कपूर सारख्या आउटडेट होत चाललेल्या नौकेसही यामुळे गती मिळाली. 'मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा' या गाण्यावर फुत्कारणारी श्रीदेवी विसरणं अशक्य आहे. पोस्टरवरची तिची दोन्ही हातांनी फणा उगारल्याची पोझ आजही डोळ्यापुढून हटत नाही. या 'नगीना'चा सिक्वेल 'निगाहे'च्या रूपाने आला होता पण त्याची फारशी जादू चालली नाही.
धर्मेंद्र, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ पासून सनी देओल, अक्षय, सलमान, शाहरुखशीही तिने जोडी जमवली होती. विनोदखन्ना सोबत गर्जना आणि फरिश्ते असले नावंही लक्षात न राहणारे सिनेमे तिने केले होते. 'कर्मा'सारख्या मल्टीस्टाररमध्ये विनाकारण कामही केले तर चंद्रमुखी, गुरुदेवसारखे टाकाऊ सिनेमेही केले. महानायक अमिताभसोबत काम करण्याची तिची इच्छाही दरम्यान 'आखरी रास्ता', 'इन्किलाब' आणि 'खुदागवाह'च्या रूपाने पुरी झाली. १९९४ मध्ये 'लाडला' आणि १९९७ मध्ये 'जुदाई'ने तिने पुन्हा अनिल कपूरसोबत आपण बेस्ट परफॉर्म करू शकतो आणि चौतीसाव्या वर्षीही आपल्यात चार्म आहे हे तिने सिद्ध केले. या काळातच ती कपूर कुटुंबाच्या इनर सर्कलमध्ये शिरली होती. १९९६ मध्ये निर्माता बोनी कपूरने आपली पत्नी मोना शौरी कपूर हिला घटस्फोट दिला आणि श्रीदेवीशी विवाह केला. तिच्या पासून त्याला जान्हवी आणि ख़ुशी या मुली झाल्या. श्रीदेवीने कपूर कुटुंबात आपलं वेगळेपण जपताना आपला सावत्र मुलगा अर्जुनकपूरशी ज्या पद्धतीने नातं निभावलं ते बॉलीवूडसाठी आदर्श ठरावं. तिच्या फिल्मी करिअरमधे अनेक टुकार आणि फालतू सिनेमांची खंडीभर यादी आहे हे तिच्या असुरक्षित वृत्तीचं प्रतीक ठरावं. एनटीआरसोबतचे तिचे 'कोंडा विटी सिंहम' आणि 'सरदार पापा रायडू' हे सिनेमे तेलगूमधील ओ की ठो कळत नसतानाही आमच्या सोलापुरातील श्रीनिवास थियेटरमध्ये बघितल्याचे स्मरते. कारण तिची ठसकेबाज अदाकारी आणि लाघवी सौंदर्य. श्री हिंदी इतकीच साऊथमध्ये चमकली. तमिळ आणि तेलुगुची ती वन ऑफ द ऑलटाईम फाईनेस्ट हिरॉईन राहिली हे तिच्या यशाचे सर्वोच्च मानबिंदू ठरावेत. इंडस्ट्रीत तिने अनेक चांगले धडे दिले. मनोजकुमारचा मुलगा कुणाल गोस्वामी हा तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता, त्याच्या चेहऱ्यातही हा फरक स्पष्ट दिसत होता. तरीही तिने त्याच्यासोबतचा 'कलाकार' हा अत्यंत टुकार सिनेमा केला. याचे दिग्दर्शक पी.सांबशिवराव यांनी तिच्या चाईल्डरोल्ससाठी तिला केलेली मदत ध्यानी ठेवून तिने ही भूमिका स्वीकारली होती, हा सिनेमा सणकून पडला पण त्याने श्रीला फरक पडला नव्हता. निर्माता दिग्दर्शक आय. व्ही. शशीचे ऋण चुकवताना तिने ऐन प्रसिद्धीच्या शिखरावर असताना 'नशीली जवानी' सारखा भिकार सिनेमा केला होता. 'जांबाज'मध्ये फिरोजखानने डिम्पल कपाडियाचे काहीच दाखवायचे बाकी ठेवले नव्हते तिथे श्रीदेवीने गेस्ट अपिअरन्स करताना एक सूचक इशारा तिला दिला होता.
'शेरणी', 'आर्मी' हे सूडपट साकारताना तिच्यातले नवे रूप समोर आले. लग्नानंतर कमबॅक करताना तिने साकारलेली इंग्लिशविंग्लिश मधली पारंपारिक भारतीय आई आणि 'मॉम'मधली मुलीच्या अत्याचाराचा बदला घेणारी आई ही दोन्ही रूपे खासच होती. त्यातही इंग्लिश विंग्लिशमधली तिने साकारलेली शशी गोडबोले खूप भाव खाऊन गेली. 'सोलवा सांवन' पासून ती 'गांव की गोरी' साकारत होती त्याचा परफेक्ट रिबाउन्स तिने 'इंग्लिशविंग्लिश'मध्ये दिला होता. तिच्या फर्स्ट इनिंगमध्ये हिट सिनेमे खूप होते पण त्यात दर्जेदार सिनेमे खूप कमी होते. या दोन सिनेमांनी तिची सेकंड इनिंग पॉवरफुल होईल असे वाटत होते. पण नियतीला हे मंजूर नसावे. एकाएकी हुरहूर लावणारी एक्झिट घेऊन ती अनंताच्या प्रवासाला निघून गेली. तिच्या मुलींचे करिअर तिला उभे करायचे होते हे ही स्वप्न अधुरे राहिले. ती असली काय वा नसली काय याने कुणाच्या जीवनात फरक पडत नाही, पण आपल्या रोजच्या दिनचर्येच्या रहाटगाडग्यात, संघर्षात आणि बेचव नीरस आयुष्यात सिनेमा नित्य नवे रंग भरत असतो, आपल्याला एक उमेद देत असतो, करमणुकीच्या तीन तासासोबत एक दृष्टीकोनही देत असतो. फिल्मी दुनियेतले लोक आपल्या आयुष्यातले इंद्रधनुष्यी रंग आपल्या प्रेक्षकांच्या जीवनात भरून जातात. आठवणींचे उमाळे दाटून आले की आपल्याला त्यांची पुन्हा पुन्हा आठवण होत राहते. श्रीदेवीच्या आठवणीही अशाच मनात राहतील.
एकट्याने रात्री सज्जात असताना कधी जर चांदण्यांनी लखलखलेलं नितळ निळेकाळे आभाळ समोर असेल तेंव्हा मनाची सतार झंकारून उठेल अन ओठावर नकळत बोल येतील, 'नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये... ..."
ही शुक्राची चांदणी कधीच मावळणार नाही, ती लोकांच्या हृदयात सदैव चमकतच राहील....
अलविदा श्रीदेवी.... वुई मिस यू ....
- समीर गायकवाड.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा