Saturday, February 25, 2017

सय ....


रात्रीपासून पाऊस पडतोय... आईने घराबाहेर उभे केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत रहावं अन आईने अधून मधून हळूच खिडकीतून डोकावून पाहत राहावं तसं ह्या पावसाचं झालंय... एक हरवलेली रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं ह्या पावसाचं झालंय.. पहिल्यांदा भांडण झाल्यावर प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं ह्या पावसाचं झालंय... होस्टेलवरच्या पहिल्या रात्री आईवडिलांच्या आठवणींनी पहिली रात्र या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन अश्रुंचे पाझर लागून राहावेत तसा हा पाऊस पाझरतोय....


गावाकडे जाताना बस चुकावी अन रात्रभर वाट बघत बसल्यावर घरातले अणुरेणु डोळ्यापुढे फेर धरून नाचत राहावेत तसे ह्या पावसाने फेर धरलेत... पहिल्यांदा माहेरी जाताना प्रवासातली रात्र मोठी वाटत जाते आणि काजळअंधार अधिक गहिरा वाटत जातो, नकळत एक अनामिक भीती मनात दाटून येत राहते अन माहेरची ओढ अधिक तीव्र होत जाते. कधी दिवस उजाडेल असं होऊन जाते तसं ह्या रात्रभर कोसळणारया पावसाचे झालंय... उद्या गणिताचा पेपर आहे पण अभ्यास काहीच झालेला नाही अन डोळ्यापुढे रागवलेल्या वडिलांचा व त्यांना भरीस घालणारया गुरुजींचे चेहरे रात्रभर सारखे तरळत राहताहेत. तसेच ह्या पावसाचे ढग रात्रभर घराबाहेर तरळत आहेत.....

आता वडील राहिले नाहीत... वडील गेल्यानंतरची पहिली रात्र कशी होती म्हणून सांगू ? रात्रीच्या पावसात एका मोठ्या वटवृक्षाखाली उभं असताना एखादी लकाकणारी वीज यावी अन तिने अख्खं झाड आपल्यासोबत घेऊन जावं, आपण तसंच हतबल होऊन तिथंच त्यांची वाट बघत रात्रभर रडत उभं राहावं. त्यांची आठवण येत रहावी. त्यांनी ज्या करंगळीला धरून आपल्याला चालवलं तिला रात्रभर काटे येत राहावेत, त्यांनी जेंव्हा जेंव्हा पाठ थोपटली तिथे रात्रभर शहारे येत राहावेत, त्यांनी आपल्या भल्यापोटी कधी हातावर पट्ट्या मारल्या असतील त्या हातावरच्या त्या वळांनी पुन्हा उमटावं, आपल्याला सायकल वरून शाळेत सोडताना त्यांनी हात हलवून आपल्याला धीर देत राहावं अन तो त्यांचा हात त्या रात्रभरच्या पावसात तरळत रहावा.कधी आजारपण आलं तर त्यांनी रात्रभर माथ्यापाशी बसून राहावं आणि आपण डोळेभरून त्यांच्याकडे पाहत राहावं. जगाशी कधी भांडण झालं तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्याला हत्तीचे बळ देणाऱ्या त्या बापमाणसाने हळूच आपल्यासाठीही कधी अश्रू ढाळावेत आणि आपली चुकून त्याकडे नजर जावी, त्यांनी म्हणावं 'काही नाही डोळ्यात जरा धूळ गेली होती रे !'... त्यांच्या या बोलण्याने आपल्या डोळ्यांना अश्रूंची धार लागावी अन आपण आयुष्यात एकदाच वडिलांच्या छातीवर डोकं टेकवून मनसोक्त रडावं तसं ह्या पावसाचं झालंय....

आठवणींचे अनेक श्याम मेघ एकत्र आणून नुसती काळीजवीणा झंकारत रहावी तसं ह्या पावसाचं झालंय... रात्रभर कुणीतरी आपलंच पण अनामिक असं माणूस उंबरठयापाशी आलंय असं वाटत राहावं असं या रात्रभर दाराशी लगटून राहिलेल्या पावसाचं झालंय...

त्याच्याही मनात तेच आलंय जे आपल्या मनात आलंय, त्याच्या आठवणींना उधाण आलंय कारण त्याने आपल्याला प्रतिक्षेत बरंच ताठकळवलंय !..
दार उघडून बाहेर बघा त्याला तेच सांगायचेय जे तुम्हाला बोलायचेय....

रात्रीपासून पाऊस पडतोय, स्वर्गस्थ बळीराजाची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी उतावीळ झालेल्या मेघदूताची घालमेल ऐकायची असेल तर जरा पावसात भिजा त्याला काही तरी सांगायचेय !... काल रात्रीपासून पाऊस पडतोय त्या पावसाचे हे असं गारुड झालंय !

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment