काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...
आपल्या पदराशी ती चाळा करत बसलीय आणि तिच्या समोर आहे तो नजरेत अनामिक नशेचे अगणित कैफ घेऊन बसलेला परीटघडीच्या धवल कपड्यातला रुबाबदार आनंदबाबू ! पांढरेशुभ्र बंगाली धोतर अन पायघोळ सदरा, त्यावर घेतलेले शुभ्र मखमली उपरणे. हातात लालबुंद मदिरेचा ग्लास घेऊन काहीशा रुबाबात बसलेला आनंदबाबू तिच्याकडे आसक्त नजरेने पाहतो आहे अन पुष्पा त्यांच्याकडे तोंड करून बसलेली आहे. नावाडी एका संथ लयीत नाव हाकतोय, रात्र देखील या दोहोंच्या हालचाली बेधुंद होऊन बघत्येय, कंदिलाचा उजेड अंधारातील चांदण्यांना वाकुल्या दाखवित पुष्पाच्या चेहऱ्या वरून ओसंडून वाहतोय आणि तो परीकथेतला राजकुमार त्याच्या वेदना मदिरेत उतरवताना दर्दभऱ्या आवाजात तराणे छेडतोय -
'चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाये सावन जो अगन लगाये,
उसे कौन बुझाये पतझड जो बाग़ उजाड़े,
वो बाग़ बहार खिलाये जो बाग़ बहार में उजड़े, उसे कौन खिलाये ?'...
गात असतानाच मध्येच उठून तो नावेच्या टोकाकडे पुढे जातो. ती त्याच्या हातातला ग्लास घेऊन उभी राहते. तो आता तिच्या डोळ्यात पुरता उतरला आहे अन ती त्याच्या मदिरेत !.... 'हमसे मत पुछो कैसे मंदिर टूटा सपनोंका' असे म्हणत म्हणत तो पुन्हा तिच्या जवळ येऊन उभारतो. ती आपल्या थरथरत्या हातातला ग्लास त्याला देते.
पार्श्वसंगीतात आत्यंतिक मन विदीर्ण करणारी व्हायोलीन वाजत राहते आणि दूर नदीच्या काठावर दिसणारी दिव्यांची बारीक रांग लाटेच्या जोशात या दोहोंसाठी झोके घेत असल्याचा आभास होत राहतो....
मनाला रुखरुख लावत गाणं संपतं ....
बघता बघता अडीचेक तासाचा चित्रपट संपून जातो, थियेटरमध्ये लाईट्स लागतात. प्रेक्षक बळेच उठतात आणि एक्झिट डोअर्सच्या दिशेने सावकाश चालू लागतात. प्रेक्षक यथावकाश घरी जातो पण पुष्पा, आनंदबाबू आणि त्यांच्या आरसपानी प्रेमाच्या चांदण्यात न्हाऊन निघालेलं हे गाणं काही डोक्यातून जात नाही...
हे गाणं अजूनही कुठेही कधीही लागले तरी मनाची एक का होईना तार छेडल्याशिवाय राहत नाही....
हा चित्रपट होता 'अमरप्रेम'. राजेशखन्ना, शर्मिला टागोरचा १९७२ मधला सुपरहिट चित्रपट. देखणी पुष्पा ही एक प्रेमळ मनाची आणि सच्च्या अंतःकरणाची बाई. पेशाने ती वेश्या असते. तिच्यावर प्रेम करणारा आनंदबाबू हा धनाढ्य रसिक. त्यांच्या आयुष्यात आलेले चढउतार यावर चित्रपटाची कथा बेतलेली होती. यात एकीकडे मानवी जीवनमुल्यांचा ऱ्हास होताना दिसतो तर दुसरीकडे अनैतिकतेचा शिक्का मारल्या गेलेल्या जीवांच्या काळजात होणारी घालमेल दिसते. आणि या दोहोंच्या मध्ये समांतर गतीने चालत राहते ती अमरप्रेमाची कथा. तसं पाहिलं तर रुढार्थाने हा नायक नायिकेची कथा असलेला सिनेमा नव्हता तर एका कोवळ्या मुलाच्या जीवनात विविध वळणावर भेटत गेलेल्या व्यक्ती आणि त्यातून त्याला उलगडलेला जगण्याचा अर्थ हा या सिनेमाचा केंद्रबिंदू होता.
'अमरप्रेम' नेमका कधी पाहिलाय ते आठवत नाही. पण २५ मीटर बॅंड अर्थात रेडीओ सिलोन, विविधभारती लावुन 'चिंगारी कोई....' हे गाणं अनेकवेळा ऐकल्याचे आठवते. चित्रपट पाहताना 'पुष्पा' आणि 'आनंदबाबू'शिवाय लक्षात राहणारे आणखी एक पात्र 'नंदू'चे आहे. पुष्पाचं घर नंदूच्या घराशेजारी असतं. ती वाईट वळणाची बाई आहे हेच त्याच्या मनात ठसवलेलं असलं तरी त्याचं तिच्या घरी येणं जाणं असतंच. पुष्पाचं त्याच्यावर जीवापाड प्रेम. वेश्या असल्याने तिला मातृत्वाची अनुभूती नसते पण तिच्यातलं मायाळू स्त्रीत्व तिचा पिंड बदलू शकत नाही. ती नंदूला खूप जीव लावत असते, जणू काही तिच्या पोटचा गोळाच वाटावा इतका तिचा स्नेह असतो. पुष्पाच्या घरी येणाऱ्या आनंदबाबूला पुष्पाच्या मनात काय चाललंय हे उमगत असतं म्हणून तो कधीच नंदूला झिडकारत नाही पण नंदूची सावत्र आई मात्र त्याला पुष्पाशी असलेल्या सलगीवरून धुत्कारत असते. त्याचा जमेल तसा छळ करत असते. काळाची पावले वेगाने पुढे जातात, नंदूचं कुटुंब ते शहर सोडून जातं. तरीही ही सर्व पात्रे आयुष्याच्या एका अद्भुत वळणावर नंदूला पुन्हा भेटतात.
छोट्या नंदूवर अपार वात्सल्याने प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या पुष्पाला आनंदबाबूच्या प्रेमाला कसे सामोरे जावे याचं उत्तर शोधता येत नाही. कालांतराने आनंदबाबू आणि पुष्पा प्रौढत्वाकडून वृद्धत्वाकडे झुकतात. पुष्पा वृद्ध होते आणि चमडीबाजारमधली तिची रौनक संपुष्टात येते. तर आनंदबाबूंचे ऐश्वर्य अन शानोशौकत लोप पावते. तो अक्षरशः कफल्लक होऊन जातो. पुढे जाऊन पुष्पा धुणे-भांडी करणारी गलितगात्र असहाय निराधार बाई होते. त्यांच्या प्रारब्धाचा भोग ते भोगू लागतात. काळाच्या एका वळणावर ते दोघे पुन्हा भेटतात, तेंव्हाचा सीन खूप भाव खाऊन जातो. स्वतः असहाय असलेला आनंद पुष्पाला सहानुभूती दाखवू लागतो तेंव्हा त्याच्यावर म्हातारचळ लागल्याचे टोमणे उडतात अन पुष्पाच्या चारित्र्यावर पुन्हा शिंतोडे ! तिच्या अवहेलनेचा हा मूक प्रवास तो पुन्हा पुन्हा अनुभवतो .व्यवहारी दुनिया परत परत तिचे तुकडे करत राहते... एका असहाय स्त्रीच्या प्रेमाची कथा अमरप्रेम आपल्या समोर मांडत राहतो.
‘रो मत पुष्पा, आय हेट टियर्स ! क्योंकी आंसू इन्सान को कमजोर बना देते है’ असे म्हणणारा आनंदबाबू वृद्ध पुष्पाच्या आजारपणाच्या वंचनेत असतानाच त्याला पुन्हा एकदा नंदू भेटतो. नंदूला तो पुष्पाकडे घेऊन जातो. चित्रपटाच्या शेवटी नंदू आपल्या मानलेल्या आईला म्हणजे पुष्पाला आपल्या घरी घेऊन जातो. तो तिला घेऊन जातो ते दिवस दुर्गापूजेचे असतात, तिला तो टांग्यात बसवून घेऊन जातानाचे दृश्य पडद्यावर दिसते, दृश्याच्या पार्श्वभूमीत अनेक लोक दुर्गामातेची तसबिर हातात घेऊन घराकडे जाताना दिसतात, हे विलक्षण प्रभावशाली वाटते. जणू काही नंदूसुद्धा त्याच्या दुर्गेला घरी घेऊन जातो आहे असे भासते. नंदू पुष्पाला घेऊन घरी पोहोचतो तेंव्हा बालपणी नंदूने लावलेले पारिजातकाचे रोपटे आता एका बहरदार आणि फुलांनी डवरलेल्या झाडात रुपांतरीत झालेले दिसते. 'अमरप्रेम'च्या क्लायमॅक्सला डोळ्याच्या कडा नकळत ओल्या होऊन जातात. अश्रूंची ही सर हवीहवीशी आहे.
विभूतिभूषण बंदोपाध्याय या महान बंगाली कथालेखकाच्या कथेवर हा चित्रपट आधारला होता. 'अपूर संसार', 'पाथेर पांचाली' हे सत्यजित रें चे सिनेमे यांच्याच कथांवर आधारित होते. ही ऐतिहासिक पृष्ठभूमीही या चित्रपटाला आहे, किंबहुना या दमदार कथेच्या जोरावर 'अमरप्रेम' मनात घर करून राहतो.
१९३० च्या आसपास विभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी 'हिंगेर कचोरी' (हिंगांची कचोरी) ही कथा लिहिली. त्यांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी आणि कथेच्या लेखनानंतर चाळीस वर्षांनी त्यावर अरविंद मुखर्जी यांनी 'निशी पद्मा' हा बंगाली सिनेमा बनवला. सिनेमा खूप चालला, त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १९७२ मध्ये शक्ती सामंत यांनी याच सिनेमावर आधारित 'अमर प्रेम' बनवला.
विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या त्यांनी १६ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथांवर अनेक महान चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यांच्या आयुष्यात इतके चढ उतार आणि हलाखीचे दिवस येऊन गेले की त्यांच्यावरच एक सिनेमा निघायला हवा. लग्नानंतर एका वर्षात त्यांची पहिली पत्नी निवर्तली तेंव्हा त्यांचे वय होते एकोणीस वर्षे. वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांना तारादास नावाचा एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर चार वर्षांनी आताच्या झारखंडमधील पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील घाटशिला येथे त्यांचे १९५१ साली निधन झाले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जवळजवळ सत्तावीस वर्षे ते विधूर म्हणून एकांताचे आणि अनेक हालअपेष्टांचे जिणे जगले. याच काळात त्यांनी जी दुनिया बघितली त्यावर आधारित अनुभवांना ते शब्दबद्ध करत गेले. कोलकत्याच्या बदनाम गल्ल्यात 'हिंगेर कचोरी' मधील अनंग बाबू त्यांना वास्तवात भेटला होता. त्याचा जीव की प्राण असलेली पुष्पा तिथेच गवसली होती. विभूतीभूषणनी त्यांना नानाविध रंग चढवत आपल्या कथेत गुंफले. रेड लाईट डायरीजचे लेखन करताना अशा अनेक पुष्पा मला भेटल्या हे माझे नशीब समजतो. असो याने विषयांतर होईल.
किशोरवयात 'अमरप्रेम' पाहिला होता तेंव्हा सावत्र आईचा छळ सोसणाऱ्या नंदूला पडद्यावर पाहताना फार वाईट वाटायचे. लहानगा नंदू आणि त्याच्याशी कपटभाव ठेवून वागणारी सावत्र आई व चित्रपटाच्या शेवटी मोठा झालेला नंदू आपल्या मानलेल्या आईला (पुष्पाला) आपल्या घरी घेऊन जातो, इतकीच अमरप्रेमची किशोर वयातील आठवण. ’बडा नटखट है’ हे एकच गाणं तेव्हा खूप दिवस लक्षात राहीलं. आनंदबाबू, पुष्पा यांचं नातं कळण्याचं ते वयच नव्हतं. पण पुढे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ’अमरप्रेम’ भेटतच राहीला. दुःख आणि आनंदाचे रंग गडद करत गेला.
पुढे दूरदर्शनवर 'छायागीत', 'रंगोली'मध्ये हे गाणं खूप वेळा पाहिलं. वयानुसार वाढलेल्या जाणीवा अन अनुभव यातून नंतर या गाण्याचा अर्थ थोडाफार कळत गेला पण अजूनही पूर्ण अर्थ कळलाच नाही असे वाटते. मागे काही वर्षांनी 'अमरप्रेम' मॅटिनीला पाहिला. त्या काळी मॅटिनीला जुने चित्रपट लागत असत.. तेंव्हा पाहिलेला 'अमरप्रेम', किशोरवयात पाहिलेला 'अमरप्रेम' आणि आता यु ट्यूबवर पाहतानाचा 'अमरप्रेम' दरवेळेस वेगवेगळे अनुभव देऊन गेला. आनंदबाबू अन पुष्पाच्या नात्यातले गहिरे रंग दरवेळेस अधिक गहिरे होत गेले...
'अमरप्रेम'ला आता चार दशके उलटून गेली यत पण आजही नावेत बसलेले राजबिंडे आनंदबाबू, पाठमोरी देखणी पुष्पा अन त्या दोघांच्या अंगावर नावेतल्या कंदीलाचे हळुवार पडणारे पिवळसर कवडसे काही केल्या नजरेपुढून हटत नाहीत. याचे श्रेय किशोरदांनाही आहे. कधीकधी तर असे वाटते की ते आनंदबाबूच्या मागे नावेतच ते कुठेतरी उभे असावेत आणि प्रेमाच्या वेदनेचा कैफ त्यांच्या गायकीत तिथेच उतरला असावा. अनेक गाणी येतील, अनेक गायक येतील पण 'अमरप्रेम'मधलं चिंगारी कोई भडके' ऐकून त्याला नाक मुरडणारा अरसिक कधी कोणाला कुठेच भेटणार नाही....कारण 'अमरप्रेम'मधील ही चिंगारी सर्वांना हवीहवीशीच आहे. कारण या चिंगारीत एक अनामिक दर्द आहे !

- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा