
आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय).