नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. हा साहित्यप्रकार मराठीत दिवाकरांनी ईतका समर्थपणे हाताळलाय त्याला तोड नाही. 'पंत मेले, राव चढले' ही दिवाकरांची एक प्रसिद्ध नाट्यछटा आहे.
आजच्या पिढीला याची माहिती व्हावी म्हणून ती इथे उद्धृत केली आहे. एका कुटुंबातले दुःख दुसऱ्याचे सुख कसे असू शकते याचे उत्कट विवेचन करताना दिवाकरांनी तत्कालीन ब्राम्हण कुटुंबांच्या जीवनशैलीवर व सामाजिक चालीरितीवर सहजगत्या व अत्यंत हळुवार पद्धतीने प्रकाश टाकला आहे. सुख आणि दुःख यांतील सीमा त्यांनी धूसर करताना ह्या दोन्ही अनुभूती एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा असतात हे मार्मिकपणे मांडले आहे. मला दिवाकर भावतात ते त्यांच्या साहित्यगुणांमुळे. त्यांच्या कुठल्याही नाट्यछटेत ते निरुपणकाराचा बाज स्वतःकडे घेत नाहीत, ते बोजड शब्द टाळतात, नाट्यछटाना शब्दबंबाळ होऊ न देता जेमेतेम दोनतीन परिच्छेदात सगळे कथानाट्य संवादी स्वरुपात जिवंत करतात. खरे तर हे काम अत्यंत अवघड आहे. यासाठी कथावीण अत्यंत मजबूत आणि शब्दांची निवड नेटकी व सटीक अशी असावी लागते, पाल्हाळ न लावता कथासार त्यातच मांडायचे असल्याने 'मांडणी'स सर्वाधिक महत्व असलेला हा लेखनप्रकार आहे. प्रसंगांचा क्रम व त्यानुरूप वर्णन हेही महत्वाचे ठरते. जर सलग कंटाळवाणा वाक्यक्रम आला तर संपूर्ण नाट्यछटेस बाधा येऊ शकते, मूळ आशयास हानी न पोहोचवता हे सर्व शैलीदार पद्धतीने साध्य करणे म्हणजे खरे तर अग्नीदिव्यच म्हणायला पाहिजे. पण दिवाकरांनी ते अगदी सुलभसहज पद्धतीने प्रस्तुत केले.
'पंत मेले, राव चढले'च्या पहिल्या छटेत एका घरी पंत मेल्याने म्हणजे वडील वारल्यामुळे घरातील कुमारवयीन मुलाला माधुकरी मागून पोट भरावे लागते. त्याने काही मागून आणले तरच त्याच्या चिमुरडया बहिणीस खायला मिळणार असते. पंतांच्या पत्नीला धुणी भांडी करण्याचे काम करावे लागते. घराचा कर्ता पुरुष गेल्याने होणारे हाल त्यात आहेत. मन हेलावून टाकणारे भावोत्कट वर्णन हा पहिल्या छटेचा आत्मा आहे. तर दुसऱ्या नाट्यछटेत पंतांच्या निधनानंतर त्यांच्या जागी बढती मिळून ज्यांच्या घरी खुशीचे वातावरण तयार झाले आहेत अशा रावांच्या मनस्थितीचे व त्यांच्या हर्षोल्हासित कुटुंबाचे रंजक वर्णन आहे.
ही नाट्यछटा इतकी गाजली की, या शीर्षकाचा वापर चक्क वाक्यप्रचार म्हणून रूढ झाला. हा वाक्यप्रचार जर कुणी पहिल्यांदाच ऐकला तर त्याला हा विनोदी वाटेल यात शंका नाही. मात्र जर ही नाट्यछटा त्याच व्यक्तीच्या वाचनात आली तर या वाक्यप्रचार रुपी रूढ झालेल्या वाक्यात असणारी करुणेची किनखापी झालर त्याला नक्की अस्वस्थ करून जाईल इतकी ताकद या नाट्यछटेत आहे.
'पंत गेले, राव चढले' -
पंतांच्या घरीं -
... असें काय ? सोड मला ! चिमणे,
असें वेडयासारखें काय करावें ! रडतेस काय ?
जा ! दार लावून घे
घरांत आपला गोपूबाळ निजला आहे ना ?
त्याच्याजवळ जाऊन बैस हं ! रडूं नकोस, जा ! आई आबासाहेबांकडे भात सडायला गेली आहे,
ती आतां इतक्यांत परत येईल ! जाऊं मी ? रडायची नाहींस ना ?
भूक लागली आहे म्हणून का तूं रडतेस ? असें काय ? चिमे, मी येईपर्यंत तूं अगदी गप रहा हो !
आईनें दळून ठेवलेलें हें पीठ यमुनाबाईच्या घरीं पोंचवितों, आणि तसाच माधुकरी मागून मी लवकरच परत येतों !
मग माझ्या ताईला भात, वरण, भाकरी ...
माधुकरी म्हणजे काय ?
ताई ! माधुकरी मागणें म्हणजे भीक मागणें हो !
लोक आपल्याला भिकारी म्हणतील ? म्हणूं दे ! बाबा देवाच्या घरीं गेले आहेत;
त्यांनी देवाला सांगितलें म्हणजे मग देव आपल्याला श्रीमंत करील !
बाबा केव्हां येतील ? छे ! ते आतां कुठलें यायला !
हें बघ ताई ! तूं बाबांच्याबद्दल पुनः कधीं आईला विचारुं नकोस हो ! ती किं नाहीं लागलीच रडायला लागते !
कोण आई ! केव्हां आलीस ? हें ग काय ! - आई ! आई !! कां ग अशी एकदम मोठमोठ्यानें रडायला लागलीस ?
मी माधुकरी मागायला जातों म्हणून ? होय ?
पण आई ! तूं नाहीं का ग लोकांची भांडी घांशीत - दळण दळीत - धुणें धुवीत ? तसेंच मी
आई ! गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत !
मी आज नको जाऊं म्हणतेस ? कां बरें ? ऊन फार पडलें आहे, आणि माझे पाय फार पोळतील म्हणून ?
असूं दे कीं ! मी पळत पळत जाऊन लवकर परत येतों !
जर आतां मी गेलों नाहीं तर गोपू, चिमी, तूं, मी, सगळे जण आपण भूक लागून रडायला नाहीं कां लागणार ?
मग आपल्याला कोण बरें खाऊं घालील ? आई ! मी आत्तां जाऊन येतों, सोड मला !.... ''
रावांच्या घरीं -
.... खाऊ ! अरे पेढे आणले आहेत पेढे ! थांबा, थांबा ! अशी घाई करुं नका ! सगळ्यांना देतों बरें मी !
आधीं देवाला नैवेद्य दाखवूं ! आणि मग
हो, हो ! तुला आधीं देईन सोने मी ! मग तर झालें !
पाणी आणलेंस ? शाबास ! हं, सोने, बापू, देवाच्या पायां पडा,
आणि म्हणा ' जय देवबाप्पा ! असेच सुखाचे दिवस आम्हांला वरचेवर दाखवीत जा !' - अस्सें ! शाबास ! हं,
हे घे सोने, तुला चार, आणि हे बापू, तुला चार, झालें ना आतां ?
कोण आहे ? रामभाऊ ? अरे वाः ! तुम्ही तर अगदीं वेळेवर आलांत बुवा ! हं, हे घ्या,
आधी खा मुकाट्यानें ! मग कारण विचारा ! मला पांच रुपये प्रमोशन झालें पगार वाढला, त्याचे हे पेढे ! समजलें ?
अरे बापू ! आतां हे आंत घेऊन जा !
आणि इकडे बघ, आपल्या त्या गोविंदरावांना, आपासाहेब कर्व्याना, झालेंच तर माडीवरच्यांना, सगळ्यांचा घरी आतांच्या आतां जाऊं द्या म्हणावे ! समजलें ना ? नको, नको, मला नको ! अहो हपिसांत मीं पुष्कल खाल्ले आहेत !
मंडळी ऐकेचनात ! तीन रुपयांचे पेढे द्यावे लागले मला !
म्हटलें जाऊं द्या ! मंडळी आपली आहेत ? आणि पुनः असे आनंदाचे प्रसंग वरचेवर थोडेच येत आहेत ?
बरें झालें चला ! इतके दिवस आशेनें रात्रंदिवस वाट पाह्यल्याचें परमेश्वरानें शेवटीं सार्थक केलें !
अहो, पंधराचे वीस व्हायला सहा वर्षे लागली - सहा वर्षे !
नुकतेच आमचे दिवाकरपंत मेले, आणि त्यांची ही जागा मला मिळाली, बरें !
असो, ईश्वराची कृपा होती म्हणून हे तरी दिवस दिसले ! हो ! करतां काय ?
बरें आपण आतां मुंबईला कधी जाणार ?
रविवारची ना ? मग हरकत नाहीं ! कारण मी परवांच्या दिवशीं श्रीसत्यनारायणाची पूजा करण्याचें योजले आहे !
तेंव्हा म्हणतो, प्रसाद घेऊन मुंबईला जा !
ठीक आहे ! अहो, परमेश्वरांची कृपा असली तर उत्तरोत्तर आपल्याला आणखीही असेच सुखाचे दिवस येतील !
काय ? म्हणतो तें खरें आहे कीं नाहीं ?.... ''
- दिवाकर. १७ मे १९१२
नाट्यछटा हा मराठीमधील एक गद्य लघुवाङ्मयप्रकार आहे. मराठी वाङ्मयात याची सुरुवात १९११ पासून आढळते. दिवाकर (कालखंड -१८८९ ते १९३१) यांच्याकडे याच्या जनकत्वाचा मान जातो. दिवाकरांनी आपली पहिली नाट्यछटा १८ सप्टेंबर १९११ रोजी लिहिली आणि या व यापुढील दोन वर्षांत त्यांनी आपल्या एकूण नाट्यछटांपैकी बऱ्याचशा नाट्यछटा लिहून टाकल्या. या नाट्यछटापैकी दोन, १५ एप्रिल १९१३ च्या 'केसरी'च्या अंकातून प्रसिद्ध झाल्या आणि त्यांनतर 'उद्यान', 'मनोरंजन', 'रत्नाकर' अशा मासिकांतून इतर नाट्यछटाही प्रसिद्ध झाल्या. नाट्यछटा हे नाव प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन यांच्या सूचनेवरून निश्चित झाले. पटवर्धन हे दिवाकरांचे स्नेही आणि त्यांना पाश्चात्त्य वाङ्मयाच्या अध्ययनात साहाय्य आणि मार्गदर्शन करणारे गुरू. रॉबर्ट ब्राउनिंग ह्या इंग्रजी कवीची काव्ये दिवाकरांनी पटवर्धनांच्या बरोबर वाचली होती. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांमुळे (ड्रॅमॅटिक मोनोलॉग) नाट्यछटा लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना मिळाली. या आधी मराठीत मनोरंजन आणि करमणूक या नियतकालिकांतून ‘नेपथ्यपाठ’ या नावाने एक-भाषितांची पद्धती स्वीकारून कलेले लेखन येत असे. दिवाकरांनी ते पाहिलेले असावे; तथापि नाट्यछटाची प्रेरणा आपणास ब्राउनिंगच्या एकभाषितांमुळे झाली, असे त्यांनीच सांगितले आहे.
नाट्यछटा या नावातील ‘छटा’ या लघुत्वसूचक शब्दाने हे लेखनदीर्घ नसावे, अशी जी कल्पना होते, ती खरी आहे. नाट्यछटा सामान्यतः पंचवीस ते पन्नास ओळींइतकी असते. तिच्या नावातील ‘नाट्य’ या शब्दाने लेखकाच्या स्वतःच्या आत्माविष्कारापेक्षा त्याने कल्पिलेल्या व्यक्तीचा आत्माविष्कार अभिप्रेत आहे. नाट्याचे वाहन जो संवाद तोच येथेही या आत्मविष्काराचे वाहन असतो; मात्र हा संवाद एकमुखी असतो. यात बोलणारे पात्र एकच, परंतु ते दुसऱ्या एक अथवा अनेक व्यक्तींशी बोलत असते; त्या व्यक्तींनी दिलेला प्रतिसाद या एकमुखी संवादात गृहीत आणि सूचित असतो; या छटेमध्ये प्रसंग एकच निवडलेला असतो आणि तो नाट्यपूर्ण, लक्षणीय असावा अशी अपेक्षा असते. प्रसंग एकच असल्याने त्याचा परिणामही एकजिनसी होतो. त्याकरिता हे लेखन एकात्म व सुश्लिष्ट असावे लागते. त्याची रचना प्रमाणबद्ध आणि आटोपशीर असणे आवश्यक असते. पात्राला आणि प्रसंगाला अनुरूप अशी भाषा, वेचक मोजक्या शब्दांनी मनोगत व्यक्त करणारी शैली, विरामचिन्हांनीही अर्थ व्यक्त करण्याचे कौशल्य, अर्थसूचक मथळे, अथपासून इतिपर्यंत असणारी वेधकता हे उत्तम नाट्यछटेचे आवश्यक असे विशेष आहेत. नाट्यछटेमधून कल्पिलेल्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये तिच्या स्वभावातील विसंगती, खोल जिव्हाळ्याची दुःखे, सामाजिक दोष वा अन्याय यांवरील टीका, जीवनावरील भाष्य यांपैकी काहीना काही दिवाकरांनी व्यक्त केलेले असे. त्यांच्या नाट्यछटेचे मूल्य पुष्कळसे आशयातील या विशेषांवर अवलंबून असे. त्यांच्या उत्तम नाट्यछटात वर उल्लेख केलेल्या ‘पंत मेले–राव चढले’ व्यतिरिक्त ‘वर्ड्स्वर्थचे फुलपाखरू’; ‘फाटलेला पतंग’; ‘बाळा, या नारळाला धक्का लावू नकोस बरे’; ‘पण बॅट नाही’ इ. नाट्यछटांचा समावेश होतो.
दिवाकरांच्या हयातीत आणि त्यानंतर काही वर्षे नाट्यछटांना बहर आला. काही काळ ते नियतकालिकांचे एक नित्याचे अंग झालेले होते. अन्य नाट्यछटालेखकांमध्ये ‘धनंजय’, ‘गोमागणेश’ (ग. कृ. फाटक), कटककर, वि. स. गोगटे, सी. ल. देवधर, कमतनूरकर इत्यादींचा उल्लेख अवश्य करावयास हवा; परंतु या लेखकांची दृष्टी प्राध्यान्याने स्वभावविसंगतीवर केंद्रित झालेली होती. त्यामुळे दिवाकरांच्या नाट्यछटाप्रमाणे त्यांत विविधता आणि वजन येऊ शकले नाही. शिवाय दिवाकरांइतकी काटेकोर व काटकसरी परिश्रमशीलताही या नाट्यछटाच्या पाठीशी नव्हती. दिवाकरांच्या नंतर दहा–पंधरा वर्षांतच या प्रकारच्या लेखनास ओहोटी लागली आणि नाट्यछटा नामशेष का झाली, या विचाराला प्रारंभ झाला. दिवाकरांनी आपल्या कित्येक यशस्वी नाट्यछटामधून स्वभावविसंगतीवर भर दिला असल्याने, नंतरच्या नाट्यछटाकारांस तेच एक नाट्यछटेचे मूलतत्त्व अथवा यशाचे रहस्य आहे असे वाटून ते त्यातच गुरफटून गेले आणि नाट्यछटेला साचेबंद रूप प्राप्त झाले. साहजिकच त्यांचा वाचकांस आणि लेखकांसही कंटाळा आला अशी नाट्यछटा नामशेष का झाली याची मीमांसा करण्यात येते.
दिवाकरांचा जन्म पुणे येथे झाला. दिवाकरांचे वडील राजेवाडी या ठिकाणी स्टेशनमास्तर होते. कालांतराने ते पुण्यास राहाण्यास आले. दिवाकर हे त्यांचे दुसरे अपत्य होते. दिवाकर अडीच वर्षांचे असताना त्यांना आजीस दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुषी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते. पुढे त्यांनी त्यांचे सर्व लिखाण 'दिवाकर' या नावाने प्रसिद्ध केले. दिवाकरांचे प्राथमिक आणि दुय्यम शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. शाळेतील शालान्त परीक्षा 'स्कूल फायनल' ते १९०८ मध्ये उत्तीर्ण झाले.
जून २४ १९१० रोजी कोल्हापूरच्या श्री. विष्णु नरसिंह पाठक यांच्या सखू या मुलीशी दिवाकरांचा विवाह झाला. या कालावधीत दिवाकर असिस्टंट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलिस यांच्या कचेरीत नोकरी करत होते. पुढे फेब्रुवारी १९१२ मध्ये दिवाकरांची ’डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलिस' यांच्या कचेरीत बदली झाली. परंतु या दरम्यान दिवाकरांचे डोळे बिघडल्यावर सिव्हिल सर्जन डॉ. हॅमिल्टन यांनी तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालानुसार त्यांना सरकारी नोकरी सोडून द्यावी लागली. पोलिस सुपरिन्टेंडंटच्या कचेरीतील नोकरी सुटल्यानंतर जून १९१२ पासून दिवाकरांनी 'डिप्रेस्ड क्लास मिशन'च्या सेंट्रल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक या पदावर (मासिक पगार पंधरा रुपये) काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी १९१४ मध्ये असिस्टंट हेडमास्तर म्हणून (मासिक पगार वीस रुपये)तर जुलै १९१५ मध्ये शाळेचे हेडमास्तर म्हणून (मासिक पगार तेवीस रुपये)त्यांना बढती मिळाली. परंतु नोव्हेंबरमध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला व चार महिन्यांच्या शोधानंतर नूतन मराठी विद्यालयात पुन्हा एकदा शिक्षक म्हणून काम स्वीकारले. मार्च १९१६ मध्ये ते एस.टी.सी परीक्षा पास झाले. यावेळी त्यांना सुमारे तीस रुपये मासिक वेतन मिळत होते. नूतन मराठी विद्यालयात त्यांनी प्रथमच इंग्रजी हा विषय शिकवायला सुरुवात केली. सहकाऱ्यांच्या मदतीने दिवाकरांनी लवकरच प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकवण्यात कौशल्य हस्तगत केले आणि उत्तम इंग्रजी शिक्षक असा लौकिक प्राप्त केला. १९२३ पासून मृत्यूसमयी, १९३१ पर्यंत आठ वर्षांच्या कालावधीत दिवाकर शिक्षकी पेशाचेच काम करत होते. सप्टेंबर १९३१ मध्ये दिवाकर इन्फ्ल्युएंझाच्या तापाने आजारी पडले आणि १ ऑक्टोबर १९३१ रोजी या आजारामुळेच त्यांचे निधन झाले.
दिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेले होते. यातूनच त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. मार्च २७ १९११ रोजी त्यांनी थॉमस मिडलटनच्या 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' या नाटकाच्या आधारे 'रंगेल रंगराव' नामक नाटक लिहिण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर गटेच्या 'फ्राउस्ट' हे नाटक वाचल्यानंतर त्यांनी या नाटकाच्या आधारे 'पंडित विद्याधर' नावाचे नाटक लिहिण्याचे काम हाती घेतले. ब्राउनिंगच्या 'ड्रॅमॅटिक मोनोलॉग' या लेखनप्रकारावरूनच दिवाकरांनी नाट्यछटा हा लेखनप्रकार विकसित केला. सप्टेंबर १८ इ.स. १९११ रोजी दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली. पुढच्या दोन वर्षांतच दिवाकरांनी त्यांच्या एकूण नाट्यछटांपैकी बहुतेक नाट्यछटा लिहिल्या. ’नाट्यछटा’ हा शब्द दिवाकरांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सुचविला. नाट्यछटा हा प्रकार लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना पटवर्धनांनीच दिली असे मानले जाते.
१९१३ नंतर मात्र दिवाकरांचे नाट्यछटांचे लेखन मागे पडले. 'शोकान्त' हा नाट्याचा नवीन प्रकार दिवाकरांनी १९१३ मध्ये लिहिण्यास सुरुवात केली. १९१४ साली "मी माझ्याशी!" ही नाट्यसंवादांची लेखमालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. 'पाऊस', 'निजलेले मूल', 'सुट्टी! शाळेला सुट्टी!', 'ती बिचारी रडतेच आहे!' हे नाट्यप्रसंगही दिवाकरांनी १९१४ सालीच लिहिले. 'कारकून' हे तीन अंकी नाटकही त्यावर्षीच पूर्ण झाले. १९१५ साली 'सगळेच आपण ह्य: ह्य:' , 'ऐट करू नकोस!' आणि 'आय.सी.एस.'(अप्रकाशित) या नाटिका लिहल्या. १९१६ मध्ये दिवाकरांनी मेटरलिंकच्या 'द साइटलेस' ( Les Aveugles ) या नाट्यकृतीचे रूपांतर केले. १९२३ ते १९३१ या आठ वर्षांच्या काळात दिवाकरांनी दहा नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी 'अहो मला वाचता येतंय!', 'कमीचा मन्या', 'मसालेदार ताजा चिवडा', 'आले कोठून, 'गेले कोठे', 'भर चौकात' असे साध्या शब्दांतून-प्रसंगांतून जीवनविषयक खोल आशय सुचविणारे नाट्यप्रवेश लिहिले. कारकुनासारख्या सामान्य माणसांच्या वास्तविक आयुष्याचे स्वाभाविक स्वरूपात चित्रण करणारे तीन अंकी नाटक ’कारकून’ लिहिले.
नरसिंह चिंतामण केळकर यांच्याशी असलेल्या ओळखीमुळे दिवाकरांच्या काही नाट्यछटा केसरी या पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. हरिभाऊ आपटे यांनी 'तारीख ७ नोव्हेंबर' ही दिवाकरांची केशवसुतांवरची नाट्यछटा 'करमणूक' या मासिकात प्रसिद्ध केली होती. 'उद्यान' आणि 'ज्ञानप्रकाश' या मासिकातही त्यांच्या काही नाट्यछटा प्रसिद्ध झालेल्या होत्या. 'रत्नाकर' मासिकाच्या गोखले यांनी दिवाकर यांचे अखेरचे जवळजवळ सर्वच लिखाण-- नाट्यछटा, नाट्यसंवाद, नाटिका आणि छोट्या गोष्टी इत्यादी -- आपल्या मासिकात प्रसिद्ध केले. प्रा. पोतदार यांनी 'साहित्य सोपान' या पत्रात दिवाकरांच्या दोन नाट्यछटा प्रसिद्ध केल्या होत्या.
दिवाकरांच्या सर्वच्या सर्व एक्कावन नाट्यछटांचा संग्रह काँटिनेन्टल प्रकाशनाने 'दिवाकरांच्या नाट्यछटा' या नावाने प्रसिद्ध केलेला असून या पुस्तकाला प्रा. रा.कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे तर विजय तेंडुलकर यांनी नाट्यछटांचे रसग्रहण केलेले आहे. याशिवाय दिवाकरांचे एकूण एक लेखन 'संपूर्ण दिवाकर' या नावाखाली १९३३ मध्ये प्रसिद्ध केले गेले.
दिवाकर यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी साहित्याचे वाचन केलेले होते. शेक्सपियर, शेली, ब्राउनिंग, कीट्स, वर्डस्वर्थ यांसारख्या इंग्रजी लेखकांचे साहित्य त्यांनी अभ्यासलेले होते. शेक्सपियर या इंग्रजी नाटककाराच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास (काळ-१९११) त्यांनी केलेला होता. याशिवाय मोलियर, टॉलस्टॉय इ. लेखकांचे ग्रंथही त्यांनी वाचलेले होते. नाटककारांपैकी इब्सेन, गाल्सवर्दी, मेटरलिंक, हाउप्टमान इत्यादींची नाटके त्यांनी (काळ-१९१३) वाचलेली होती. १९१८ ते १९२२ या काळात दिवाकर यांनी ऑस्कर वाइल्ड, पुश्किन, पिनिअरो, गॉर्की या लेखकांचे ग्रंथ वाचले तर आयुष्याच्या शेवटच्या आठ वर्षात बॅरी, ए.ए. मिलन, ड्रिंकवॉटर, कॅथरिन मॅन्सफिल्ड या लेखक लेखिकांची पुस्तके वाचून त्यावरील टीकावाङ्मयही दिवाकरांनी वाचून पूर्ण केले.
जानेवारी ४ १९१२ रोजी दिवाकरांनी केशवसुतांच्या कविता सर्वप्रथम वाचल्या. केशवसुतांच्या कवितांनी दिवाकर मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा प्रभाव कायम होता. वासुदेवराव पटवर्धनांबरोबरच्या मैत्रीप्रमाणेच दिवाकर आणि केशवसुत यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. केशवसुतांच्या सर्व कविता छापून निघाव्यात, आणि त्यांचे जतन व्हावे यासाठी दिवाकर यांनी बरेच प्रयत्न केले. याकामी त्यांनी हरिभाऊ आपटे आणि केशवसुतांचे धाकटे भाऊ सीतारामपंत दामले यांचे साहाय्य मिळवण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही. तरीही दिवाकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज केशवसुतांचे समग्र काव्य उपलब्ध आहे. दिवाकर काही काळासाठी रविकिरण मंडळाचे सदस्य होते आणि या मंडळाच्या रविवारच्या बैठकीत आणि चर्चेत ते भाग घेत असत. पुण्याच्या नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने शंकर काशीनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांच्या स्मृतिनिमित्त होत असलेल्या या स्पर्धा इ.स. १९९२ साली सुरू झाल्या. २०१६ साल हे दिवाकर स्मृतीनाट्यछटा स्पर्धांचे रौप्य महोत्सवी वर्ष होते.
आज शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ यांचा ८५ वा स्मृतिदिन आहे. त्यांना शब्दसुमनांची श्रद्धांजली. मराठीतील एका रंगतदार साहित्यकृतीच्या या जनकास अभिवादन. मराठीचा खरा कळवळा असणाऱ्या भाषाप्रेमींशिवाय इतरही मराठी मायबोलीकरांनी हा साहित्यप्रकार एकदा तरी अवश्य वाचावा असाच आहे. काळाच्या ओघात लुप्त झालेला हा साहित्यप्रकार नेटीझन्सच्या माध्यमातून पुनरुज्जीवित व्हावा असे कुणा एकाच्या मनात जरी आले तरी या लेखाची यशस्वी फलश्रुती होईल.
- समीर गायकवाड.
संदर्भ : मराठी नाट्यछटा, आवृ. दुसरी, पुणे, १९३९- कानेटकर, शं. के.,
संपा. नाट्यछटा, आवृ. दुसरी, पुणे, १९३९- लागू, रा. कृ.,
विकीपिडीया.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा