शनिवार, २ एप्रिल, २०१६

स्वतःचा शोध घेणारा अफलातून नेता - अभिनेता : हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय


राजेश खन्नाचा 'बावर्ची' हा सिनेमा आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. त्यातले सतत पलंगावर बसून असणारे खवचट आजोबा आठवतात का? तेच ते, 'शांती निवास' सदनचे सर्वेसर्वा शिवनाथ शर्मा! त्यांचं वास्तव जीवनामधलं नावही असंच मजबूत होतं! त्यांचं नाव हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय.

काही माणसं वरवर एकदम किरकोळ साधी वाटत असतात मात्र अशांच्या अंतःकरणात खोलवर डोकावून पाहिलं की काहीतरी वेगळंच दृष्टीस पडतं. संबंधित व्यक्तीच्या बाह्यरूपाहून भिन्न स्वरूप समोर येतं; कधी हे विलक्षण आकर्षक असतं तर कधी अत्यंत धक्कादायक! ही अशाच माणसाची गोष्ट.

यांची थोरली बहीण म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील विख्यात महिला सेनानी! सरोजिनी नायडू त्यांचं नाव. आणि यांची पत्नीही तितकीच थोर; रेमन मॅगेसेसे ऍवार्ड विजेती कमलादेवी चट्टोपाध्याय! बहीण अगदी सक्रिय काँग्रेसी आणि पत्नी अतिशय कट्टर समाजवादी. विशेष म्हणजे हे गृहस्थ कडवट साम्यवादी!

या दोघींच्या तुलनेत हरिंद्रनाथही काही कमी नव्हते, देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत हे विजयवाडा मतदारसंघातून सीपीआय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले! त्यामुळे यांचाही रौब होताच!

हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय हे लोकसभेतही आपल्या खड्या आवाजात चळवळीची गाणी गात व भाषणं देत.त्यांच्या भाषणात ते कॉग्रेसी सत्ताधाऱ्यांना अगदी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनाही झोडून काढत, परंतु नेहरू त्यांची भाषणं,गाणी गंभीरपणे ऐकत, नेहरूही त्यांचें फॅन होते. त्यांच्या आवाजात वेगळा ह्रिदम असे, किशोर कुमार पेक्षाही अद्भुत त्यांची स्वर पट्टी होती,त्यांची काही गाणी युट्यूबवर उपलब्ध आहेत. 

ते कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक तेलंगण सशस्त्र लढ्यातील आघाडीचे कार्यकर्ते होते, त्यांनी आणि हैदराबाद मधील लोकशाहीर, गीतकार, कॉम्रेड मखदूम मोइद्दींन यांनी आपल्या गाण्यांनी तेलंगण परिसर ढवळून काढला होता.त्यांच्या गाण्याच्या जोरावरच ते खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते.

एकाच घरात तीन भिन्न टोकाच्या राजकीय विचारधारा असणारी थोर माणसं राहत होती! परिणाम व्हायचा तोच झाला, कुणीच नमते घेतले नाही. वैचारिक आणि राजकीय मतभिन्नता टोकाची असल्याने केवळ कृत्रिमरित्या नाते निभावत नेण्यापेक्षा फारकत घेतलेली बरी या स्पष्टतेतुन ते विभक्त झाले.

देशातली घटस्फोटाची जी काही पहिली प्रकरणे होती त्यात यांचेही प्रकरण होते. एव्हढ्या मोठ्या कुटुंबात असा प्रकार घडल्याने देशभरात चर्चेचा विषय झालेला.

अखेर ते विभक्त झाले. त्यांनी स्वतःचा शोध जारी ठेवला. सत्यजित रे, ऋषिदा, गुलजार यांच्याशी त्यांची मैत्री होती ती कामी आली. त्यांनी कसदार कविता लिहिल्या आणि सिनेमांतही कामं केली. छोट्याच परंतु चांगल्या भूमिका केल्या.

पत्नीपासून विलग झाल्यावर त्यांनी स्वतःचा शोध घेतला, तो ही विलक्षण अभिनव पद्धतीने! हे प्रत्येकाला जमत नाही कारण यासाठी संयम, निश्चय आणि सहनशीलता हवी. हरिंद्रनाथांना हे सहजी जमले!

वास्तवात हरिंद्रनाथ हे अत्यंत उदारमतवादी आणि आधुनिक विचारांचे होते. त्यांची धाकटी बहीण सुहासिनी हिने तिची मैत्रीण कृष्णा राव हिच्याशी त्यांची ओळख करून दिली. कृष्णा विधवा होती. हरिंद्रनाथांना ती आवडली. त्यांनी विवाहाची मनीषा बोलून दाखवली.

हरिंद्रनाथांचे वडील विख्यात शास्त्रज्ञ होते आणि आई गायिका. त्यांनी कोणतीही आडकाठी न घेता अनुमती दिली. कृष्णा रावची कमलादेवी चट्टोपाध्याय झाली! तिने तिचे आकाश शोधले यातून दुरावा आला परिणामी त्यांच्यातले पतीपत्नीचे नाते टिकले नाही. त्यांच्या लहान बहिणीने- सुहासिनी ने महाराष्ट्रातील कम्युनिस्ट नेते कॉम्रेड रा. म. जांभेकर यांच्याशी विवाह केला, तिचा नि जांभेकर यांचा संसार सुखाचा झाला!

हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय हे एक बहुपेडी व्यक्तिमत्व होते. हरिंद्रनाथांनी लिहिलेल्या इंग्रजी भाषेतील कविता विशेष प्रसिद्ध आहेत. साहिब बिवी और गुलाम, आशीर्वाद, अभिलाषा, तीन देवियां, तेरे घर के सामने, मेहबुबा अशा हलक्या फुलक्या चित्रपटात काम केलेला हा माणूस दिसायला खत्रूड वाटायचा पण अत्यंत हळव्या मनाचा, कवी हृदयाचा त्यांचा पिंड होता.

हरिंद्रनाथांनी अनेक बंगाली व काही हिंदी गाणी लिहिलीत, त्याला संगीत देखील दिले अन् त्या गाण्यांना त्यांनी आपला आवाजही दिला होता. अशी आगळी वेगळी खुबी त्यांच्यात होती.

सत्यजित रें सरांच्या सिनेमात त्यांना मानाचे अन् प्रेमाचे स्थान होते. छोट्याच पण लक्षात राहतील अशा भूमिका त्यांनी रेंच्या सिनेमात केल्या. 'फेलुदा' आठवून पाहा म्हणजे प्रचिती येईल! स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारा हा माणूस अत्यंत अबोल होता मात्र त्यांच्या हिंदी रचना विरुद्ध टोकाच्या होत्या ! 'रेलगाडी मालगाडी ...' अशोक कुमारांच्या आवाजातलं हे गाणं त्यांनीच लिहिलं होतं !

1975 मध्ये आलेल्या 'ज्युली' या हिट चित्रपटातले लक्ष्मी या नवख्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं 'माय हार्ट इज बिटिंग...' हे सुप्रसिद्ध गाणंदेखील याच हरिंद्रनाथांचं होतं..काही ठिकाणी हे गाणं आनंद बक्षींच्या नावाने खपवले गेले ही बाब अलाहिदा, मात्र या गाण्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या गाण्याला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होताहेत मात्र हे गाणे अजूनही तरुणच आहे नि पुढेही तरुणच राहील!

वरवर खडबडीत वाटणारा हा माणूस आतून मात्र मेणाहून मऊ म्हणतात तसा होता, आयुष्यभर स्वतःचा शोध घेत राहिला. भूमिका मिळाव्यात म्हणून त्यांनी कुणाचे उंबरठे झिजवले नाहीत की त्यांना प्रसिद्धीचा सोस नव्हता. अशी माणसे चित्रपट क्षेत्रात चालत नाहीत पण त्यांनी स्वतःला बदलवले नाही.

गुलजार, ऋषिदा आणि सत्यजित रे या तीन तऱ्हेच्या पण त्यांच्यासारख्याच प्रतिभावान माणसांशी मैत्री असूनही त्याचा त्यांनी कधी फायदा घेतला नाही. 1973 मध्ये त्यांना भारत सरकारने कविता व चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

चित्रपट क्षेत्रात रोज पायलीला पासरीभर माणसे येतात आणि जातात. कोण कोणाला मोजत नसतो. काही तर केवळ वर्षभरात विस्मृतीत जातात काहीना त्याच्याशीही काही घेणेदेणे नसते, ते फक्त स्वतःच्या निखळ आनंदासाठी या क्षेत्रात आलेले असतात. अशांपैकी एक असणाऱ्या हरिंद्रनाथांचा आज जन्मदिन.

त्यांच्या कविता अधूनमधून वाचनात येतात तेव्हा त्यांनी रंगवलेले 'बावर्ची' मधले आजोबा डोळ्यापुढून तरळून जातात अन् आश्चर्य वाटते की वाटयाला आलेल्या सर्वच सिनेमात छोट्या भूमिका केलेला हा माणूस विस्मृतीत कसा काय जात नाही? याचं कारण त्यांच्या शोधयात्रेत दडले आहे.

माणसाला आपण कोण आहोत हे लक्षात आले पाहिजे, आपल्याला काय आवडते नि आपण काय करू शकतो, आपल्याला जे आवडते ते आपण करू शकतो किंवा नाही याचा अदमास घेता आला पाहिजे. आपलं आवडतं क्षेत्र निवडता आलं तर त्यात आपलं शतप्रतिशत योगदान देऊन तिथे आपला ठसा उमटवता येतो. हरिंद्रनाथांनी हेच केलं! हे जमलं की आयुष्य सुखकर होतं!

हरिंद्रनाथांची एक कविता इथे आवर्जून द्यावी वाटते -
'पुराने पन्नों वाली वो डायरी अक्सर ज़िन्दा हो जाती है,
जब खुलती है, मुस्कुराती है, पहले प्यार की हरारत,
खिलखिलाती है कर के कुछ शरारत..
रुलाती भी है वो एक कविता,
एक सूखा ग़ुलाब कुछ आँसुओं से मिटे शब्द…
कुछ मीठी, कुछ नमकीन सी यादें
निकल आतीं हैं जब बिखरे पीले पन्नों से
मैं भूल जाता हूँ इस उम्र की दोपहर को
और फिर से जी लेता हूँ कुछ अनमोल पल....'

आपल्या सर्वांच्या हाती अशी एक दृश्य वा अदृश्य स्वरूपातली डायरी असतेच जिची पाने आपण उघडली की त्यातल्या अनेक गोष्टी सचेत होतात. त्यातल्याच एखाद्या पानात गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या असतात तर काही पानांमधून जुन्या खारटगोड आठवणी समोर येतात. या स्मृतींचा जागर झाला की डायरीच्या धुरकट झालेल्या पानांचा विसर पडतो नि ते अनमोल क्षण आपण परत परत जगत राहतो. हा आपल्या भूतकाळाचा शोध होय.

हरिंद्रनाथांनीही हा शोध घेतला मात्र ते त्यात गुंतून पडले नाहीत. ते स्वतः डायरीची पाने नव्याने लिहीत राहिले. लिहिलं, वाचलं पाहिजे; जगणं अर्थपूर्ण होतं!

- समीर गायकवाड




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा