मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

संयुक्त महाराष्ट्र आणि शाहीर अमरशेख .....


दिल्लीतल्या रस्त्यांवरचा मराठी माणसाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा होता अन त्यात अग्रभागी असलेल्या एका ट्रकच्या हौदयात उभे राहून एक शाहीर माईकचा वापर न करता गळ्याच्या शिरा ताणून सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सलग सहा तास एका हाताने डफ वाजवत आपल्या खडया पहाडी आवाजात पोवाडे गात होता आणि हे अद्भुत दृश्य बघून हैराण झालेले दिल्लीकर तोंडात बोटे घालून त्या शाहीराकडे अचंबित नजरेने बघत होते !
चार वाजता मोर्चाची सांगता जाहीर सभेने झाली. या सभेत बोलताना आचार्य अत्रे त्या शाहीराचे कौतुक करताना सदगदित होऊन बोलले -
"शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहीर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं...."
ती सभा होती संयुक्त महाराष्ट्रासाठीची !
अन 'दो कवडी के मोल बिकने को मराठा तयार नहीं है' असं ठणकावून सांगणारे ते महान शाहीर होते - 'शाहीर अमर शेख' !
या अमरशेखांच्या कर्तुत्वाचा आणि जीवनाचा हा धांडोळा ....
अमरशेख धर्माने मुस्लीम पण त्यांनी ना कधी जात बघितली, ना कधी धर्म बघितला. आयुष्याची सुरुवात पाणक्या म्हणून, गाडीचा क्लिनर म्हणून, नंतर गिरणी कामगार म्हणून, नंतर गिरणी कामगारांचा पुढारी म्हणून आणि पहाडी आवाजाच्या देणगीमुळे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध तर झालेच पण लोकप्रियही झाले..शेख आडनावाच्या शाहिराची रसरशीत चित्तरकथा ....

आमच्या सोलापूर जिल्ह्यातील जन्मभूमी असलेल्या शाहिर अमर शेख यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. मुंबई विद्यापीठात अमर शेख यांच्या नावाने अध्यासन आहे. याच अध्यासनातर्फे शाहिरांच्या जन्मशताब्दीची सुरुवात होत आहे.

‘महाराष्ट्र शाहिर’ म्हणून अमर शेख यांना विसरणे हा कृतघ्नपणा ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत मराठी जनतेचा त्याग हा जसा सगळयात मोठा आहे.. आचार्य अत्रे, डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील अशा थोर नेत्यांच्या घणाघातामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचली हे खरे असले तरी हे वातावरण तयार करण्यात शाहीर अमर शेख यांचे फार मोठे योगदान आहे.अमरशेख यांच्यासोबतचे सहकारी आत्माराम पाटील यांचेही योगदान आहे आणि सर्वच शाहिरांचे योगदान आहे.

आज कोणाला खरे वाटणार नाही, त्या काळात ग्रामीण भागात वीज नव्हती, माईक नव्हते, लाखा-लाखांच्या सभा फळीवर कुठे तरी खडूने जाहिरात करून जमत होत्या. आणि अशा या प्रचंड सभांमध्ये शाहीर अमर शेख यांच्या शाहिरीने सभेची सुरुवात होत होती. जे दिग्गज वक्ते होते ते रात्री कधीतरी उशिरा पोहोचत. कारण त्या काळात दहा वाजेपर्यंतच सभा आटोपली पाहिजे, असा नियम नव्हता.

एकेका रात्री चार-चार सभा असत आणि सर्व सभा मागे-पुढे होत. अमर शेख यांनी आपल्या पहाडी आवाजाने सभा सुरू?करून द्यायची आणि अत्रे, डांगे, एस. एम, उद्धवराव, क्रांतिसिंह हे पांडव सभेला पोहोचले की अमर शेख यांनी पुढच्या सभेला जायचे. एखादा शाहीर रक्त ओकला असता. व्यासपीठावर तीन-चार कंदील.

गावात पेट्रोमॅक्स असली तरी ती काँग्रेसवाल्याकडे. त्यामुळे ती मिळायची नाही आणि मग कंदिलावर सभा व्हायची. सभेच्या शेवटच्या माणसाला व्यासपीठावरील माणसं दिसायचीच नाहीत. पण अमर शेख यांचा पहाडी आवाज शेवटपर्यंत पोहोचायचा.. निरव शांतता असायची. आणि डफावर थाप पडली की अमर शेख यांच्या मुखातून ते धगधगते शब्द निखारा होऊन बाहेर पडायचे..
‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती
गोव्याच्या फिरंग्याला चारूनी खडे
माय मराठी बोली चालली पुढे
एक भाषकांची होय संगती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती..’

अमर शेखपाठोपाठ आत्माराम पाटील हातात डफ घ्यायचे आणि त्यांच्या शाहिरीने एक जोश निर्माण व्हायचा..
‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा
खुशाल कोंबडं झाकून धरा..’

महाराष्ट्र अक्षरश: पेटून उठलेला होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी जे काय हवं ते करायची तयारी मराठी माणसानं दाखवलेली होती आणि मग या शाहिरांच्या तोंडून ते शब्द लोक अक्षरश: झेलत होते..

बेल्लारी बेळगांव ।
पंढरी पारगाव।
बोरी उंबरगाव ।
राहुरी जळगाव।
सिन्नरी ठाणगांव।
परभणी नांदगाव।
व-हाडी वडगांव।
शिरीचा बस्तार।
भंडारा चांदा।
सातारा सांगली।
कारवार डांग।
अन् मुंबई माऊली।
जागृत झालाय दख्खनपुरा.. खुशाल कोंबडं झाकून धरा..

सारी सभा या शाहिरांच्या आवाक्यात यायची. मुख्य व्यक्त्यांना सभेला यायला दोन दोन-तीन तीन तास उशीर व्हायचा.. आणि एवढा वेळ सभेला मंत्रमुग्ध करून ठेवणे हे सोपे काम नव्हते. हे मर्दाचे काम होते आणि हे मर्द शाहीर दोन दोन-तीन तीन तास आपल्या ताब्यात सभा ठेवत होते. त्यांचा डफ, त्यांचे तुणतुणे, त्यांची ढोलकी.. सारी सभा मोहरून जात होती. संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण तयार करण्यात या लोक शाहिरांचे योगदान फार फार मोठे आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला त्यावर पुढे वाद झाला. पण तो मराठी जनतेने आणला. आचार्य अत्रे यांच्या वाणीने आणि ‘मराठा’तील लेखणीने आणला. याचबरोबर महाराष्ट्रातील या दमदार शाहिरांनी छत्रपतींच्या काळातील शाहिरी अमोघ शास्त्रासारखी या चळवळीत वापरली.

संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी या शाहिरांनी पार पाडली, असा इतिहास महाराष्ट्राला लिहावाच लागेल. या शाहिरांना काहीही मिळालेले नाही. कोणतेही मानधन त्यांनी घेतलेले नाही. प्रवास खर्च कोणी दिला असेल तर ठीक पण एस. टी.ची गाडी आणि साध्या युनियनच्या गाडया त्यातून प्रवास करून सारा महाराष्ट्र पिंजून काढणारे हे शाहीर आणि त्यांचे नायक शाहीर अमर शेख यांना महाराष्ट्र विसरणे शक्य नाही.

संयुक्त महाराष्ट्रातील लढयाचे दोन-तीन मोठे टप्पे होते. जसे प्रतापगडचा मोर्चा हा एक मोठा टप्पा होता. मुंबई महापालिकेच्या निवडणुका समितीने जिंकणे हा सगळयात मोठा टप्पा होता. त्याचप्रमाणे दिल्लीवर धडकलेला समितीचा विराट मोर्चा हाही फार मोठा टप्पा मानला जातो. या दिल्लीच्या मोर्चात अग्रभागी एक ट्रक होता. त्या ट्रकवर उभं राहून शाहीर अमर शेख यांची डफावर थाप पडली ती सकाळी दहा वाजता आणि हा मोर्चा दुपारी चार वाजेपर्यंत चालला. दहा ते चार असे सहा तास शाहीर अमर शेख गात होते. एखादा शाहीर रक्त ओकला असता. दिल्लीच्या रस्त्यावरील सरदारजी तोंडात बोटं घालून या शाहिराकडे पाहत होते. गगनभेदी आवाजात अमर शेख यांचा तो पहाडी आवाज दिल्ली भेदून जात होता..
‘जाग मराठा.. आम जमाना बदलेगा..’

अमर शेख यांच्यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हेही होते. त्यांनी गीतं लिहायची आणि अमर शेख यांनी ती गायची..
'माझी मैना गावाकडे राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाला | कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची |
रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची |
काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||’

अण्णाभाऊंचे हे गीत अमर शेख यांनी गावागावात पोहोचवले. त्याचवेळी डाव्या विचारांचे प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची कविताही अमर शेख यांनीच अमर केली.
'डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती ?
आलं वरीस राबून, मी मरू किती ?

कवळाचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती ?
गवताचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती ?
आडाचं पाणी बाई ग, पाणी वडावं किती ?
घरात तान्हा बाई ग, तान्हा रडंल किती ?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती ?........

अक्षय र्‍हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रूप नवं आणू महाराष्ट्र भूला
जुलमाचे काच रावणी फास, एकीचं निशाण हाती ! ..'

दिल्लीचा मोर्चा संपल्यानंतर जाहीर सभा झाली. तेव्हा आचार्य अत्रे अमर शेख यांना म्हणाले, ‘शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहीर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं.’

अमर शेख हे नुसतेच शाहीर नव्हते तर ते गीतकारही होते. ‘अमर गीत’, धरती माता, कलश, हे त्यांचे काव्यसंग्रह त्यांच्यातील साम्यवादी कवीची साक्ष पटवायला पुरेसे आहेत. ‘कलश’ या काव्यसंग्रहाला आचार्य अत्रे यांनी ६० पानांची प्रस्तावना लिहिली आणि ‘कलश’चे महत्त्व त्यामुळे मराठी मनात घराघरात पोहोचले.

या ‘कलश’मध्ये अमर शेख यांनी कोकीळच्या संगीतावर एक कविता लिहिली आहे. जगाला या कोकीळ आवाजाची मोहिनी अनेक वर्षे आहे. पण साम्यवादी कवीला या संगीतापेक्षाही गरीब माणसाच्या पोटातील भूक अस्वस्थ करीत आहे आणि म्हणून अमर शेख लिहून जातात..
'कोकीळं गाऊ नको तव गीत
जाळीत सुटले मानवी हृदया..
जे भेसूर संगीत
भूक येई?पायात माझी बघ
होई जीवाची तगमग तगमग
काय मला तारील तुझे संगीत
कोकीळं गाऊ नको तव गीत.....'

या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांचे शेख अमर हे टोपण नाव होय. त्यांची कारकीर्द २० ऑक्टोबर १९१६ ते २९ ऑगस्ट १९६९ इतकी राहिली. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो.

कलश आणि धरतीमाता हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत हा गीतसंग्रह आणि पहिला बळी हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छत्रपती शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.
लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे...

कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता. आजच्याच दिवशी २९ ऑगस्ट १९६९ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी इंदापूरजवळ अपघाती निधन झाले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले...

अमर शेख यांनी 'प्रपंच’ आणि ‘महात्मा फुले’ या गाजलेल्या चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या आणि यातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘महात्मा फुले’ हा चित्रपट तर आचार्य अत्रे यांचीच निर्मिती होता. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रपतींचे रौप्य पदक मिळाले होते आणि या चित्रपटात गाडगेबाबांनीसुद्धा कीर्तन करून काम केलेले होते. त्याच चित्रपटासाठी अमर शेख यांच्या अभिनयाचा गौरव झालेला आहे. आचार्य अत्रे तेव्हा म्हणाले होते, अमर शेख म्हणजे धग, रग, आग यांची बेरीज होय....
आज शाहीर अमरशेखांचा स्मरणदिवस आहे. त्या अनुषंगाने नवीन पिढीस या अजरामर शाहीराच्या महान कार्याची ओळख व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच ..

या अनोख्या योद्धयास त्रिवार नमन ....

- समीर गायकवाड .

संदर्भ : १. पोतदार माधव रा. - शाहीर अमर-अण्णा, पुणे, २००४.
२. शेख मलिका अमर - सूर एका वादळाचा: शाहीर अमर शेख, मुंबई, १९९२.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा