Tuesday, July 19, 2016

निरभ्र ......बिगारी कामगाराने जशी ठराविक वेळेची ड्युटी करावी, वेळेवर यावे वेळेवर निघून जावे तसे मान्सूनचे असते. तो ठराविक वेळेस येतो, मर्जीनुसार पडतो आणि निघूनही जातो. त्यानंतर बऱ्याच काळाने कावराबावरा झालेला एक अवकाळी पाऊस मान्सून घरी सुखरूप पोहोचल्याची वार्ता घेऊन येतो, पोस्टमनने घरोघरी पत्रे वाटावीत तसा सगळीकडे हा पाऊसनिरोप तो पोहोच करतो. कधी कधी या निरोप्या पावसासोबत अंगात वारं भरलेली चहाटळ वावटळही येते. लोक म्हणतत अवकाळी पाऊसवारं आलं. मला तसं वाटत नाही. यात माणसाचा थेंबमात्र संबंध नसतो, ही सगळी निसर्गाची भाषा असते. ज्याची त्याला कळते. माणूस उगाच लुडबुड करतो, नाक खुपसतो. खरंतर इतर कुठलाही प्राणी निसर्गाशी खेळत नाही पण माणसाला भारी खोड. असो....

काल एक अवकाळी पाऊस काय पडला सगळे रूपच पालटले. आईने पोराला अंग खरवडून, घासून पुसून, अंघोळ घालून लख्ख स्वच्छ करावे तशी सगळी पाने पावसाने न्हाऊन निघाली. त्यांची धुळीची पुटे गळून पडली. हिरवाईचा मस्त हिरवाकंच पोपटी रंग तरारून उठला. पाऊस ओसरला तेंव्हा थेंबाच्या ओझ्याने पाने जड झाली होती का पावसाच्या ऋणापायी पानांनी माना तुकवल्या होत्या हे सांगणे जरा कठीणच असते. काल अचानक पाऊस सुरु झाला तेंव्हा झाडांच्या तपकिरी करडया रंगाच्या बुंध्यावरील मुंगळयांची रांग गोंधळून गेली होती, बरेच वेळ त्यांनी बैठक घेतली अन आहे तिथल्याच फटीत पाऊस ओसरेपर्यंत ते सगळेजण आराम करत बसले. उंचावर उडणारया मोठ्या पक्षांनी सुरुवातीला पावसाला दाद दिली नाही पण पावसात शिवाशिवीचा खेळ खेळल्याने पंख जेंव्हा जड झाले तेंव्हा त्यांनी सुं बाल्या केल्या आणि आपापल्या ढोल्या गाठल्या. फांदीवरील बारीक सारीक डहाळयांना लटकणारी पिवळी चॉकलेटी पाने आधीच वैतागुन गेली होती, नव्या हिरव्या पोपटी तरतरीत पानांमुळे त्यांच्याकडे कुणी बघतच नव्हते. त्यात त्यांचा देह क्षीण झालेला पण देठ मजबूत असल्याने त्यांना काही करता येत नव्हते. पण पावसाने त्यांना मदत केली. अनेक पानांनी रिमझिम पावसात हर हर गंगे म्हणत झाडाला अलविदा करत मातीकडे झेप घेतली. डवरलेल्या फांदयांतील घरटी जरा अस्तव्यस्त होऊन गेली, काही काडया ढिल्या झाल्या, एखादे दुसरे अंडे खाली गळून पडले. काही दिवसांपूर्वी जन्मलेली पिले अकस्मात अंगावर आलेल्या पावसाच्या थेंबांनी भेदरून गेली. त्यांनी जाम गलका केला पण त्यांच्या आईने डोळे मोठे करून दटावताच चोची मिटून डोळे किलकिले करत सगळी पिले गप झाली.

झाडाच्या बुंध्याखाली असणारया किडया मुंग्यांना या पावसाने काय करू अन काय नको असे झाले होते. झाडांनी त्यांच्या सावलीच्या परिघाखाली जास्ती चिखल होऊ दिला नाही पण सभोवताली बऱ्यापैकी चिखल झाला. थंडीमुळे कोरड्या पडलेल्या मातीला जरा हायसे वाटले. तरारून आलेल्या तुरीने आपल्या कपाळावर येणाऱ्या पानांच्या बटा मागे सरकवत थोडे लाजून मुरकून घेतले. कचकचून तटतटलेल्या ज्वारीच्या कणसात पावसाचे थेंब लपाछपी करत लपून बसले. जोंधळ्याच्या ताटावरून पाण्याचे संथ ओघळ मुळाकडे वाहत राहीले. मकवनाच्या लांब सडक हिरव्या पल्लेदार पानांनी तर मान ताठ करून पावसाला अखंड सलामी दिली. त्यांच्या पायात अधेमध्ये उगवलेल्या हरभरयाचा जीव तो केव्हढा ! त्याची पाने आधीच नाजूक इवलीशी चुणचुणीत. ती मात्र पार गर्भगळीत झाली. पण त्यांनी शेवटपर्यंत अंग टाकले नाही. सोयाबीनच्या पानांच्या छत्र्याखालच्या आडोशात नाकतोडयांनी उबदार आसरा घेतला. ऊसाच्या फडाने मात्र पावसाला जुमानले नाही. त्याचे आपले 'एकीच्या बळाचे धडे' देणे सुरूच राहिले. बोरीबाभळी मात्र फार सुखावल्या. कारण सगळेच जण त्यांना ओरबाडून जातात फक्त पाऊसच त्यांच्या काटेरी अंगावर मायेने हात फिरवतो याची त्यांना मनोमन जाणीव असते. औदुंबर त्याच्या निर्गुण निर्विकार रुपात उभा होत, तो तरी काय कारणार ? त्याला ना पावसाचा आनंद की दुष्काळाचे दुःख. नाही म्हणायला वडाच्या पारंब्यांनी ओलेत्या अंगाने एकमेकाला मिठ्या मारत पाऊसगाणी ऐकवली. गुडघे वर करून त्यात मान खुपसून बसलेल्या प्रौढ परिपक्व माणसासारखा पिंपळ मात्र ह्या पावसाने काय काय कमी जास्त होणार या विचारात बुडून गेला.....

पावसाने जशी पाने गळाली तशी बरीचशी फुलेही गळाली. सदाफुली मात्र झुडपावरून खाली पडली नाही. पण तिच्या पाकळ्यांवर कुरतडल्यागत बोचकारे उमटले. चाफा मुळचाच जरा राठ पाकळ्यांचा त्यामुळे त्याने पावसाला दाद दयायची नाही हे आधीच ठरवलेलं पण त्याच्या देठांनी त्याला दगा दिला. त्याची बरीचशी फुले गळून गेली. कर्दळीने एकमेकाच्या पाकळ्यांना गच्च धरून होता होईल तो पावसाला झेलले पण काही पाकळ्या चिंबटल्या, त्यांची अक्षरशः घडी पडली. जास्वंदाचा जीव तो काय, आधीच मुलखाच्या नाजूक पाकळ्यांचा जास्वंद अगदी या पावसाने पार हिरमुसून गेला. सूर्यफुलांनी तर चक्क माना वेळावल्या. तिळवण, पुंगळ्या, रानभेंडा, रानतुरे, गोकर्ण, शिराळ, धवणी, घाणेरी यांचे मात्र हालहाल झाले. केशरीलाल पळसफुले मात्र ह्या कोवळ्या जीवांचे हाल बघत गालात हसत राहिली. उद्दाम, रग्गील अन रुक्ष रुईची फुले नेहमीप्रमाणे त्यांच्याच तोऱ्यात आत्ममग्न राहिली. धोतऱ्याच्या निळ्यासावळ्या फुलांना मात्र आपल्या सवंगडयांचे फार दुःख झाले, त्यांनी हातपाय लटकवत उलटे टांगून घेतले. गोंदवेली आणि रानगवत जणू काही घडलेच नाही अशा थाटात उभी राहिली. आपली सखेसोबती असणारी ही एकेक फुले पावसाशी लढत असताना फुलपाखरांना मनस्वी दुःख झाले असावे. ती बिचारी आपले तलम नाजूक पंख मिटून देहाची चिपळी करून रुसवेल्या तोंडाने बसून राहिली. एखाददुसऱ्या झाडात नुकत्याच अंग धरू लागलेल्या पोळ्यावरच्या मधमाशा जीवाच्या आकांताने एकेमेकाला चिटकून राहिल्या. पण त्यांचे जे नुकसान व्हायचे होते ते झालेच....

पानाफुलांची ही कथा तर मुक्या जीवांची वेगळीच दशा होती. खुराडयातल्या कोंबड्यानी डोळे झाकून जप करणारया आजीची भावमुद्रा धारण केली होती. त्यांची चिमुकली पिले त्यांच्या पोटाखाली दडून होती. मंत्र्याच्या सलामीस दिवसभर उभ्या असलेल्या पोलिस शिपायाप्रमाणे पाऊस पडेपर्यंत शेळ्या मेंढया उगाच उभ्या होत्या. गोठयातील म्हशींना पावसाचे फारसे सोयरसुतक नसते, त्यामुळे त्या आपल्या अधून मधून शेपटी हलवत निवांत बसून राहिल्या होत्या. गायींना मात्र कोण आनंद झाला होता ! त्या अंग थरथरवून पावसाला दाद देत होत्या. मध्येच शिंगं हलवून गळ्यातल्या घंटेचा आवाज करत होत्या. पावसाळा झाल्यापासून कामाला जुंपलेले बैल आता चिखल झाल्यामुळे दोन तीन दिवस कामाला सुट्टी लागणार ह्या सुखासीन विचारात दंग होते. वासरं, रेडकं दावणीला ढुसण्या देऊन आपला नवथरपणा जाणवून देत होती. कुत्र्यांनी मिळेल त्या आडोशात अंगाचे मुटकुळे केले. गोठयाच्या शाकारलेल्या छताला गच्च चिकटून बसलेल्या पाकोळयांनी जागेवरून हलणे पसंत केले नाही. विहिरीतल्या बेडकांनी दिवाळीच साजरी केली. मान ताठ करून बसलेले सरडे मात्र परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते .....

ह्या सर्वांकडे बघून मला मात्र आगळेच समाधान लाभले. पाऊस हा आपल्यासाठी कधी रुक्ष असतो तर कधी मनभावन पण निसर्गाचे तसे नसते. तो हात खुले करून त्याला कवेत घेतो. इच्छा असो नसो तो त्याला मिठीच मारतो. क्षेम कुशल विचारतो. त्यांच्या गुजगोष्टी होतात. देवाणघेवाण होते. मग जड पावलाने पाऊस निघून जातो, चराचर आपल्या चक्रात पुन्हा नव्याने गुंतून जातं. माणूस मात्र त्याच्या गरजेनुरूप ह्या चक्रात नाक खुपसत बसतो. ज्ञानाच्या अन विज्ञानाच्या जोरावर निसर्गात ढवळाढवळ करू पाहतो. मग एखादं वादळवारं येतं आणि माणसाला त्याची औकात दाखवून जातं. पानाफुलांना, झाडांना, पक्षांना, प्राण्यांना वाटते आता तरी हा माणूस नावाचा प्राणी सुधारेल व निसर्गाची जपणूक करेल. त्यांना बिचारयांना काय ठाऊक की हा प्राणी किती खोडील आहे ? हा फक्त नावाला माणूस आहे ! पाऊस झाला की हे सारे विचार फिरून फिरून मनात येतात. मन अस्वस्थ होतं. मग इतक्या साऱ्या संकटानंतरही उगवत्या सूर्याला साक्षीस ठेवून ओल्या मातीतून हळूच इकडे तिकडे डोकावत बाहेर पडणारया इवलूशा कोवळ्या अंकुराचे कौतुक करत रुक्ष दिनचर्येत मी स्वतःला गुंतवून घेतो आणि अस्वस्थ करणाऱ्या माणूसविचारांपासून सुटका करून घेतो. सकाळ टळून गेल्यावर पावसानंतरचे निळे पांढरे आभाळ पाण्याच्या प्रतिबिंबात स्वतःचे रुपडे बघत गालातल्या गालात हसत राहते, लक्षावधी डोळ्यांनी काळ्या मातीकडे मन भरून पाहत राहते. या निरभ्र आभाळाकडे बघताना मनातले मळभ कधी निघून जाते कळत देखील नाही...

- समीर गायकवाड

( छायाचित्र जालावरून साभार)

No comments:

Post a Comment