सोमवार, २८ मार्च, २०१६

सर्वसामान्याचा अनोखा ताजमहाल !



महाल,राजवाडे,प्रतिके,स्मारके काय राजे लोकांनीच बांधावीत का ? सामान्य माणसाचे प्रेम हे बादशहाच्या प्रेमाइतके उत्तुंग प्रेम नसते का ? साध्या भोळ्या सर्वसामान्य माणसालाही प्रेमाचे प्रतिक निर्माण करावे वाटले तर त्याने काय करावे ? राजा महाराजांनी आपल्या प्रेमाच्या खातीर उंचे राजवाडे, महाल उभे केले म्हणून त्यांचे प्रेम श्रेष्ठ अन म्हणूनच इतरांचे प्रेम कदाचित तितके श्रेष्ठ ठरवले जात नाही असे का ? राजा महाराजांकडे तितकी संपत्ती, तितके मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, सामान्य माणसाचे तसे नसते. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या प्रेमाचे तसेच उत्तुंग प्रतिक उभारावे वाटले तर त्याकडे जग कुतूहलाने पाहते. आपल्या पत्नीवर असीम प्रेम करणारी काही आगळी वेगळी माणसे अशीच झपाटून जातात अन काही तरी वेगळे करून दाखवतात. ही माणसे इतरांच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनतात. काही जण त्यांची टवाळी करतात, तर काही जण याला अनावश्यक खर्च ठरवतात तर काहींजण यावर सल्ला देतात की हेच पैसे सामाजिक कार्यात खर्च करून देखील आठवणींचे स्मारक उभा करणे अधिक उचित ठरले असते. काहीजण हा निव्वळ वेडपटपणा ठरवून मोकळे होतात तर काही मात्र कौतुक करतात. सामान्य माणसाने असं प्रेम करणं अन त्यातून असं स्मारक उभं करणे हे आत्ताच्या फास्ट ब्रेकअप आणि रिजॉइंटवाल्या प्रेमाच्या फास्ट - फ्युरियस दुनियेत असं प्रेम अनुभवास येणं जरा दुरापास्तच झाले आहे.

मुघल बादशहा शहाजहानने बांधलेला ताजमहाल आजही जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतो, आजही ताजमहाल प्रेमाच्या सर्वोच्च प्रतीकांमध्ये गणला जातो. शहाजहानचे त्याच्या पत्नीवर मुमताजवर गहिरे प्रेम होते. तिच्या मृत्युनंतर त्याने तिच्या स्मरणार्थ स्मारक उभे करायचे ठरवले. एका बादशहाने आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणी जपण्यासाठीचे हे स्मारक बनले देखील तितकेच उत्तुंग अन भव्य दिव्य, नेत्रदिपक असे ! आजही त्यांच्या प्रेमाचा 'वास्ता' सध्याच्या जमान्यातील प्रेमवीर देताना दिसतात. असं हे कुणालाही भुरळ पाडणारं आरसपानी सौंदर्याने नटलेले स्मारक आपण पण उभे करावे असं वाटलं तरी लोक वेड्यात काढतील ! इतका पैसा कसा उभा करणार आणि त्याला वेळ किती लागणार, कुटुंबातील इतर सदस्य या वायफळ खर्चाला तयार होतील का, स्मारक कुठे आणि कसे उभे करायचे, त्याला सरकारी परवानगी कशी घ्यायची, सरकार परवानगी काय म्हणून देईल असे एक ना अनेक प्रश्न लगेच पिंगा घालायला सुरुवात करतात. या प्रश्नांचा ससेमिरा मागे लागला की आपला जीवाचा माणूस निघून गेल्यानंतर आधीच निराश अन विमनस्क झालेल्या मनाची उरली सुरली उभारी नष्ट होते अन राहते ती योजनेची कुचेष्टा ! पण काही माणसं त्यांच्या मनातल्या आखीव रेखीव योजनांना मूर्त स्वरूप देतातच ! फार जिद्द लागते अशा गोष्टींसाठी अन तितकेच त्याचे वेडही काळजात घुमावे लागते !

असेच एक दिवाने प्रेमी आहेत फैझुल हसन कादरी ! ते उत्तर प्रदेशातील बुलंद शहर या शहरातील निवृत्त पोस्टमास्तर आहेत, फैझुल हसन यांनी त्यांच्या गावी केसर कलां येथे आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रेमाचे प्रतिक उभे केले आहे ! त्यांनीही एक स्मारक उभे केले आहे ! त्यांनीही एक ताजमहाल बांधला आहे ! त्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या जागेत हा ताजमहाल उभा केलं आहे. बुलंदशहर पासून ५० किलोमीटर अंतरावर एक छोटेसे हिरवाईने नटलेले खेडे आहे केसर कलां ! या गावी फैझुल यांच्या अनेक पिढ्यांपासूनचे वास्तव्य आहे. कादरींचा निकाह ताजुम्मील बेगम यांच्याशी ६ दशकांपूर्वी, १९५३ मध्ये झाला, त्यांचं उभयतांवर अतूट प्रेम होते. सामान्य माणसाचा असतो त्यांचा मीठभाकरी खाऊन सुखाचा समाधानाचा अन तृप्तीचा संसार होता. या दांपत्याला मुले बाळे झाली अन त्यांचा संसार आनंदाने फुलला ! जीवनातील संघर्ष हा सामान्य माणसाच्या दिनचर्येला पाचवीला पुजलेला असतो, त्याला फैझुल हसन अब ताजुम्मील बेगम हे दांपत्य देखील अपवाद नव्हते. नातवंडे सुना यांनी भरलेल्या घरात पुढे सुख बाळसे धरून मोठे झाले. वंशवेल मोठी झाली, फैझुल हसन यांच्या संसाराचे रहाट गाडगे ताजुम्मील यांनी मोठ्या हिकमतीने चालवले. अन एके दिवशी छोट्याशा भोवळ येण्याचे निमित्त झाले अन ताजुम्मील यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या विविध चाचण्या केल्या अन दुर्दैवी निदान झाले. ताजुम्मीलना कॅन्सर झाला होता. एक दशक त्यांनी या आजाराशी लढा दिला. आयुष्यभर आपल्या संसाराची अन आपली काळजी घेणारया आपल्या प्रिय पत्नीला अंथरुणाला खिळलेले पाहून फैझुल हसन उन्मळून पडले. त्याना सगळं जग उदास वाटू लागलं. सगळ्या कुटुंबाने शर्थीचे प्रयत्न केले पण २०११ मध्ये लग्नाच्या ५८ वर्षांनी ताजुम्मील यांचा इंतेकाल झाला. त्या देवाघरी गेल्या. उतारवयात अंथरुणाला खिळून असलेली पत्नी गेल्यामुळे फैझुल हसन खचून गेले. त्यांना आपल्या प्रिय पत्नीच्या प्रेमाची अनुभूती स्वस्थ बसू देईना, तिचा विरह त्यांना सहन होईना. तिच्यावरील प्रेमाखातर आपणही काही तरी भव्य दिव्य असं स्मारक बांधावं असं त्यांना राहून राहून वाटू लागलं.

आपल्या पत्नीवरील प्रेम हे अजरामर ठरावं अन लोकांनी त्याच्या आणाभाका घ्याव्यात असं त्यांना वाटायचं, त्यांनी आपला विचार मुलांजवळ बोलून दाखवला. आपला थकलेला बाप जो आई गेल्यापासून गुमसुम असतो त्याच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी आलेली रौनक बघून मुलांना बरं वाटलं. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आनंदाने होकार दिला. पण स्मारक कोणते उभं करायचं हे फैझुल यांनी ठरवलेले होतेच, ताजमहाल !! मुघल बादशहा शहाजहानने आपल्या दिवंगत पत्नी साठी बांधलेला ताज ! आपल्या पत्नीच्या या देखण्या मजारकडे बघत शाहजहानने आपले कैदेतले अखेरचे दिवस अगदी एकट्याने घालवले होते अन आपल्या खिडकीतून दूरवर दिसणारया ताजकडे बघत बघत आपला प्राण सोडला होता. मरताना हा बादशहा आपल्या पत्नीचा हा मकबरा डोळ्याच्या पारयात विरघळवून त्याची छबी आपल्यासोबत घेऊन अनंताच्या प्रवासाला गेला होता. त्यामुळे अर्थातच फैझुल हसन यांना ताजची भुरळ पडली तर त्यात नवल ते काय ! त्यांनी आपल्या ताजमहालची कल्पना सर्वांसमोर मांडल्याबरोबर आधी अडचणींचा पाढा समोर उभा राहिला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले अन त्या दिवसापासून झपाटल्यागत त्यांनी आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी काम सुरु केले.…

फैझुल हसननी आपल्या जमीनीचा काही भाग विकला, घरातील दागिने विकले, कमाईतली शिल्लक खर्ची टाकली अन आपल्या गावातला आपल्या 'ताज' साठीचा ताजमहाल उभा करायला सुरुवात केली. फैझुल हसन यांचा ताजमहाल बांधून जवळ जवळ पूर्ण झालाय. त्याच्या संगमरवराचे काम बाकी आहे, त्यासाठी पैसे उभे करण्याचे त्यांचे प्रयत्न अजून चालूच आहेत. फैझुलना या ताजमहाल भोवती बगीचा देखील बनवायचा आहे, पण त्याचा खर्च मात्र त्यांच्या आवाक्यातला नाही. शिवाय देखभाल देखील अशक्य आहे, यावर उपाय म्हणून त्यांनी पुन्हा बुलंदशहरच्या जिल्हाधिकारी बी.चंद्रकला यांची भेट घेतली तेंव्हा त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे मदत मागण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आणि पाळले देखील. तोपर्यंत माध्यमातून सामान्य माणसाच्या या 'ताज' बद्दल माहिती प्रसिद्ध होताच अखिलेशनी स्वतःहून ट्विटरवर याविषयी कुतूहल दाखवले अन फैझुलना लखनौ भेटीचे निमंत्रण दिले !! इतकेच नव्हे तर शाहजहानचा ताजमहाल ही एका बादशहाची ख्वाहिश होती अन फैझुल यांचा ताजमहाल हा सर्वसामान्य माणसाच्या हृदयाच्या कोपरयात बंदिस्त असणारया अव्यक्त इच्छा आकांक्षाची दास्तान आहे हा फरक त्यांनी मांडला !

आग्र्याचा ताजमहाल पहायला जसे पर्यटक येतात तसे पर्यटक बुलंदशहरच्या या गरीबाच्या स्वकष्टाच्या ताजमहालला पहायला यावेत अन हा ताजमहाल देखील जगाच्या नकाशावर यावा असं अखिलेश यादव यांनी सुचवताच कादरीजींना आनंदाश्रू आवरले नाहीत. एक सामान्य माणूस, आपली रोजीरोटी कष्ट कमाईने खाणारे एक कुटुंब अन कुटुंबातील सर्वांसाठी खस्ता खाणारी एक माऊली या सर्वांच्या एकेमेकावरील असामान्य प्रेमातून उभा राहिलेला 'ताज' !

आपण सुद्धा आपल्या पत्नीसाठी काही तरी करून दाखवावे, आपल्या प्रेमाचे प्रतिक जगाने पहावे असं सर्वांनाच वाटत असते पण सर्वांच्याच इच्छा फळाला येत नाहीत. प्रखर इच्छाशक्ती अन इतरांची मोलाची साथ यातून ते साकारते. आपल्या जीवनाच्या जोडीदारासाठी आणाभाका सगळेच घेत असतात, विवाहापूर्वी तर चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा असते पण संसार मागे लागला की हे चंद्रतारे गरजा आणि व्यथा यांच्या भवसागरात बुडून जातात अन उरतो तो रितेपणा ! राहतात त्या आठवणी ! मागे उरतात दिलेल्या आणाभाकांचे टोकदार शब्द ! खूप काही करायचे असते आपण ते जमत नाही, खूप काही सांगावे वाटते पण ते बोलता येत नाही, खूप काही द्यायचे असते आपण गेले द्यायचे राहून असे म्हणत म्हणत आपल्याही शेवटच्या घटका जवळ येतात तेंव्हा कंठी आलेले प्राण हताश करून जातात. आपल्या हातून निसटलेल्या क्षणांची अन राहिलेल्या आश्वासनांची स्मरणमाला गुंफतात, तेंव्हा हाती काही राहिलेले नसते. या अशा विमनस्क मनस्थितीमुळेच मला फैझूल हसन यांच्या ताजमहालचे महत्व शाहजहानच्या ताजमहालपेक्षा अधिक वाटते. अर्थातच यावर अनेक मतमतांतरे असू शकतात पण एका सामान्य माणसाची आपल्या दिवंगत पत्नीच्या प्रेमाचे प्रतिक उभी करण्याची जिद्द चुकीची अन खोटी ठरवता येत नाही !

फैझुल हसन यांचा ताजमहाल शाहजहानच्या ताजइतका देखणा, भव्य दिव्य, नेत्रदिपक अन कदाचित उत्तुंगही नसेल पण त्यामागची भावना अन प्रेम हे तितकेच अत्युच्च आहे, किंबहुना त्याहून काकणभर सरस असेल असं म्हणणे गैर ठरणार नाही. या प्रेमाची - प्रतीकाची महती प्रकांडपंडितांना, ज्ञानी लोकांना रुचेल की नाही हे सांगता येणार नाही पण त्याने फारसा फरक पडणार नाही कारण,

'पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भया न कोए |. ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होए ||' असं कबीरजींनी उगाच का लिहिले आहे !!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा