बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

अनुवादित कविता - न्युमेरी अल नैमत उर्फ अमजद नासीर : जॉर्डन , अरेबिक कविता

मी कुठेही गेलो तरी 
संध्येस त्याच खोलीत असतो 
जी माझ्या आईने अज्ञात पानाफुलांच्या सुगंधाने भरलेली असते.
हा सुगंध माझ्यासोबतच असतो जणू.
माझी आई देवाघरी गेली आणि तेंव्हापासून ही गंधभारीत खोली माझ्यासवे असते.
बालकवींच्या 'औदुंबरा'सारखा हा गंध माझा पिच्छा करतो.
खरे तर आपले आयुष्य आपण जितके उध्वस्त करू 
तितका विध्वंस आपला पाठलाग करत राहतो. 
हे तर माझ्या आजीच्या अंतहीन म्हणींसारखे घडतेय, 
जे पुन्हा पुन्हा प्रारंभाकडे खेचतेय. 
विमनस्कतेच्या या वर्तुळाला मी कसे छेदेन हे ठाऊक नाही.
शब्द, गंध आणि झेपेच्या बंधनातून मुक्त होत 
हवेहवेसे पदलालित्य मला लाभेल का 
याचेही उत्तर माझ्याकडे नाही. 
आईच्या गंधभारीत आठवणींचे कढ हेच आता जणू जीवन झालेय...

लंडन येथे वास्तव्यास असणारे जॉर्डनचे कवी-लेखक याह्या न्युमेरी अल नैमत उर्फ अमजद नासीर यांच्या hadhian (विमनस्क) या अरेबिक कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. मूळ कवितेत सी.पी. कॅव्हफी यांच्या
प्रसिद्ध 'सिटी' या कवितेचा उल्लेख आहे त्याजागी मी बालकवींच्या औदुंबर कवितेचा उल्लेख केला आहे. कारण कॅव्हफींच्या 'सिटी' कवितेतले शहर कुठेही गेलं तरी कवीचा पिच्छा सोडत नाही अन तो विमनस्क होत जातो असे दर्शवले आहे ; बालकवींच्या 'औदुंबरा'चेही असेच होते.

प्रौढत्वास पोहोचलेल्या एका कवीच्या मातेचे निधन होते आणि त्याला सर्वत्र तिचा गंध जाणवू लागतो. ज्यातून त्याला सुटका नकोय पण त्याला त्याची खेद-खंत आहे कारण आई हयात असताना इच्छा असूनही त्याला तिचा सहवास लाभला नाही. मग या गंधापासून दूर जात पूर्वीसारखं आईच्या सहवासाच्या ओढीतलं स्वच्छंदी जगणं वाट्यास येईल का हा कवीचा प्रश्न खूप घायाळ करून जातो. या अनुषंगानेच हा अनुवाद सर्वांसमोर मांडावासा वाटला. काव्यार्थ वाचल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना ही आपलीच कविता असल्याची भावना नक्कीच दाटून येईल याची मला खात्री आहे.

'औदुंबर'मधल्या शेवटच्या दोन ओळी सोडल्या तर कविता निखळ आनंदाचा नैसर्गिक झरा वाटते पण .. "झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर' इथे बालकवींना अभिप्रेत असणारा शोकात्म औदुंबर विमनस्कतेचे प्रतिक आहे, जे त्यांच्या जीवनात त्यांनी कठोरपणे अनुभवले होते. 'ऐल तटावर पैल तटावर' हा पिच्छा पुरवणारा भास आहे जो हरवून गेलाय, वास्तव आहे तो इतक्या देखण्या निसर्गाला काळ्या डोहात बुडवून त्यात आपले पाय मोकळे सोडून बसलेला औदुंबर...असाच अर्थ सी.पी. कॅव्हफी यांच्या प्रसिद्ध 'सिटी' या कवितेतून प्रतीत होतो आणि मराठी वाचकांना सहज उमजेल असा चपखल काव्य्यात्म शब्द औदुंबराशिवाय दुसरा योग्य वाटला नाही म्हणून त्याचा उल्लेख केलाय...
 
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा