रविवार, २९ जानेवारी, २०१७

क'वीलक्षण' ...



एके काळी कवी, कवयित्री हजार माणसात देखील सहज ओळखू यायचे, त्यासाठी डोक्याला ताण द्यायची फारशी गरज पडत नसे. त्यांची लक्षणे ठरलेली असत. कलात्मकतेचा बाज दाखवणारी त्यांच्या डोक्यावरच्या केसांची अस्ताव्यस्त झुल्फे कवीच्या लेबलखाली ती मस्त खपून जायची. शिवाय कवीला इतकीही उसंत नाही असा एक समज त्यातून रूढ व्हायचा. दाढीचा किरकोळ खर्च टाळणारे प्रतिभेचे बाह्यलक्षण क्रमांक दोन म्हणजे रापलेल्या गालफडावरील हनुवटीकडे वाढलेले दाढीचे खुंट होय. कवीच्या नाकावरून घसरून खाली आलेला कधीही फ्रेम तुटायच्या बेतात असलेला त्याचा चष्मा त्याला अगदी चपखल शोभून दिसे. कवीच्या कपाळावर आठ्यांची आखीव रेखीव जाळी जळमटे असायचीच.

त्याच्या किरकोळ हाडकुळया देहावर ढगळ मापातला खादीचा किंवा कॉटनचा झब्बा सदरा लोंबत असे. खांद्यावर आणि मानेवर कॉलरपाशी विरलेला हा सदरा दुमडलेल्या बाह्यांजवळ मळकटून गेलेला असे. आपल्या सदरयाची एखादी गुंडी तुटलेली नसेल तर एखादे कडवे अर्धेच सुचेल असे कवींना वाटत असावे त्यामुळे कवीच्या शर्टची एखादी का गुंडी अर्धी किंवा पूर्ण तुटलेली असे. तिथले रिकामे काजे अनाथ मुलासारखी दुर्मुखलेले वाटे.

काही कवींच्या सदऱ्याच्या खिशातील बॉलपेनची शाई लीक होऊन तिचा अमिबा सारखा आकार तयार होऊन ती शर्टच्या आत पाझरत असे. हा 'शाईपाझर' बनियनमधून थेट काळजापर्यंत झिरपत असे त्यामुळे त्यांचे लेखन खऱ्या अर्थाने आधी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचे. काही कवी इस्त्री न केलेले विजार शर्ट वापरत असत. "असे केल्याने आपल्या त्रिकालज्ञानी प्रतिभेत भर पडतो असा गंजी केलेला कडक समज काही प्रतिभावंतांच्या डोक्यात गाळात अडकलेल्या गाढवासारखा रुतून बसला असल्याने असे घडत असावे...." असे आधुनिक मराठी साहित्यातील कवींची परिमाणे सांगणाऱ्या क'वीलक्षण' या काव्यआस्वादक ग्रंथात कधीतरी वाचल्याचे स्मरते. क'वीलक्षण' हे नाव कपदार्थच्या धर्तीवर सुचल्याचे त्यातील प्रस्तावनेत वाचले होते. असो.

तमाम कवींच्या खांद्याला शबनम बॅग नामक पिशवी लटकत असे. या पिशवीचे फक्त नावच देखणे होते. पिशवीत काही बाही कोंबलेले तरी असे वा ती अगदीच मोकळी असे. खांद्यावर अडकवून अडकवून किंवा घरी असल्यावर खुंटीला अडकवून तिच्या दोरीच्या मध्यभागातील वीण ढिली झालेली असे, अवखळ पोरीच्या बटा वेणीतून बाहेर लोंबाव्यात तसे हे धागे बाहेर लोंबत असत. माझ्या ओळखीतले एक कवी फक्त मोरीत जातानाच ती दिव्य शबनम बॅग आपल्या बाहुंपासून बाजूला करत असत. त्यांना तिचा विरह जरा सुद्धा सहन होत नव्हता म्हणे ! झोपताना देखील ते तिला उराशी कवटाळत. त्यांच्यावर आणि त्यांच्या दिव्य प्रतिभेवर (!) खार खाऊन असणाऱ्या दुसऱ्या एका जळक्या कवीने त्यांच्याबद्दल वावडी उडवली होती की, 'त्या पिशवीमुळेच आपल्याला कविता सुचतात' असा त्यांचा काव्यात्मक समज असल्याने ते असे वागत होते म्हणे ! ही शबनम बॅग खांद्यावर असली की 'खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, कविता उडवीन राई राई एव्हढ्या' हे काव्य काही कवींच्या मस्तकात भिनायचे म्हणे. मग काय ठिणग्या उडाव्यात तशा कविता उडत उडत रचल्या जात.

केवळ कवींचीच बाह्यलक्षणे मराठी साहित्यात अभ्यासली जातात असे नव्हे तर कवयित्रींची बाह्य लक्षणे देखील अभ्यासली गेली आहेत. शुभ्रधवल, किंवा ऑफव्हाईट रंग हा कवयित्रींच्या साडीचा आवडीचा रंग. जोडीला फुला फुलांची बारीक नक्षी कधी कधी असे. क्वचित वेलबुट्टीही आढळून यायची. कवीच्या सदऱ्यगत ह्या साडया चुरगळलेल्या नसत पण त्यांना भट्टी माहित नसे. गळ्यात किवा हातात क्वचित एखाददुसरा माळेसारखा दागिना असे. एका हातात मात्र नाजूक घड्याळ असे. खांद्याला एखादी छोटीशी पर्स असे.

एखादे किरकोळ काव्य संमेलन देखील कवींना 'आजि मला ब्रम्ह गवसले' या थाटाचे वाटे. लोकांना कवीमित्र भेटले की दरदरून घाम फुटायचा. आता काय ऐकून घ्यावे लागेल या कल्पनेने मेंदूत तांडव सुरु होई. 'काय मित्रा कसा आहेस' इथून संवाद सुरु व्हायचा. 'मी बरा आहे, तू कसा आहेस' हे उच्चारलेले शब्द हवेत विरेपर्यंत कविता ऐकून घेण्याची विनंती तयार असे. 'नुकतीच मी एक कविता केली आहे' असं सांगताना त्याच्या अलीकडे पलीकडे असणारया इसमाला मुसळाने ठोकून काढावे असे लोकांना वाटे पण दुर्दैवाने त्याच्या शेजारी श्रोत्याशिवाय कुणी नसे. त्यामुळे हाती मुसळ धरणे रद्द करून कानांवर अन्याय सहन करण्याच्या तयारीत सज्ज राहावे लागे. कवीच्या तावडीत अशा तऱ्हेने कुणी अलगद सापडला की पिंजऱ्यात अडकलेल्या उंदिरासारखी त्याची अवस्था होई तर कवी म्हणजे त्या पिंजऱ्याचा मालक. मग तो थेट आकाशगंगेतील धुमकेतूपासून ते रॉकेलच्या रांगेपर्यंतच्या आणि चंद्राच्या सौंदर्यापासून ते प्रेयसीच्या गालावर नव्याने उमटलेल्या चॉकलेटी वांगावरच्या कविता ऐकवत असे. त्या दिवशी उपवास असला तर चालायचे कारण त्या कविता ऐकल्या की तहान भूक उरत नसे, म्हणजे तिची वाट लागत असे. पण उपवासाव्यतिरिक्तच्या दिवशी कवीमित्र भेटला की मेंदूचा भुगा होताना पोटातली आतडी कुत्र्याने मुटकुळे करून झोपी जावी तशी झोपी जात ! मग रात्री बेरात्री भूक लागे आणि चुकून त्याच वेळी रेडीओ किंवा दूरदर्शनवर 'आजची काव्यमंजुषा या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नामवंत कवींचा परिचय' हे शब्द जरी ऐकू आले तरी अंगावर काटा येई. 'छटी का दुध' नामक दुध कुणाला आठवावे अशी आपली इच्छा असली तर त्या व्यक्तीची काही हौशी कवीमित्रांशी गाठ घालून द्यायची !

माझे कवीमित्र नेहमी त्यांची काही दुखणी सांगत. 'घरी आपण एखादी कविता ऐकवली की किती थंडा प्रतिसाद मिळतो' याचे दर्दभरे वर्णन करताना कवी आता रडतो कि काय असे वाटे आणि त्यामुळे माझ्याच पोटात भीतीचा गोळा येई. त्यांची उदाहरणे अत्यंत बोलकी असत.
'चंद्र तारकांनो माझ्या अंगणात या तुम्ही, मोद भरतो तुमच्या जीवनात आम्ही' अशी कविता त्याने करायचा अवकाश की त्याच्या माजघरातून आवाज येई, "अहो दहा दिवस झाले तेव्हढा बल्ब गेलाय, नवा आणून बसवा म्हटलं तर तुमच्याकडून तेही होत नाही का ?"
या प्रश्नामुळे चंद्रतारका गर्भगळीत होऊन कवितेतून आकाशात परत जात.
"या चिमण्यांनो माझिया घरात बांधिन एक झुला तुमच्यासाठी, कशाला जाता या वाळलेल्या झाडाच्या अंगकाठी? " असं त्याने लिहायचा अवकाश की लगेच त्याची पत्नी त्याला सांगे की, "महिना झालाय परसातली झाडं सुकलीत जरा पाणी घाला."
एकंदर कवी जे काही लिही त्यावर पाणी पडत असे. 'प्रिये तुझ्यासाठी अंथरला माझ्या कवितेचा शेला' असलं काही लिहिलं की मग तर कवीची धडगत नसे, "जळलं मेलं ते नशीब लग्न झाल्यापासून अंगाला कसलं नवं कापड ते लागलं नाही" असं ऐकताच त्याचे रेशमी काव्य उसवून जाई. पण कवीदेखील मोठे निगरगट्ट असत. रेटून कवितेच्या जिलेब्या टाकत. यात बहुत करून शब्दांची बुंदी आशयाच्या कढईतून बाहेरच पडे. कवी म्हणजे घराजवळच्या झाडावरील घरट्यातील पिलांकडे न पाहणारा पण त्यावर मायेने ओथंबलेली कविता लिहिण्यात वाकबगार असणारा इसम ! त्यामुळे त्याच्या काव्यचातुर्याची 'पुरती' कल्पना त्याच्या घरी असल्याने कवितेची डाळ त्याच्याच घरात शिजत नसे.

कवीच्या बाह्यलक्षणात एक महत्वाचे लक्षण म्हणजे त्याच्याअंगी असणारी कविता ऐकवण्याची जिद्द आणि सादरीकरणाची चिकाटी ! दिसला माणूस त्याला ऐकव कविता असं काहींचं चालत असे. विमा एजंट वगळता इतर कुणी याला आपणहून बळी पडत नसत. पण जे लोक अपघाताने कवीच्या कवितांचे 'बळी' ठरत ते मराठीशीच दुष्मनी असल्यागत वागू लागत. त्यामुळे कधीकधी त्यांच्या घरचे लोक 'आमचा माणूस कालपर्यंत तर बरे होते ओ पण त्या कवींच्या कविता काय ऐकल्या आणि त्यांचे चित्तपाखरू सैरभैर झाले' असे ऐकवत. कविता ऐकवण्यासाठी कवीला कोणत्याही वयातले, कोणत्याही लिंग-वर्णाचे श्रोते चालतात. अक्षरशः त्या श्रोत्याच्या बखोटाला धरून आपल्या कवितांचा भडीमार त्याच्यावर करतात. श्रवणेन्द्रियांची त्या बापुडवाण्याला वीट येतो की काय असे वाटे. कवीला हे सर्व कळे पण हाती आलेली 'शिकार' तो सोडत नसे !

कविता ऐकवण्यासाठी श्रोता तावडीत आला कि स्थळमहात्म्य कवीच्या दृष्टीने महत्वाचे नसे. म्हणजे कुठल्याही जागेवर कविता ऐकवण्याचा कवीचा हातखंडा असे. स्मशानभूमीत मयतीला आलेल्या व्यक्तीतून देखील कवी चाणाक्षपणे आपला श्रोता शोधून काढत. देवळापासून ते दवाखान्यापर्यंत आणि न्यायालयापासून ते भाजीमार्केटपर्यंतचे कुठलेही स्थळ कवीला चाले. चालत्या बसमध्येही त्याला कविता सुचे, सिनेमा पाहतानाही त्याचे लक्ष पडद्याऐवजी प्रेक्षकाकडे असे. गझलेपासून ते पोवाडयापर्यंत आणि बडबडगीतापासून ते केकावलीपर्यंतचे कुठल्याही प्रकारचे 'काव्यटेंडर' कवी सराईतपणे भरे. एखादा तरबेज पाकीटमार ज्या सफाईदार पद्धतीने लोकांचे खिसे साफ करत असे तितक्याच सफाईदार शैलीने कवी आपल्या काव्यहत्याराने लोकांची झोप उडवत. वेळ कुठलीही असो पहाट, सकाळ, दुपार, सांजवेळ, मध्यरात्र असली तरी पाण्यावर लोणी काढावे इतक्या सहजतेने कवितांचे रतीब कवी घालत असे. आपल्या मुलाबाळाइतकेच त्याला यमक, अनुप्रास, अलंकार प्रिय असत. वृत्ते, मात्रा, गण यांच्या उल्लेखाशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरत नसे.

साड्यांच्या दुकानातील सेल्समनमध्ये जशी सहनशीलता असे तशीच सहनशक्ती कवीच्या अंगी नैसर्गिकरित्या टिकून होती आणि आहे. गिऱ्हाईकाने साडी घेतली नाही तरी तिथला सेल्समन अगदी स्थितप्रज्ञ भावाने शांत धीरगंभीर बसून असतो, सातत्याने साड्या दाखवत राहतो. कंटाळा करत नाही तसंच काहीसं कवीचे असे. समोरच्या श्रोत्याने डोळे तात्पुरते वा 'कायमचे' मिटलेले असले तरी, त्याची मुद्रा प्रश्नचिन्हांकित असली तरी, त्याने तोंडाचा आ वासलेला असला तरी किंवा त्याने कोणतीही दाद दिली नाही तरी, किंबहुना चेहऱ्यावरील रेषही ढळू दिली नाही तरी कवी आपली कविता हसतमुखाने पुढे रेटत असे. कवी श्रोत्यांच्या गुणांना अवगुणांना सरावलेला असे. निर्ढावलेल्या कसबी कसायासारखा तो काव्यसोहळे कापून काढत असे. तिथे शब्दांचे पाट वाहवत असे. कवींचे आणखी बरे असे, एक कवी दुसऱ्या कवीला इतकी अफाट दाद देत असे की त्याच्या ओझ्याने काव्यार्थ फाटून जावा ! आपले काव्यसंग्रह खपले नाहीत तर ('मधल्या गल्लीतले ढेरपोटे बाबूराव काल खपले, आज त्यांचा अंत्यविधी आहे' या विधानातील 'खपले' या अर्थाने हा शव्द वापरला नसून खप या विक्रीदर्शक शब्दाचे ते प्रत्ययकारी रूप आहे) कवी ते बंबात न घालता उशाखाली ठेवणे पसंद करत, जेणेकरून झोप नीट यावी. कवी आणि प्रकाशक यांच्यात हाडवर्ण आणि गजकर्ण यांच्यातले नाते असे. दोन्हीही व्याधीजनक असल्याने त्यावर तोडगा निघत नसे. काही लोक रस्त्यात आपला चेहरा दिसला की तोंड लपवून हळूच पळून जातात हे कवीला कळत असे तरीही तो 'हे विश्वची माझे घर' या उक्तीने सर्वांवर प्रेम करत असे. त्या काळातील कवींची आणि कवयित्रींची बात काही और होती.

आताचे कवी त्याहून पुढे गेले आहेत, आपल्या महान कविता वाचायला किंवा ऐकायला मायबाप श्रोता उपलब्ध असला नाही तरीही उन्हात 'सांडगे' वाळत घालावेत तसे सोशल मिडीयावर, फेसबुकवर, व्हॉटसएपवर आपल्या कवितांचे वाळवण तो अविरतपणे टाकत असतो. त्याच्या कविता वाचायच्या आधीच त्या 'वाळल्या' जातात. म्हणजे खंडकाव्याइतके दिर्घ आणि बोजड काव्य असले तरी अवघ्या काही सेकंदात त्यावर लाईक्स, कॉमेंटसचा भडीमार होतो. आजकाल पायलीला पासरीभर संमेलने होतात त्यामुळे गल्लोगल्ली कविराजांचे प्रस्थ आता वाढते आहे. कवितांची वर्गवारी करताना सुमार आणि बेसुमार हे दोनच वर्ग उरतात की काय असे भाष्य महान कवी 'मध्वविनायक' यांनी आपल्या 'काव्यभूशिर' या काव्यचिकित्सेत केल्याचे गंपूने करपट ढेकरा देत देत मला नुकतेच सांगितल्याचे आठवते. कागदाची (आणि कवितेचीही) किंमत कमी झालेली असल्याने, तसेच मुद्रणव्यवस्थेतील आमुलाग्र यांत्रिकीकरणीय बदल (शब्द वाचून गांगरलात ना, सोपं सांगतो- प्रिंटिंग मशीनमध्ये बदल झाल्याने ! आता कसं मराठीत सांगितल्यासारखं वाटतेय होय ना !) झाल्याने काव्यसंग्रह नामक बाड छापणे आता स्वस्त आणि सुलभ झाले आहे. (त्यामुळे किराणा दुकानात पूर्वीसारखी शालेय वह्यांची गमतीदार रद्दी आढळण्याऐवजी कालपरवा प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहांची पाने साखर, मीठ बांधून देण्यासाठी वापरली जात असल्याचे एका अहवालात नमूद आहे.)

इतके सारे असूनही कवी आपले अस्तित्व टिकवून आहे. जे जगाला दिसत नाही ते त्याला दिसते. आपला चष्मा सांभाळत दिव्य दृष्टीने तो जगाला मार्ग दाखवतो, प्रेम न करता प्रेमिकांना प्रेरणा देतो, बनारस पान खात खात पानाफुलांवर जीव लावतो, पत्नीइतकेच देवतांना घाबरतो, नवरसांवर आमरसाइतकाच जीव लावतो ! स्वतः कितीही दुःखात असला तरी भवसागराची दुःखे आपली समजतो आणि त्याच्या आयुष्यात हसू नसले तरी स्वतःवर हसत जगाची दुःखे हलकी करत जगाला आनंदी ठेवतो. कवीच्या या सर्व क'वीलक्षण' गुणांमुळे मीही कधी कधी कविता करण्याची हौस भागवून घेत स्वतःला कवी म्हणवून घेतो !

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा