Monday, January 2, 2017

जीवनतत्व - प्रेमाची अभिव्यक्ती


काही दिवसांपूर्वी रजनीकांतचा एक किस्सा वाचण्यात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले असा तो किस्सा होता. मात्र असा किस्सा अनेक महानुभावांच्या बाबतीत पूर्वी घडला आहे. यातीलच एक किस्सा लिओ टॉलस्टॉयचा आहे. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असे त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळला. पण त्याने पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर हमालाला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

टॉलस्टॉय ! जगाच्या इतिहासात कोरलं गेलेलं एक ठळक नाव. टॉलस्टॉय आपल्या सर्वांना परिचयाचा आहे तो त्याच्या "वॉर अँड पीस" आणि ‘ऍना कॅरेनिना’मुळे. एकोणिसाव्या शतकाची अठ्ठय़ाहत्तर वर्षे आणि विसाव्या शतकाचं पहिलं दशक पाहिलेला हा महामानव. त्याच्या हयातीतच तो उदंड कीर्तीचा आणि प्रचंड तिरस्काराचाही धनी झाला होता. त्याचं सबंध आयुष्य म्हटलं तर अत्यंत संपन्न होतं.. आणि तरीही एकेकाळचा काउन्ट (सरदार) असलेला मनस्वी 'लिओ' वयाच्या ब्याऐंशिव्या वर्षी वैफल्यग्रस्त अवस्थेत पहाटेच्या सुमारास घर सोडून निघून गेला आणि अॅस्टोपोवो रेल्वे स्टेशनवर मृत्यूच्या अधीन झाला. टॉलस्टॉय यांची एक कथा जगप्रसिद्ध आहे, आपण सर्वांनी वयाच्या कुठल्या तरी टप्प्यावर ती ऐकली वा वाचली असेलच...

‘माणसाला जगायला किती जागा लागते?’-‘हाऊ मच लॅण्ड डझ ए मॅन नीड?’ ही टॉलस्टॉयची बोधकथा एकेकाळी फार लोकप्रिय होती. या प्रश्नाचं उत्तर अर्थातच, माणसाला जगायला फार जागा लागत नाही; मेल्यावर पुरायला तीन फूट गुणिले सहा फूट एवढी जमीन पुरते असं या कथेचं सूत्र होतं. या गोष्टीतल्या नायकाला ‘तू दिवसभरात पळत पळत जाऊन जेवढी जमीन पायाखालून घालवशील तेवढी जमीन तुझ्या मालकीची होईल’ असा वर मिळतो. मात्र त्यानं सूर्यास्तापर्यंत मूळ जागी परत आलंच पाहिजे, अशी अट असते. इथे त्यानं स्वत:च्या शक्तीचा, वेळेचा उपयोग नीट करणं, अचूक अंदाज बांधणं अपेक्षित असतं. पण मोह काही त्याला सुटत नाही. अजून थोडं पळूया, अजून काही जमीन मिळवूया असं म्हणत तो पठ्ठय़ा खूप लांबवर जातो. अर्थातच सूर्यास्तापर्यंत तेवढं अंतर कापून माघारी येणं त्याला शक्य होत नाही. आणि परतीच्या निम्म्या वाटेवर धाप लागून, छाती फुटून तो कोसळतो. त्यानं फार हाव धरली नसती, तर थोडीफार तरी जमीन मिळवली असती. त्या व्यक्तीला शेवटी अकाली मृत्यूला सामोरं जावं लागतं. आपल्या कथांतून बोजड वाटणारं तत्वज्ञान सुलभ पद्धतीनं मांडण्यात टॉलस्टॉयचा हातखंडा होता. 'वॉर अँड पीस' ही लिओ टॉलस्टॉयची कादंबरी म्हणजे संपूर्ण मानवी जीवनाचे, तत्कालीन रशियाचे, राष्ट्रांच्या इतिहासाचे परिपूर्ण चित्र आहे. मानवतेच्या आनंदाचे, महानतेचे, व्यथांचे, अपमानांचे परिपूर्ण चित्र आहे.

चैतन्यशील साहित्य हे असंच असतं जे जगण्याचे विविध अर्थ साध्या सोप्या भाषेत विशद करतं. साहित्यकारांची विलक्षण प्रतिभा आपल्याला त्यावर विचार करायला भाग पाडते आणि आपली जडण घडण होत राहते. या गोष्टीतून जीवनातील खऱ्या संपत्तीचे आणि ज्ञानाचे नेमके मर्म उमगते. अशीच आणखी एक गोष्ट आहे जी प्रेमाचा व्यापक अर्थ शिकवते.

एकदा एक देखणा उमदा तरुण कवी एका महाराणीच्या विश्रामकक्षात कविता सादर करायला आला. महाराणीकडे बघून त्याने काही अत्यंत उत्कट प्रेमकविता सादर केल्या. त्याकविता ऐकून महाराणी त्याच्यावर खूप खुश झाली. नंतर तिच्या दासी निघून गेल्यावर तो कवी अत्यंत आर्जवयुक्त स्वरात बोलला, "गुस्ताखी माफ करणार असाल तर मनातली एक गोष्ट आपणाला सांगू का ?" महाराणीने त्याला अनुमती दिली.
"आपण खूप चांगल्या आहात, सुस्वरूप आणि देखण्याही आहात. आपण मला खूप आवडलात. माझे आपल्यावर पाहताक्षणी प्रेम बसले आहे. माझ्या प्रेमाचा तुम्ही स्वीकार कराल का ?... बदल्यात तुम्ही माझ्यावर प्रेम केलेच पाहिजे असे काहीही नाही....एखादा स्नेही जसा आपल्याला एखादा गुलाब देतो किंवा एखादा मित्र आपल्याला भेटवस्तू देतो तसे मी माझे प्रेम आपल्याला देऊ इच्छितो, तेही कोणत्याही परताव्याशिवाय ! आपण माझे प्रेम घ्याल का ?"

कवीने अचानक विचालेल्या अनपेक्षित प्रश्नाने महाराणी पुरती गोंधळून गेली. काही क्षणांत तिने स्वतःला सावरले. आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणत ती बळेच उत्तरली- "माझे तर लग्न झालेले आहे!" त्या सरशी कवी उत्तरला - "पण त्याने काय फरक पडणार आहे ? तुम्हाला फक्त स्वीकार तर करायचा आहे !". त्या प्रतिभावंत तेजस्वी कवीचे ते लाघवी बोलणे ऐकून महाराणी तिच्या नकळत गालात हसत उत्तरली, "मान्य ! पण मला मुले आहेत, मुली आहेत आणि त्यांची देखील अपत्ये आहेत. आता मी परिपक्व झालेय आणि कदाचित मी वयस्कही झालेय.."
महाराणीच्या गालावर पडलेल्या खळीकडे अनासक्त कुतूहलपूर्ण नजरेने बघत कवी बोलला - "असू द्यात. त्याने फरक पडत नाही... वयाचे थोडेच बंधन असते का ? तुमची अपत्ये देखील कोणावरतरी प्रेम करत असतील ना .."
महाराणी बोलल्या - "या राज्याच्या महाराजांचेही माझ्यावर प्रेम आहे आणि माझेही त्यांच्यावर प्रेम आहे. मग तुमच्या प्रेमाला मी कसे स्वीकारू ?"

कवी मंद स्मित करत उद्गारला - "प्रेमाला नात्याचे नावच द्यायला हवे असे काही नाही... माझ्या मनातले मूक प्रेमभाव मी व्यक्त केले नसते तर मला चुटपूट लागून राहिली असती. आता मी व्यक्त झालोय. कुणा एकावर प्रेम करणे किंवा कुणा एकाने आपल्यावर प्रेम करणे ही भावनाच जगणं श्रेष्ठ करून जाते. भूक, तहान, जिज्ञासा, आस्था, स्नेह, माया, लोभ या जशा भावना आहेत तशीच प्रेम ही देखील एक भावनाच आहे. अशा भावनाच आपल्याला जगण्याचा आधार शिकवून जातात पण त्यात गुंतूनच पडायला पाहिजे असे काही नाही. प्रेम आपल्याला जगण्याचा आधार देतं, ते दोन्ही बाजूने स्वीकारले गेले असेल तर आधाराचं रुपांतर आनंदात होतं. हा आनंद अन्य भावनातून देखील मिळवता येतो. मात्र फक्त प्रेमाच्याच भावनेत गुंतून राहिलं तर कदाचित आयुष्यभर वेदनाच हाती लागतात. हे मला ठाऊक आहे म्हणून मी व्यक्त झालोय. आता तुम्ही स्वीकारले वा अव्हेरले तरी त्याचा माझ्या जीवनावर खूप मोठा फरक पडणार नाही ..."

कवीने विशद केलेली प्रेमाची भावना ऐकून महाराणी काही क्षण विचारात पडली. पुढच्याच क्षणाला स्वतःला सावरत ती उत्तरली - "वाह कवीराज ! किती छान समजावून सांगितलंत तुम्ही ... मी एक संसारीक स्त्री ही आहे आणि महाराणीही आहे... त्यामुळे योग्य वेळी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन... आता तुम्ही येऊ शकता !" महाराणीच्या उत्तरावर खुश होत कवीने मंद स्मित केले आणि महाराणीला वंदन करून तो तिथून बाहेर पडला. जाताना महाराणीने त्याचा उचित सन्मान केला.

काही दशके लोटली. एका पौर्णिमेच्या रात्री त्या कवीच्या स्वप्नांत ती महाराणी आली आणि ओलेत्या डोळ्यांनी त्याला म्हणाली, "असे होऊ शकणार नाही का, की अन्य एका मनुष्य जन्मी तू मला भेटशील, तेंव्हा तुझ्या प्रेमाच्या बदल्यात मी तुला प्रेम देऊ शकेन आणि तेंव्हा माझे वय सत्तर वर्षांचे नसेन !"
त्या अनपेक्षित स्वप्नाने कवी दचकून जागा झाला, त्याच्या मनात अनेक विचार आले. शेवटी दृढ निश्चय करून सकाळ होताच महाराणीच्या राज्याच्या दिशेने त्याने कूच केले. काही दिवसांत तो त्या नगरराज्यात दाखल झाला तेंव्हा त्याला तिथल्या रयतेकडून कळाले की, पौर्णिमेच्या रात्री वयाच्या सत्तराव्या वर्षी महाराणींचे देहावसान झालेय ! कवीला या गोष्टीचे दुःख झाले आणि काहीसे आश्चर्यही वाटले. न राहवून तो राजदरबारी गेला तेंव्हा नव्या राजाने त्याला निकट बोलावले. त्याची वास्तपुस्त होऊन ओळख लागताच महाराणीने त्याच्यासाठी वीस वर्षापूर्वी लिहून ठेवलेला बंद लिफाफ्यातला एक खलिता त्याच्या स्वाधीन करण्यात आला. त्या नंतर त्याचा सन्मान करून त्याला तिथून विदा केले गेले. घरी परत आल्यावर थकलेल्या कवीने अधाशासारखा तो लिफाफा खोलला. त्यातील खलिता वाचल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटले कारण राणीने स्वप्नात येऊन जे सांगितले होते तोच आशय त्या पत्रात होता. स्वतःच्या प्रेमाच्या सच्चेपणाचा त्याला त्या दिवशी मनस्वी अभिमान वाटला आणि त्याचे डोळे एकाच वेळी दुःखाश्रू आणि आनंदाश्रूने भरून आले.

खऱ्या प्रेमाचा स्वीकार होवो वा अव्हेर होवो त्याची अभिव्यक्ती होणे गरजेचे असते. एखादी व्यक्ती आवडणं आणि तिच्यावर आपण प्रेम करणं हे नुसतं व्यक्त जरी केलं तरी त्यातून मिळणाऱ्या तृप्ततेतून जीवन व्यतित करता येते. मानवी जीवनातील सर्व भावभावनांचे नेमके अर्थ जाणून घेण्यासाठी साहित्य पदोपदी उपयोगी पडते, आपण ठरवायचे आहे की काय वाचायचे आहे. हे जर आपल्याला कळले नाही तर संसाराच्या भवसागरात आपण वाचत नाही, षडरिपूंच्या कल्लोळात आपण बुडून जाऊ. जगभरातल्या कोणत्याही देशातील कोणत्याही धर्माच्या, वयाच्या, लिंगाच्या, वर्णाच्या लेखकाचे कोणत्याही भाषेतले साहित्य हे याच जीवनतत्वाचे दार्शनिक आहे....

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment