Tuesday, December 6, 2016

जयललितांचे आयुष्य - सापशिडीचा पट !"जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं त्यांच्या आयुष्यात कुठंच घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे......" 


दक्षिण भारतातील लोक उत्तरेकडील लोकांपेक्षा अधिक भावनाप्रधान आहेत. तिकडचे सिनेमे पाहिल्यावर याची प्रचिती जास्त येते. कपडयापासून ते विचारांपर्यंत कमालीचा भडकपणा तिकडे दिसून येतो. तिकडची पुस्तके, गाणी, खेळ आणि वेशभूषा देखील याला अपवाद नाही. तिथली जनताच मुळात भावनाप्रधान असल्याने तिकडचे राजकारणही भावनांच्या आधारे चालते.
त्यामुळे जनता आपआपल्या आवडत्या नेत्याला देवासमान मानते. नेता अत्यवस्थ झाला एव्हढे जरी कानावर आले तरी अनेकजण हात कापून घे, जाळून घे वा फास लावून घे असे आततायी कृत्य करतात. काल मध्यरात्री जयललिता गेल्या तेंव्हा अनेक त्यांच्या अनेक पाठीराख्यांच्या मनात हा विचार डोकावला असेल. कारण जयललिता ह्या अनेकांच्या साठी अम्मा होत्या, देवी होत्या ! पण मला वाटते की जयललितांचे आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने सापशिडीचा खेळ होता. त्या फाईटर कमबॅक क्वीन होत्या. जयलालितांच्या बालपणापासून ते अगदी अपोलोत दाखल होईपर्यंत त्या अनेकवेळा मागे फेकल्या गेल्या पण त्या पुन्हा नव्या जोमाने पुढे आल्या. ह्या वेळेस मात्र त्या कमबॅक करू शकल्या नाहीत, नियतीने त्यांना मात दिलीच. जयलालितांना नेमका काय आजार झाला होता आणि इस्पितळात इतके दिवस त्यांना कोणत्या आजारावरचे उपचार दिले जात होते याची माहिती अजूनही सार्वजनिक झालेली नाही, त्यामुळे अनेक अफवांनी तामिळनाडू सध्या ग्रासले आहे. सीक्रेसी, वादविवाद, संपत्ती, सत्तास्पर्धा, खलनीती, ममता, संयम. जिद्द आणि एकाधिकारशाही यांचे एकत्रित रसायन म्हणजे जयललिता होत .....

२४ फेब्रुवारी, १९४८ ला मंड्या जिल्ह्यातील मेदूकोटे ह्या छोटयाश्या खेडयात जयराम व वेदवल्ली अयंगार ह्या दांपत्याच्या पोटी जयांचा जन्म झाला तेंव्हा त्यांचे आजोबा म्हैसूरच्या शाही राजवाडयात पॅलेस सर्जन होते. त्यांचे चांगले नाव होते. जयललितांचे पाळण्यातले नाव 'गोमलावल्ली' होते. 'जयविलास'
आणि 'ललिताविलास' ह्या दोन घरात त्यांचे बालपण गेल्याने जया एक वर्षाच्या असताना त्यांचे नाव जयललिता असे ठेवले गेले.    काळाने त्यांना पहिला फटका वयाच्या दुसऱ्या वर्षी वडीलांच्या अकस्मात निधनाने दिला होता. या प्रसंगी जयांची आई केवळ विशीतली तरुणी होती. जयांचे आपल्या वडीलांबाबत मत प्रतिकूल होते, एका प्रकट मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, "माझे वडील नुसते मौजमस्ती करण्यात दिवस घालवत असतं...He was gentleman of pleasure." वडील वारल्यानंतर जया आणि त्यांचे कुटुंब वडिलांच्या मूळ गावी बेंगळूरात आले. जयांच्या आईंस वेदवल्लीस अंबुजावल्ली नावाची धाकटी बहिण होती. जयांची ही मावशी हवाई सुंदरी झाली आणि तिने आपला बोऱ्याबिस्तरा चेन्नैला हलवला. हवाईसुंदरी म्हणून काम करताना तिच्या सौंदर्यावर भाळलेल्या तमिळ निर्मात्यांनी तिला नाटक, चित्रपटांची ऑफर दिली. 'विदयावती' नावाने तिने तमिळ सिनेमात अल्पावधीत आपला जम बसवला. बहिणीच्या यशाने हुरळून गेलेल्या वेदवल्लीने देखील जयाला आपली बहिण पद्मावतीच्या हवाली करून चेन्नै गाठले. संध्या नाव धारण करून तिने देखील तमिळ सिनेमात अल्पावधीत जम बसवला. १९५० ते १९५८ अशी आठ वर्षे जया आपल्या आईपासून दूर राहिल्या याची त्यांना रुखरुख राहिली.

नियती जयांच्या मनासारखे काहीच घडू देत नव्हती. वडील अकाली गेलेले आणि आई दूरदेशी अशा अवस्थेत ज्यांनी आपल्या अभ्यासावरच आपलं मन लावलं आणि त्याचा परिणाम कालांतराने पुढे दहावीच्या परीक्षेत दिसून आला. दहावीच्या परीक्षात त्या तमिळनाडू बोर्डात राज्यात पहिल्या आल्या होत्या.
दरम्यान १९५८ मध्ये पद्मावतीचे लग्न ठरले आणि जयांना आईकडे चेन्नैला येण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या जयांची अभ्यासात जेव्हढी रुची होती तितकीच नाट्य व नृत्यात होती. जयांचे तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्लिश यावर जसे अद्भुत प्रभुत्व होते तसेच प्रभुत्व भरतनाटयम, मोहिनीअट्टम, मणिपुरी आणि कथक नृत्यावर होते. जयललिता वयाच्या ६ व्या वर्षांपर्यंत आपल्या आईबरोबरचं राहत होत्या.त्या दोन वर्षात त्यांची दिनचर्या साचेबंद होती. त्याचा उल्लेख त्यांनी 'जनता की अदालत' या कार्यक्रमात केला होता. त्या म्हणाल्या होत्या, “ मी माझं बालपण केवळ ४ वर्षापर्यंतच जगले. मी रोज सकाळी ५ वाजता उठत असे आणि झोपेतून उठताच शास्त्रीय कर्नाटकी संगीत शिकवायला शिक्षिका हजर असतं. त्यानंतर मी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत शाळेत जातं असे. शाळेतून घरी पोहचायच्या अगोदरच घरी दोन शास्त्रीय नृत्य शिकवायला शिक्षिका हजर असतं.या सगळ्यामध्ये माझी खूप चिडचिड व्हायची. मात्र याचा त्या दोघींवर काहीच फरक पडत नसे”. ह्याच्या दुसरया परिणामस्वरूप त्या कुशल नृत्यांगना झाल्या. मे १९६० मध्ये जयांच्या नृत्यांचे प्रथम प्रस्तुती अरंगेत्रम थाटात झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते विख्यात तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन ! त्यांनी जयांचे सौंदर्य व नृत्य पाहून त्याच दिवशी सांगितले की ही मुलगी एक दिवस तमिळ सिनेमाची महानायिका होईल ! आणि झालेही  तसेच ....

जयांची मावशी, आई ह्या दोघींनी एव्हाना तमिळ सिनेमात आपले बस्तान बसवलेले असल्याने जयांना सिनेमाची दारे लगेच उघडली. श्रीशैल महात्म्य ह्या कन्नड सिनेमातून जयांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाचे जिथे चित्रीकरण सुरु होते त्याच स्टुडीओत संध्या उर्फ वेदवल्लीच्या सिनेमाचे काम सुरु होते, जया आपल्या आईसोबत तिथे हजर होत्या. डॉक्टर राजकुमार अभिनित त्या कन्नड चित्रपटातील सीनच्या चित्रीकरणातील बालकलाकाराला पार्वतीचे काम करायचे होते पण ती वेशभूषा अंगावर चढवली की तो
बालकलाकर रडू लागे. आसपासच्या फ्लोअरवरील संध्याच्या कानावर ही माहिती येताच ती जयांना घेऊन तिथे गेली. जयांच्या अंगावर पार्वतीची वस्त्रे चढली आणि शॉट ओके झाला !  अशा प्रकारे कन्नड सिनेमात त्यांची एन्ट्री झाली, तिथून रंगमंचावर पदार्पण झाले. या दरम्यान 'आपल्याला हे करिअर करायचे नसून एक नामवंत वकील व्हायचे असे आहे' असे जया आपल्या आईला वारंवार सांगत असत. त्यामुळे जयांच्या सुट्याचा ताळमेळ घालून हे शुटींग होई. 'द एपिस्टर' ह्या इंग्रजी सिनेमापासून ते हिंदीतल्या 'मनमौजी'पर्यंत जयांना बालकलाकार म्हणून काम मिळाले. १९६४ मध्ये संध्या ज्या चित्रपटात काम करत होती त्याचे निर्माते दिग्दर्शक होते बी.आर.पंतुलू. त्यांनी जयांना पाहिले. आपल्या महत्वाकांक्षी 'चिन्नद गोम्बे' ह्या सिनेमासाठी त्यांनी जयांना हिरोईन म्हणून साईन करायचे ठरवले, तेंव्हा हे काम गळ्यात पडले तर आपली वकीली कधीच पूर्ण होणार नाही हे ओळखून जयांनी सहा आठवडयात शुटींग पूर्ण करून मोठी बिदागी मागितली. त्यांना वाटले पंतुलू ह्या अटी मान्य करणार नाहीत. पण झाले उलटेच. पंतुलूंनी अटी मान्य केला. चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला आणि नामी वकील होण्याचे जयांचे स्वप्न कायमचे भंगले ! नियतीने जयांना पुन्हा हरवले. याकाळात जयांच्या आईची कारकीर्द उतरणीला लागल्याने जयांना रुपेरी पडदा अव्हेरणे शक्य झाले नाही. घरी आजोबा सेवानिवृत्त झालेले, मावशीची मुले आणि थकलेली आई ह्या सर्वांचा गाडा रेटण्यासाठी जयांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही ... 

कन्नड सिनेमात जयांचा चेहरा नावानिशी ओळखला जाऊ लागला आणि तमिळ, तेलुगु निर्मात्यांचे - अभिनेत्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. १९६५ मध्ये सी.व्ही.श्रीधरच्या 'व्हेन्नीर अदै' मधून जयांनी तमिळ सिनेमात श्रीगणेशा केला तर तेलुगु सुपरस्टार ए नागेश्वर राव सोबत 'मंशुलू ममतालू'द्वारे तेलुगुत पाय रोवणारया जयांनी १९८० आपला अखरेचा तेलुगु सिनेमा नागेश्वर राव सोबतच केला होता. तमिळ सिनेमात स्कर्ट परिधान करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री
ठरल्या होत्या. १९६८ मध्ये धर्मेंद्रसोबत जयांनी 'इज्जत' ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. पण खऱ्या अर्थाने त्यांचे पडद्यावरचे अन जीवनातले नायक ठरले एमजीआर - एम जी रामचंद्रन ! १९६५ ते १९७३ ह्या आठ वर्षात ह्या जोडीने एक नव्हे दोन नव्हे तर अठ्ठावीस सुपरहिट सिनेमे केले ! ही जोडी ड्रीमकपल ठरले. ह्या सर्व काळात इतरही अनेक मुख्य नायकांसोबत जयांनी काम केले. पौराणिक कथांपासून ते हॉट रोमान्सपर्यंतच्या सर्व कथांना त्यांनी न्याय दिला. जयललिता बिकिनी घालणारया पहिल्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या कारकिर्दीत तमिळ, तेलुगु व कन्नड सिनेक्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना  सन्मानित केले गेले.


जयललिता आणि एम.जी.आर यांच्या वयामध्ये ३१ वर्षांचा फरक होता, तरीही त्यांच्या जोडीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. पुढे त्यांची जोडी फक्त सिनेमांपूर्ती मर्यादीत न राहता त्या जोडगोळीने राजकारणात प्रवेश केला. जयललिता
यशाच्या शिखरावर असताना अचानक त्यांच्या आईचे निधन झाले.याचा परिणाम म्हणून जयललिता यांनी सिनेमांमधून काढता पाय घेतला, एवढेच नाहीतर त्यांनी अनेकदा आपले आयुष्य संपवून टाकण्याचा देखील प्रयत्न केला.त्यांनी एम.जी.आर बरोबरचे आपले संबंध देखील कमी केले आणि त्या मद्रास सोडून हैद्राबादमध्ये रहायला लागल्या.

१९८० साली जयललिता यांच्या आयुष्यात एम.जी.आर यांचा पुन्हा प्रवेश झाला. एम.जी.आर पूर्वीपासूनच तमिळनाडूच्या राजकारणात सक्रीय होते.ते द्रविद मुनेत्र कडगम पक्षाचे कार्यकर्ते होते. मात्र १९७२ साली एम.जी.आर यांनी अण्णा द्रमुक (AIADMK) या पक्षाची स्थापना केली आणि १९७७साली एम.जी.आर तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. जयललिता या एका ब्राम्हण
कुटंबातून होत्या मात्र त्या अशा पक्षाचे काम करत होत्या जिथे ब्राम्हणवादी विचारांचा विरोध केला जात होता. अशा परिस्थितीत जयललिता यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले.मात्र थोड्याच काळात त्यांना पक्षात महत्वपूर्ण स्थान देण्यात आले.यामुळे पक्षांतर्गत कुरबुरी सुरू झाल्या. म्हणून जयललिता यांना १९८३ साली राज्यसभेत पाठवण्यात आले. राज्यसभेतील त्यांच्या कार्याचे कौतुक केले गेले. दरम्यानच्या काळात जयललिता यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी कसून प्रयत्न केले.त्यासंदर्भात त्यांनी राजीव गांधीशी पत्राद्वारे शिफारसदेखील केली.हे सगळं एम.जी.आर यांच्या कानावर पडताचं त्यांनी जयललितांकडून पक्षाच्या
संदर्भातील सगळे हक्क काढून घेतले. या सगळ्या प्रकारामुळे जयललिता यांना प्रचंड अपमान सहन करावा लागला.याच काळात मुख्यमंत्री पदावरील एम.जी.आर यांची तब्बेत खालावली आणि त्यांना न्यूयॉर्कला हलवण्यात आले. खरे तर जयांना एमजीअार २५ डिसेंबरला पक्षातून काढणार हाेते. मात्र २४ डिसेंबरलाच त्यांचे निधन झाले .

एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जयललितांना घरी येऊ दिले नाही. जयललितांवर पुस्तक लिहिणाऱ्या वासंती यांच्यानुसार जयललिता एमजीआर यांच्या घरी पोहोचल्या, दार ठोठावू लागल्या, बऱ्याच उशिरानंतर गेट उघडण्यात आले. मात्र मृतदेह कुठे ठेवला आहे हे त्यांना सांगण्यात आले नाही. एका खोलीपासून दुसऱ्या खोलीकडे त्या अक्षरश: पळू लागल्या, परंतु प्रत्येक दरवाजा बंद करून घेण्यात आला. मृतदेह मागच्या दरवाजातून राजाजी हॉलमध्ये नेल्याचे त्यांना नंतर सांगण्यात आले. जयललिता तातडीने तेथे
पोहोचल्या. धक्काबुक्की सहन करत त्या एमजीआर यांच्या मृतदेहापर्यंत पोहोचल्या. दोन दिवस त्या मृतदेहाजवळ उभ्या राहिल्या. पहिल्या दिवशी १३ तास आणि दुसऱ्या दिवशी तास. एमजीआर यांच्या पत्नी जानकी यांच्या समर्थक महिला जयललितांच्या पायावर प्रहार करत राहिल्या, पण त्या जागच्या हलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यातून अश्रूही आले नाहीत. मृतदेह शववाहिकेतून नेत असताना त्या मागे पळत राहिल्या. एका जवानाने मदतीचा हात देऊन त्यांना वर घेतले. पण जानकी यांच्या पुतण्याने धक्का देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर हताश होऊन त्या घरी परतल्या.

एम. जी. आर. यांच्या मृत्यूनंतर पक्षात त्यांचा उत्तराधिकारी काेण यावरून रणकंदन झाले. पक्षाचे अनेक नेते त्यांच्या पत्नी जानकी यांच्या बाजूने हाेते. पक्ष आणि सरकार चालवण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले, ज्यामध्ये जयललिता यांचा समावेश नव्हता. या सगळ्या प्रकारानंतर अण्णा द्रमुक पक्षाचे दोन भागात विभाजन झाले. एम.जी.आरच्या समर्थकांनी पक्षाचा कारभार साभांळण्यासाठी त्यांचीच पत्नी जानकी रामचंद्रनची निवड केली. मात्र जानकी यांचा प्रभाव दिसून येण्या आधीच तमिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
करण्यात आली. नंतर कालांतराने तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्या वेळी जयललिता यांनी वेगळा पक्ष काढला. जयललिता यांना त्यांचा प्रचार करण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली .त्यांच्या सभांना प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहत असे.त्या निवडणूकांमध्ये पक्षाला प्रचंड यश मिळाले. निवडणुका डीएमकेने जिंकल्या. जयललितांचा पक्ष २३ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर हाेता. जानकी यांच्या पक्षाला एक जागा मिळाली. त्यानंतर अण्णाद्रमुकचे दाेन्ही भाग जयललितांच्या नेतृत्वाखाली एकत्र अाले. त्यांना नशिबाची साथ लाभली. पण या सगळ्याचे श्रेय तर जयललितांना मिळालेच नाही आणि मंत्रीपदसुद्धा नाही.

१९८९ तमिळनाडू विधानसभा निवडणूका झाल्या, त्यात अण्णा द्रमुक पक्षाचा दारून पराभव झाला.त्यामुळे जयललितांच्या विरोधकांना पक्षाची सर्व सूत्रे जयललितांकडे परत सोपवावी लागली. १९९१ च्या निवडणूकीत जयललिता यांच्या पक्षाने कॉंंग्रेस सोबत युती केली आणि १९९१ साली त्या पहिल्यांदा
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. इथे त्या सत्तेत येण्यास कारणीभुत ठरले डीएमकेचे आमदार ! २५ मार्च १९८९ ला तामिळनाडू विधानसभेत जयांच्या साडीस हात घातला गेला. द्रौपदी वस्त्रहरणाशी याची तुलना केली गेली. याचा जयांनी पुरेपूर भावनिक लाभ उठवला. त्यांनी सत्तेत आल्याशिवाय विधानभवनात पाय टाकणार नाही अशी प्रतिज्ञा केली. सभांमधून त्या ह्या मुद्द्याचा अतिशय खुबीने वापर करत असत. यामुळे डीएमके पिछाडीस पडले..

दरम्यान, त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या त्या म्हणजे त्यांची खास मैत्रीण शशीकला हिच्या भाचाच्या लग्नात जे करोडो रूपये उडवले गेले त्यामुळे.
लग्नात जे करोडो रूपये खर्च केले गेले ते सरकारी खजिन्यातून वापरले गेल्याचा आरोप जयललिता यांच्यावर करण्यात आला. १९९५मध्ये जयललितांनी ह्या दत्तक पुत्राच्या लग्नात कोटी रुपये खर्च केले. हा विवाह सर्वात महागडा विवाह सोहळ्याच्या रुपात गिनिज बुकमध्ये नोंदविला गेला होता. मात्र जयललिता यांनी तो सगळा खर्च मुलीकडून करण्यात आला असल्याचं सांगून त्या चर्चेला पूर्णविराम दिला.

दिवसेंदिवस तमिळनाडूमध्ये जयललिता यांचा प्रभाव वाढत होता. तमिळनाडूतील जनता जयललिता यांना देवासमान मानून पूजत होती.मात्र हा विश्वास फार काळ टिकणारा नव्हता. १९९६च्या निवडणूकांमध्ये त्यांना अपयश आलं आणि एम. करूणानिधीचं नेतृत्व असणारा डी.एम.के पक्ष पुन्हा सत्तेत
आला.त्या लगोलग जयललितांवर एक दोन नाही तर तब्बल ४६ भ्रष्टाचाराच्या आरोपांचा ठपका ठेवण्यात आला १९९६मध्ये करुणानिधींनी जयललितांच्या  निवासस्थानावर छापे टाकविले. तेव्हा छाप्यात ३० किलो सोने, ८०० किलो चांदी हिरे जडीत दाग-दागिने मिळाले. १२ हजार साड्या, ७५० जोड्या सॅंण्डल. १९ कार्स, ३८ एसी आणी ९१ लक्झरी घड्याळीही मिळाल्या. न्यायालयाने चार वर्षासाठी शिक्षा आणि १०० कोटीच्या शिक्षेची सजा सुनावली. सीएम पद सोडावे लागले. त्यामुळे जयललिता यांना ६ महिन्याच्या कालावधीसाठी तुरूंगात जावे लागले.

 जयललिता यांनी या अपमानाचा बदला २००१ साली घेतला जेव्हा त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी निवडून आल्या. त्यांनी रातोरात माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांना अटक करण्याचे आदेश काढले. या घटनांदरम्यान जयललिता केंद्रीय राजकारणात सक्रीय झाल्या.त्यांनी १९८८ च्या लोकसभा निवडणूकांसाठी कॉंंग्रेसला झिडकारून भाजपासोबत हातमिळवणी केली मात्र थोड्याच काळात त्यांनी कॉंग्रेस सोबत पुन्हा एकदा युती केली.त्यामुळे १३ महिने सत्तेत असलेलं अटल बिहारी वाजपेयी याचं सरकार रातोरात पडलं.यातून जयललिता यांना काहीच फायदा झाला नाही, याउलट त्या केंद्रीय रा़जकारणातून बाहेर फेकल्या गेल्या. २००१ साली जयललिता मुख्यमंत्रीपदी निवडून येताच त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावर पुन्हा पाणी सोडावं लागलं. त्यात शशिकला प्रकरणाची भर पडली. शशिकला ही जयललिताची जिवलग मैत्रीण होती. ९० च्या दशकापासून पुढे दोन दशके ती सावलीसारखी सोबत होती. पण २०११ मध्ये आरोप लावून शशिकला ने पति नटराजन यांना सीएम बनविण्यासाठी जयललिता ला स्लो पॉईजनिंगने मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर जयललितांनी शशिकलास आपल्या घरासह पक्षातूनही
काढून टाकले होते. ह्या वेगळेपणाचा राग १०० दिवसच चालला. शशिकलाद्वारे माफी मागितल्यावर जयललिताने तिला पुन्हा एकदा आपलेसे करुन घेतले. त्यानंतर २०११ च्या निवडणूकांमध्ये अण्णा द्रमुक पक्षाने इतर ११ पक्षांसोबत युती करून पुन्हा विजय मिळवला. २०१४च्या लोकसभा निवडणूकीत जयललितांच्या पक्षाला विजय मिळाला.तमिळनाडूमध्ये भाजपाला शिरकावदेखील करून दिला नाही. अखेर २७ सप्टेंबर २०१४ रोजी जयललिता यांना ६६.६५ कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ४ वर्षांचा तुरूंगवास झाला.त्यांचा जामीन अर्जदेखील फेटाळण्यात आला. २०१६ च्या
विधानसभा निवडणुकात त्यांना करारी हार मिळणार असे भाकीत सर्व राजकीय प्रकांड पंडितांनी वर्तवले होते, पण त्यांना तोंडघशी पाडत सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा भीमपराक्रम १९८४नंतर प्रथमच घडवला. सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झालेल्या जयललिता एव्हाना प्रादेशिक नेत्या न राहता देशपातळीवरील महत्वाच्या राजकीय नेत्या झाल्या होत्या. जीएसटी वरून त्यांनी केंद्राची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. पूर्ण बहुमतातील सरकार आल्यावर त्यांनी करुणानिधींना रातोरात त्यांच्या घरातून अपमानास्पद रित्या अक्षरशः 'उचलले' होते तेंव्हा सुडाच्या ह्या नाट्याने देश स्तब्ध झाला होता. देशभरातून टीका झाली पण जया टस की मस झाल्या नव्हत्या.  

जयांनी पॉप्युलर राजकारणाचे नवनवे फंडे आजमावले आणि त्यात त्या इतक्या यशस्वी झाल्या की लोकांनी त्यांना आपल्या 'अम्मा'चा (आई) दर्जा दिला. जयांच्या अम्मा कँटीनमध्ये २ रुपयांत इडली मिळते तर दोन रुपयांत राेट्या डाळ, रुपयांत लेमन राइस किंवा कर्ड राइस सांबारासह अाणि १० रुपयांत पूर्ण जेवण दिले जाते. मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होताच स्त्री भ्रूणहत्या राेखण्यासाठी त्यांनी कठाेर पण लोकप्रिय पावले उचलली त्यामुळे तामिळनाडूत लिंगगुणाेत्तर समताेल राहिला. महिलावर्गाने त्यामुळे त्यांना उचलून धरले. शाळेत मुलांना वडिलांचे नाव लावण्याची सक्ती रद्द केली. फक्त अाईचे नाव पुरे नवी क्रांतिकारक भूमिका अस्तित्वात आणली. तृतीयपंथीयांना शाळा 
महाविद्यालयात प्रवेश देण्याची व्यवस्था केली. गरिबांना माेफत उपचार देण्याची व्यवस्था केली. राज्यात रेशनकार्ड धारकांना २० किलाे तांदूळ माेफत देण्याची योजना त्यांनी राबवली. अम्मा पाणी, अम्मा मीठ, अम्मा सिमेंट अाणि गरीब महिलांसाठी माेफत सॅनिटरी नॅपकिन पुरवले. यंदाच्या निवडणुकात त्यांनी अम्मा लॅपटॉप लॉँच केला तेंव्हा त्यांच्यावर उधळपट्टीची झोड उठली पण नेहमीप्रमाणे टीकाकारांना भीक न घालता त्यांनी आपली योजना राबवली देखील ! तामिळनाडूत राज्याचा २७ टक्के खर्च त्यांनी अशा अनुदानांवर नेला पण लोककल्याणकारी नेत्या ही छबी त्यांनी मोठ्या प्रेमाने व हौसेने जोपासताना करुणानिधींच्या डीएमकेसह सगळ्या राजकीय पक्षांना नामोहरम केले होते.

कांजीवरमची हिरवी आणि विटकरी रंगाची साडी त्यांची विशेष पसंतीची साडी होती. मनगटावर रोलेक्सचे महागडे घड्याळ. साडीच्या रंगानुरूप
चपला,बांगड्या आणि ज्वेलरी हा त्यांचा छंद ! चेन्नईच्या अत्यंत राजेशाही परिसरात त्यांचा वेद निलयमहा बंगला आहे. याबाबत अशी वदंता आहे की, त्यांचे निवासस्थान म्हणजे भूतलावरचा स्वर्गच जणू. यात रम्य बागांपासून ते जलतरण तलावापर्यंतच्या सुविधा आहेत. बिलियर्डस पुल, टेनिस कोर्ट, भव्य लायब्ररी आहे. शिवाय, देशविदेशी संगमरावरापासून सजवलेल्या भिंती अन अत्यंत महागडे इंटेरिअरही याच्या सजावटीत वापरण्यात आले आहेत. त्यातही नोकरचाकरांची रेलचेल अन दिमतीला महागड्या गाड्या. असे डोळे दिपवणारे वैभव. पण मागील दोनेक वर्षात ह्या झगमगाटी राहणीमानापासून त्या दूर गेल्या होत्या. आपल्या व्यस्त दिनचर्येतून त्यांना जेव्हा वेळ मिळायच तेव्हा त्या थेट स्वयंपाकात मग्न होऊन जात. लिहण्याचा त्यांचा छंद वेगळाच. त्यांनी इंग्रजी आणि तमिळ भाषेत लिहलेल्या कादंबऱ्या आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. अभिनय ही कला, लिहणे हा छंद अशा वैशिष्ट्यांव्यतिरिक्त त्यांच्यात एक घोडेस्वार लपली होती. हे खूप कमी लोकांना माहित आहे. जयललिता घोडेस्वारीत पारंगत होत्या. घोड्यांवरची त्यांची
लगामच त्यांना राजकारणातील नियंत्रण शिकवून गेली होती. राजकारणाचा गंध नसलेल्या जयललिता एम.जी.आर याचं बोट धरूनं राजकारणात आल्या, तिथे त्या रमल्या आणि यशस्वी देखील ठरल्या. मात्र वाळवीने स्वतःचचं अस्तित्व असलेल्या घराला पोखरावं तसं जयललिता यांनी लालसेपायी लोकशाही शासन प्रणालीची व्यवस्था पोखरली. जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे.

काल रात्री जयलालितांचे निधन झाल्यावर त्यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले ओ. पनीरसेल्वम शपथग्रहणावेळी शोकमग्न होते,
तमिळनाडूची जनता गल्लोगल्ली शोक करतेय. जयललिता हयात असताना जिथे जिथे जात तिथे तिथे सोन्याच्या रंगात मढलेली त्यांची सिंहासनरुपी खुर्ची सदैव त्यांच्यासोबत असे. ती खुर्ची सांभाळण्यासाठी त्यांनी स्वतंत्र नोकराची नेमणूक केलेली होती. पनीरसेल्वम यांना सीएमपदाची खुर्ची मिळाली पण ह्या सुवर्णसिंहासनावर ते विराजमान होऊ शकत नाहीत. जोवर ह्या खुर्चीला नवा वारस मिळत नाही तोवर तामिळनाडूच्या राजकारणात सापशिडीचा राजकीय खेळ चालूच राहील हे नक्की !

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment