Saturday, May 12, 2018

मलेशियातील निवडणुकीचे अन्वयार्थ


मलेशिया हा आशिया खंडातील बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक ताकद अफाट आहे. विकासाची भूक देखील मोठी आहे. मुस्लीमबहुल देश असला तरी कट्टरपंथी अशी आपली ओळख होऊ नये याची तो काळजी घेतो, सोबत मुस्लिमांचे मर्जी सांभाळताना त्यांचे हितही जपतो. ‘आसियान’ समूहातील मलेशियाचे स्थान सर्वोच्च आहे. भारताचे मलेशियाशी संबंध नेहमीच अंतर राखूनच राहिले आहेत. आशिया खंडात महासत्ता व्हायचे हे भारतीयांचे स्वप्न आता लपून राहिलेले नाही. कदाचित यामुळेही अन्य बलवान आशियाई राष्ट्रे भारताविषयी सावध भूमिका घेतात. दोन्ही देशांची एकमेकाविषयी धोरणे आणि प्रतिमा बऱ्याच प्रमाणात निश्चित आहेत. भाजप सत्तेत आल्यावर मात्र मलेशियाच्या भूमिकेत काहीसा बदल झाला. दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा, चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेला वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक हा मलेशियात आश्रयाला आहे हे आता कुणापासून लपून नाही.

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशिया दौऱ्यावर गेले होते. २२ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांनी मलेशियातील भारतीय समुदाया समोर केलेलं भाषण मलेशियाविषयी खूप काही सांगून जाते. मोदी म्हणाले होते की, "मलेशियाने स्वातंत्र्यप्तीनंतर केवळ सहा दशकात खूप अभिमानास्पद कार्य केले. गरिबाचे जवळ-जवळ उच्चाटन झाले आहे. संपूर्ण लोकसंख्येला मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. १०० टक्के साक्षरता आहे. ज्यांना हवा आहे त्या सर्वांना रोजगार उपलब्धही आहे. पर्यटन क्षेत्र बहरत आहे. त्यांनी निसर्गाचे देणे जपूनही ठेवले आहे. त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत. सुलभ व्यापाऱ्याबच्या श्रेणीमध्ये ते खूप उच्च स्तरावर आहेत आणि गेल्या पाच दशकांदरम्यान दरवर्षी त्यांनी विकासाचा सरासरी ६ टक्के दर कायम राखला आहे. आणि कुठल्याही देशासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मलेशियाचे एक प्रसिध्द पर्यटन घोषवाक्य आहे. “मलेशिया खराखुरा आशिया” आणि मलेशिया या कसोटीला पुरेपूर उतरतो. इथे अनेकतेत एकता आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम संगम आहे. नवीन शोध आणि अपार कष्ट आहेत आणि या विभागातील शांततेचा ध्यासही आहे." या भाषणातून मलेशियाचा अंदाज येतो. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या देशात ९ मे रोजी तेथील संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यातला मतितार्थ सध्याच्या भारतीय राजकारण्यांसाठी बोधप्रद ठरावा असा आहे. 

मलेशियाच्या स्वातंत्र्यापासून ‘युनायटेड मलयज नॅशनल ऑर्गनायझेशन' (UMNO) या पक्षाचे वर्चस्व असणाऱ्या 'बॅरिसन नॅसनल कोएलिशन' (BN) आघाडीचे राज्य आहे. मलेशियातील स्थानिक मलय लोकांचे प्राबल्य या पक्षातून जाणवत रहिले. येथील ३२ दशलक्ष लोकसंख्येपैकी ६९ टक्के लोक मलय आहेत तर २४ टक्के चीनी वंशाचे आणि ७ टक्के भारतीय वंशाचे लोक आहेत. मलेशियन राजकीय नेत्यात UMNO च्या महाथिर महंमद यांचा मोठा दबदबा राहिला आहे. २१व्या वर्षी महाथिर UMNOचे सदस्य झाले. केडाह या स्वत:च्या गावात डॉक्टरकी करणारे महाथिर १९६४ मध्ये संसदेवर निवडून गेले होते. १९६९ मध्ये त्यांनी आपल्याच पक्षाच्या तत्कालीन पंतप्रधान टुंकू अब्दुल रहमान यांच्या कामकाजावर टीका करणारं जाहीर पत्र लिहिलं. ते पत्र इतकं गाजलं की  त्यामुळे त्यांना आपल्या पक्षाला आणि खासदारकीलाही मुकावं लागलं. त्यानंतर त्यांनी नवी खेळी करत देशाची, मलय जनतेची अस्मिता गोंजारली. 'द मलाय डिलेमा' नावाचं वादग्रस्त पुस्तक त्यांनी लिहिलं. 'देशातील मलय जनतेला मुख्य प्रवाहातून बाजूला सारलं गेलंय, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय' असा सूर त्यात आळवला होता. स्वतःचं सामाजिक अवमूल्यन होण्यास मलय लोकही तितकेच जबाबदार आहेत असा अर्थही त्यातून ध्वनित होता. महाथिर यांच्या उजव्या विचारांनी UMNO पक्षातील तरुण नेत्यांना आकर्षित केलं. त्यानंतर महाथिर यांना पुन्हा पक्षात समाविष्ट करण्यात आलं. १९७४ मध्ये ते पुन्हा संसदेवर निवडून आले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं, आणि अवघ्या चार वर्षांत ते पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले. १९८१ मध्ये ते मलेशियाचे पंतप्रधान झाले. ९० च्या दशकात महाथिर यांच्या कारकिर्दीतच मलेशियाची आशियाई क्षेत्रातील विकसित देश म्हणून ओळख प्रस्थापित झाली. 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स'सारखी वास्तू महाथिर यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग होता. 

विकास धोरणं जनतेत लोकप्रिय ठरल्याने हुकुमशाही प्रवृत्तीकडे कल असणाऱ्या महाथिर यांच्या अन्य कारवायांकडे मलय जनतेने कानाडोळा केला. ह्युमन राईट्सबद्दल महाथिर नेहमीच अनुत्सुक राहिले. सत्तेत असताना त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बचावाची पुरेशी संधी न देता तुरुंगात टाकले. आर्थिक आणि राजकीय सुधारणांची मागणी करणाऱ्या तत्कालीन उपपंतप्रधान अन्वर इब्राहीम यांनादेखील तुरुंगात टाकलं. २००३ मध्ये सत्तेवरून पायउतार होण्यापूर्वी त्यांनी केलेलं 'काही ज्यू लोकांचा गट जगावर राज्य करत आहे' हे विधान खूपच चर्चेत आलं होतं. अनेक देशांनी यावर नाराजी दर्शवली होती. स्वतःची  प्रतिमा ढासळू लागल्यावर त्यांनी नवा डाव खेळला. "स्वतःवर मी खूप नाखूश आहे कारण मला माझ्या वंशाला यश आणि मान मिळवून द्यायचा होता, आणि त्यात मी अपयशी ठरलो" अशी गुगली टाकत त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. २२ वर्षे सत्ता भोगून राजकीय निवृत्तीचा आव आणत महाथिर सत्ताधीशांवर टीका करत एकप्रकारे सक्रीयच राहिले. त्यांच्या पश्चात त्यांचेच शिष्य नजीब रझाक यांनी सत्ताशकट हाकले. महाथिर यांनी या काळात आपल्या भूमिकेत नाट्यपूर्ण बदल घडवून आणत नवा डाव मांडला. नजीब आणि पर्यायाने UMNO पक्षाशी वैचारिक मतभेद होत असल्याचा दावा करत महाथीर यांनी पक्ष सोडला. UMNOचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पकाटन हरपन (PH ) आघाडीत जाण्याचा निर्णय घेत महाथीर यांनी त्यांच्या समर्थकांनाही धक्का दिला. महाथिर यांच्या त्या चालीचा अर्थ परवाच्या निवडणुकीत विशद झाला. आपल्याच चेल्याने केलेल्या भ्रष्ट राजवटीचा बिमोड करण्यासाठी पुन्हा सक्रीय होत असल्याची घोषणा करत महाथिर मागील काळात मैदानात उतरले. त्यांनी बाजी मारली. हे करताना राजकीय आयुष्यात केलेल्या चुकांबद्दल माफीची नौटंकीही केली. आता ९२ व्या वर्षी देशाची सूत्रं स्वीकारणारे ते सगळ्यात वयस्क राष्ट्रप्रमुख ठरलेत. विशेष म्हणजे दोन वर्षांसाठी पंतप्रधानपदी राहून मग त्यांनीच एकेकाळी तुरुंगात टाकलेल्या अन्वर इब्राहिम यांच्याकडे देशाची सूत्रं देण्याचा विचार असल्याचं महाथीर यांनी निवडणुकीआधीच सांगितलंय. 

मे महिन्यात रमजान सुरु होण्याआधी नजीब यांनी सरकारचा कार्यकाळ बाकी असूनही अनेक लोकप्रिय घोषणा करण्याचा सपाटा लावत निवडणुका घोषित केल्या. २२२ संसदीय आणि ५८७ राज्य जागांसाठी ही १४ वी निवडणूक झाली. दोन टर्म सत्तेत असलेल्या नजीब यांच्या विरुद्ध जनतेत असंतोष होता. UMNO पक्षाच्या जागा कमी होतील मात्र सत्तेत तेच असतील असा अंदाज वर्तवला जात असूनही अनपेक्षितपणे जनतेने विरोधी पक्षाच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. हे साध्य करताना महाथिर यांनी डोकं चालवलं. विरोधी पक्षांत सामील होऊन सार्वत्रिक निवडणूक लढविली. ६० वर्षे सत्तेत असलेल्या 'बॅरिसन नॅसनल कोएलिशन' आघाडीकडून महाथिर यांनी सत्ता काबीज केली. मलेशियाच्या २२२ सदस्यांच्या संसदेत ११२ जागा बहुमतासाठी आवश्यक असतात. PH ने ११५ जागा मिळविल्या आहेत. पारंपरिक मुस्लिम मलय वेषभूषेत शपथ घेणाऱ्या महाथिर यांनी म्हटलंय की, 'आम्हाला बदला घ्यायचा नाही. आम्हाला कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. लवकरच सुधारणांचे पर्व सुरू करणार आहोत. पूर्वीच्या सरकारच्या जुनाट योजना रद्द केल्या जाणार आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कायद्याने कारवाई केली जाईल.' पण महाथिर यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. 

नजीब यांनी ऑक्टोबरमधील बजेटमध्ये सरकारी नोकरांना खुश करत मोठया सवलती दिल्या होत्या. मध्यमवर्गास भुलवण्यासाठी आयकरात सवलत घोषित केली होती. कट्टरपंथी इस्लामी मलय लोकांना आकर्षण्यासाठी झाकीर नाईकशी सलगी केली होती. २००८ आणि २०१३ मध्ये नजीब यांची लोकप्रियता कमी होत गेली होती, ती या खेपेस आणखी खालावली. त्यातच पारंपरिक चीनी आणि भारतीय घटकपक्षांनी BN मधून अंग काढून घेतलं. भरीस भर म्हणजे मुस्लिम मतांचे विभाजन झाले. पॅन एशियन इस्लामिक पार्टी (PAS) या उजव्या विचाराच्या पक्षाने UMNO ची इतकी मते खाल्ली की दोन राज्यात हा पक्ष सत्तेत आला आहे. या निवडणुकीत ७६ टक्के मतदान झाले. मागच्या खेपेपेक्षा (८५%) ते कमी होते. तेरापैकी सहा राज्यात पकाटन हरपनची निर्विवाद सत्ता आलीय. महाथिर यांच्या चार पक्षांच्या PH आघाडीत डेमोक्रॅटिक ऍक्शन पार्टी हा चिनी मतदारांचा आधार असलेला मुख्य घटकपक्ष आहे. अन्वर इब्राहीम यांचा ‘पार्टी केडिलन रक्यत’, महाथिर यांनी स्थापन केलेला ‘बेरसतु’ हा नवा पक्ष आणि PAS मधून फुटलेला ‘अमानाह’ हा छोटा पक्ष त्यात सामील आहेत. या चारही पक्षांचे वैचारिक मतभेद आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात हे कसे राज्य करतील हा औत्सुक्याचा विषय असेल. २०१५ मध्ये लागू केलेल्या जीएसटीवर प्रखर टीका करणाऱ्या या आघाडीस त्यात सुधारणा करायच्या आहेत. नजीब सरकारने बंद केलेली पेट्रोल सबसिडी पुन्हा सुरु करायची आहे. बेसिक वेतनात वाढही करायची आहे. हे सर्व आपण करून दाखवू असा महाथिर यांचा विश्वास आहे. याहून मोठ्या भूलभुलय्याच्या प्रचंड घोषणा नजीब यांनी केल्या होत्या तरीही लोकांनी त्यांना नाकारले. नुसती प्रलोभने दाखवून आणि लोकांत फुट पाडून आता राज्य करता येणार नाही हे महाथिर यांनी दाखवून दिले आहे.                                                               
‘पकाटन हरपन’चा मलय भाषेतील अर्थ ‘आशेची आघाडी’ असा होतो, ही आशा आपल्याकडील राजकारणाला दिशा देईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. २०१९ मध्ये भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकात मलेशियाच्या निकालाचा प्रभाव पडेल असं म्हणणं कदाचित अतिरेकी विधान वाटेल पण दोन्ही देशातील सध्याच्या राजकीय सामाजिक मुद्द्यांचे साम्य पाहू जाता असे काही होऊ शकते. किंबहुना मोदी आणि महाथिर यांच्या व्यक्तीरेखात असणारे साम्य पाहू जाता महाथिर यांनी आयुष्यभर उजव्या विचारसरणीकडे झुकता झुकता सत्ता काबीज करण्यासाठी कट्टरता कमी करून मधला मार्ग निवडण्याचे जे डावपेच लढवले तेच मोदी देखील लढवतील अशी शक्यता वाटते. मलेशियाच्या राजकारणात मोदी, अडवाणी, वाजपेयी यांच्याशी साम्य असणारी ही राजकीय मंडळी जशी आढळतात तद्वतच काँग्रेस आणि भाजपच्या आघाड्यासारख्या आघाड्याही आढळतात त्यामुळे तिथल्या निकालाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा निकाल काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना बरेच काही शिकवून जाईल हे नक्की. 

- समीर गायकवाड.