शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

वाहनप्रणालीच्या परिवर्तनाची नांदी....



'द इकॉनॉमिस्ट'मध्ये कार उद्योगाच्या बदलत्या चेहऱ्यावर वेधक भाष्य करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. जगभरातील कार उद्योग कशी कात टाकतो आहे यावर प्रकाश टाकतानाच भविष्यातील कारचा चेहरा कसा कॅरेक्टराईज्ड असणार आहे याची एक झलक त्यात दिसून आली. आदिमानवाचा इतिहास पाहू जाता अश्मयुगापासून माणूस स्वतःची हत्यारे बनवताना नजरेस पडतो. ताम्रयुगात त्याची धातुशी जवळीक वाढली. चाकाचा शोध लागेपर्यंत वाहतुकीसाठी चतुष्पाद प्राण्यांचा वापर केला. वेगवेगळ्या खंडात त्या त्या भौगोलिक रचनेनुसार माणसाने प्राण्यांवर हुकुमत मिळवत त्यांचा वापर साधन म्हणून केला. चाकाचा शोध लागल्यावर माणसाने रथांची निर्मिती केली, टांगे, चाकगाड्या निर्मिल्या. विशेष म्हणजे चाके असलेली ही वाहने चालवण्यासाठी त्याने प्राणीच जुंपले. जेंव्हा इंजिनाचा शोध लागला तेंव्हा माणसाने स्वयंचलित वाहने वापरण्यावर भर दिला. प्राणी जुंपून चालवल्या जाणाऱ्या वाहनातील प्रवासात आणि इंजिनाच्या वाहनातील प्रवासात वेळेचा प्रचंड फरक होता.



पुढील काळात विविध प्रकारचे इंधन आणि त्यावर चालणारी इंजिने असे पर्याय आले आणि प्रवास अधिकच वेगवान झाला. वाहनांचे आकार, रंग, ठेवण, वेग, सौंदर्य यात विलक्षणविविधता आली. बघता बघता कार उद्योगाच्या रूपाने एक मोठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री जगभरात अस्तित्वात आली. माणसाने वाहन म्हणून प्राण्यांचा वापर जरी टाळला असला तरी आपल्या कारच्या ठेवणीत मात्र प्राण्याची लक्षणे वापरली. दोन डोळ्यागात हेडलाईट्स दिल्या, जीभ बाहेर येणाऱ्या तोंडासारखे मधोमध कार्बोरेटर दिले, पुढच्या मागच्या उजव्या डाव्या पायाच्या ठेवणीप्रमाणे पुढे मागे डाव्या उजव्या बाजूस चाके लावली, पाठीवरच्या पृष्ठभाग सपाट ठेवला, खाली पोटासारखी गॅप ठेवली, पोटाच्या आत मोकळी जागा असते ती सीट रचनेसाठी वापरली. हेन्री फोर्डसारख्या कल्पक व्यक्तींनी टॉर्क आणि ऍक्सलरेशनची गणितं जगापुढे रचली अन लोक वेगावर आरूढ होत गेले. कार उद्योगाने ज्या त्या काळातील जगाला साजेशी भाषा वापरली. त्यामुळे कालानुगणिक कारचा चेहरा आकार बदलत गेला. अगदी एकोणीसाव्या शतकातील विंटेज कारपासून ते आताच्या फोर्डच्या टेरीटरी टीएस या लक्झरी एसयूव्ही पर्यँतची आवर्तनं पहिली तरी हे ध्यानात येतं. पण आता काळाने कात टाकलीय तर कार उद्योगालाही कायापरिवर्तनाला सामोरे जावे लागतेय.

याचाच परिपाक म्हणजे यंदाच्या वर्षात तीन मोठे कार ब्रँड अखेरच्या घटिका मोजत आहेत. कदाचित हे त्यांचे अखेरचे वर्ष ठरू शकते. जर्मनीच्या वोक्सवॅगनचे बीटल, फिलीपीन्सची जीपनीज आणि सेनेगलची कार रॅपिडस ही मिनीबस - कार सेवा त्यांच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. त्यांची कसलीही रंगरंगोटी केली वा कितीही जाहिरातबाजी केली तरी त्यांचे पुनरुज्जीवन अशक्य झालेय कारण त्यांचे प्रतिस्पर्धी नवे आहेत, त्यांची रचना आगळी वेगळी आहे आणि त्यांचं रूपडं नव्या युगाच्या सायफाय व्याख्येत बसणारं आहे. हे सगळे मेक आता इतिहासजमा होणार असले तरी लोकांच्या मनात त्यांचे स्थान अजूनही टिकून आहे, कारण आपल्या वाहनाशी प्रत्येकाची एक ट्युनिंग जुळलेली असते. सेनेगलची कार रॅपिडस ही निळी पिवळी रेनाल्ट व्हॅन होती, ज्यावर आफ्रिकन सौंदर्यदृष्टीची देखणी छाप होती, फुलं, पक्षी, अश्व, सुफी संतांची चित्रे आणि इस्लामी घोषवाक्ये यांनी ही वाहने नटलेली होती. तर फिलिपिन्सची जीपनीज ह्या मोनोक्रोम जीप्सच होत्या ज्यावर बीचवरील मुलींपासून ते रटाळ कौटुंबिक फ्रेम्सपर्यंतची अनेक दृश्ये तरळत. तर बीटलने बदलत्या ऋतूप्रमाणे स्वतःला बदलवले होते. ही सर्व वाहने वेगवान होती, लोकांच्या गरजा पूर्ण करणारी होती, लोकांच्या खिशाला चाट न लावणारी होती तरीही आज त्यांना अलविदा म्हणण्याची वेळ आलीय.

मनिला शहरातून धावणाऱ्या जीपनीजना तर लोकांनी प्रेमाने नावं दिली होती. वाहन घेऊ न शकणाऱ्या पण वाहनातून प्रवास केल्याशिवाय आपलं रोजचं इप्सित साध्य करणं ज्यांना अशक्य होतं त्या सर्व लोकांचे एक कुटुंब अशा वाहनांनी तयार झालं होतं. वेगवेगळ्या चित्रांनी सजलेल्या या गाड्यात वेगवेगळ्या ठिकाणची, वयाची, विविध क्षेत्रातली माणसं बसत अन त्यांच्या प्रवासाच्या वेळा पूर्ण होईतोवर त्यांच्यात एक अनुबंध तयार होई. बीटलचेही असेच होते. डिस्नेच्या हर्बीने तिला वेगळी छबी दिली जिला आस्थेची किनार लाभली. जगभरतील बीटलओनर्ससाठी ती प्राईड मोमेंट होती. कार रॅपिडसला देखील सेनेगलमधल्या लोकांनी नेयो, बाखआये पासून अलअहमदूलिल्लाह पर्यंत आपुलकीची नावं दिली होती. ही वाहनं लोकांच्या जीवनाचा भाग होती आता मात्र ती अतिस्त्वासाठी झगडत आहेत. आपल्याकडेही एक काळ प्रीमिअर पद्मिनी, फियाट पद्मिनी, अँबेसिडॉर, कॉण्टेसा यांनी एके काळी लोकमानसात स्थान मिळवले होते, छोट्या कारच्या सेगमेंटमध्ये मारुती एट हंड्रेडने दोन दशकाहून अधिक काळ खिंड लढवली. पण पुढे जाऊन आपल्या वाहन उद्योगानेही मागच्या दोन दशकात चेहरा मोहरा बदलला. युरोप आणि अमेरिकेतले एसयुव्हीचे, लक्झरीअस हॅचबॅकचे ट्रेंड आले आणि गणितं बदलली. आता जगातील कार पुन्हा नव्याने कात टाकत आहेत, आपल्यावरही त्याचा परिणाम होईलच.

आता बीटलच्या बेडकासारख्या वा एखाद्या किटकाच्या डोळ्यासारखी हेडलाईटस असलेली वाहने दुर्लभ होत जातील, क्रोमचा परिपूर्ण वापर करून अॅन्थ्रोमोर्फीक स्टाईलचे लाईटस युज करणारे जीपनीज शैलीचे एक्स्टर्नल फिचर्सदेखील नसतील, या कार्सना पूर्वी मडफ्लॅपर्स असत कारण पूर्वी रस्तेही तसेच होते, धुळीचे - चिखलाचे ! आता रस्तेच चकाचक होताहेत, आता ड्रायवर्सदेखील आरामदायी ड्रायव्हिंग असण्याकडे कल ठेवतात. सीटबेल्ट कसे असावेत किंवा सेफ्टी मेजर्स काय असावेत यावर पूर्वी जास्त खल होत नसे. गाडीच्या सायलेन्सरमधून येणारा धूर कोणते पदार्थ हवेत उत्सर्जित करतो यावर जागतिक परिषदात चर्चासत्रे झडत नसत, वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे पर्यावरणावर काय दुष्परिणाम होणार आहेत यावर घराघरातून चिंता व्यक्त केली जात नसे. आता मात्र काळ वेगाने कायापालट करतो आहे. घसघशीत सवलत, स्वस्ताई, सहज उपलब्धता याच्या जोडीलाच आता नवे शब्द आलेत, इकोफ्रेंडली अन लॉंग लास्टींग ! एके काळी आपल्या मालकाच्या मोस्ट ओबेडीयंट डॉगच्या पोजिशनमध्ये दाराबाहेर उभ्या असणाऱ्या या वाहनांकडे आता नव्या दृष्टीकोनाने पहिले जातेय ! प्रदूषणमुक्त जगाचा ध्यास सगळ्या जगाने घेतल्याचे हे द्योतक आहे.

स्लीक डिझाईनमधली चकचकित निमुळती वाहने आता वापरात येताहेत, इलेक्ट्रिक कार्सचा बोलबाला सर्वत्र सुरु झालाय. सेनेगलच्या रस्त्यांवर तर चायनामेड शुभ्रांकीत लांबलचक बसेस रस्त्यावर आल्यात सुद्धा ! मनिलामध्येही कम्प्लीट इकोफ्रेंडली ट्रान्सपोर्ट सिस्टीम लॉन्च झालीय. पार्किंगपासून ते प्रदूषणापर्यंत नवे गोल सेट करणारी नवी वाहनप्रणाली सर्वांनाच हवीहवीशी झालीय. आधुनिकता, सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य यांचे भान आता लोकांना नेमके आणि नेटके आलेय. त्यासाठी थोडी महाग असणारी पण दीर्घकाळ फायदे देणारी नवी वाहन प्रणाली जगभरात दाखल होतेय त्याची ही नांदी ठरावी, वाहनांची बादशाहत असणारी वोक्सवॅगनदेखील आता आपलं सगळं लक्ष इलेक्ट्रिक कारवर केंद्रीत करून आहे. आपल्याकडेही सरकारने याच धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. टाटामोटर्सने यात आघाडी घेतलीय. जगभरात जर हाच ट्रेंड रूढ झाला तर जुनाट इंधनाच्या गाड्यांचे वाईट दिवस येतील. पर्यायाने त्या इंधनसाठ्याच्या जीवावर जगभरावर आपले साम्राज्य रचण्याचे मनसुबे रचणाऱ्या लोकांचेही समृद्धीचे दिवस संपुष्टात येतील. कदाचित हेच सौदी अरेबियाच्या नव्या राजसत्तेने अधिक चाणाक्षतेने ताडले असावे त्यामुळेच येणाऱ्या काळात पेट्रोडॉलर्सची गरमी कमी होईल ते त्यांनी ओळखलेय, त्या करिताच उत्पन्नवाढीचे अन नव्या स्त्रोताचे योग्य पर्याय ते शोधत असावेत !!

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा