शनिवार, १६ जुलै, २०१६

बैलगाडीच्या रम्य वाटा .......



बैलगाडीच्या वाटा म्हणजे गाडीवानाच्या मनावरचे एक गारुड असते, या वाटा म्हणजे बैल आणि माती यांच्या अबोल नात्याचे अस्सल प्रतिक असतात. फुफुटयाने भरलेल्या मातकट रस्त्यावरून जाताना बैल माती हुंगत चालतात अन त्यांच्या तोंडातून गळणारी लाळेची तार मातीत विरघळत जाते. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजावर वाटेच्या दुतर्फा असणारी पिवळी रानफुले मस्त डुलत असतात तर गाडीच्या एका लयीत येणारया आवाजावर आजूबाजूची दगडफुले अन मातकट झालेली पाने धुंद होऊन जातात. सारया रस्त्याने बैल खाली वाकून मातीशी हितगुज करत असतात अन माती मुक्याने त्यांच्याशी बोलत बोलत बैलांच्या दमलेल्या थकलेल्या खुरांना मातीने न्हाऊ घालते, मातीनेच मालिश करते, बैलांचे पाय जितके मातकट होतात तितके त्यांचे श्रम हलके होतात . रस्त्याने जाताना ओझे ओढणारे बैल त्यांच्या वाड वडलांचे क्षेम कुशल तर मातीला विचारत नसावेत ना ? हा प्रश्न माझ्या डोळ्यात हलकेच पाणी आणून जातो....



काय विचारत असतील बर बैल मातीला ? माती काय सांगत असेल बर बैलांना ? गाडीला जुंपलेले बैल आणि त्यांच्याशी बोलणारी माती याला साक्ष असणारी वाटेच्या कडेची पाने, फुले हा संवाद रोजच ऐकत असतील, ऐकून रोज का बरे डुलत असतील ? काय नाते असेल बरे या सर्वांमध्ये ? हे प्रश्न नेहमीच पडतात. रस्त्याच्या कडेला असणारी एखादी दगडधोंड्याची रास, दगड गोट्यांची एखादी चळत, एखादी कुंबी, दगडांचे बांध हे देखील कान लावून हा संवाद ऐकत असतात. कधी कधी तर या दगडांच्या कपारीतून एखादा साप बाहेर येऊन मातीतून आडवी लोळण घेत रस्ता पार करून जातो जणू काही रस्ता निर्धोक असल्याचे तो त्याच्या नागमोडी वळणा वळणातून व्यक्त करत असतो. कधी या दगडांच्या राशीतून एखादा सरडा मान ताठ करून बैलांना काही इशारे देतो अगदी बैलगाडी वळणावर जाईपर्यंत त्याच्या इवल्याशा डोळ्यांनी निश्चलतेने टकमक टकमक बघत राहतो.

बैलगाडी मातीच्या,दगड धोंड्याच्या, मुरुमाच्या, ढेकळाच्या रानातून जाते तेंव्हा बैल अगदी तल्लीन होऊन गाडी पुढे ओढत नेतात, ते हुं की चु करत नाहीत. त्यांना जोजवणारी काळी आई त्यांच्यासोबत असल्यामुळे ते या रस्त्यांवरून जाताना अगदी बिनधास्त असतात. हेच बैल डांबरी सडकेवरून गाडी ओढताना मात्र अगदी बेचैन होतात, त्यांचे मन लागत नाही, सडकेवरून त्यांचे पाय घसरायला लागतात. पायात पेटके येतात, सापत्यात फास लागयला लागतो. मानेवरचे जू अगदी जड होते, तोंडाला फेस येऊ लागतो, मान खाली ओढायला लागतो तर कासरा वर ओढायला लागतो. त्यांच्या जीवाची अगदी ओढाताण होऊ लागते. नाहीतरी डांबरी सडका या कृत्रिम अन वरवरच्या मायेच्या असतात. त्यांना दिशादर्शक फलक नसतील तर त्यांचे अस्तित्व नुरते. मातीच्या वाटेला तिची स्वतःची एक ओळख असते, प्रत्येक पाणंदीच्या रस्त्याला माहेरवाशिनीचे आनंदाश्रू अन सासुरवाशिणीचे विरहाचे अश्रू मिसळलेले असतात. पारावरच्या रस्त्यात गप्पा मारताना पान खाऊन मारलेल्या पिचाकारयांचा, पानाच्या चंचीचा, काताचा, चुन्याचा पाने खाताना काढून टाकलेल्या पिवळ्या देठांचा अन मायेने फिरवलेल्या बोटाचा एक अनामिक वास त्या वाटेला असतो. तळ्याजवळून जाणारया बैलगाडीच्या रस्त्याला गारवा असतो, तिथली माती थंड असते तिथली झाडे, तिथल्या पारंब्या यांचा ऊन सावलीचा खेळ ही त्या रस्त्याची ओळख असते. वेशीवरच्या वाटेने अनेक सुखदुखे बघितलेली असतात,अनेक आनंदाचे क्षण अनेक दुःखाचे मळभ या वाटेने आपल्या मातीत जिरवलेले असतात.

पांडुरंगाच्या देवळाजवळच्या वाटेत उदबत्तीच्या अर्धवट जळालेल्या काड्या, सुकलेली फुले, गंध, बुक्क्याचे कण, गोपीचंदाचे घोटीव तुकडे अन कीर्तन-प्रवचन ऐकताना थकलेल्या, सुरकुतलेल्या डोळ्यातून नकळत वाहून गेलेल्या अश्रुंचे थेंब मोठ्या मायेने अन आस्थेने जातन केलेले असतात. मळ्याकडच्या रस्त्याला तर गाडीवानाचे उसासे, त्याची गाऱ्हाणी, त्याचे सांगावे, त्याने दिलेल्या हाळ्या, त्याने आनंदाने मारलेल्या आरोळ्या, त्याने येता जाता मातीच्या कानात सांगितलेले हितगुज, पावसाने ओढ दिल्यावर त्याने बसकण मारून मातीत टेकलेले डोके, त्याच्या घरातील चिमुकल्या पायांनी मातीला केलेल्या गुदगुल्या, गोठ्यात रोज येजा करणारया गायी म्हशींची अन त्यांच्या वासरांची निखळ मैत्रीचे ठसे यांचे ऋणानुबंध मिसळलेले असतात. रोज अस्ताला जाणारा सूर्य जिथे मातीचे चुंबन घेतो अन निळे आकाश जिथे रंग बदलून काळे निळे होत राहते तर कधी तांबडे पिवळे होते त्या सर्व रंगच्छटांना मोठ्या आस्थेने आपल्या प्रत्येक कणात सामावून ठेवणारया त्या वाटेची सर जगातल्या कोणत्याच चकाकत्या डांबरी सडकेला येत नाही, या सडकामध्ये तो गोडवा, ती माया, ते आपलेपण नसते. या रस्त्यांवर असतात सिग्नलचे भडक लाल,पिवळे अन हिरवे रंगातले बंदचालू होणारे कृत्रिम दिवे ! या सडकावर असतात गतीरोधक जे गती कमी करतात, लय बिघडवतात, जे प्रसंगी जीवघेणे देखील ठरतात. इतकेच कशाला, या सडकांवर पाऊस जरी पडला तरी तो त्यात मुरत नाही तो रुसवेला होऊन गटारामध्ये मिसळून जातो पण त्या रस्त्यात मिसळून जात नाही, मग मातीच कधी तरी फार ओढ लागल्यावर त्या रस्त्याला खड्डा पाडून बाहेर डोकावत राहते, पण तिचा जीव देखील त्या डांबरी सडकेखाली घुसमटत राहतो इतके प्रदूषण अन इतके ओझे तिला अहोरात्र सहन करावे लागते....

गावाकडच्या मातीच्या वाटा सांजवेळ झाली की मलूल होऊन जातात, थकल्या भागल्या जीवांची खुशामत करून, त्यांची सेवा करून मातीच थकून गेलेली असते त्यामुळे या वाटा संध्याकाळी उदास वाटतात, मग याच वाटांमध्ये असणारया दगडगोटयात रातकिडे त्यांचे एकतालीय संगीत रात्रभर वाजवत राहतात. श्रमलेले गाडीवान बैल मोकळे सोडून त्यांच्या पुढ्यात चारा टाकतात, त्यांच्या अंगावरून मायेने हात फिरवताच बैल त्यांचे शुभ्र रेशमी कातडे थरथरवतात अन शिंगे हलवून ख़ुशी व्यक्तवतात. दमलेला गाडीवान हातपाय धुवून जीवाला थोडा विसावा देतो, चुलीतून येणारा मस्त धूर अन त्या धुराचा वास असणारे खमंग कालवण तयार झाले की मातीचा देखील जीव कासावीस होतो. परातीत वाजणारया ज्वारीच्या भाकरीचे थापण्याचा थाप- थाप आवाज भुकेचे संदेश घेऊन येतो अन चांदण्या रातीला मातीत बाज टाकून चार घास पोटात टाकून झाले की मोत्या-हिरया या कुत्र्यांची जोडी देखील रंगात येते, मातीत लोळून ते मस्ती करू लागतात, मातीला कधी कधी कळत नाही की हे दोघे भांडण करत आहेत की मस्ती करत आहेत, मग न राहवून ती धुरळा उडवते अन हे दोघे जण अंगाचे वेटोळे करून त्या बाजेच्या कडेला जाऊन बसतात. गोठ्यात इतका वेळ चारा, आमुणे, कडबा कुट्टी खात उभी असणारी सगळी जनावरे देखील आता पाय पोटात मुडपून बसलेली असतात. हळूहळू सगळे अलगदपणे झोपेच्या अधीन होतात आणि वाट देखील हळूच शांत होते, तिच्यावर तरंगणारे धुलीकण खाली बसतात, मातीच्या कुशीत अंग विसावताना ते दिवसभर हवेत तरंगताना ऐकेलेले सृष्टीचे गाणे ऐकवतात.

बैलगाडीच्या वाटा डोंगराळ भागातून जातात तेंव्हा मात्र बैल दमून जातात,माळरान भागातून जाताना त्यांच्या अंगाला उन्हाचे चटके बसतात. उताराच्या रस्त्याला देखील गळ्याला फास बसतो अन खडकाळ रस्त्याला पायांना दगड धोंडे लागतात, गर्द झाडांच्या सावलीतल्या रस्त्याने जाताना मात्र निर्जीव बैलगाडी देखील बोलू लागते. वाट कोणतीही असो बैल आणि माती यांचा संवाद चालूच असतो. वाटेच्या कडेने असणारी शेते अन त्यावरून बागडणारी पाखरे, अधून मधून येणारी वाटेत मान वाकवून डोकावणारी आजूबाजूची हिरवी पिवळी झाडे यांचे त्या वाटेशी मर्मबंधाचे नाते असते, या नात्यावर प्रेमाचा शिडकावा करणारी त्या झाडांची पाने वाटेतल्या मातीवर मस्त लोळण घेत असतात. मळा असो वा वस्ती असो कुठूनही निघताना गाडीला एकदा का बैल जुंपले की त्यांना सांगावे लागत नाही की कोणत्या वाटेने जायचे आहे , फक्त जू खांद्यावर ठेवले आणि गाडी एकदा का वाटेवर आणली की पुढचे काम ती वाट आणि वाटेने जाणारे बैल बिनचूक करतात. या वाटेने जाताना मग गाडीवान एखादी बारीक डुलकी देखील घेतात, कारण कोणतेच अडथळे वा नवखेपण त्या वाटेने जाताना वाटत नाही. बैल थेट त्यांच्या थांब्यावर जाऊन थांबतात त्यासाठी ना चाबूक चालवावा लागतो, ना हॉर्न वाजवावा लागतो. हा सगळा मामला प्रेमाचा अन मायेचा असतो. या मातीत पाऊस पडून चिखल झाल्यावर मात्र माती जणू बैलांच्या पायांना धरून ठेवायचा प्रयत्न करते अन चाके जड होतात. बैल कसेबसे मातीच्या त्या मगरमिठीतून स्वतःला सोडवून घेतात अन मळ्यात येऊन अंग टेकवतात.

गावाकडची जुनी माणसे सांगतात की आताची माणसे केवळ तासा दोन तासाच्या कामापुरते बैलगाडीतून जातात पण पूर्वी कित्येक दिवसांची सैर करायची झाली तरी बैलगाडीच असायची. लाकडापासून बनविण्यात येणाऱ्या बैलगाडय़ामध्ये छकडा व दोन बैलाची बैलगाडी अशा दोन प्रकारच्या गाड्या असत. छकडा किंवा एक्का बैलगाडी परगावी जाण्यासाठी वापरली जायची. वजनाने हलक्या असलेल्या या बैलगाडीत तीन-चार माणसे बसण्याची व्यवस्था असायची. त्यांच्यावर ऊन, पाऊस लागणार नाही यासाठी वरून कमानीच्या आकाराचा कापडी पडदा लावलेला असायचा. गाडीतून लग्नाची वऱ्हाडी मंडळी दुसऱ्या गावी जायची तेव्हा पाच-पंचवीस छकडय़ांचा ताफा एकामागून एक रांगेत निघे. ते दृश्य मोठे मजेशीर दिसे.गाडय़ा बनविण्यासाठी देवदार, सागवान लाकूड वापरून गाडीच्या जुवू व साठय़ावर बारीक नक्षी काढलेली असते. ती काळ्या तेलाने चकचकीत केली जाते. त्यामुळे छकडा मोठा रुबाबदार दिसे. दळणवळणासाठी अजूनही ग्रामीण भागात बैलगाडी वापरली जाते. शेती कामे करण्यासाठी ट्रॅक्टर आला तरी गरीब शेतकऱ्यांचा आधार बैलगाडीच आहे.

नवी पिढी ही मामाच्या गावाला किंवा ग्रामीण भागात गेली तर बैलगाडीत बसायला विसरत नाही. तर अशा या बैलगाडीतून सासूरवाशीण पोर तिच्या सासरी जाई तेंव्हा बैल इतके सावकाश चालत असत की तिला न्यायला तिच्या सासरहून आलेला मुरळी अगदी वैतागून जात असे, चाबकाचे फटके गाडीवानाला ओढायला लावी. पण चाबूक अंगावर बसून देखील ते बैल आपल्या मातीत वाढलेल्या त्या पोरीला तिच्या गावी पोहचवताना जणू भावविवश होत असल्यागत संथ होऊन जात अन तिचा जास्तीत जास्त सहवास मिळवत. सासरहून माहेरी येणारया माहेरवाशिनीच्या वेळेस मात्र हेच बैल याच वाटेने वारे पिलेल्या घोड्यागत गाडी पळवत असत, ते इतक्या वेगाने दौडत की कधीकधी गाडीवान असणारया तिच्या भावाला कासरे ताणून धरायची वेळ येई. एखादी पोटुशी बाई वा एखादे आजारी म्हातारे माणूस दवाखान्याच्या वाटेने नेताना मातीने भरलेली वाट आपण होऊन जागा करून देत असे अन बैल देखील खाचखळगे चुकवत पुढे जात. शाळेत जाणारी पोरे नेताना या वाटेला वेगळाच आनंद होई तर मामाच्या गावाला आलेल्या पोरांना शेतशिवार फिरवून आणताना या वाटांना होणारा आनंद गगनात मावत नसे. पावसातले पाणी असो वा कडक ऊन असो वा कडाक्याची थंडी बैलगाडीच्या वाटा वेगळ्याच रुपात आपली साथ संगत करत असतात. या वाटा मला माझ्या भाऊबंदासारख्या वाटतात, या वाटांनी जाताना मला वाडवडलांनी या वाटेने घेतलेले श्वास जाणवतात, या वाटातली धूळ डोळ्यात गेल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येत नाही पण या वाटांवरून जर खूप दिवसात जर गेलो नाही तर मात्र या वाटांच्या आठवणीने डोळ्यात पाणी येते, पण हे अश्रू झिरपायला पायाशी तिथली माती नसते तेंव्हा अजून वाईट वाटते....


अशा या ओढाळ वाटा अन त्यावरून सदैव दोसरा काढत चालत जाणारया बैलगाडीच्या रम्य सुरस आठवणी ज्यांचे कितीही गुण गायिले तरी ते कमीच आहेत ....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा