
ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.
आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे . गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी.