सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

महाकवी सावरकर


१३ जुलै १६६० च्या रात्री सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी शिवाजीराजे बाजीप्रभू, बाजींचे बंधू फुलाजीप्रभू आणि सहाशे मावळयांच्या साथीने बाहेर पडले. वीर शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान बाजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून व्यर्थ जाऊ दिले नाही. आपल्या रक्ताने बाजींनी घोडखिंड पावन केली आणि आपल्या राजाला या संकटातून बाहेर काढताना स्वतःचे प्राण त्यागीले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला ३७० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या ऐतिहासिक घटनेवर लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. आजही हा पोवाडा नुसता वाचला तरी मनगटे आवळतात, मुठी वळतात, धमन्यातले रक्त सळसळून उठते, छाती फुलून येते. स्फुल्लिंग पेटून उठतात.

स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥
पोवाड्याच्या सुरुवातीस त्यांनी चितोडच्या बुरुजास, राणाप्रतापच्या पराक्रमास, तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडास, जरिपटका तोलणारे धनाजी संताजीस, दिल्लीच्या तख्ताची शकले उधळत येणारे सदाशिवराव भाऊस, स्वतंत्रतेच्या रणात मरण पत्करून चिरंजीव झालेले सारे चिरंजीव हुतात्म्यास, सर्व राष्ट्रवीरांस सप्रेम आवतण दिले आहे. या साऱ्यांना येण्याचे आवाहन करून पोवाड्याची सुरुवात होताच अंगावर रोमांच फुलतात. धुळीचे लोट उठावेत इतक्या सहजतेने पण अवचितच दीन दीनचे शब्द घुमू लागले, लगट करून सिद्दीने पन्हाळ्याचा वेढा चिवटतेने लावून धरला. स्वतंत्रतेचे काळीज असणारे शिवराणा गडात अडकून पडले. आपल्या बापाचा अफझलखानाचा वध डोक्यात ठेवून फाजल शिवशंभूला जिवंत धरण्यासाठी येतो खरा. पण सावरकर लिहितात - 'बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे । जाशि त्याकडे । जीवंत धरुं तरि साचा । जीवंत पवन धरण्याचा । अभ्यास आधिं कर याचा ।'

पुढे ते म्हणतात - फाजल खानाचे धाडस म्हणजे हरिणाने वणव्याला धरण्यासारखे आहे. स्वातंत्र्यसंगरावर हल्ला करायला आलेल्या या शत्रूवर घाला घातला पाहिजे असं बाजींनी राजांना सांगितले. हाती भाला घेऊन एक मावळा गडाखाली आला. खरे तर त्या मावळ्याने जेंव्हा सिद्दीला पाहिले होते तेंव्हा त्याचा हात आधी त्याच्या कमरेला लटकत असणाऱ्या तलवारीकडेच गेला होता. मात्र आपली इच्छा दाबून त्याने सिद्दीला मुजरा केला आणी तो त्याला वदला - 'शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला । उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥'

महाराजांनी पाठवलेला हा शरणागतीचा निरोप ऐकून सिद्दीची छाती फुगून आली. मराठे अखेर शिकस्तीस कबूल झाले. आता काय आनंदोत्सव साजरा करायचा. - 'हुए शिकस्त मराठे आजी । फिर लढना क्यौंकर आजी । चलो शराब उडायें ताजी । आप लेवजी, नहीं आप लेवजी । आप गाजि आप तो रणगाजी ।' राजांच्या निरोपामुळे सगळा वेढा ढिला पडला. जो तो आनंदात मश्गुल झाला. खरे तर राजांनी हा कालसर्प झिंगवून त्यात अशी काही हवा भरली की त्याला आपल्या गारुडावर नाचवले. रात्रीचा प्रहर उलटल्यावर शिवाजी राजांनी मराठ्याची खरी जादू दाखवायला सुरुवात केली. त्याचं अगदी देखणं वर्णन सावरकरांनी केलं आहे. -
'कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।'

या पंक्तीनंतर सावरकरांनी तत्कालीन ब्रम्हवृंदाने बाजीप्रभू आणि शिवाजीराजांवर लावलेल्या आरोपांचा 'अब्रम्हण्यम'चा खरपूस समाचार घेतला आहे. सिद्दीच्या हाती तुरी देऊन महाराज आणि त्यांचे विश्वासू पराक्रमी सहकारी तिथून निसटले, पण त्या साठी त्यांना सिद्धीस खोटे सांगावे लागले. याचे समर्थन करताना सावरकर गीतेतला दाखला देतात. - 'ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् । तथैव; श्रीमान् । भारतीं कृष्ण वदला हें । अधमासि अधम या न्यायें । रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।' बाजींवर राळ उडवणाऱ्या ब्राम्हणांची ते 'भाबडीं भोळिं भटें वदतीं' अशा शब्दात खिल्ली उडवतात. 'अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो । आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥ साप विखारी देश-जननिला ये घ्याया चावा । अवचित गांठुनि भुलवुनि ठकवुनी कसाही ठेचावा ॥'अशा शेलक्या शब्दात सावरकरांनी राजांच्या या कृतीचे समर्थन केले आहे.

राजे किल्ल्याहून निसटले खरे, आपण मात्र फसवलो गेलो हे ध्यानात येता क्षणीच सिद्दी जोहरने सिद्दी मसूदच्या नेतृत्वाखाली एक मोठी फौज राजांच्या मागावर पाठवली. बाजींनी हे ताडले होते की यवनांची फौज आपला पाठलाग करत येणारच, तेंव्हा आपण काय करायचे हे देखील त्यांनी मनात निश्चित केले होते. बाजींनी आपल्या मनातील विचार राजांच्या कानी घातला -
'हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।'

आपल्या प्राणाची बाजी लावत बाजींनी शिवाजीराजांना आपल्या विनवणीतून आपलं म्हणणं ऐकून घ्यायला राजी केलं. सावरकरांनी याचे भावूक वर्णन केले आहे. “शिवबा तुम्हीच वसुदेव आहात, स्वातंत्र्याचे श्रीकृष्णही तुम्हाला गडावर न्यायचे आहेत, या कपटी कंसास तुम्हीच मारायचे आहे ! मग हि स्वातंत्र्याची कृष्ण चिन्मूर्ती आपल्या गडावरील गोकुळात आनंदात नांदेल.” शिवाजी राजे पुढे विशाळगडाकडे रवाना झाले. त्या काळरात्री बाजी आपल्या भावासह फुलाजीसह, मावळ्यांचे मनोधैर्य उंचावत घोडखिंडीत सज्ज होऊन थांबले. अखेर 'दीन,दीन'ची घोषणा करत शत्रू तिथे दाखल झाला. गनीम खिंडीत दाखल होताच सावजाची वाट बघत असणाऱ्या शिकाऱ्यासारखे मराठे चवताळून उठले. शत्रूची संख्या दुप्पट असूनही मराठे आपल्या पराक्रमाची शर्थ करत होते. हरहरचा जयघोष होत होता. तलवारीच्या खणखणाटास उसंत नव्हती अन मधूनच सणासण बाणही चालत होते. सावरकर म्हणतात - 'मारण मरणावीण नेणती, वीर रणीं रंगती।'
मराठ्यांनी निकराचा वीरश्रीने भारलेला हल्ला चढवीत म्लेंच्छ गनीम खिंडीपार नेला. संख्येने दुप्पट असूनही शत्रू मागे हटला. मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. बाजींच्या हातात अखंडित तलवार चालत होती तरी त्यांचे सारे लक्ष राजांच्या गडाकडे पोहोचण्याकडे होते. 'राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा' जोवर गडावर पोहोचत नाही तोवर खिंड आपण लढवू हा त्यांचा निर्धार होता. त्यांना वाटायचे की, 'जरी या समरांगणात आपल्याला मरण आले तरी आपण लगेच पुनर्जन्म घ्यावा आणि ह्या राजासाठी इथंच आपला जीव द्यावा !!'

मागे हटलेल्या गनिमांनी जिद्दीने पुन्हा मोठा हल्ला केला. 'दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला । भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥' आता दोन्हीही पक्षाकडून एकमेकावर चढाया सुरु झाल्या होत्या. जणू काही ते योद्धे त्या समरभाजनीं वीररसाची लयलुट करत होते. यवनांचा मोठा हल्ला पाहून मराठे जरा कचरले, पण बाजी पुढे आले आणि त्यांनी तो हल्ला स्वतः पेलला. उन्मत्त म्लेंच्छाच्या मस्तकाचा जणू बाजींनी चेंडू करून टाकला होता. बाजींच्या अतुलनीय शौर्याच्या बळावर हा हल्ला देखील परतून लावला. 'डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।'

'जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥' अशी मराठ्यांची अवस्था झाली होती, बाजीप्रभूंच्या सर्वांगावर जखमा झाल्या होत्या. त्यांचे गात्र थकले होते, तरीही सारे लक्ष विशाळगडाकडून येणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे लागून राहिले होते. सारे वीर सचिंत होऊन आपले प्राण कानात आणून त्या आवाजाची प्रतिक्षा करत होते. आणि तशात नवी कुमक घेऊन फाजलखान खासा हल्ला करता झाला. ते पाहुनी बाजींनी पुन्हा उसळी मारली अन पुन्हा त्या खिंडीत त्यांचे रक्त सांडू लागले. इतक्यात एका तोफेचा गोळा सूंसूं आवाज करत बाजींच्या वर्मी बसला. बाजी विव्हळ होऊन खाली पडले, पण पडताचक्षणी उठले आणि बेहोशीच्या अवस्थेला आलेला हा वीर वदला - 'तोफे आधीं न मरे बाजी, सांगा मृत्यूला ।'

या एका वाक्याने अंगावर काटा येतो, वज्रमुठ वळते आणि रक्त उसळू लागते. अंगावरच्या जखमांची पर्वा न करता, 'मी जखमी नाहीच, मी थोडा तृषाक्रांत झालोय' असं बाजी मावळ्यांना सांगतात. 'मी तर रिपुरक्त घटाघटा पितो, माझ्या धरणीमातेस थोडी जरी जखम झाली तरी मी हंबरडा फोडेन, आपण आपल्या शत्रूची आतडी ओढून त्याची पट्टी करून बांधायला पाहिजे.' बाजींचं असं जोशपूर्ण सावरकर करतात. 'माझी पर्वा करू नका, मला जसे आलो तसेच सोडा, पण तुम्ही मात्र आपली वीरत्वाची भूक शमवण्यासाठी शत्रूची नरडी फोडा' असं ओजस्वी वर्णन पुढे केले आहे.

'शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥ लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।' असं सांगणारे बाजी या खिंडीची तसूभर भूमी देखील लढवण्यास अजूनही प्रोत्साहित करतात. तोफेच्या आवाजाआधी न मरण्यासाठी मावळ्यांना ते वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे यांची शपथ घालतात. असं म्हणत म्हणत ते अखेर धरणीवर कोसळतात, आणि इतक्यात तोफेचे बार उडतात. तो आवाज ऐकून सर्वांग रक्ताने माखलेल्या बाजींचा चेहरा खुलतो. अखेर बाजींचे प्राणपक्षी उडून जातात.

पोवाड्याच्या शेवटच्या चरणात सावरकरांनी आताच्या परिस्थितीलाही लागू होईल असा प्रहार केला आहे. ते म्हणतात की, 'बाजींसारख्या अनेकांचे रक्त त्या खिंडीत पेरले गेले अन रायगडावर त्यामुळे स्वराज्याचा भला थोरला वृक्ष आकारास आला. आपले पूर्वज असे पराक्रमी (रणगाजी) होते, त्यांना आपण (आजचे लोक) वंशज म्हणून शोभतो का ? माझ्या या प्रश्नातील अर्थाला तुम्ही समजवून घ्यावे अशी विनायक म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे. कारण स्वदेश आणि स्वराज्य नसेल तर या देहाचा धिक्कारच असायला पाहिजे!

स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
पोवाडयाच्या अखेरीस सावरकरांनी विचारलेला हा प्रश्न संवेदनशील मनाला बेचैन करून सोडतो. या पोवाडयाला शंभराहून अधिक वर्षे होऊन गेलीत, आता परिस्थिती आणखी बिकट झालीय. त्याला कारणीभूत बोटचेपे राजकारणी अन बोथट विचारसरणीचे लोक आहेत. त्याकरिता या पोवाड्याचे आयुष्यात एकदा तरी पारायण व्हायला पाहिजे म्हणजे मनातील सुप्तावस्थेत असणारा स्वराज्याचा एल्गार पुन्हा जागृत होईल.

सावरकरांच्या काव्य रचनेत ९० कविता, आर्या, आरत्या, फटके, पोवाडे, लावणी, भावगीते, नाट्यगीते अशा असंख्य काव्य प्रकारांचा समावेश आहे. सागरास (ने मजसी ने), स्वतंत्रतेचे स्तोत्र (जयोस्तुते) या प्रसिद्ध कवितांबरोबर वयाच्या केवळ ११ व्या वर्षी लिहिलेला सवाई माधवरावांचा रंग हा फटका, तानाजी/ बाजीप्रभू यांचे पोवाडे, चाफेकरांचा फटका यासह बंदी जीवनावर आधारित कविता तसेच वहिनीचे सात्वन, माझे मृत्युपत्र, अनादी मी अनंत मी या जीवन तत्वज्ञानावर आधारित रचना आहेत. हिंदू एकता गीत, ध्वजगीत, शस्त्रगीत आदी गीतेही यात आहेत.

सावरकरांचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. दिक्कालाला भेदून भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी, आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारीत कादंब-यांचा लेखक, रक्ताच्या शाईत विद्युलतेच्या लेखणीने लिहीणारा व उज्ज्वल भूतकाल व श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान घेऊन राष्टभक्तीचा स्फुल्लिंग चेतविणारा ग्रंथकार, अतीत कालातील घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखविणारा द्रष्टा इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. जी सावरकरांची प्रतिभा अग्निकण उधळते तीच काव्यपुष्पेही उधळते. मराठीत वीररस प्रकर्षाने आणण्याचे श्रेय सावरकरांना जाते. सावरकरांचे भावोत्कट साहित्य प्रत्यक्ष अनुभूतीतून साकारलेले आहे. सावरकरांनी ज्या ज्या वेळी कृतीसाठी पाऊल टाकले, त्यांच्या बंडखोर मनात ज्या संवेदना उमटल्या, त्यांच्या कविमनाचे जे जे सौंदर्यग्रहण केले, त्या सर्व गोष्टी त्यांच्या साहित्यातून जगापुढे मांडल्या.

सावरकरांचे पहिले काव्यलेखन म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका होय. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी । शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. निबंधकार सावरकर हे तर्ककठोर, घणाघाती, अभ्यासपूर्ण, पल्लेदार शैलीमुळे अजरामर आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत. 'उत्तरक्रिया', 'सन्यस्त खङग', 'उःशाप' या त्यांच्या नाटकांत नाट्याचे व तेजस्वितेचे रंग लीलेने मिसळून गेले आहेत. ही नाटके एखाद्या चढाईखोर व्याधासारखी वाटतात. 'काळेपाणी', व 'मला काय त्याचे' या त्यांच्या कादंब-यांतून त्यांनी आत्मानुभव सांगणारे व उपदेशात्मक आहेत. सावरकरांच्या गोष्टी व समाजचित्रे हे त्यांचे कथासंग्रह वाचनीय आहेत. त्यांचे अनेक स्फूट लेख आणि पत्रके तत्कालीन समाजचित्रण करतात.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर', 'हिंदुपदपातशाही' व 'सहा सोनेरी पाने' हे त्यांचे इतिहासविषयक ग्रंथ. त्यांचा 'शिखांचा इतिहास' अप्रकाशित राहिला. विषयाचा व्यासंग, स्वतंत्र दृष्टीकोन, विश्लेषक बुद्धी, डोळस स्वाभिमान आणि वस्तुनिष्ठ, साधार व स्फूर्तीदायक विवेचन ही त्यांच्या इतिहास ग्रंथांची वैशिष्ट्ये. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. सावरकरांनी लिहिलेली 'जयोस्तुते..' ही कविता माहिती नाही असं म्हणणारा मराठी माणूस सापडणार नाही इतकी गोडी त्या कवितेत आहे. शिवाजी राजांवर लिहिलेले 'हे हिंदूशक्ती संभूत दिप्ततम तेजा' हे काव्य आजही अंगावर रोमांच आणते, या गीताने ऊर अभिमानाने फुलून येतो.
'सागरा, प्राण तळमळला..' हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं !



घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस. अप्रतिम आशयाचे हे काव्य गाताना डोळ्यातून धारा कधी लागतात ते उमगत नाही..
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी

तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी

पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती

तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा

राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.

मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच ! (साभार - स्वरूपयोग)

...........................................................................................................................................

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नीा येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
मार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.
१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.
मराठी साहित्यसंपदेत आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अढळस्थान मिळवणाऱ्या या दृष्ट्या कवीच्या उत्तुंग अभिजात प्रतिभाशक्तीचे आणि त्यांनी केलेल्या अथक संघर्षाचे मराठी मनास नेहमीच गारुड राहील.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा