कोलकात्त्यातील बागबाजार या जुन्या शहरी भागातली ती एक छोटीशी घरवजा शाळा होती. उन्हाळ्याचे धगधगते दिवस होते. अंगाची लाही लाही करणारया त्या हवामानात महिला,मुले आणि वृद्ध शक्यतो घरी बसून राहत. अशा वातावरणात विदेशी महिलांना फार शारीरिक हाल अपेष्ठा सोसाव्या लागत. मात्र कोलकात्त्यातील त्या छोट्याशा शाळेत एक विदेशी स्त्री अशा विषम वातावरणात आनंदात राहत होती.
मागील काही दिवसांपासून सोनेरी केसाची, गौरकांतीची ती तेजस्वी स्त्री आर्थिक जमवाजमवीच्या विचारात होती. दिवसरात्र तिच्या डोक्यात तिच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे भविष्य यावरच विचारमंथन चालू होते. आर्थिक स्त्रोतासाठी अनेक पर्याय समोर होते, त्यातला तिला योग्य वाटलेला पर्याय होता, तिने स्वतः यासाठी वणवण फिरून लोकांकडे आर्जवे करून पैसा उभा करणे. खरे तर तिने काढलेल्या शाळेत मुलीदेखील स्वखुशीने येत नव्हत्या, पालक त्यांना पाठवत नसत तर ती स्वतः त्यांच्याघरी जाई आणि मिनतवारया करून मुलीना शाळेत पाठवायला सांगे. म्हणजे तिची एकाच वेळेस दोन्ही दिशेने तारेवरची कसरत चालू होती. तिच्या शाळेची आणि तिच्या आर्थिक निकडीची गरज ख्रिस्ती मिशनयापर्यंत पोचली यात नवल ते काय. एके दिवशी भर दुपारी रणरणत्या उन्हात तिच्याकडे हेनरिटा मुल्लर या प्रौढ महिला आल्या. तिने त्याना पाणी दिले, इतर विचारपूस केली. येण्यामागचे प्रायोजन विचारले तसे हेनरिटाबाईंचा चेहरा खुलला. त्यांनी मुली, महिला, शिक्षण, बालकल्याण असे विषयांचे रिंगण करत करत पुढे नेले आणि शेवटी आर्थिक गरजाशिवाय हे सर्व सिद्धीस नेता येत नाही असं सांगितले.
अखेर मनाचा हिय्या करून हेनरिटाने त्या तेजस्वी स्त्रीला तुझी शाळेची निकड किती रक्कमेची आहे असे विचारले आणि आपला एक फासा फेकून पाहिला. तिची गरज ऐकून थोडासा विचार केल्यासारखे करून हेनरिटा म्हणाल्या, ' ठीक आहे, तुम्ही अगदी मनापासून या मुलींसाठी झटताय. खूप चांगले काम करताय. तुम्हाला मदत करायलाच पाहिजे. मी तुम्हाला आवश्यक ती सर्व रक्कम देते. इतकेच काय माझी सर्व संपत्ती मी तुम्हाला देते."
ती सोनेरी केसांची स्त्री आता थोडी अचंबित होऊन हेनरिटाकडे पाहू लागली होती. एक ओळख पाळख नसलेली महिला आपली सर्व संपत्ती आपल्या शाळेसाठी देऊ करत्येय याचा तिला आनंद वाटत होता आणि तितकेच आश्चर्यदेखील वाटत होते. त्या स्त्रीच्या चेहरयावरचे आश्चर्यमिश्रित भाव हेनरिटाने लगेच ओळखले आणि आपला दुसरा फासा लेगेच फेकला.
"पण माझी एक अट आहे.."
हेनरिटाच्या उद्गारासरशी ती स्त्री प्रश्नार्थक मुद्रेने हेनरिटाकडे पाहू लागली.
" होय असे बिचकून जाऊ नका, माझी अट फार मोठी किंवा अवघड नाहीये, अगदी साधी सोपी सरळ बाब आहे. तुम्हाला तर ती अगदी सोप्पी आहे, इतर भारतीय स्त्रियांना मात्र ती थोडीशी अवघड वाटली असती. पण तुम्हाला नाही.."
हेनरिटाच्या खुलाशाने तिचा अधिक गोंधळ उडाला तसं हेनरिटानी शेवटचा फासा फेकला. त्या म्हणाल्या,"माझी फक्त एक अट आहे, तुम्ही ख्रिस्ती पद्धतीने या मुलींना शिकवा, बस्स इतकेच. शिवाय तुम्हीही ख्रिश्चन आहात तेंव्हा तुम्हाला हे स्वीकारार्ह असायला पाहिजे.आणि ."
हेनरिटाचे वाक्य तिने अर्ध्यातच थांबवले आणि तिने त्यांना हात जोडले आणि म्हणाली की," तुम्ही दाखवलेल्या उदार अंतःकरणाबद्दल आणि तुमच्या सकरात्मक मदतीच्या प्रस्तावाबद्द्ल मी तुमची ऋणी आहे. कालीमातेच्या कृपेने मला काही कमी पडत नाही, तुम्ही येऊ शकता!"
आता आश्चर्यचकित होण्याची वेळ हेनरिटा मुल्लर यांची होती..त्या म्हणाल्या, 'मी समजले नाही, तुमचे उत्तर काय आहे ?" "मी जरी जन्माने ब्रिटीश असले तरी आतामात्र मी एक हिंदू भरतोय स्त्री आहे, आणि माझ्या सर्व विद्यार्थिनी या माझ्या मुली आहेत. माफ करा मी तुमची मदत घेऊ शकत नाही. मी स्वतःशी, माझ्या विद्यार्थिनीशी आणि माझ्या धर्माशी प्रतारणा करू शकत नाही..तुम्ही आता येऊ शकता..भेटीसाठी धन्यवाद !"
तिचे हे बाणेदार उत्तर ऐकून निरुत्तर झालेल्या हेनरिटा जड पावलांनी तेथून बाहेर पडल्या.
ती बाणेदार तरुणी म्हणजे मार्गारेट एलिझाबेथ नोबल उर्फ भगिनी निवेदिता ! ती शाळा आजही कोलकात्त्यात आहे. बागबाजारला निवेदिता लेन आहे, तिथे या महान स्त्रीच्या स्मृती आजही आहेत.
आपला देश - धर्म सोडून भारतात राहून भारतीयांसाठी जीवन वेचणारी ही ध्येयवेडी तरुणी स्वामी विवेकानंदांची मानसकन्या होती. त्यांनीच तिला 'भगिनी निवेदिता' हे नाव दिले होते…
स्वामी विवेकानंदांची मानसकन्या भगिनी निवेदिता यांनी स्त्री शिक्षणासाठी कठीण श्रम वेचले आणि मुलींसाठी शाळा काढली. ही शाळा व स्त्री शिक्षण हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. यासाठी त्यांनी आपल्या तत्त्वांना कधीच मुरड घातली नाही. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे देशवासियांनी त्यांना भगिनी म्हणून स्वीकारले. हिंदुत्वाची सेवा हेच जीवनाचे ध्येय, तीच एकमेव उपासना आणि त्या उपासनेतूनच ईश्वरप्राप्ती हा सेवाभावी मार्ग स्वीकारणारी मूळची इंग्लंडमधील मार्गारेट, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी २८ जानेवारी १८८८ रोजी भारतात आली. कोलकात्यात शारदामाता यांच्या आश्रमात ती इतर संन्यासिनींप्रमाणे राहिली आणि त्यांचा जीवनक्रम तिने जवळून पाहिला. शारदामातांच्या दर्शनासाठी येणाºया स्त्रियांच्या अडीअडचणी तिने ऐकल्या, स्त्रियांवरील लादलेल्या अनेक जाचक रूढींची तिला कल्पना आली. त्याचबरोबर तिने हिंदू पोथी- पुराणांचे अध्ययन केले. येथील जीवनपद्धती समजून घेऊन त्या प्रवाहात ती यशस्वीपणे सामील झाली. उदार मन, अपार करुणा आणि नम्र वाणी या गुणांमुळे तिने लोकांना लवकरच आपलेसे करून घेतले.
हिंदू धर्माच्या परिघातील समाजातील लोकांनीही मार्गारेटला आपले म्हणावे, त्यांना ती आपल्यातलीच वाटावी म्हणून स्वामीजी तिच्याशी तासंतास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असत. मार्गारेटची ग्रहणशक्ती अलौकिक होती. विवेकानंद ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी तिला बरोबर नेत. अवलोकन करून, त्यावर विचार करून, तेथील पद्धती आत्मसात करून तिने या समाज प्रवाहात सामील व्हावे यासाठी ते प्रयत्नशील असत. कोलकात्याच्या लोकांना आपल्या या पाश्चिमात्य शिष्याची ओळख स्वामीजींनी ‘इंग्लंडकडून भारताला मिळालेली ही एक अमोल देणगी’ अशी करून दिली होती.
कोलकात्यात निलाम्बर मुखर्जींच्या बागेतील रामकृष्ण आश्रमात मार्गारेटने आपले सेवाभावी व्रत स्विकारल्यानंतर परमेश्वरचरणी, गुरूचरणी तिने आपले सर्वस्व समर्पण केले होते. त्यावेळी सर्वस्व निवेदित केलेल्या त्या कन्येला स्वामीजींनी नवीन नावाने हाक मारली ‘निवेदिता’! आणि मार्गारेटाने आपल्या या नवीन ओळखीसह भारतात सेवा कार्याला सुरुवात केली. तिच्या विचारांना पाश्चिमात्य विज्ञानाचा डोळसपणा होता. प्लेगच्या साथीत स्वामीजी व इतर शिष्यांच्या बरोबरीने तिने रोगग्रस्तांची सेवा केली. स्वच्छतेचे महत्त्व स्वत: हातात झाडू घेऊन रस्ते, नाल्या साफ करून तिने दाखवून दिले.
केवळ वेदांताची चर्चा करणारी ही संन्यासिनी नाही तर कर्मयोग निष्काम बुद्धीने आचरणात आणणारी आहे, हे तिने दाखवून दिले. रुग्णांना ती देवदूताप्रमाणे भासे. आता विवेकानंदांच्या कार्याचा वसा चालविणारी निवेदिता ही स्वशक्ती व सामर्थ्यावर उभी राहिली होती. पुढे स्वामीजींबरोबर पंजाब, काश्मीर यात्रा करून सर्वसामान्य यात्रेकरूंप्रमाणे त्या अमरनाथ यात्रेत सामील झाल्या.
भारतीय संस्कृतीचा वारसा अधिक डोळसपणे जपला जावा त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाची जाण मुलींना यायला हवी होती. त्या वेळी हिंदू समाजात बालविवाह पद्धत रूढ असल्याने बालविवाहित स्त्रियांची संख्याही मोठी होती. अशा अनाथ स्त्रियांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी, स्वावलंबी बनविणारे क्रियात्मक शिक्षण, उपयुक्त घरगुती उद्योग शिकविणे आवश्यक होते.
आपल्या पती व मुलांशी संवाद साधण्यासाठी वाचन, लेखन, अंकगणित, इतिहास, भूगोल हे सर्व शिकविणेही भाग होते. त्यासाठी विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन तसेच सुविचार प्रामुख्याने रुजविण्याची गरज होती. त्यातूनच कर्तबगार स्त्रिया, उद्याची भावी पिढी सक्षम, बलशाली होईल. या राष्टÑसेविका सुकन्या, सुगृहिणी, सुमाता होतील तेव्हाच राष्टÑ कर्तबगार, बलशाली होईल हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांना विविध अंगांनी विषय शिकायचे होते. कालिपूजनाच्या दिवशी निवेदितांनी आपले ‘बालिका विद्यालय’ शारदामातांच्या हस्ते तीन मुलींना प्रवेश देऊन चालू केले. लवकरच त्याची संख्या तीस झाली. तरुण, प्रौढ, विधवांचा प्रश्न लक्षात घेऊन पुढे थोड्याच दिवसांत त्यांना उपयोगी पडेल अशा मातृमंदिराची स्वतंत्र स्थापनाही त्यांनी केली. घरोघरी जाऊन स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचा तो काळ होता.
मुलींना शाळेत पाठवा म्हणून विनवण्या कराव्या लागत; पण निवेदितांनी अखंड परिश्रम करून शाळा नावारूपास आणली. त्यासाठी त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. पुढे आयुष्यभर निवेदितांनी वेगवेगळी अनेक कामे उभी केली, नावारूपाला आणली; ही शाळा व स्त्रीशिक्षण हा त्यांच्या सर्व कार्याचा केंद्रबिंदू होता. शाळेला आर्थिक चणचण नेहमीच भासे. पैसा जमविण्यासाठी त्यांनी लेखन, व्याख्याने, प्रवचने असा विद्याव्यासंग आयुष्यभर केला. आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल अशी मदत त्यांनी कधीही स्विकारली नाही. ‘मी हिंदू आहे व या माझ्या मुली आहेत.’ ही धारणा त्यांच्यात पूर्णपणे रुजलेली होती. मुली बाटवण्यासाठी शाळा नव्हती. इतिहासातील स्फूर्तिदायक गोष्टी त्या मुलींना सांगत. त्या केवळ शाळेत नव्हे तर आसपासच्या घराघरांत, व्यावसायिकांत, दुकानदारांत, नोकरदारांत आदरणीय होत्या. ‘ही आपल्याला मदतीचा हात देईल, ही आपल्या पाठीशी आहे.’ असा विश्वास सर्व जनतेच्या मनात निर्माण झाला होता.
पुढे निवेदितांनी स्वतंत्रता चळवळीतही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी वृत्तपत्रांतून ब्रिटिशांविरुद्ध प्रखरपणे लेखन केले आणि जाहीर भाषणे दिली. वंगभंग आणि स्वदेशीच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
विवेकानंदांची ती मानसकन्या होती. ‘भगिनी निवेदिता’ या नावाने ती विश्वविख्यात झाली. अशा या कर्मयोगिनी भगिनी निवेदितांचा आज स्मरणदिवस आहे, त्यांना सविनय प्रणाम....
- समीर गायकवाड
(टीप- सोबतचे छायाचित्र भगिनी निवेदिता यांच्यावर काढण्यात आलेल्या बंगाली चित्रपटातील आहे आणि लेखातील माहिती जालावरून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा