Sunday, February 12, 2017

पावसाचे हितगुज .......होय नाही म्हणत म्हणत अखेर ढगांमधले भांडण संपले. बरयाच काळापासून असलेला अबोला मिटला, अन त्यांचे काल मनोमिलन झाले. त्यांच्या मिलनासाठी आसुसलेल्या वीजांनी नेत्रदीपक रोषणाई केली. बघता बघता त्यांच्या मिलनाला धुमारे फुटले, पावसाचा जन्म झाला. पावसाचे थेंब अगदी नाचत नाचत ढगामधुन बाहेर पडले. नाचरया थेंबाना वारयाने आपल्या झोक्यावर मनमोकळे झुलवले. हवेतल्या धुलीकणांनी त्या थेंबाना मायेने ‘गंध-पावडर’ लावली. धरतीवर कासावीस झालेल्या सगळ्या भूमिपुत्रांनी आपल्या डोळ्यातल्या पाण्यात हे थेंब अलगद झेलले. त्यांच्या डोळ्यातले पाणी अधिकच खारे झाले. काल आमच्याकडे पाऊस येऊन गेला......वेलींच्या कानात गाणी म्हणून गेला, वडाच्या पारंब्याना कवटाळून मनसोक्त रडला. पिंपळाच्या पानामध्ये वेड्या राघूच्या घरटयात डोकावून गेला ; ‘ मी अजून बरसणार आहे, तुझी पिले जन्माला घाल त्यांच्यासाठीही मी तजवीज करणार आहे!' असं त्या आभाळवेडया पक्षिणीला अंड्यांची काळजी घेण्याच्या निमित्ताने बजावून गेला. आटून गेलेल्या ओढ्यातल्या तप्त कोरड्या खडकांना मिठी मारून गेला, झाडांच्या अंधारलेल्या ढोलीतल्या नव्या संसाराकडेही नजर टाकून गेला. पळसाच्या शेंड्यावर आलेल्या तलम कोवळ्या पालवीशी झिम्मा खेळून गेला, वाड्या वस्तीतल्या चंद्रमौळी घरातून बळीराजाच्या घराची हालहवा घेऊन गेला, बळीराजाच्या गरीबीचे रिपोर्ट कार्ड इंद्रदेवाला सादर करणार आहे असं फाटक्या छपराला डोळ्यात पाणी आणून सांगून गेला...काल आमच्याकडे पाऊस येऊन गेला....

खोल गेलेल्या दगडी आडात गिरक्या घेत जाऊन रडवेला होऊन वर आला, पाणंदेतल्या आंब्यांच्या झाडाना थोडा दिलासा देऊन गेला. वेशीतल्या जीर्ण झालेल्या लिंबाशी बोलताना लिंब धाय मोकलून रडला; “आणखी जोरात ये, निष्पर्ण पानांच्या मोडलेल्या फांद्यांचे माझे हे निर्जीव कलेवर आता सोसत नाही, विजेचा एकच कल्लोळ घेऊन ये, माझे गाऱ्हाणे ऐकून घे” असे त्याने सांगताच पावसाने त्याला कवेत घेत त्याचे डोळे पुसले. गावाबाहेरच्या तळ्याने तर पावसाला मिठी मारली अन गाळात बुडालेले आपले अंग धुऊन घेतले. पाझर तलावाच्या तालीशीही त्याने सल्ला मसलत केली. गावातल्या गल्ल्यांमध्ये त्याने जोरात सडे टाकले अन फुफुटयाने भरलेल्या रस्त्यांना चिखलाची भेट दिली. कोण कुठल्या जातीचे असा भेद न करता सगळ्या रस्त्यात नाचून गेला, सर्व गल्ल्यात त्याने मनसोक्त उनाडक्या केल्या. काल आमच्याकडे पाऊस येऊन गेला....

सानथोर भेदभाव न करता तो सर्वांच्या अंगणात फेर धरून नाचला. म्हातारया कोतारयांच्या सुरकुतल्या कपाळाच्या रेशमी कायेला चुंबून गेला. पोराठोराना वहीतल्या पानांच्या नावा तयार ठेवायला सांगून गेला. हळदओल्या सासुरवाशिणींना माहेरचा सांगावा देऊन गेला. अंगणातल्या तुळशीचा नभातल्या मेघश्यामासाठी हळवा निरोप घेऊन गेला. गोठ्यातल्या गाई म्हशीना मनसोक्त न्हाऊ घालून गेला. विठ्ठलाच्या कळसावर मनापासून अभिषेक करून गेला. दर्ग्याच्या घुमटाला सलाम करून गेला. उनाड होऊन जन्माला आलेला पाऊस काल आमच्या गावातून पोक्त होऊन पुढे गेला. काल आमच्याकडे पाऊस येऊन गेला....

गावभर फिरून झाल्यावर पाऊस शेतशिवारांमध्येही गेला. तिथे जाताना त्याचे डोळे डबडबून गेले होते, त्याचे ऊर धपापत होते. रडणारया पावसाला गडगडाटी आवाज करून ढग धीर देत होते. फाटक्या कपड्यात मातीच्या ढेकळात उभ्या असलेल्या बळीराजाशी बोलताना पाऊसच 'कोसळून' गेला, अपराधी भावनेने कोसळून खाली पडणारया त्या पावसाच्या थेंबाना शेवटी काळ्या आईने आपल्या कवेत घेतले. मातीच्या मऊशार कुशीत त्याने आपला दमलेला देह विसावला अन तो आपले जन्मगाणे मातीच्या पोटातल्या बीजांच्या कानात हलकेच गाऊ लागला. त्याला अनेक गहिवर आले. बळीराजाने त्याचे डोके आपल्या थकलेल्या खांद्यावर घेतले तेंव्हा कुठे तो शांत झाला. त्याला धीर देणारे ढगही शांत झाले. काल आमच्याकडे पाऊस येऊन गेला. माझ्या बेरंग लेखणीला इंद्रधनुष्याची संजीवनी देऊन गेला ....

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment