Thursday, December 15, 2016

'सूर्यवंशम' - थ्रू डिफरंट अँगल ....


'सूर्यवंशम' सेट मॅक्सवर किती वेळा लागला ह्यावर खूप कॉमेंटस आणि विनोद तुम्ही सर्वांनी वाचले असतील. त्याच 'सूर्यवंशम' मधील एका सीनची ही गोष्ट. हिरा हा ठाकूर भानूप्रताप यांचा मुलगा. त्याची गौरीशी लहानपणापासून मैत्री असते. तिच्या मैत्रीपायी त्याची शाळा सुटते, अभ्यासात ढ असणारा हिरा अधिकच बदनाम होतो. मैत्रीचे रुपांतर एकतर्फी प्रेमात होते. तारुण्यात पदार्पण केल्यावर गौरीशी लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या हिराला मोठा धक्का बसतो. त्याचे वडील त्याच्यावर अजूनच नाराज होतात. लग्न ठरवल्यावर ऐन वेळेस गौरी लग्नास नकार देते. हिरावर पुन्हा अपयशाचे शिक्के बसतात. मात्र साध्या भोळ्या हिरावर राधाचे प्रेम बसते. राधाच्या आईची इच्छा असते की राधाचे लग्न ठाकूर देशराजच्या मुलाशी व्हावे. हिरा राधाच्या प्रेमाचा स्वीकार करतो. भर मांडवातून तिला उचलून नेतो. तिच्याशी विवाह करतो. हिराची आई ठाकूर भानूप्रतापला खूप काही सुनावते. चिडलेला भानूप्रताप त्या दोघांना घरात न घेता संतापाच्या भरात वाट्टेल ते बोलतो. हिरा आणि राधा भानूप्रतापचा आशीर्वाद न मिळाल्याने निराश होऊन परततात. ते एका लहानशा घरात साधेपणाने गरिबीच्या कठीण दिवसांत आपला संसार सुरु करतात. बेरोजगार असणारा हिरा राधाला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सांगतो आणि स्वतःला मिळेल त्या कामाला जुंपून घेतो. एकदा राधाकडे तिचे वडील येतात त्या सीनची ही पोस्ट..

एके दिवशी राधाचे वडील राधाला भेटायला तिच्या छोटेखानी घरी येतात. ते दारातून आत दाखल होतात तेंव्हा राधाच्या हाताला लावलेली मेंदी ओली असते त्यामुळे हिरा आपल्या हाताने मोठ्या प्रेमाने तिला घास भरवत असतो. राधाच्या वडीलांना वाटते की राधाच्या हाताला काही जखम झालेली असेल त्यामुळे हिरा तिला खाऊ घालतोय, सत्य कळल्यावर त्यांचे प्रेम बघून राधाचे वडील खूप सुखावतात. आपल्या लेकीवरचे जावयाचे प्रेम बघून खळाळून हसतात. त्यांना मनोमन आनंद होतो, मग ते सांगतात की ठाकूर देशराजच्या असंस्कृत मुलाशी राधाचे लग्न व्हावे हे त्यांनाही आवडलेलं नव्हतं. त्यांचीही इच्छा असते की राधा आणि हिराचे लग्न व्हावे पण राधाच्या आईच्या मोठ्या घराच्या हव्यासापायी अन हट्टापायी ते गप्प राहिलेले असतात. राधाचे वडील लग्नाच्या वेळी काही देता आले नाही म्हणून त्या दोघांसाठी काही कपडे व मिठाई घेऊन आलेले असतात. ते कपडे - मिठाई देऊ लागताच राधा त्यांना अडवते. 'आईला न सांगता परस्पर हे कपडे दिले जात असतील तर आम्हाला ते नकोत' असं वडिलांना विनवते. आई आणि बाबा दोघांनी मिळून ते कपडे दिले तर मात्र त्यांचा आनंदाने स्वीकार करेन असं ती सांगते.

राधाचे वडील राधाच्या इच्छेचा मान राखून ते कपडे - मिठाई बॅगेत परत ठेवतात. राधा त्यांना म्हणते, 'तुम्ही पहिल्यांदा घरात आलात, काही तरी खाऊन जावे लागेल. खायला काय करू ?' त्यावर 'लेकीच्या घरी पाणी पिणे सुद्धा मला आवडणार नाही' असं सांगत राधाचे वडील जायला निघतात. तेंव्हा राधा त्यांना अडवते. शेवटी ती जे काही खाऊ घालेल ते आनंदाने खाईन असं ते सांगतात. राधा स्वयंपाकघरात जाते. घरात खाण्याची कुठली जिन्नस शिल्लक नसते. आता काय करायचे असा प्रश्न पडतो. शेवटी हिरा तिला सांगतो रात्रीचाचा थोडासा भात असेल त्याचेच काही तरी बनव. मग ती हिराला दुध साखर आणायला बाहेर पाठवते. तोवर स्टोव्ह पेटवून पुढच्या तयारीला लागते. राधाचे वडील दिग्मूढ होऊन तिच्याकडे पाहतच राहतात. एकेकाळी स्वतःच्या अलिशान स्वयंपाकघरात फोडणीच्या वासाने ठसका लागणारी आपली मुलगी घासलेटचा भकभकता स्टोव्ह पेटवून त्यावर आपल्या गरीब घरातील उरल्या सुरल्या पदार्थाचे व्यंजन बनवते तेंव्हा नकळत त्यांचे डोळे पाणावतात. रात्रीच्या भातात दुध साखर घालून राधा त्याचाच मिठी भात बनवून वडिलांच्या पुढ्यात मोठ्या मायेने ठेवते. 'जी मुलगी कधी किचनमध्ये पाऊल ठेवत नव्हती ती इतकी चांगली कूक कशी काय झाली ' असा मिश्कील सवाल करत मुलीने बनवलेली मिठी भात मन लावून खातात. श्रीमंतीत लाडाकोडात वाढलेली आपली मुलगी परिस्थितीशी जुळवून घेत इतक्या सुखात जगते आहे याचे त्यांना समाधान वाटते. तिने बनवलेला मिठी भात त्यांना इतकी आवडतो की ते शिल्लक असलेला भात राधाच्या आईसाठी डब्यात घालून आपल्या घरी घेऊन तृप्त मनाने तिथून निघतात...

राधाचे वडील घरी परतल्यावर त्यांची पत्नी टोमणा मारूनच त्यांचे स्वागत करते. 'अपनी भगौडी बेटी और गंवार दामादसे मिल आये क्या ?'असा खोचक सवाल करते. 'हिरा हा असा हिरा आहे की ज्याला जवाहऱ्याची पारखी नजर आवश्यक नाही. तो आपल्या पत्नीला राधाला, डोळ्यांच्या पापण्यात झुलवत ठेवतो. इतकं प्रेम तो तिच्यावर करतो' असे ते सांगतात. त्यावर 'हिराने राधाला पळवून नेले आहे, इतका देखावा तर त्याला करावा लागणारच' असा टोला राधाची आई लगावते. 'त्याचा प्रेमाचा देखावा असला तरी हरकत नाही पण आपली राधा तिथे खूप खूश आहे. तिने बनवलेला स्वादिष्ट गोड मिठी भात खूप छान आहे. खास तुझ्यासाठी आणलाय. खाणार का ?' असं राधाच्या वडीलांनी विचारताच 'तुम्ही आणलेलं हे जे काही आहे ते माणसाच्या खाण्यालायक नाही' असं ती कुचकट बोलते. राधाचे वडील मिठी भातचा डबा फ्रीजमध्ये ठेवतात. रात्र उलटल्यावर अंथरुणात निद्रादेवीची आराधना करत पडून असणारी अन मुलीच्या आठवणीने अस्वस्थ झालेली राधाची आई हळूच बेडवरून उठते. किचनमध्ये जाते, आवाज न करता फ्रीजचे दार उघडून त्यात ठेवलेला मिठी भातचा डबा हळूच बाहेर काढते. केंव्हा एकदा त्याची चव घेईन असे तिला झालेले असते. डबा उघडून अधाशासारखं खाऊ लागते, तिला देखील मिठी भात आवडतो. खाता खाता तिला ठसका लागतो. तिच्या चाहुलीने मागेमागे आलेले राधाचे वडील तिला अंधारात पाण्याचा ग्लास देऊ करतात. 'मुलीच्या हातचा मिठी भात कसा वाटला ? आवडला का ?' असा प्रश्न विचारताच राधाच्या आईचे अवसान गळून पडते. ती आपल्या नवऱ्याच्या कुशीत शिरते, तिच्या अश्रुंचे बांध फुटतात. 'कैसी है मेरी बच्ची ? खूश तो है ना ?'असं विचारत हमसून हमसून रडू लागते. राधाचे वडील तिला सांगतात की आपली राधा खूप सुखात आहे...

मुले आणि आईवडील यांच्यात कोणत्याही कारणाने किती जरी दुरावा झाला तरी त्यांच्या अंतःकरणात खोल कुठेतरी मायेचा ओलावा टिकून असतो हेच खरे. त्याचे चित्रण या सीनमध्ये खूप सुंदर साकारले आहे. फिकट निळ्या साडीतली सौंदर्या या सीनमध्ये खूप सुंदर दिसते. 'सीआयडी'मुळे घरोघरी पोहोचलेले शिवाजी साटम या सीनमध्ये भाव खाऊन जातात. बिंदूच्या सफाईदार वावराबद्दल लिहिण्याची आवश्यकता नाही. उलट अमिताभ थोडासा केविलवाणा वाटतो. भानूप्रताप जेव्हढा करारी वाटतो तितका हिरा भावत नाही. असो...अमिताभची दुहेरी भूमिका असूनही 'सूर्यवंशम'चा प्राण म्हणजे 'सौंदर्या'च होय. या चित्रपटात अनेक खटकेबाज सीन आणि संवाद आहेत पण भावूक करून जाणारया या सीनची बातच कुछ और होती. सूर्यवंशमच्या अतिरेकी स्क्रीनिंगमुळे एकच फायदा होतो तो म्हणजे सौंदर्याला अधून मधून पाहता येतं. तिचं अकाली जाणं चूटपुट लावून गेलं. ती नावासारखीच सुंदर होती. पण ती नुसती शोभेची बाहुली नव्हती. तर तिचा अभिनयही उत्कृष्ट होता. सातत्याने स्क्रीनिंग करून या चित्रपटाचे हसे झाले असले तरीही कधी हा सिनेमा लागल्याचे ध्यानात आले तर फक्त 'सौंदर्या'साठी काही मिनिटे का होईना पण मी हा 'सेटमॅक्सवंशम' (!) पाहतो...

- समीर गायकवाड.