पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ऋचा’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही."
माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी, त्याच्या महानतेची गाथा सांगणारी ही कविता आहे बाबुराव बागूलांची. जातिव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतिकारी लेखणीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यातील तपस्वी साहित्यिक म्हणजे बाबुराव बागूल.
बाबुराव रामजी बागूल हे कवी, कथा-कादंबरीकार, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, दलित साहित्याचे प्रवक्ते, परिवर्तनवादी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आणि एक पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात परिचित आहेत. गेल्या अर्धशतकभराच्या काळात वाड:मयीन क्षेत्राबरोबरच पुरोगामी चळवळीत ते कृतिप्रवण होते. तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार साध्या सोप्या प्रवाही काव्यरचनेतून मांडणारा कवी असं त्यांचं वर्णन समीक्षक करतात ते या कवितेद्वारे समर्थ वाटते.
‘वेदाआधी तू होतास..’ या कवितेत त्यांनी मानवी अस्तित्वाचा शोध घेताना देवधर्मासह अन्य तथाकथित मोठ्या गणल्या गेलेल्या संज्ञांची चिरफाड केली आहे. माणूस नेमका कसा निर्माण झाला ? त्याची उत्पत्ती नेमकी कशी झाली याचे उत्तर विज्ञानाने केंव्हाच दिले आहे मात्र माणूस आजही थोतांड काव्य सांगतो आणि पिढ्या दर पिढ्या निर्मितीच्या त्याच भाकडकथा ऐकवतो. या सर्व ऐकीव आणि गाळीव माहितीला बाबुराव बागूल सुरुंग लावतात. ते म्हणतात की, 'वेदाआधीही माणूस होता, (वेदांतील) परमेश्वराआधीही माणूस होता. त्याचे अस्तित्व याहून जुनेच आहे. तसेच पंचमहाभूतांचे ज्ञान त्याला तेंव्हाही होते, तो तेंव्हा देखील पंचतत्वांच्या अक्राळ विक्राळ रौद्र स्वरूपाला पाहून तो व्यथित व्हायचा, व्याकुळ व्हायचा. या व्याकुळतेपायी तो जी याचना करायचा ती याचना म्हणजेच 'ऋचा'' असं विद्रोहाचं निशाण ते आपल्या कवितेतून फडकवितात.
पुढं जाऊन ते असंही म्हणतात की, 'माणसाने ईश्वर कल्पिला, त्याचे जन्मसोहळे साजरे केले. त्याला नाव दिले. सर्व प्रेषित ज्यांनी ईश्वराचे निरोपे बनण्याचे कार्य केले त्यांना देखील माणसानेच निर्मिले, त्यांचे बारसे देखील माणसानेच केले. अल्लाह, देव, जीझस यात त्याची विभागणी केली.' हे सर्व निर्मिक नसून माणूसच त्यांचा निर्मिक असल्याचा दावा बागूल रुपकात्मक शब्दात करतात.
'केवळ देव वा प्रेषित यांच्यापुरते माणसाचे कर्तुत्व सीमीत नसून त्याही पलीकडे माणसाचे सिद्धास्तित्व आहे.' असा क्रांतिकारी सिद्धांत ते मांडतात. मानवतेच्या चेहऱ्याला ते विशाल स्वरूप देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रह, तारे, तारका यांची नावे माणसानेच निश्चित केली आणि त्या दिवसापासूनच सूर्याला स्वतःची ओळख मिळाली, चंद्रालाही नाव मिळाले. माणसाने अवघ्या विश्वाचे नामकरण केले आणि अवघ्या विश्वाने ते मान्य केले. कुणी चंद्राला सुर्य वा सूर्याला चंद्र म्हटले नाही, सर्वांच्यात एकवाक्यता आली. हे केवळ आणि केवळ माणसाच्या उत्तुंग प्रतिभेमुळेच शक्य झाले. कवितेच्या शेवटी ते एका वाक्यात खूप काही बोलून जातात. ते लिहितात - "तूच आहेस सर्व काही अन तुझ्यामुळेच सुंदर झाली ही मही !"
माणसाची इतकी देखणी महती तीही अत्यंत कमी शब्दात अन नेमक्या आशयात क्वचितच कुठे आढळते. बागूलांनी रूढ संकेतांच्या ठिकऱ्या उडवताना कुठेंही शब्दातिरेक केलेला नाही तसेच कुठेही अश्लाघ्य वा अर्वाच्च शब्द न वापरता वज्रभेदी प्रहार केले आहेत. देवधर्माच्या पलीकडे जाऊन मानवी मनाचे अंतराळ शोधत जाणारा हा काव्यतराळ काट्याचा सल राहावा तसा काळजात रुतून बसतो आणि त्यांच्या कवितेचा वाचक, श्रोता विचार करायला प्रवृत्त होतो हे या कवितेचं यश आहे.
मध्यंतरी काही दिवसांपूर्वी पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या एका विद्यार्थी दशेतील मुलाने मीडियामध्ये सांगितले की 'आपण पुण्यात नाव बदलून राहिलो होतो. यावर मोठा गहजब उडाला होता. हीच परिस्थिती बागूलांच्या आयुष्यात येऊन गेली होती. त्या परिस्थितीला स्वतः अनुभवून बाबुराव बागूलांनी त्यावर दाहक कथा लिहिली होती. 'जेंव्हा मी जात चोरली' हे तिचं नाव. त्या कथेनं समाजात मोठं काहूर माजवलं होतं. या अनुषंगाने बाबुराव बागूलांनी त्या काळी नोंदवलेला आक्षेप आजही लागू पडतो अशी वेदनादायी कबुली द्यावी लागते.
"आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे. घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार, दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." हा बाबुराव बागूलांचा आक्षेप होता.
आताच्या काळात आर्थिक विषमता, गरीबी आणि गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून याकडे पहावेसे वाटते. त्यातून नकळत आपण जातीच्या कॉलमपाशी येऊन ठाकतो, हे समाजाचे आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणाचे ढळढळीत अपयश आहे असे खेदाने म्हणावे लागते.
या पार्श्वभूमीवर सद्यकाळात शहरात संपूर्ण परिस्थिती बदलली आहे आणि जातीयता नष्ट झाली आहे असे म्हणता येईल का हा प्रश्न अंतर्मुख करून जातो. ग्रामीण भागात उच्चवर्णीय उच्चजातीय वर्चस्ववादी समाजरचनेने आजही गावोगावी गावाच्या वेशीबाहेर महारवाडे जोपासले आहेत. मुंबईसारख्या महानगरात पन्नास- साठच्या दशकातील काळात जातीयतेच्या भिंतींचा धांडोळा घ्यायचा असेल तर तत्कालीन दलित साहित्य वाचन करणे अपरिहार्य आहे. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, नामदेव ढसाळ यांच्या बरोबरीनेच बाबुराव बागूलांचे नाव त्यासाठी घेतले जाते. केवळ दलित साहित्यिक म्हणून नव्हे तर तत्कालीन स्वयंकेंद्रित आणि चाकोरीबद्ध विषयांच्या कोषात गुंग झालेल्या साहित्यविश्वास त्यांनी तडे दिले होते. पांढरपेशी, एकविचारी असे जे स्वरूप साहित्यास प्राप्त झाले होते त्यास आव्हान त्यांनी दिले. एव्हढेच नव्हे तर साहित्यिक संस्कृतीच्या तथाकथित बेगडी नियमांना झुगारून जिवंत, ज्वालाग्राही भावना प्रकट करणारे बंडखोर साहित्य त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. विद्रोहाचा मानबिंदू असणारे दलित साहित्य अशी सद्यकाळात त्याची स्वतंत्र ओळख आहे. मात्र आजघडीला त्यातील धार बोथट वाटते. त्यातल्या वेदना कालबाह्य वाटतात. त्यातले दुःख विस्मरणाच्या पानात सुटून गेल्यासारखे वाटते. याचा अर्थ असा नव्हे की ते साहित्य कालबाह्य वाटते, किंबहुना त्यातल्या वेदना ह्या अस्सल होत्या आणि त्याचे प्रकटन जिवंत होते, त्याचा अविष्कार भेदक होता म्हणून ते सदैव चैतन्यशील असेच राहील. पण त्याची परिणामकारकता ही आजच्या काळात कमी वाटते आहे हे मान्य करावे लागेल. आजच्या घडीला मोठ्या महानगरातच नव्हे तर अनेक लहानमोठ्या शहरात विद्रोही साहित्यात आढळणारी पार्श्वभूमी राहिलेली नाही. शहराच्या उलट ग्रामीण भागातच अजूनही जातीयतेचे कोष अजूनही मोठ्या अहंकाराने, आवेशाने, अभिमानाने पोसलेले आहेत. त्यावर मात्र नवीन लिखाण काहीसे थांबले आहे. हा साठोत्तरीच्या काळातील दलित साहित्यिकांचा समाजमनावरील पगडा म्हणायचा की नव्या दमाच्या सक्षम लेखकांची उणीव ? विद्रोहाचा लाव्हा मेंदूतून शब्दात आणण्यासाठी लेखकही तितकाच कसदार असावा लागतो आणि त्या अग्नीदिव्यातून तो गेलेला असेल तर त्याच्या साहित्याला आपसूक समाजमान्यता मिळते. आता त्या जाणीवाच मुळात बोथट झाल्याचे हे प्रतिक आहे.
'जेव्हा मी जात चोरली होती' (१९६३), 'मरण स्वस्त होत आहे' (१९६९, कथासंग्रह) आणि 'सूड' (१९७॰, कादंबरिका) ह्या बागूलांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. सामाजिक विषमतेचा बळी होऊन झोपडपट्टीत नाही तर गावकुसाबाहेर राहणारा ; दु:ख-दैन्याने ग्रासलेला आणि अन्याय-अत्याचारांविरुद्ध बंड करून उठणारा शोषित, दलित, अपमानित माणूस बागुलांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या इच्छाआकांक्षांचा ; सुखदु:खांचा आणि वासना-विकारांचा शोध घेत असताना एका दाहक सामाजिक वास्तवाचे दर्शन बागुलांनी घडविले आहे. पण नुसतेच दलितव्यक्तीकेंद्रित कथा त्यांनी लिहिल्या नाहीत हेही नमूद करावसे वाटते. 'जेव्हा मी जात चोरली' ह्या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत त्यातल्या पाच कथा दलित तर पाच सर्वसाधारण विषयावरच्या. 'सूड' ह्या त्यांच्या कादंबरिकेत पुरुषी अत्याचारांविरुद्ध बंड करून उठलेल्या जानकी नावाच्या तरुणीची कथा आहे. जानकी ही एका मुरळीची मुलगी. तारुण्याची आणि स्त्रीत्वाची विटंबना असह्य झाल्यामुळे तिला स्त्रीत्वच नकोसे होते. साधुवेष धारण करून एक पुरुष म्हणून वावरण्याचा ती प्रयत्न करते. पुढे निर्मळ मनाच्या एका साधूच्या सहावासात, राख झालेल्या तिच्या स्त्रीसुलभ वासना आणि विकार पुन्हा सचेत होतात आणि त्या साधूला ती आपले स्त्रीत्व अर्पण करते. वास्तवता आणि प्रतीकात्मकता ह्यांच्या समिश्र लयीतून स्त्रीत्व साकारलेली जानकीची ही कथा एका विद्रोही स्त्रीचे व्यक्तिमत्त्व उभे करीत असली, तरी तिच्यातील काव्यात्मकताही लक्षणीय आहे. बागूलांची विद्रोही पार्श्वभूमी अन प्रवाही शैली पाहून नामदेव ढसाळ त्याना 'मराठीतला दोस्तोवस्की' असे संबोधित असत.
"बागूलांच्या कथेत अथपासून इतिपर्यंत नाट्य खच्चून भरलेलं आढळते. त्यांच्या कथेतील माणसं ही कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचलेली आहेत. सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या - अशा टोकावर जाऊन पोहोचलेली आहेत की कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे हे कळत नाही. स्वतःबरोबर ती इतर कुणाकुणाला ओढत नेणार आहेत याचाही संभ्रम पडतो. जेव्हा जेव्हा ती अर्धवट, अडाणी असतात तेव्हातेव्हा तर त्यांच्या आततायीपणाचा अगदी कळस होतो. त्यांच्या तोंडातून कढत वाफेसारखे जहरी शब्द बाहेर फेकले जातात. आंतरिक तळमळीने ती वेड लागल्यासारखी वागतात. 'पेसूक', 'गुंड', 'वाटेवरची', 'वानर' आणि इतर कथांकडे वाचकांनी नजर टाकावी, म्हणजे त्यांना या कथेतल्या माणसांच्या हृदयात केवढी खळबळ माजून राहिली आहे ते दिसेल...." शिरीष पै यांची ही प्रस्तावना फार बोलकी आहे. पण आजच्या काळात ती आत्यंतिक द्वेषमूलक, पराकोटीची जातीयवादी अशी माणसा-माणसातली भिंतच आता जागो जागी खिंडार पडलेल्या अवस्थेत आहे. त्याचे कुठेतरी साहित्यात प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे, जे दुर्दैवाने होताना दिसत नाही. बागूलांच्या गद्यलेखनाला जशी धार आहे तशीच ती कवितेलाही आहे. त्यांचे काव्यलेखन गद्याच्या तुलनेत कमी असले तरी प्रभावशाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कविता काळाच्या कसोटीवर देखील खरया ठरल्या आहेत.
बागूलांच्या कथा जशा आशयसंपन्न होत्या तशाच त्यांच्या कविताही होत्या. त्यांच्या कवितेतून प्रतित होणारी स्त्रीप्रतिमा उदात्त आहे, विमुक्त आहे. ते तिच्या सौंदर्याचं देखणं वर्णन करतात. तिच्यापासून कलावंत कशी प्रेरणा घेतात याचं उदाहरण देतात. नारीची विविधरूपे जीवनाच्या प्रवासात कशी अनुभवास येतात याबद्दल आपलं मत मांडतात. धर्मप्रचारकांनी स्त्रीला कसे लुबाडले याचा लेखाजोखा देतात. सरतेशेवटी स्त्री म्हणजे काय या अनादीकाळा पासून चालत आलेल्या शोधाचे आपल्या परिने उत्तर देण्याचा प्रयत्न बागूल करतात.
"हे नारी
तुझे ललित, सुंदर नारीपण
मनमोहक आहे.
नेत्रसुखद आहे.
तुझ्या सुरेख, सुडौल शरीरावर
निसर्ग आणि नियती
प्रगट करतात तरूणपण
तेव्हा तुझे नश्वर शरीर
होते अजरामर.
अनेक
कलाकृतींचे प्रदर्शन
वा प्रदर्शनीय संग्रहालय
तुझ्या दर्शनानेच कलावंतांना
सुचतात कलाकृती आणि वास्तुशिल्पे
तुझ्या आशयपूर्ण उरोजावरून
देवालयाची मस्तके,
कळस साकार झाले आहेत
आणि ती स्वर्गाशी
सतत संवाद करतात असे मानले जाते आहे....’
बाबुराव बागूलांसारख्या लढवय्या आणि ख्यातनाम लेखकास आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची चणचण भासली, त्यापायी त्याना स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. हे क्लेशदायी सत्य नजरेआड करून चालणार नाही. असे का झाले असावे याची अनेक उत्तरे सापडतील. मरणाच्या प्रतिक्षेत बागुलांनी लिहिलेली कविता विशेष नोंद घेण्यासारखी आहे. त्यांच्या प्रतिभेची यातून जाणीव होते. "मी शतकांच्या स्वप्नांचा अविष्कार आहे, उगवत्या जीवनाचा भाष्यकार आहे" असं म्हणणारे बागूल दारिद्रय, दु:ख व दैन्य याच्या विळख्यातून दलित मुक्त व्हावा, जुने जग लयाला जावे म्हणून मरणाला आवाहन करतात. ते लिहितात-----
मरणा,
तु येणार आहेस ना; तर लवकर ये
कायेच्या कल्पवृक्षावरून चैतन्याचा स्वर्गीय पक्षी
स्वर्गात उडून जाण्यापूर्वीच ये.
तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल कर
माझ्या जळत्या जीवाला लागला तर
उरीची संपेल क्षणी जळजळ
बुजतील वळ युगायुगाचे
विरतील ओहळ जुन्या जखमांचे मनामनातले
होईन मी शुद्ध चांगलासा तरुण
कधी कबीर,कधी उमर खय्याम
गेला ज्या चितारुन
मरुन मी मेघासारखा संचारेन वार्या वरती
कधी गिरीच्या शिरी राहून
उभा गाईन गीते लखलखती."
त्यांनी कथेबरोबरच सूड (दीर्घकथा), अघोरी, कोंडी, भूमिहीन, मूकनायक, अपूर्वा, सरदार, पावशा व पाषाण या कादंबरया आणि ‘आंबेडकर भारत-खंड१ व खंड २’ तसेच ‘दलित साहित्य-आजचे क्रांतिविज्ञान’ असे वैचारिक ग्रंथही लिहिले. मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणार्यान बाबुराव बागूल यांना त्यांच्या साहित्यातील व चिंतनातील प्रतिमेमुळे म. ना. वानखेडे यांनी ‘दलित अंग्री यंग मॅन’ असे संबोधले होते. त्यांच्या लेखनातील स्फोटक शब्द ‘व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याची भाषा’ बोलतात, तेव्हा त्यांच्या नसानसांत मनूप्रणीत व्यवस्थेबद्दल किती चीड आहे, हे प्रत्ययास येते. त्यांच्या या 'आंबेडकर' या कवितेत ते म्हणतात -
'मनू मानी ज्यांना महाअरी
तिथे तुझा जन्म झाला असेल तर
तुला व्हावेच लागेल ‘ आंबेडकर ’
युगांतरकारी ‘ आंबेडकर ’!
क्रांतिकारी ‘ आंबेडकर ’!
मनूचा मर्मांतक वैरी ‘ आंबेडकर ’!
दुसरा पर्यायच नाही
तुला व्हावेच लागेल ‘ आंबेडकर ’!
‘ आंबेडकर ’ एवढा मोठा नाहीस झाला
तरी लहानगा का होईना
आंबेडकरच व्हावे लागेल तुला
तुझ्या बापावरी मजूर नाही,
वा मास्तरही नाही,
कलेक्टरही नाही,
फक्त आंबेडकर होणे आहे तुला
म्हणजे सम्यक क्रांतीला
देशात आणणे आहे तुला !
बाबुराव बागूल मुळचे नासिक जिल्ह्यातील विहीतगावचे. तिथल्या एक गरीब दलित, कुटुंबातला त्यांचा जन्म. शिक्षण विहीतगाव आणि मुंबई येथे इयत्ता अकरावीपर्यंत. आरंभी लाँड्रीत मार्कर ते दवाखान्यातील कंपाउंडरचा साहाय्यक अशा नोकऱ्या केल्यानंतर प्रथम दादरच्या कोहिनूर मिलमध्ये आणि नंतर माटुंगा येथे रेल्वेच्या यंत्रशाळेत कामगार म्हणून त्यांनी बारा वर्षे काम केले.नोकरी सोडल्यानंतर पुढे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. त्यातूनच त्यांच्या साहित्यनिर्मितीस प्रतिभेचे धुमारे फुटत गेले.
बाबुराव बागूल यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य - संस्कृती महामंडळ, फाय फाउंडेशन - यांचे पुरस्कार प्राप्त झाले. पहिले विद्रोही साहित्य संमेलन व अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन यांसह अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणार्याा बाबुरावांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दीर्घ आजाराने नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या साहित्यातील नकार, विद्रोह आणि मानवतावादी जीवनमूल्यांचा पुरस्कार ही त्रिसुत्री अत्यंत प्रभावी ठरली. मानवी मनाचा शोध त्यांच्या-एवढा दुसर्याा कोणत्याही कथालेखकाने क्वचितच घेतला असेल. त्यामुळे बागुल यांचे मराठी साहित्यामधे अनन्यसाधारण असे स्थान आहे. ‘मानदंड’ ठरण्याइतके ते साहित्य महनीय आहे.
आजघडीला मात्र अशा विद्रोही साहित्यिकांची उपेक्षा होताना दिसते आहे. बोथट झालेल्या सामाजिक जाणीवा याच्या मुळाशी आहेत. बागूलांच्या आणि समकालीन दलित लेखकांच्या नावाचा जोगवा आपल्या चरितार्थासाठी मागून आपली तुंबडी भरून घेणारया व नावापुरत्या दलित राहिलेल्या राजकारण्यांना त्यांचा सोयीस्कर विसर जिथे पडत चालला आहे, तिथे इतरांची अवस्था किती वाईट असू शकेल या कटूसत्याचे शल्य जास्त वेदनादायी आहे.
समीर गायकवाड.
Nice information...
उत्तर द्याहटवा