शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

शब्दसूर्य - नारायण सुर्वे !


‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती.’ फुटपाथवरच्या खुल्या आकाशाखाली जगाच्या खुल्या विद्यापीठात शिकलेल्या नारायण सुर्वेंनी झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. मागे वळून पाहताना त्याच आयुष्यावर, 'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे' असं रसरशीत भाष्यही केले.
नदी आणि ऋषी यांचे कुळ आणि मूळ शोधू नये असे म्हटले जाते. नारायण सुर्वे हे लाक्षणिक अर्थाने आणि आशयघन निर्मितीच्या दृष्टीने मराठी साहित्यातले कबीर होते असं म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीमध्ये एका कापडगिरणीसमोर गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने रस्त्यावरील एक अनाथ जीवास उचलून घरात आणले. त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अश्राप जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले.

सुर्वे दांपत्याने या जीवाला नुसते प्रेमच नव्हे तर आपले नावही त्याला दिले. तोच हा नारायण ! नारायण गंगाराम सुर्वे ! मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान संघर्षमय वाटचालीतून निर्माण करणारे आणि आशयाच्या नव्या वाटा चोखाळणारे सुर्वे मास्तर !! अक्षरवाटेवरील पांथस्थासाठी अंधाऱ्या भवतालात आपल्या आयुष्याचा दिवा करून उभे राहिलेल्या सुर्व्यांच्या आयुष्याची सुरुवातच नाट्यमय आणि संघर्षमय अशी होती. ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ या निर्भीड वृत्तीने तब्बल सहा दशके सुर्व्यांनी मराठी सारस्वताच्या दरबारात शब्दरूपी तळपती तलवार परजत ठेवली.

सुर्वेंचे वडील गंगाराम सुर्वे मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये स्पिनिंग खात्यात साचेवाला म्हणून कामास होते व आई काशीबाई ह्या देखील कमला मिलमध्ये बाईंडिंग खात्यात होत्या. दैन्य, जगण्याचा संघर्ष आणि अविरत कष्ट यातून त्यांचे आयुष्य तावून सुलाखून निघालेले. सुर्वे दांपत्याने आपले स्वतःचे आयुष्य दारिद्र्यात बुडालेले असूनही आपल्या जीवनातला आनंद नारायणाच्या रूपातून फुलवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्याच्यासाठी घासातला घास काढून ठेवला. शिक्षणावाचून आपली आबाळ झाली तशी त्याची दैना होऊ नये म्हणून त्याच्या शिक्षणाची सोय पोटाला चिमटा घेऊन केली. नारायणाला अक्षरओळख व्हावी, लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम येथे मराठी महापालिका शाळेत घातले. नारायण सुर्वे १९३६मध्ये चौथी उत्तीर्ण झाले तेंव्हाच गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते वैभववाडीत गावी निघून आले.

ज्या सुर्वे दांपत्याने त्यांना नाव दिले त्यांच्यासोबतचा प्रवास इथे थबकला. गंगाराम सुर्वेनी निवृत्तीनंतर गावी जाताना नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले. तेव्हढेच पैसे गाठीला आणि मुंबईचा विशाल सागर साथीला अशा स्थितीत भाकरीचा चंद्र मिळविण्यासाठी ते एका सिंधी कुटुंबात घरगडी म्हणून कामास लागले. कधी घरगडी तर कधी हॉटेलात कपबशा विसळणारा पो-या, कुणाचे कुत्रे तर कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणा-या पोरगा अशी कामे करत ते वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑईल मिलमध्ये हमालाचे काम केले. कापड गिरणीत धागा धरला, बॉबीन भरली. पुढे जाऊन मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. १९५७मध्ये ते व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झाले. १९५९मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकाची सनद मिळविली आणि १९६१मध्ये ते शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नं. एकच्या शाळेत त्यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. त्या दिवसापासून ते गिरणगावचे ‘सुर्वे मास्तर’ झाले. इथून त्यांची काव्यप्रतिभा बहरु लागली, लाक्षणिक दृष्ट्या हा सुर्व्यांमधील कवीचा प्रारंभ होता.

साठोत्तरी काळात निर्माण झालेल्या वेगळ्या वर्गाची भाषा बोलणारा कवी अशी ज्यांची ख्याती आहे, असे सुर्वे मास्तर म्हणजे सामाजिक बांधिलकीची भूमिका आपल्या कवितांमधून सातत्याने मांडणारा महाकवी. वैश्विक जाणिवांचा थेट उद्गार मांडताना साध्या- सोप्या, सरळ शब्दांची रचना ही त्यांची खासियत होती. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘सनद’, ‘नव्या माणसाचे आगमन’ या काव्यसंग्रहातून सुर्व्यांची खास शैली नजरेत भरते.

माणसाइतका सृजनात्मा कुठे भेटलाच नाही असं सांगतानाच आयुष्याची धग शोध घेतल्याविना आपसूक कशी भेटत गेली हे त्यांनी आपल्या काव्यात प्रसवले. १९६२मध्ये त्यांचा ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. सुर्व्यांच्या कवितेला दृकश्राव्यतेच्या जोडीला सजीवत्वाचं वरदान लाभलंय. पोटाची खळगी भरण्यासाठी सहय़ाद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, हणम्या, नालबंदवाला याकूब, इसल्या, चंद्रा नायकीण, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्याव, दाऊद शिगवाला, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. कवी सुरेश भट यांच्या गझलगंधित भाषेत सांगायचं झालं तर “माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सुर्य मी; माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !” या पंक्ती सुर्वे अक्षरशः जगले. समाजाच्या सर्व स्तरातून ते झिरपत गेले, त्यातल्या विविध टप्प्यांवरल्या भावना जगले आणि याच भावभावनांचे चित्र शब्दकुंचल्यातून त्यांनी चितारले.


गिरणी कामगार दांपत्याने सुर्व्यांना आपली ओळख, नाव – नाते दिल्याने त्या दांपत्याच्या वेदना आपसूक त्यांच्या काव्यविषयात व्यक्त झाल्या. बालपणापासून सभोवतालच्या कामगारांच्या जगात वाढल्याने सुर्व्यांच्या साहित्यात या कष्टकरीजगाचे विविध संदर्भ जागोजागी आपले अस्तित्व ठळकपणे जाणवून देतात. कामगारांचे दैन्य, व्यथा त्यात पाझरतात. अंधारवाटांच्या जाळ्यात राहूनही प्रकाशाचा पांथस्थ होण्याचे सामर्थ्य सुर्व्यांच्या कवितेत कोठून आले, खडतर प्रवासात त्यांचे मार्गदर्शक कोण होते या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या ‘कार्ल मार्क्स्’, ‘जाहिरनामा’ या कवितांतून मिळतात.

प्रत्येक कवीच्या लेखणीतून एक तरी अशी कविता प्रसवते की त्या कवितेद्वारे त्याचे नाव जगभर पोहोचते आणि ती कविता हीच त्या कवीची ओळख होऊन जाते. मातीचं आणि भूमीपुत्राचं कवन असणारी डोंगरी शेताची कविता साहित्यिक विश्वात नारायण सुर्वे यांचा ठसा उमटवणारी रचना ठरली.
‘डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती
आलं वरीस राबून मी मरावं कि ती
कवळाचे भारे बाई ग घेऊनी चढावं किती
आडाचं पाणी बाई गं पाणी वडाव किती
घरात तान्हा माझा गं तान्हा रडलं किती
तान्हय़ाचं रडं ऐकून पान्हा येईल किती.’
१९५८ मध्ये नवयुग मासिकात प्रसिद्ध झालेल्या या कवितेचे रुपांतर नंतर गीतात झाले, एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली, त्यामुळे सुर्व्यांची कविता घरोघरी पोहोचली. मानवी मनाचा अचूक कानोसा घेणाऱ्या अनेक कविता पुढे सुर्व्यांनी लिहिल्या आणि त्यांचे नाव कालातीत झाले.

रोजच्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात, अनेक सत्यं उलगडतात ; या भीषण वास्तवापुढे पुस्तकी ज्ञान कुचकामी ठरते. यातून सावरून घेणारी देखील माणसेच असतात हे सत्य देखील ते समोर मांडतात. तेही अगदी साधेपणाने कोणतीही शब्दसजावट न करता !
'किती वाचलेत चेहरे
किती किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे ‘सत्य’ एक अनुभव
बाकी हजार ग्रंथराज कोलमडून पडतात,
आणि शेवटी जीवनाचा मूलभूत अर्थ सांगतात
तरी का कोण जाणे!….
माणसाइतका सृजनात्मा
मला भेटलाच नाही.'

आपल्याकडे एक म्हण आहे काखेत कळसा अन गावाला वळसा ! या म्हणीचा प्रत्यय देणारे, समीक्षकांच्या कोतेपणावर भाष्य करणारे एक वक्तव्य एका गप्पाष्टकात पु.लं.नी केलं होतं ; त्यातला चर्चेचा विषय होता आधुनिक विचाराच्या नवकवींचा. समीक्षक अनेकांची नावे घेत होते पण काही विशिष्ट नावे गाळत होते. उपस्थित असलेल्या पु.लं.नी चाणाक्षतेने हे ताडले. ते उत्तरले, "अरे, केशवसुत कशाला शोधताय ? तुमचा केशवसुत परळमध्येच राहतोय. नारायणच त्याचेही नाव !" ते नारायण म्हणजे कवी नारायण सुर्वे !
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांचे काव्यवाचन झाले तेंव्हा महिलांच्या गर्दीची एक झुंडच त्यांना भेटायला आली. सा-या जणी डोळय़ाला पदर लावून रडत होत्या नि म्हणत होत्या,
‘मास्तर, कसं कळलं वो आमचं दु:ख तुम्हाला?’.
त्यावर सुर्वे म्हणतात त्या बायकांचं ते बोलणं म्हणजेच कवितेला मिळलेली उत्स्फूर्त दाद होत'.
याचं कारणही त्यांच्या कवितेत दडले आहे, त्यांच्या कवितेत आढळणाऱ्या स्त्रिया ह्या नेहमीच पोक्त आणि प्रौढ राहिल्या आहेत. यामागची पार्श्वभूमी देखील अगदी खुलेपणाने सुर्वे म्हणतात, "माझे काव्यलेखनच मुळी पस्तीशीनंतर सुरू झाले. तोपर्यंत न्हाणीतले उमाळे आणि उसासे सरून गेले होते." आपल्या काव्यविषयाची इतकी स्पष्टता क्वचितच कवी जनतेपुढे आणतात. पण सुर्वे याला अपवाद होते. शिवाय ते ज्या कामगार चळवळीत कार्यरत होते तिथे देखील भाकरीचा चंद्र शोधत आलेल्या महिला होत्या, या महिलाच बाह्यजगातून थेट कवितेत अवतरल्या.

'मंग बापाच्या जागी माजं नाव लिवून कसं चालंल, बाप न्हाई म्हनलं तर पोराचं कसं जमंल...' असं म्हणत म्हणत 'तुमचंच नाव लिवा मास्तर’ म्हणणारी एखादी वेश्या जेव्हा जाणिवांच्या किनाऱ्यावर येऊन थडकते तेंव्हा तिचे दाहक अनुभवविश्व अधिक संपृक्त वाटते. तिचे जगणे बेगडी न वाटता वास्तवाशी नाते सांगणारे वाटते, तिच्या जगण्यात ते स्वतःचा अर्थ धुंडाळतात. खरे तर या कवितेतील वेश्या मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी आलेली असते. वेश्या असली तरी ती एक आई आहे. जे जीवन, भोग आपल्या वाटयाला आले ते आपल्या पोराच्या वाटेला येवू नये ही तिची अपेक्षा. तिची आर्त वेदना आणि कोमल वात्सल्य हेलावून टाकणारे आहे. तिचे दुःख व्यक्त करताना ते शब्दांचा अतिरेक करत नाहीत.

सुर्वे मास्तरांचे सारे आयुष्य गिरणगावात गेले. या गिरणगावानेच 'जगावं कस' हे त्यांना शिकवले. मिलमध्ये काम करत असताना युनियनच्या ऑफिसमध्ये झाडूवाल्याचं काम त्यांना मिळालं होतं. त्यांच्या रहाण्याची सोयही तेथेच केली होती. स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात गिरणी कामगारही आपल्या मागण्यांसाठी कॉ. श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होते. सुर्वे मास्तरांच्या भवताली साम्यवादाचेच वातावरण होते. कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाची गोडी याच काळात त्यांना लागली. या साम्यवादानेच त्यांच्या विचारांना एक निश्चित दिशा दिली. या गिरणगावातच त्यांना कार्ल मार्क्स भेटला. पुढे जाऊन सुर्वे कम्युनिस्ट चळवळीत "रेड गार्ड" म्हणून काम करू लागले. कामगार विश्वात एल्गार पुकारणारे सुर्वे साहिजकच कम्युनिस्ट चळवळीशी रुळले, त्यातच त्यांना जीवनसाथी मिळाला. कम्युनिस्ट चळवळीतील एक कार्यकर्ते कॉ. तळेकर यांच्या भाचीच्या ते प्रेमात पडले. आई-बापा पाठी मामाजवळ वाढलेल्या पोरक्या कृष्णा साळुंकेशी त्यांनी १९४८मध्ये विवाह केला. लग्नामुळे त्यांच्या आयुष्यातील कष्टांनी आता नवे वळण घेतले होते. उमेदवारीचे दिवसही अजून चालूच होते. खारजवळ एका झोपडपट्टीत सुर्व्यांनी आपला नवदांपत्याचा संसार थाटला. संसार वेलीवर कळी उमलली, त्यांना मुलगा झाला. हा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. ओल्या बाळंतिणीसह त्यांचा संसार आठ दिवस तिथेच फुटपाथवर होता. तिथून ते अधिक फिरस्ते झाले, झोपड्या बदलत राहिले. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन जगत राहिले. त्यांच्या पत्नी कृष्णाबाईंनी जानेवारी १९८४च्या किर्लोस्कर मासिकात लिहिलेले आत्मकथन म्हणजे भकास दिशांच्या थकलेल्या दूतांचे रुदन आहे.

सुर्वे साहित्य अकादमीवर मराठीचे मुख्य प्रतिनिधी झाले, पुढे परभणीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. या संमेलनाच्या मुख्य मंडपात तुफान गर्दी जमली होती. समोर जमलेला अफाट श्रोतृवर्ग बघून सुर्वे गहिवरून गेले. त्यावेळी ते बोलले,
"बघितलास ना रे बाबा हा प्रेमाचा गोतावळा
नुसत्या कवितेने जोडलेली ही माणसं बाबा
कविता कवीला कुठवर घेऊ न जाते बघा!
माझ्या कवितेचे हे पांग मी कसे फेडू बाबा!"

सुर्व्यांनी सामान्य माणसाच्या, कामगाराच्या लढ्याला आपला मंच बहाल केला. त्यांना भेटलेला कार्ल मार्क्स त्यांनी आपल्या शैलीत मांडला. केशवसुत आणि मर्ढेकर यांच्यानंतर आधुनिक कवितेत वेगळे परिवर्तन घडवताना त्यांनी कवितेतील आजवरचे दुर्लक्षित आशय आपलेसे केले. न अनुभवलेल्या व्यथा केवळ वाचूनच त्याची प्रचीती यावी अशा मूर्तिमंत देखण्या पद्धतीने ते सहजतेने काव्य करत गेले. यामुळे त्यांची कविता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये वाखाणली गेली.

मध्य प्रदेश सरकारचा १९९९चा कबीर पुरस्कार नारायण सुर्वेंना जाहीर झाला त्याप्रसंगी सुर्वेंचं मनोगत खूप काही सांगून गेलं. "कर्तबगारीत कबीर माझ्यापेक्षा हजार पटीने मोठा आहे. पण जीवनाच्या बाबतीत आमच्यात बरेच साम्य आहे, त्याला त्याच्या आईने नदीकाठी आणि मला माझ्या आईने समुद्रकाठी घेऊन जगणा-या मुंबईच्या फुटपाथवर. कबिराला सांभाळणारा विणकर होता आणि मला सांभाळणाराही कापडाशीच संबंध असलेला गिरणी कामगार होता. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला लागलो. त्यालाही त्याची जात सांगता आली नाही आणि मलाही."
आपल्या आयुष्याचा पट इतक्या मार्मिक पद्धतीने ते लोकांपुढे आणत. त्यात लपवाछपवी नसे. जन्माचं नाते हरवलेले सुर्वे त्यांच्या सांभाळ करणाऱ्या आई काशीबाईच्या मृत्यूने हळवे झाले.
त्यावर त्यांनी काव्य केले - ‘आधीच नव्हते काही, आईदेखील नाही..."
सुर्व्यांच्या कवितेतून सदैव जाणवणारे सुबोध लक्षण या कवितेत जास्त प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे त्यांच्या कविताना ते प्रबोधनिय वा प्रचारकी बाज येऊ देत नाहीत, तिला सर्वसामान्यांना भावणारी स्नेहसुलभता ते प्राप्त करून देतात.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू’ या दिव्यपंक्ती लिहिणा-या संत तुकारामांच्या नावाने आणि आजच्या दु:खाच्या नावाने जाहीरनामा मांडण्याचा काव्यमय प्रयत्न' अशी स्वतःच्या कवितेची चिकित्सा सुर्वे करतात.
'प्रत्येक कलाकृती ही त्या युगाची भूमिकाच आहे. कवी कोणत्या वर्गाचा आहे, हा भाग गौण आहे. कविता कशी आहे, तिच्यात अभिजात गुण आहेत वा नाहीत, हा विचार प्रथम लक्षात ठेवायला हवा.' अशी पुस्तीही ते जोडतात.

'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे,
सावध असा तुफानाची हीच खरी सुरुवात आहे.'
वेदनेची अशी जोरकस, प्रवाही मांडणी करून ते जगण्याची लढाई व्यापक करतात. इतरांनाही त्यात सहज सामील करून घेतात.

‘मनीऑर्डर’ या कवितेत त्यांनी स्त्री मधील आईचे दुःख तरलतेने मांडले आहे. तिच्या रोजच्या जीवनातल्या स्वप्नांच्या आकांक्षा शब्दबद्ध करताना त्यांना प्रतिमांचा टेकू घ्यावा लागत नाही. पण तिच्या व्यथा काळजाला भिडाव्यात असं नेटकं प्रकटन ते करतात.
'बाक्या पाटिवल्यात इष्णुकडं
आन धा कमी पन्नास रुपयाबी
त्येच गंगीला याक पुस्तक घ्या
नाम्याला चड्डी
रोजचं धा पैसं द्या
म्हंजी पळल पोरगं साळला
दोघास्नी मुका बी लिवा...'

सुर्वेंच्या 'तुझे गरम ओठ' या कवितेत त्यांच्या तरुणपणाची चित्तरकथा आहे. बारा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या नारायणाचे लग्न होते. नव्या दाम्पत्याची नवी देहनवलाई विलक्षण असते. त्यात रात्रदिवस कसे सरतात भान राहत नाही. एका खोलीच्या घरात राहणारा नारायण पत्नीसोबत रत होऊ लागतो तेंव्हा त्याची आई नारायणाच्या लहान्या भावंडांसह घराचा कोनाडा जवळ करते. पोराचं आता रोज रात्रीचं धुमशान होत राहणार आणि आपण निर्वासित होणार याचा बापाला संतापही येतो आणि तो अगतिकही होतो. त्यामुळे रात्र होताच बाप धुमसत, बिछान्यासह घराबाहेर निघतो. फुटपाथ गाठतो.
रात्र शृंगारात दंग असली तरी पलीकडे खडखडणारे कारखाने, खुराडेवजा खोल्याखोल्यांतुन अंथरले जाणारे जीर्ण बिछाने, रात्र गोठत जाताना जारी असलेला मुल्लाचा अखेरचा अल्लासाठी गजर, सराईत खिसेकापूगत काटे ओलांडीत चालले प्रहर यांचे उल्लेख कवितेत येतात. त्या घुम्या रात्री नारायणास तिचे तलम ओठ अधिकच गरम वाटतात.
काळ पुढे जात राहतो. त्या दोघांचं नातं घट्ट होऊ लागतं. दिवसभराचा शीण तो रात्री तिच्या खांद्यावर टाकू लागतो. ते दोघे अंतर्बाह्य तटतटत राहतात. एकजीव होत जातात. सुर्वे लिहितात, "त्या रात्री तुझे ओठ खडीसाखर होत गेले तेंव्हाही रात्र अशीच ओढाळ होती !"
निसर्ग आपलं दान त्यांच्या पारड्यात टाकतो. नारायणाच्या बायकोचे पाय जड होतात. तिचं गर्भारपण देहावर पुरतं खुलून येतं. चाळीत टाळकरी वीणेकरी येतात, तिचे डोहाळे साजरे होतात. ती खणानारळांनी वाकून जाते. दिवस सरतात आणि त्यांच्या अंगणात चिमुकली पावलं उमटतात. काळ आपल्या गतीने पुढे जात राहतो. त्याला काळाचं भान राहत नाही. तो त्याच्या गर्तेत घुमत राहतो.
कवितेच्या शेवटी सुर्वे काळजाला हात घालतात. तुझे गरम ओठ अधिकच पेटत गेले तेव्हा
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन असं सांगून वास्तवाच्या निखाऱ्याचं भान देतात.
सुर्वेंच्या या कवितेत अनेक रंग आहेत. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर याचे वेगवेगळे अर्थ सापडतात हे अधिक विशेष होय. शृंगार, दैन्य, कारुण्य एकत्र टिपता येत नाही मात्र सुर्वेंनी लीलया ते काम केलंय. त्यामुळे कवितेचा प्रभाव दीर्घकालीन टिकतो. सुर्वेंची शब्दांची निवड आणि त्यातून हवा असणारा अर्थ व्यक्त करवून घ्यायची खुबी अफलातून आहे.

'तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .
पलिकडे खड़खड़नारे कारखाने
खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने
मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र
काटे ओलांडित चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.
तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ
खपत होतो घरासाठीच .....
विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर
तुझ्या खांद्यावर ---
तटतटलीस उरी पोटी
तनु मोहरली गोमटी
एक कौतुक धडपडत आले ; घरभरले
हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी
वाकलीस खणानारळांनी .
तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन
पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन
कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .
'नारायणा' - गदगदला.
'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला .
' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा '
गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .
तीच्या ओठावर ओठ टेकवून
बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,
तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..'
आणखी एक बाब म्हणजे या कवितेतून कॉस्मोपॉलिटन शहराची काळीकुट्ट बाजू संवादी शैलीत ओघवत्या शब्दात समोर येते. एकाच समयी मानवी मनाचे भिन्न दृष्टीकोनातून केलेले मनोवेधक चित्रण बेचैन करून जाते.

रोज उठून पोटासाठी करावी लागणारी नित्याची लढाई जीवनाचा अविभाज्य अंग झालेली आहे हे स्वीकारताना ते आशावादी दृष्टीकोन ठेवतात. आपल्याच दुःखाचा मार्मिक उपहास पण बोचरा उपहास ते करतात,
"रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटकाबाहेर तर कधी फाटकाआत आहे.....

सुर्वे आपल्या आईच्या आठवणीत रमतात. ते लिहितात -
'त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही....'
काळजातून पापण्याआड तरळणाऱ्या आईच्या तरल आठवणी साध्या शब्दात सुर्व्यांनी मांडल्यात.
यावर त्यांनी अधिक खुलासेवर लिहिले आहे,
"माझी नाळ कापली जाऊन मी अलग झालो खरा,
परंतु कुणीतरी चटकन मला आपल्या स्तनाशी घेतले.
ही माझी दुसरी माय जन्मदात्रीपेक्षाही थोर आहे."

'दोन दिवस' या कवितेत आयुष्याचा हिशोबच त्यांनी मांडलाय. सर्वस्व असणारे निर्मिकाचे हात केवळ भाकरीच्या शोधात गहाण राहिले, ते कधी झुकले तर कधी मोडून पडले. कधी वेदनाच सोबती झाल्या पण समाजभान सजग ठेवले. त्यासाठी संघर्षाच्या भट्टीत आयुष्याचे पोलाद प्रदीप्त करावे लागले. हे सर्व करताना कितीएक ऋतू आले गेले काही कळाले नाही पण इतके नक्की आहे की अर्धी जिंदगी प्रतीक्षेत आणि राहिलेली दुःखात गेली. वेदनेचा टिळा भाकरीच्या भाळी लावून तिच्या शोधात हरवून गेलेले त्यांचे संवेदनशील मन कसे मारले गेले याची खंत ते नजाकतीने मांडतात.
'दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले.....
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।'

दांपत्य जीवनातील प्रेम भोगवादाच्या पलीकडे एका उत्तुंग प्रेमासक्ततेचं बिंब घेऊन जगत असतं, त्याला त्यागाची किनार असली की ते आर्त करुण वाटू लागतं. प्रेमाचं हे रूपडं दुःखद असलं तरी कमालीचं लोभस असतं हे कुणी नाकारू शकत नाही.
"जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा एक कर,
कढ आवर, नवे हिरवे चुडे भर,
उगीचाच चिर वेदनेच्या नांदी लागू नको !
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर..."
प्रेमाच्या नव्या आयामाचा अर्थ त्यांच्या कवितेत दिसतो.

'याकुब मेला दंग्यात, नव्हते नाते ; तरीही
माझ्या डोळयाचे पाणी खळले नाही
उचलले प्रेत तेव्हा मिलाद - कलमाच्या गजरात
मिसळल्याशिवाय राहिलो नाही.'
माणसाचा जात धर्म गौण मानून त्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्याकडे वैश्विक समतेच्या दृष्टीने ते पाहतात याचा प्रत्यय त्यांच्या कवितेत येतो.

सुर्वे आपल्या प्रकटनाविषयी कमालीचे प्रामाणिक आहेत. ते लिहितात - "'माझे विद्यापीठ' या कवितेचा शेवटचा अठरा ओळींचा बंध माझ्याकडून आधी रचला गेला. 'निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी' या अठरा ओळींच्या शेवटच्या ओळीतले शब्द 'कधी दोन घेत, कधी दोन देत' होते. खरे तर ही कविता इथेच संपत होती. मग तिची सुरुवात कुठे? मी चक्रावून गेलो. वर्षभर या कवितेभोवती मी घुमत राहिलो. पुन्हा पुन्हा वरील ओळींचे अर्थ व संदर्भ शोधत मी एकदाचा 'ना घर होते, ना गणगोत' या पहिल्या कडव्यातील पहिल्या ओळीच्या रचनेने सावरलो आणि कविता मनासारखी पूर्ण करून मोकळा झालो. त्यानंतर सहा महिने मी एकही ओळ लिहिली नाही इतका कातावून गेलो." काव्यनिर्मितीतली अशी प्रांजळ कबुली क्वचितच समोर मांडली जाते, ती सुर्व्यांनी तपशीलवार दिली आहे.

नारायण सुर्वे हे जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी असले तरी, त्यांचे लेखन मोजकेच आहे. 'ऐसा गा मी ब्रह्म', 'माझे विद्यापीठ', 'जाहीरनामा' आणि 'नव्या माणसाचे आगमन' असे चारच काव्यसंग्रह सुर्वे यांच्या नावावर आहेत. सुर्व्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्या समग्र कवितांचा 'सुर्वे : नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता' हा श्रेयस ग्रंथ पॉप्युलर प्रकाशित केला. या ग्रंथात त्यांच्या कवितेकडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारी प्रा. दिगंबर पाध्ये यांची चिकित्सक प्रस्तावना आणि नारायण सुर्वे यांनी पूर्वी "सनद' या संग्रहासाठी लिहिलेले आणि आता या आवृत्तीत समाविष्ट केलेले मनोगत यांमुळे सुर्वे यांची कविता समजून घेणे अधिक सोपे झाले आहे. पुस्तकाच्या शेवटी सुर्वे यांच्या कवितेवर आजवर झालेल्या समीक्षेची सूची देखील यामध्ये समाविष्ट केली आहे त्यामुळे काव्यप्रेमी वाचकांप्रमाणेच अभ्यासकांनाही हा ग्रंथ तितकाच उपयुक्त आहे.

‘दोस्त हो !
या शतकाची संध्याकाळ सुरू होत आहे.
सहजच उपडी होईल पृथ्वीची होडी,
अॅटमच्या एका गोळय़ात पापणी लवता-लवता मिटून जाल,
खोल-खोल तळात.
हिरोशिमाला नंतर फुले तरी आली.
आपणाला..? '
असा रोकडा सवाल करणारे सुर्वे येणा-या काळावर भाष्य करतात. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली,’ असं वैयक्तिक प्रकटन मांडतानाच ‘कधी विचार असे येतात जसे थकून यावेत तिस-या पाळीचे कामगार असं कटूसत्य प्रसवतात. सुर्व्यांच्या कवितांनी संकेतांची सारी प्रतले मोडीत काढली, तिचा पोत बदलला. एका दुदैवी मातेने फुटपाथवर सोडलेला हा इवलासा जीव पुढे 'घालीन मी सार्या ब्रम्हांडाच्या पाठी | सोडविन गाठी दिक्कालाच्या..' असे म्हणत दिव्य प्रतिभेची अथांग साद घालतो हे सारे अद्भुतच म्हणावे लागेल. मानवतेच्या सागरसीमेपर्यंत आतापावेतो मराठीतील पाच थोर कवी पोहोचू शकले. ज्ञानेश्वरीतील सत्वांश आत्मसात करुन अमृतानुभवात उत्क्रांत झालेले ज्ञानेश्वर, आत्म्याच्या काळोख्या रात्रीतील तडफड भोगून आकाशाएवढा झालेले तुकाराम, हरपल्या श्रेयासाठी व्याकुळ होणारे केशवसुत, मानवी अस्तितवाचा आकांत मांडणारे मर्ढेकर, मानुषतेचा नव्या मळवाटेवारील यात्रिक मुक्तीबोध आणि यंत्राच्याही काळजातील आर्त स्वर टिपणारे नारायण सुर्वे हे सहावे होत. अलौकिक प्रतिभेच्या या सुर्यनारायणाचा १६ ऑगस्ट २०१०रोजी अस्त झाला. त्यांच्या कवितेची आभा आजही वंचितांच्या वेदनांना प्रकाशमान करताना दिसते, तिच्या प्रकाश सोहळ्यात वेदनांचे विमुक्त प्रकटन आजही सशक्त आणि जिवंत वाटते. नारायण सुर्वेंचा शब्दसूर्य नित्य प्रकाश देत राहील यात दुमत नसावे..

- समीर गायकवाड

८ टिप्पण्या:

  1. बापु, देवा तू मराठीचा प्राध्यापक का नाही झालास.
    एवढी शब्दसंपदा, रसास्वाद जोखण्याची, वर्णन करण्याची अपरंपार क्षमता आहे तुमच्याकडे.
    नारायण सुर्वे एक डाव्या विचारसरणीचे महान कवी होते एवढंच आमचं आजवरलं ज्ञान होतं. गद्याचंच वाचन रडत खडत होतं तिथे काव्य..पद्याची काय कथा पण हा ब्लाॅग वाचल्यावर लिखाणाची उर्मि आलीच पण वाचन मनन चिंतनाची खोली किती असते हेही कळलं, नारायण सुर्वे वाचले पाहिजेतच याची प्रबळ इच्छा झाली.यावर छानसं पुस्तक सुचवा. सप्रेम नमस्कार. महेश फडके.

    उत्तर द्याहटवा
  2. बापु, देवा तू मराठीचा प्राध्यापक का नाही झालास.
    एवढी शब्दसंपदा, रसास्वाद जोखण्याची, वर्णन करण्याची अपरंपार क्षमता आहे तुमच्याकडे.
    नारायण सुर्वे एक डाव्या विचारसरणीचे महान कवी होते एवढंच आमचं आजवरलं ज्ञान होतं. गद्याचंच वाचन रडत खडत होतं तिथे काव्य..पद्याची काय कथा पण हा ब्लाॅग वाचल्यावर लिखाणाची उर्मि आलीच पण वाचन मनन चिंतनाची खोली किती असते हेही कळलं, नारायण सुर्वे वाचले पाहिजेतच याची प्रबळ इच्छा झाली.यावर छानसं पुस्तक सुचवा. सप्रेम नमस्कार. महेश फडके.

    उत्तर द्याहटवा
  3. समीर गायकवाड म्हणजे मराठीच विद्यापीठ

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अतिस्तुती लेखकास मारक असते... आपल्या स्नेह आदरासाठी आभारी आहे...

      हटवा