शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

बाळासाहेब आणि पवार साहेब - एक दिलदार यारीदुष्मनी !



बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे आपसातील नातेच वेगळे होते. वैयक्तिक जीवनात मैत्री आणि  राजकारणात वैमनस्य असं असूनही त्यांनी आपसातले संबंध तुटूपर्यंत कधीच ताणले नाहीत. 'मैद्याचे पोते' म्हणून बाळासाहेब ज्यांची टिंगल करायचे ते शरद पवार हे त्यांचे पाच दशकाचे सोबती आणि मैत्र होते. 'ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे  माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये' अशा शब्दात पवारसाहेबदेखील त्यांच्यावर सभांमधून बोलायचे. सभा - भाषणे यातून दोघे जरी एकमेकावर राळ उडवत असले तरी त्यांनी त्यांच्यात आपसात असलेले एक ट्युनिंग कधी बिघडू दिले नाही अन ते दोघे कधी एकही झाले नाहीत अन आपसातल्या मैत्रीतून विभक्तही झाले नाहीत. ही दोन ब्रम्हफुले महाराष्ट्राच्या एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याचे दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले. त्यापैकीच एक किस्सा शरद पवारांनी २०१७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डॉ.जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले होते, या मुलाखतीत त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी प्रकाशात आणल्या. त्यातली एक गोष्ट बाळासाहेब आणि पवारांनी एकत्र येऊन काढलेल्या मासिकाच्या जन्मकथेची होती….


अनोखी मैत्री 

शिवसेनेच्या स्थापनेआधी ऐन उमेदीच्या काळात बाळासाहेब ठाकरे आपलल्या उमेदीच्या काळात 'फ्री प्रेस जर्नल'मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. १९६० मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली. यानंतर त्यांनी कुठेही नोकरी केली नाही वा कुणाची ताबेदारी स्वीकारली नाही त्यांच्या डोक्यात स्वतःचे एखादे नियतकालिक वा मासिक सुरु करण्याचे घोळत होते. त्‍याच काळात शरद पवार, भा. कृ. देसाई आणि शशिशेखर वैद्यक या तीन तरुणांना सोबत घेत त्‍यांनी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारया ‘टाइम’ मासिकाच्या तोडीचा त्याचा दर्जा असावा, असे या सगळ्यांचे एकमत झाले. आपसात बैठका झाल्या, रूपरेषा ठरवली गेली आणि चौघांनीही खूप विचार करून याचे नियोजन केले. मासिकाचे नाव एकमताने 'राजनीती' असे देण्याचे ठरले. नाव ठरले, त्यातील कंटेंट कसे असावे ठरले आणि त्यावरील मालकी हक्काची वाटणीही आधीच ठरली. मासिकावर चौघांची मालकी समान राहील असे ठरवले गेले .

एका प्रसन्न क्षणी दिग्गज ..

मजकूर छापण्याआधी दर वेळेस चौघांनी मिळून कंटेंट तपासून घ्यायचे ठरले. यात नेमकी कोणती सदरे घ्यायची यासाठी या चौघांच्या अनेक बैठका झाल्या. मासिकासाठी समान भांडवल चौघांनी मिळून उभे करण्याचे ठरले त्यानुसार त्यांनी या मासिकासाठी 55 हजार रुपयांचे भांडवल जमा केले. मासिकाचे, मार्केटिंग, डिझाइन तासंतास बोलून ठरवले गेले. मासिक तयार झाल्यानंतर स्वतःच वितरीत करायचे की वितरकाला द्यायचे यावरही बराच खल झाला अन शेवटी याची जबाबदारी वितरकावर टाकायची ठरली आणि त्याकाळातील अग्रगण्य वितरकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. आपण सगळेच जण मासिकाच्या सर्वच अंगांवर इतकी जीव तोडून मेहनत घेतोय व त्यातील दर्जा -मजकूर पाहता हे मासिक अल्पावधीतच देशात पहिल्या स्थानावर जाईल याची चौघांनाही  खात्री होती.

एक अविस्मरणीय क्षण - पवारसाहेब, बाळासाहेब आणि अटलजी     
मासिकाच्या प्रकाशनाच्या वेडाने झपाटलेल्या या ध्येयवेड्या तरुणांनी अफाट मेहनत घेऊन मासिकाच्‍या पहिल्‍या अंकाचे काम पूर्ण केले. आता सर्व सदरे, मजकूर आणि डिझाईन संपूर्णतः तयार झाले होते केवळ मुद्रण बाकी होते. याच वेळी बाळासाहेब पवार साहेबाना बोलले की, ''त्यांच्या एका भगिनीला अंतर्ज्ञान आहे, त्यांच्या अंगात आल्यावर त्यांनी सांगितलेले भाकित खरे ठरते. त्यांचा सल्ला‍ घेऊ''. त्यांच्या या कृतीला शरद पवारांनी आधी आढेवेढे घेतले पण या सर्व प्रक्रियेत अंतिम शब्द बाळासाहेबांचा ठरलेला असल्याने मासिकाचे प्रकाशन कधी करावे, याचा मुहूर्त काढण्‍यासाठी हे चौघे बाळासाहेबांच्‍या 'त्या' बहिणीकडे गेले.

बाळासाहेबांच्या 'त्या' भगिनींनी या चौघांना आशीर्वाद देऊन प्रकाशनासाठी मुहूर्त सांगितला. एवढेच नाही तर या मुहूर्तावर हे मासिक प्रकाशित केले तर बाजारात अंकच राहणार नाही, असे भाकितही केले. त्यांचे हे भाष्य ऐकून चौघेही उत्साही झाले. बाळासाहेबाच्या भगिनीने सांगितल्याप्रमाणे मासिकाची पहिली प्रत मनोभावे सिद्धीविनायकाच्या चरणी ठेवली. इतकी मेहनत घेऊन तयार झालेल्या पहिल्या अंकाचा प्रकाशन सोहळा देखील मोठी प्रसिद्धी करून करण्यात आला. अंक छपाई पार पाडली अन अंक वितरकाकडे रवाना झाले. प्रकाशनानंतर काही दिवसांनी आपल्या अंकाची विक्री किती झाली याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी वेगवेळ्या गावी जावून बाजारातील स्टॉलवरील
अखेरच्या दिवसातले क्षण  
मासिकाच्या विक्रीची माहिती घेतली. त्यांना फार आनंद झाला कारण एकाही स्टॉलवर अंक शिल्लक नव्हता. अत्यंत खुशीने त्यांनी वितरकाकडे संपर्क साधला. वितरकांने केलेल्या खुलाशाने मात्र ते हैराण झाले ! 'राजनीती' या मासिकाची एकही प्रत विकली न गेल्याने त्यांनी सर्व अंक गोळा करून  कपाटात बंद करून ठेवले होते. बाळासाहेबांच्या 'त्या' भगिनींनी वर्तवलेले 'बाजारात एकही प्रत राहणार नाही' हे  भाकित अशा पद्धतीने चक्क खरे ठरले. हा या मासिकाचा पहिला आणि अखेरचा अंक ठरला !! हे मासिक पुन्हा कधीही प्रकाशित झाले नाही.….

मासिकाची अशी दुरावस्था झाल्यानंतर हे चौघे बाळासाहेबांच्या घरी एकत्र जमले. तिथे अर्थातच गप्पांचा मुख्य विषय बंद पडलेले 'राजनीती' मासिक हाच होता. .इतक्यात देवीचा संचार अंगी होणाऱ्या बाळासाहेबांच्या 'त्या' भगिनी तिथे आल्या. बाळासाहेबांनी त्यांना पुढे जाताजाता थांबवले आणि त्यांनी सल्ला दिलेल्या उपक्रमाची कशी वाट लागली, याबद्दल खास ठाकरी भाषेत त्यांना जे काही सुनावायचं ते सुनावलं. त्यानंतर पवारांसह इतरांनी तो विषय तिथंच सोडून दिला. "एकंदरीत चार मराठी माणसांनी एकत्र येऊन उद्योगाचा एक महान उपक्रम हाती घेतल्यावर त्याची ‘अखेर’ कशी होते, हेही आम्हा सगळ्यांना समजून चुकलं !" असं मार्मिक अन खुमासदार वक्तव्य पवारांनी या आठवणीच्या अखेरीस केलं होतं !

बाळासाहेब आणि पवार साहेब दोघेही राजकीय शत्रू होते पण राजकारण बाजूला सारलं की दोघेही रसिक मित्र वाटायचे. दोघांनीही मर्यादा ओलांडून टीकाटिप्पण्या केल्या नाहीत, व्यक्तिगत चिखलफेक केली नाही. टपल्या मारल्या, नकला केल्या पण त्यालाही एक शालीनतेचा बाज होता. त्यात हाडवैराची अणकुचीदार वेदना नव्हती. त्यात तिरस्कार किंवा द्वेष, मत्सर नव्हता. त्यात ओढून ताणून आणलेले गळाकाढू बेगडी प्रेमही नव्हते. तसेच दोस्तीचे वा दुष्मनीचे फाजील प्रदर्शनही नव्हते. राजकारणी माणसाने आपसात नाती कशी ठेवावीत आणि आपसातले मतभेद जतन करूनही कसे दुखावू नये याचे हे आदर्श उदाहरण आहे. 

आजकाल फेस्बुकीय राजकीय पाठीराखे सर्व मर्यादा, सभ्यतेचे सर्व संकेत पायदळी तुडवून एकमेकाचे कपडे फाडत असतात. यात त्यांना हे ही भान राहत नाही की आपण कोणाच्या बाजूने, कोणाविरुद्ध,कसे, कुठे आणि का भांडत आहोत ? त्यांनी या बाबीवर थोडे लक्ष दिले तर फार बरे होईल .....असो

बाळासाहेब आणि पवारसाहेबांच्या मतभेदाचे किस्से जास्त रंगवून सांगितले जातात मात्र त्यांच्या आपसातल्या गहिऱ्या मैत्रीचे असे किस्से समोर आले की मराठी माणूस हा दिलदार यारदुश्मन असतो याची प्रचीती येते !!

(टीप - लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे) 


अशीही कुरापत असू शकते ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा