बुधवार, २० एप्रिल, २०१६

काव्यमय पितापुत्र - 'राना'-माधव !


एखादया प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा बहुतांश करून डॉक्टरच होतो तर राजकारणी माणसांची मुले सर्रास राजकारणी होतात. त्याच चालीवर मोठया वकिलांची अपत्ये वकिली करताना आढळतात तर बिल्डरची मुले वडिलांचा कित्ता गिरवतात. कलाक्षेत्रात ही बाब सिनेमा वा नाट्य क्षेत्रात कमीअधिक लागू होते, तिथे मातापिता जे कुणी सिनेमा नाटकाच्या क्षेत्रात असतात त्यांचा सहज पाठिंबा मिळतो. त्यांचे वलय, त्यांची साधने यांचा फायदा होतो अन पुढच्या पिढीला पाय रोवणे तिथं सोपे जाते. मात्र पुढच्या पिढीचे नाणे खोटे असेल तर मात्र ते आपोआपच मागे पडते. इतर कलाक्षेत्रात मात्र असे घडताना दिसून येत नाही. चित्रकाराचं अपत्य चित्रकारच होईल किंवा शिल्पकाराचं अपत्य पत्थराला आकार देईल असे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. अशीच अवस्था क्रिडाक्षेत्रातही पाहायला मिळते. असंच काहीसं साहित्यिकाचं असतं. उत्तम साहित्यिकाचं अपत्य देखील प्रतिभावंत साहित्यिकच झाल्याचं अपवाद वगळता दृष्टीस पडत नाही. मराठी साहित्यात अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे आहेत जिथे मायबापापैकी कुणीतरी साहित्यिक आहे अन त्यांची दुसरी पिढी देखील साहित्यात रममाण झाली आहे. अशा दुर्मिळ साहित्यिक पितापुत्रात सोलापूरचे ज्येष्ठ कवीश्रेष्ठ रा.ना.पवार व त्यांचे प्रतिभावंत कवी पुत्र माधव पवार यांची नोंद होते. गिरणगांव म्हणून परिचित असणाऱ्या व कलाक्षेत्रात काहीसं बकालपण असणाऱ्या सोलापूरसारख्या शहरास या पवार पितापुत्रांच्या लेखनाने एक नवी ओळख प्राप्त करून दिली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

साहित्यिक ओळख असणारी शहरं वेगळी आणि कष्टकरी श्रमिकांची शहरं म्हणून ओळख असणारी शहरं वेगळी आहेत. सोलापूर हे श्रमिकांचे शहर म्हणून जास्त प्रसिद्ध होते आणि आहे. कारण इथं असणाऱ्या कापड गिरण्या, हातमाग, यंत्रमाग आणि विडी उद्योग ! त्यामुळे इथल्या कुणा सोलापुरी माणसाने कला क्षेत्रात काही करून दाखवलं तरी त्याचं इथल्या कष्टकरी जनतेला त्याचं अप्रूप नसे कारण त्यांचा रोजचा लढा हा भाकरीच्या चंद्रासाठीचा होता. इतर काही शहरात सांस्कृतिक चळवळ जशी रुजली आणि तिला तसा चेहरा प्राप्त होत गेला याला कारणीभूत ठरले तिथले बाह्य घटक आणि तिथले वातावरण. या दोन्ही बाबींचा सोलापुरात अभाव असूनही इथं कलाक्षेत्र आणि साहित्यिक चळवळ तग धरून राहिली. इथल्या साहित्यिकांचे त्यामुळेच विशेष कौतुक आहे. कारण उपजीविकेची दुर्लभ साधने मिळवून, त्याच्याशी प्रामाणिक राहून त्यांनी सरस्वतीच्या चरणी आपली सेवा रुजू केली.

'पाय धरिल कविराय दुजा अशी काय लावणी करी । माय कुणाची व्याली या गगनाखालीं कविता सोलापुरी ।' अशी ओजस्वी कविता करणाऱ्या शाहीर रामजोशींची ही कर्मभूमी. त्यांच्यानंतर सोलापूरची अर्वाचीन साहित्यिक ओळख म्हणून कवी संजीव, कवी रा.ना.पवार आणि कवी दत्ता हलसगीकर या त्रयीकडे पाहिले जाते. कालमानानुसार हे तिघेही काळाच्या पडदयाआड गेले मात्र त्यांनी दिलेली अक्षरओळख आजही टिकून आहे. कारण या तिघांनी स्वतंत्र शैलीतून, वेगेवगळ्या आशयविषयांचे दर्जेदार साहित्य लेखन करताना स्वतःचा रेखीव ठसा मराठी साहित्यात उमटवला होता. तिघांचेही व्यक्तिमत्व भिन्न स्वभावविशिष्ट्यांचे होते, राहणीमान - विचारमान भिन्न प्रांतातले होते, भाषिक जडणघडण सुद्धा वेगवेगळी होती. रा.ना.पवार, संजीव आणि दत्ताजींच्या कविता वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत. यांची कोणतीही रचना वाचताक्षणीच या तिघांपैकी कोणत्या कवीने ही कविता लिहिली असेल हे लक्षात यावे इतकी कसदार चैतन्यदायी शैली या तिन्ही कवींनी जतन केली होती. ज्येष्ठ लेखक त्र्यं.वि. सरदेशमुख, डॉ. निर्मलकुमार फडकुले आणि डॉ. नरेंद्र कुंटे सरांचे साहित्यिक योगदान सोलापूरला देशपातळीवर घेऊन गेले. या दिग्गजांच्या मांदियाळीतला सध्याचा दुवा म्हणून कवी माधव पवार यांचे नाव घेता येईल.

माधव पवारांचे वडील कवी रा.ना. पवार हे सिद्धहस्त कवी होते. तत्कालीन मराठी सारस्वतांत त्यांचं उठणं बसणं असे. त्या काळातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांची सोलापूर वारी झाली की 'रानां'च्या घरी स्नेहभेट ठरलेली असे. रा. ना. पवारांचा परिचय राज्यभर होता. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. पु. ल. देशपांडे, दादा कोंडके, जयमाला शिलेदार, जयराम शिलेदार, सुधीर फडके, डॉ. निर्मलकुमार फडकुले, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूरकर, ज्योस्ना भोळे आदी असंख्य मंडळी त्यांच्याकडे नेहमी घरी येत. घरात होणाऱ्या या दिग्गजांच्या वर्दळीने रानांची लेखणी बहरत गेली आणि त्यांच्या पुत्रावर माधवावर साहित्यसंस्कार घडत गेले. 'रानां'नी लिहिलेल्या कविता आजच्या आधुनिक युगातील सोशल मिडीयावर म्हणजे यु ट्यूबवर देखील ऐकायला, पहायला मिळतात. त्यांच्या काही कविता जुन्या पिढीतले लोकच नव्हे तर पुढच्या पिढीत देखील गुणगुणताना आढळतात.
'क्षणभर, उघड नयन देवा
करावया तव मंगल पूजा
देहदीप मी जाळिन माझा
भावभक्तिचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा
धूप जाळिते मी श्वासाचा
सुगंध पसरिल मंगलतेचा
कोमल पद हृदयावर ठेवित प्रभू माझा यावा
अभंग नाही, नाही ओवी
मूक जिवाने कशि रे गावी ?
नयनांमधले अश्रू करिती अखेरचा धावा...'
'रानां'नी लिहिलेलं हे गीत अमृतस्वरागिनी माणिकताईंनी अप्रतिम स्वरात गायलं आहे. यात व्यथितांच्या दुःखवेदनांचे आर्तभाव असे काही प्रकटले आहेत की ऐकणारा तल्लीन व्हावा. कविवर्य रा. ना. पवारांनी अगदी वाचाहीन मनुष्यापासून ते मुक्या जनावरांच्या `नयना’तले अश्रू पाहण्यासाठी डोळे मिटलेल्या देवास त्याचे `नयन’ उघडायचे आवाहन केले आहे. देवाच्या या आराधनेत त्यांनी आर्जवं केली आहेत की ज्यात देह्दीप देवाच्या गाभाऱ्यात दग्ध होऊन जावा, परमेश्वराने त्याचे कोमल चरण आपल्या हृदयावर ठेवून आगमन करावे. मग त्याच्यासाठी श्वासाचा धूप जाळावा लागला तरी पर्वा नाही असं सांगतानाच ते निर्मिकाला आश्वस्थ करतात की, 'त्याची अशी पूजा बांधली जाईल की सर्वत्र मंगलतेचा सुगंध पसरेल. अश्रू अखेरपर्यंत तुझाच धावा करत राहतील कंठ अबोल झाला असला तरी मूका जीव तुझीच ओवी अभंग गाण्याचा यत्न करत राहील !'

या कवितेतून देवाला आवाहन करून झाल्यावर 'देवा बोला हो माझ्याशी' या कवितेत त्यांनी देवाला आपल्याशी संवाद साधण्याची गळ हक्काने घातली आहे. यात ते लडिवाळपणे म्हणतात
'देवा बोला हो माझ्याशी
तुम्हीच मजवर रुसल्यावरती
बोलू मी कोणाशी ?.....
.....बोलायाचे नसेल जर का
बोलु नका, पण इतुके ऐका
कमलाक्षातुन कटाक्ष फेका,
मजवरती अविनाशी !'
त्यांच्या या गीताला ज्योत्‍स्‍ना भोळे यांनी आपला सुरेल आवाज दिला होता. देवाशी असणारे कवीचे जवळीकीचे भाव कृत्रिम न वाटता संतांच्या परंपरेशी नातं सांगत आपलेपणाचा वारसा जपणारे आहेत. देवाची व्याख्या करताना करताना नका विचारू देव कसा- नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा असं सांगत त्याचा दर्शनमार्ग त्यांनी दाखविला आहे. ते म्हणतात - 'दर्पणास का रूप स्वत:चे, असती का आकार जलाचे, साक्षात्कार जसा तो दाखवि दिसेल त्याला प्रभू तसा !'

'राना' असं साधंसोपं आशयघन प्रवाही भावभक्तीने लिहित गेले. त्यांनी प्रसिद्धीची हौस मनी धरली नाही की प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न कधी केला नाही. आत्मव्यक्त होण्यासाठी ते लिहित गेले हे त्यांच्या कवितांचे प्रयोजनस्वरूप म्हणता येईल. रसिक वाचकांना त्यांच्या कविता भुरळ घालत गेल्या आणि मग राज्यभरात त्यांचे नाव आपसूक होत गेले. त्यांचा वाचक आणि चाहता वर्ग निर्माण झाला. 'रानां'चे हे काव्यमय जगणे त्यांच्या घरात त्यांच्या नकळत त्यांच्या मुलाच्या रूपाने आणखी एक कवी घडवत गेला. त्यांची उर्जा त्या मुलाची उर्मी बनून गेली. हा संवेदनशील कवी त्याच्या काव्यनिर्मितीच्या काळात सोलापुरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात कविता सादर करीत असे. त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्यासोबत मंचावर तबला, पेटीवाला असे. अशा कार्यक्रमांना ते आपल्या लहानग्या किशोर वयीन माधवला सोबत घेऊन जात. त्यांच्या कविता, गीते माधव मन लावून ऐकत असे. पण या कविता ऐकता ऐकता त्याच्यातला 'कवी' कधी घडत गेला हे कुणालाच कळले नाही. या सभाधीटपणाची पुढची पायरी म्हणजे माधव पवारांनी मिमिक्री व नकला करण्यास सुरुवात केली, लोकांपुढे उभं राहताना त्यांच्यातला निरीक्षक कवी जागृत राहायचा. यातूनच पुढे वाचनाचा छंद जडला व माधव पवारांनी त्यांच्या साहित्यदरबारात पहिले पाऊल टाकले.

रानांच्या भेटीस येणाऱ्या दिग्गजांच्या चर्चातून निर्माण होणाऱ्या ज्ञानजाणिवा व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ठसे 'रानां'च्या नकळत त्यांच्या मुलावर उमटत गेले. या थोरांचे लेखन त्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरले. माती ओली असतानाच तिला कुंभाराच्या नकळत अतिशय देखणा आकार इथं मिळत गेला आणि माधव पवारांच्या कवित्वाला बहर येत गेला. कविता आणि हिंदी गजलांचे त्यांचे वाचन वाढत गेले त्यातून लिहिण्याची शैली विकसित होत गेली. अभिजात प्रतिभा असणाऱ्या वडिलांच्या पोटी जन्माला येऊनही रानांची साहित्यलक्षणे आणि माधव पवारांची साहित्यलक्षणे यात मुलभूत फरक आहेत. दर्जा व अनुभवप्रकटन यांची सांगड घालताना कुठेही स्तर खालावू न देण्याचे शिवधनुष्य दोघांनीही लीलया पेलल्याचे त्यांच्या लेखनावरून दिसून येते. मातृभूमीच्या उत्कट जाणिवा, निसर्ग, मानवी मूल्ये आणि समाज असे विविध विषय रानांच्या कवितांत अविष्कृत झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या मित्रांनी ``सावळ्या विठ्ठला`` हा काव्य संग्रह काढला. तर माधव पवारांच्या कवितांत विद्रोहाची झलक स्पष्ट दिसून येते. सामाजिक प्रश्नांवर लिहिताना त्यांच्या लेखणीला जास्त धार चढते तर प्रेमाच्या कवितांत ती आकंठ प्रेमरसात बुडून जाते. ती विरहाचे रंग लेऊन उदासवाणी होते तर कधी मादक शृंगाराची बेफाम लावणी होऊन नाचते तर कधी विषमतेची आर्त कैफियत मांडते तर कधी उत्तम विलापिका होते तर कधी विराणी होते. कवितेचे नवरंग घेऊन त्यांची कविता नटमोगरी होते तर कधी गझलेचे देखणे रूप घेऊन मेहफिल सजवते.

या प्रतिभासंपन्न कवीला सध्या आजाराने ग्रासले आहे. दर दोन दिवसाआड त्यांचे डायलिसीस केले जाते, त्यांना आजार तोच आहे जो त्यांच्या वडिलांना होता- 'किडनी फेल्युअर' ! तरीदेखील त्यांचे काव्य लेखन थांबलेले नाही. उलट मृत्यूला आव्हान देणारी त्यांची कविता अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही. ते लिहितात -
'मी वीज होऊनी जाईन जाता जाता
ही गरुडभरारी माझी
कुणी रोखू नका हो आता
मी वीज होऊनी जाईन
दुनियेतून जाता जाता..'
सावध ऐका पुढल्या हाका असं म्हणणाऱ्यातले ते नाहीत. ते आव्हान देतात यात त्यांचा विद्रोह दिसून येतो. मरणालाही ते पांढरे निशाण दाखवत नाहीत कारण ते त्याला भीत नाहीत. उलट प्रारब्धात आलेल्या दु:खाचे कौतुक किती दिवस आणि का करायचे असा रोकडा सवाल ते करतात. त्यांच्या वाट्याला अनेकदा दु:खच आलं. जणू त्यांना सुखाची सवयच नसावी. दर दोन दिवसाआड ते मृत्युच्या जबड्यात जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन करून हसतमुखाने बाहेर येतात. ते खचत नाहीत याचे सर्व श्रेय ते त्यांच्या मित्र परिवारास देतात. "गोत्यात आणणारी नाती म्हणजे नाती-गोती" असं सूचक वक्तव्ये करणारे माधव पवार त्यांच्या सुखदुःखाच्या अनुभवांना सारखेच जोजवतात अन अल्वारपणे त्यांना मोहक शब्दरूप देतात.

गंध कुणाचा होता -
हा दिवस असा का आहे
तो दिवस तसा का होता
तू सांग तुझ्या देहाला
गंध कुणाचा होता ?
प्रेमाच्या शोधातच ते अस्तित्वाचा शोध अशा तरल पद्धतीने घेतात की जणू एखादे मोरपीस फिरवावे !


अलौकिक स्पर्श -
तुजपाशी येण्या साजणा
पाऊल असे का वळते
मागण्या अलौकिक स्पर्श
का मन देहातून पळते ?
मिलनाच्या ओढीस देहातले विचार विकार कारणीभूत असतात मात्र कवी लिहितात की, या स्पर्शओढीसाठी देहाच्या आधी मनच तिथे पोहोचलेले असते ! याचे समाधान कसे करावे यावर ते लिहितात - 'चमकते वीज अंगात, अंगाची होते लाही, शोधते असा एकांत, मज नकोच दुसरे काह!'. प्रत्यक्ष मिलन वा गळाभेट घेण्यापेक्षा एकांतात बसूनही तो अनुभव घेता येतो. इथे माधव पवारांनी कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

मग हा स्पर्श का हवाहवासा वाटतो याचे उत्तरही तेच देतात. 'चोरटा स्पर्श' या कवितेतून त्यांनी याचे सुंदर निरुपण केले आहे. या स्पर्शातूनच कविता अमर होतील अन शब्दांना चैतन्य येईल असेही ते इथे सुचवतात.
'....तुझ्या ओठातल्या अमृताने
माझ्या कविता अमर होतील.
हे सत्य
मी कधीही नाकारणार नाही
एक सांगतो बीज अंकुरण्यासाठी
मायेचाही स्पर्श हवा ..'

पण कधी जर विरहाचे ढग दाटून आले तर काय होईल यावरही ते लिहितात -
'आधार भरुनिया आले
येती पावसाच्या सरी
तुझी आठवण आली
आग पेटवत उरी!...'
प्रेमाचे इतके गहिरे रंग आपल्या कवितेत भरणाऱ्या पवारांनी श्रद्धा आणि दैवत्व यांच्यातील फरक स्पष्ट करताना कठोर प्रहार करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. 'श्रद्धेला तडा गेला की प्रत्यक्ष परमेश्वरही दगड वाटू लागतो आणि आठवतात दगडाचे सारे गुण...' विचार करायला लावणारे असं काव्य ते सहज करतात. आपल्यातील संवेदनशील मनाचा प्रत्यय देताना 'कालचक्र' या कवितेत ते स्वतःच्या अगतिकतेवर अन सरकारी बधीरपणावर आसूड ओढतात. 'अर्ध्या भाकरीच्या तुकड्यासाठी रडणाऱ्या चिमुकल्यांचा आवाज ऐकला की मनाचा थरकाप होतो, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाची जाणीव हृदयाला जखमी करते अशा वेळी मी अंधारात जातो' असं भावूक काव्य ते रचतात.

आपली अवस्था सुदाम्यासारखी आहे हे माधव पवारांना चांगलेच माहिती आहे तरीदेखील ते कुणा अन्य मित्र वा आप्तेष्टासमोर याचकाच्या भूमिकेत उभे राहायला तयार नाहीत. यात त्यांचे संस्कार व स्वाभिमान अधोरेखित होतात. त्यांनी लिहिलेली ही कविता आजच्या बेगडी दुनियेत अधिक महत्वाची वाटते. कारण पैसा हा आधुनिक जीवनाचा मूलमंत्र झालेला असताना एक कवी 'आपल्याला काही नको पण आपल्या अंतानंतर काय करावे' याची मार्मिक टिप्पणी करून जातो तेंव्हा त्यातला सल अधिक टोकदार होतो.
'मित्रा तुझ्याकडे सारं आहे
म्हणून मी काही मागावं
हे बुद्धीला पटत नाही
माझ्याकडे काही नाही
म्हणून मी काही मागावं
हे मनाला पटत नाही
मित्रा एव्हढंच कर
जेंव्हा माझा लिलाव होईल
चौरस्त्यावर तेंव्हा शेवटची बोली
तूच बोलावीस ही विनंती...'

'तो डंख विषारी होता, जरी सांगतेस हे आता |
गारुडी चावला खोल हा भोग कुणाचा होता ||'

अशी काळजाला आरपार भेदून जाणारी कविता करणारा हा कवी हळवा होऊन त्याच्या अश्रूला प्रश्नवजा सूचना करतो –

"मी नेहमीच सांगत असतो,
माझ्याच अश्रूंच्या त्या थेंबाला"

'अरे बाबा मी एकांतात आणि एकटाच असताना येत जा
मैफलीत असताना का येत असतोस ?"

आपलं दुःख आणखी आरसपानी करून यावर अश्रुने दिलेलं लाजवाब उत्तर प्रस्तुत करतात –

"अरे राजा मैफलीतही तू एकटाच असतोस
म्हणून तर मी येत असतो !"

'राना'पवारांच्या तत्वनिष्ठेमुळे दारिद्र्य पाचवीला पुजलेले असूनही 'शापित कलावंत' सारख्या कवितेत ते मनाचा ठाव घेतात तर 'एक सोनेरी पहाट'मधुन नवा आशावाद ते व्यक्त करतात. दुखातून उभारी घेण्याची ही 'फिनिक्स'वृत्ती त्यांना आजही झुंजायला बळ देते, जगायला प्रेरणा देते. म्हणूनच त्यांची दृष्टी अधिभौतिकवादी आहे अन तिला विद्रोहाची धार आहे. आपल्या एकटेपणावर अचूक बोट ठेवणारा हा कवी आधुनिक विचारांचा आणि विज्ञानाची कास धरणारा आहे.

कविवर्य सुरेश भट सरांनी 'हे शुभशकुनांचे पक्षी' या पवारांच्या काव्यसंग्रहाचे कौतुक करताना त्यांच्या पाठीवर थाप दिली होती. सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, चंद्रशेखर गाडगीळ आदी गायकांनी यातील गीतांना आपला साज चढवला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे "हे शुभशकुनांचे पक्षी' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र कवी यशवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यातील गाण्यांच्या ध्वनीमुद्रित फिती देखील उपलब्ध आहेत. एकेकाळी घराजवळ असणाऱ्या स्मशानभूमीत शैशवातील खेळणं बागडणं साजरं करणाऱ्या या कवीने घरच्या हलाखीच्या परिस्थितीत पोटातल्या आगीसाठी कित्येकदा अंत्यसंस्कारासाठी ठेवलेले अन्न अधाशीपणे खाल्लेय. माणसाचं जगणं-मरणं, सुख-दुख:, प्रेम-द्वेष, श्रीमंती-गरिबी, विषमता यांचे अंतर जवळून पाहिलेय. या सर्व जाणीवा त्यांच्या काव्यात शब्दबद्ध झाल्याने त्यांना एक वेगळे चैतन्य प्राप्त झाले आहे. देहाला जरी घरघर लागलेली असली तरी आपल्या वडीलांचा काव्यवसा आपल्या काळाने ग्रासलेल्या पंखांवरून वाहून नेताना माधव पवारांच्या काव्याला आणखी नवे आयाम प्राप्त व्हावेत अन त्यांच्या काव्यप्रतिभेच्या विहंगाने मोठी भरारी घ्यावी असे सातत्याने वाटते.

हे शुभशकुनांचे पक्षी
का कातरवेळी पिकले?
मी अवयव माझे सगळे
मातीला नेऊन विकले ?
असं देखणं काव्य लिहिणाऱ्या, माझ्या सोलापूरच्या कसदार मातीतल्या या प्रतिभावंत कवीस निरामय आयुष्य प्राप्त व्हावे अन रसिक वाचकांच्या दर्जेदार काव्याची तृषा पूर्ती व्हावी ही मनोकामना ...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा